‘केजीएफ चॅप्टर २’ चित्रपटाबद्दलच्या १० अशा गोष्टी ज्या तुम्हाला माहिती नसतील
सध्या सगळीकडे चर्चा रंगली आहे ती ‘केजीएफ चॅप्टर २’ (KGF: Chapter 2) या चित्रपटाची. या चित्रपटामुळे दाक्षिणात्य चित्रपटांना मिळणाऱ्या लोकप्रियतेमध्ये अजून एका चित्रपटाची भर पडली आहे. दाक्षिणात्य चित्रपट गर्दी खेचतात याची कारणं आहेत. यापैकी महत्वाची कारणं म्हणजे उत्कृष्ट कथानकासोबत अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आणि जोडीला स्टंट दृश्याचा भडिमार. या साऱ्या गोष्टींचं ‘एक्सक्लुसिव्ह पॅकेज’ असणाऱ्या ‘केजीएफ (KGF)’ या चित्रपटाच्या दोन्ही भागांना प्रेक्षकांनी अक्षरश: डोक्यावर घेतलं.
२०१८ साली आलेल्या ‘केजीएफ’ (KGF) या कन्नड चित्रपटाचे दोन भाग येणार हे आधीच स्पष्ट होतं. प्रशांत नील लिखित आणि दिग्दर्शित या चित्रपटामध्ये यश उर्फ नवीनकुमार गोवडा रॉकीच्या भूमिकेत, तर नवोदित कलाकार रामचंद्र राजू गरुडच्या भूमिकेत आहे. या दोघांसोबत या चित्रपटात श्रीनिधी शेट्टी, वसिष्ठ एन. सिम्हा, अच्युथ कुमार आणि मालविका अविनाश यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.
हा चित्रपट कोलार गोल्ड खाणीच्या कहाणीवर आधारित आहे. कथानकाबद्दल अजून काही सांगत नाही कारण तो स्पॉईलर होईल. तसंही या लेखमालेमध्ये आपण चित्रपटाच्या कथेबद्दल नाही तर, पडद्यामागच्या कथेबद्दल माहिती घेतो. तर त्याबद्दल थोडंसं –
१. स्क्रिप्टसाठी केलं दीड वर्ष संशोधन
‘केजीएफ’ चित्रपटाची कहाणी जवळपास सर्व सिनेप्रेमींना माहिती आहे. या चित्रपटाच्या स्क्रिप्टसाठी प्रशांत नील आणि त्यांच्या ७ सहकाऱ्यांनी जवळपास दीड वर्ष संशोधन केले. होते. तसंच, चित्रपटाचे चित्रीकरण करताना ७० आणि ८०च्या दशकातील कोलार दाखवण्याचं मोठं आव्हान युनिटसमोर होतं. यासाठी संपूर्ण सेट बदामी येथे उभारण्यात आला होता.
२. चित्रपटाच्या निर्मात्यांनी सर्व टीमचा विमा उतरवला होता.
मस्तीगुडीच्या चित्रीकरणादरम्यान घडलेल्या दुर्दैवी घटनेनंतर यश आणि निर्माते विजय किरगांडूर यांनी सुरक्षेची विशेष उपाययोजना म्हणून ‘केजीएफ’च्या संपूर्ण टीमचा विमा उतरविण्याचा निर्णय घेतला आणि त्वरित तो अंमलातही आणला.
३. कोरोनाचा फटका
‘केजीएफ’च्या यशानंतर संपूर्ण टीम मोठ्या उत्साहाने ‘केजीएफ: चॅप्टर २’च्या तयारीला लागली. दुसऱ्या भागाचे चित्रीकरण ऑगस्ट २०१९मध्ये कोलार गोल्ड फील्ड्स (KGF) मधील सायनाइड हिल्स येथे सुरू झालं. हा चित्रपट २३ ऑक्टोबर २०२० रोजी प्रदर्शित होणार होता. परंतु कोरोना महामारीमुळे चित्रपटाचे चित्रीकरण पुढे ढकलण्यात आलं.
४. शुटिंगविरोधात दाखल झाली होती कोर्ट केस
ऑगस्ट २०१९ मध्ये, केजीएफच्या (KGF) नॅशनल सिटिझन्स पार्टीचे अध्यक्ष एन श्रीनिवास यांनी ‘केजीएफ: चॅप्टर २’ (KGF: Chapter 2)च्या निर्मात्यांविरुद्ध याचिका दाखल केली होती. कारण चित्रपटाचे चित्रीकरण सायनाइड माउंडच्या संरक्षित प्रदेशात चालू होतं. या ठिकाणी चित्रीकरण करणं पर्यावरणास हानिकारक असल्याचं यामध्ये नमूद करण्यात आलं होतं. यानंतर कोर्टाने निर्मात्याला शूटिंग थांबवण्याची नोटीस बजावली. परंतु सुदैवाने नोटिसीमधील तारीख चित्रीकरण संपविण्याच्या काही दिवस आधीची होती. यानंतर चित्रपटाच्या निर्मात्यांनी या नोटिसीविरोधात न्यायालयाचा स्थगिती आदेश मिळवला आणि उर्वरित शूटिंग पूर्ण केलं.
५. चौवीस तासांत जगात सर्वाधिक पाहिला गेलेला टिझर
जेव्हा ‘केजीएफ: चॅप्टर २’ (KGF Chapter 2) चित्रपटाचा टीझर यूट्युबवर अपलोड करण्यात आला तेव्हा तो २४ तासांत ७२ मिलियन म्हणजेच ७.२ कोटी लोकांनी पाहिला आणि याचबरोबर तो जगातील सर्वाधिक पाहिला गेलेला टीझर बनला. इतकंच नाही तर, २४ तासांत सर्वाधिक पाहिलेला पाचव्या क्रमांकाचा व्हिडिओ (क्लिप) बनला.
६. चित्रपटाच्या ट्रेलरलाही उदंड प्रतिसाद
या चित्रपटाचा अधिकृत ट्रेलर २७ मार्च २०२२ रोजी यूट्युबवर लाँच करण्यात आला होता. लाँच झाल्यानंतर २४ तासांत ट्रेलरला पाच वेगवेगळ्या भाषांमध्ये १०९ दशलक्षाहून अधिक व्ह्यूज मिळाले. यानंतर हा सर्वाधिक पाहिला गेलेला भारतीय ट्रेलर बनला.
७. कन्नड भाषेतील सर्वात बिग बजेट चित्रपट
‘केजीएफ’ चित्रपट बनविण्यासाठी ८० कोटी तर, ‘केजीएफ चॅप्टर २’ (KGF Chapter 2)साठी १०० कोटी रुपये खर्च करण्यात आले. त्यामुळे हा कन्नड भाषेतला आत्तापर्यंतचा सर्वात महागडा चित्रपट ठरला आहे.
८. अभिनेत्री ‘श्रीनिधी’ने नाकारले ७ चित्रपट
‘केजीएफ’च्या यशानंतर अभिनेत्री श्रीनिधी शेट्टी कन्नड चित्रपटसृष्टीमधली स्टार बनली आणि तिला इतर चित्रपटांसाठी ऑफर यायला सुरुवात झाली. परंतु, ‘केजीएक: चॅप्टर २’ (KGF: Chapter 2)मध्ये काम करण्यासाठी तिने तब्बल ७ चित्रपट नाकारले.
९. संजय दत्त पहिल्यांदाच कन्नड चित्रपटात
‘केजीएफ चॅप्टर २’ या चित्रपटाद्वारे संजय दत्तने कन्नड इंडस्ट्रीमध्ये पाऊल ठेवले आहे. यामध्ये त्याने ‘अधीरा’ नावाच्या खलनायकाची भूमिका साकारली आहे. या चित्रपटामधील त्याच्या भूमिकेचे सर्व चित्रीकरण पूर्ण झाल्यानंतर काही दिवसांतच त्याला फुफ्फुसाचा कर्करोग झाल्याचे निदान झाले आणि ऑगस्ट २०२० मध्ये तो उपचारासाठी अमेरिकेला गेला.
=====
हे देखील वाचा – मेकअप डिझायनरकडे बघण्याचा दृष्टिकोन लोकांनी बदलायला हवा – सानिका गाडगीळ
====
१०. एकूण ५ भाषेत प्रदर्शित झालेला कन्नड चित्रपट
‘केजीएफ’ चित्रपटाचे दोन्ही भाग एकूण ५ भाषांमध्ये प्रदर्शित करण्यात आले आहेत. अशा प्रकारे ५ भाषांमध्ये प्रदर्शित झालेला ‘केजीएफ’ हा पहिला, तर ‘केजीएफ: चॅप्टर २’ हा दुसरा चित्रपट आहे.