१२१ वर्षांचे बंडखोर नाटक – संगीत शारदा…
संगीत नाटकांच्या झंझावातात सामाजिक नाटकाची मुहूर्तमेढ मराठी रंगभूमीवर रोवणारे नाटक म्हणज गोविंद बल्लाळ देवल यांचे “संगीत शारदा”. कुमारी-जरठविवाह या सामाजिक समस्येला वाचा फोडत महाराष्ट्रातील पांढरपेशा वर्गाला हादरवून टाकणा-या या नाटकाला १३ जानेवारी रोजी १२१ वर्षं पूर्ण झाली. त्यानिमित्ताने तो काळ आठवुया…
त्याकाळी मुलींची दहाव्या वर्षी लग्नं होत. दहाचं वय अकरा झालं तरी गहजब होतं असे. पुरुष मात्र कोणत्याही वयात लग्नास पात्रं होते. कोवळ्या दहा वर्षांच्या मुलींची साठीच्या थेरड्यांशी लग्नं होणं सामान्य घटना होती. अशा काळात गो.ब.देवल यांची संगीत नाटकं उत्तम व्यवसाय करत होती. आपल्या मूळ गावी मिरजेजवळ हरीपूरला जाऊन राहण्याची देवल यांची इच्छा होती. ते हरीपूरला गेल्यावर दोन अत्यंत महत्त्वपूर्ण घटना त्यांच्या आयुष्यात घडल्या. एक म्हणजे त्यांच्या पत्नीचा बाळंतपणात मृत्यू झाला आणि दुसरी घटना म्हणजे शारदा नाटकाचे लेखन झाले.
हे देखील वाचा: दीनानाथ अभिषेकींचं मा. दीनानाथ मंगेशकर असं नामकरण कसं झालं?
हरीपूरला गेल्यावर शेजारच्या सांगली संस्थानातील धनाढ्य तात्यासाहेब सांगलीकर यांनी जरठ विवाहाचा घाट घातल्याचे देवल यांच्या कानावर आले. त्यातून या नाटकाची बीजं त्यांच्या मनात रोवली गेली. त्या मुलीच्या मनातील विचारांची कल्पना करुन त्यांनी पद लिहिले, “तू टाक चिरुनी ही मान | नको अनमान.” पुढे अशीच ३०-४० पदे लिहिली गेली. दरम्यान नर्सच्या चुकीने डॉक्टर ब्रॅण्डी ऐवजी कारबॉलिक ऍसिड दिले गेल्याने देवल यांच्या पत्नीचे बाळंतपणात निधन झाले. तिथे देवल यांचे नाट्यलेखन थांबले. पुढे १८९८ मध्ये देवल यांनी हे नाटक लिहून पूर्ण केले आणि किर्लोस्कर नाटक मंडळींनी ते १८९९ मध्ये रंगभूमीवर आणले. या नाटकाने महाराष्ट्राचे समाजमन ढवळून निघाले.
नाटक पाहून अनेक कोदंडांनी (नाटकातील समाजसुधारक पात्र) अशा कोवळ्या मुलींशी लग्न करणा-या जरठांबद्दल तक्रारी केल्या. गंमत म्हणजे त्याकाळी संमतीवयाच्या कायद्याला “शारदा ऍक्ट” असे नाव पडले. वास्तविक हा कायदा १८९१ साली संमत झाला होता. नाटक १८९९ला रंगभूमीवर आले. तरी लोकांनी त्या कायद्याचा संबंध नाटकाशी जोडला इतके नाटक प्रभावशाली ठरले. विविध कलाकारांनी आपल्या अदाकारीने या नाटकाला महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहचवली.
विष्णुपंत पागनीस, बालगंधर्व, भालचंद्र पेंढारकर यांनी “शारदा” ताकदीने उभी केली. सामाजिक नाटकात संगीताचे स्थान यथातथाच असताना संगीत शारदाने सामाजिक नाटक असूनही संगीताचा एक प्रवाह निर्माण केला. या नाटकात देवल यांनी ५० पदे रचली होती. त्यातील “सुंदर खाशी सुबक ठेंगणी, म्हातारा इतुका, बिंबाधरा मधुरा, मूर्तीमंत भीती उभी ही पदं विलक्षण गाजली.
हे वाचलंत का: मराठी रंगभूमीला जागतिक रंगभूमीशी जोडणारा घाशीराम कोतवाल.
आज जरी काळाच्या ओघात या नाटकातील “जरठ कुमारी विवाह समस्या” फारशी महत्त्वाची उरलेली नसली तरी विशिष्ट काळात महाराष्ट्रातील समाजविचाराला वळण देण्याचे आणि डोळ्यात झणझणीत अंजन घालण्याचे काम या नाटकाने खचितच केले.