‘आई तुळजाभवानी’च्या पौराणिक गाथेत उलगडणार एक नवा अध्याय; चिंतामणी पाषाणाचा
नेटफ्लिक्स आणि पहिली भारतीय कलाकृती
खरंतर आता ओटीटी प्लॅटफॉर्म, वेब कंटेंट हे काही आपल्याला नवीन राहिलेलं नाही..आणि ह्या लॉकडाऊन मुळे तर लोक सर्रास ह्या वेब कंटेंट चा आनंद लुटायला शिकले आहेत..आज लोकं नेटफ्लिक्स, प्राईम, हॉटस्टार वरचा कंटेंट चवीने बघतायत, ह्यात आणखीन भर म्हणून वूट आणि सोनी लिव्ह किंवा झी५ सारख्या दमदार प्लॅटफॉर्मची, तिथे एमएक्स प्लेयर ने तर फुकटच सिरीज दाखवायचा विडा उचलला आहे…
ह्या सगळ्या गोतावळ्यात मला आठवण झाली ती मी पाहिलेल्या सर्वात पहील्या वेब सिरीजची…खरंतर ही वेबसिरीज त्यातली स्टारकास्ट, प्रोड्युसर सगळं ऐकलं तर काही लोकांना आश्चर्याचा धक्काच बसेल! सेक्रेड गेम्स ही नेटफ्लिक्सची पहिली इंडियन वेब सिरीज म्हणतात, पण ती पहिली इंडियन सिरीज नाही हे फार कमी लोकांना ठाऊक आहे, त्याआधी ‘पावडर’ नावाची इंडियन सिरीज नेटफ्लिक्स वर होती..आदित्य चोप्रा निर्मित, YRF बॅनर खाली बनवली गेलेली ही सिरीज खरी नेटफ्लिक्सवर रिलीज केलेली पहिली भारतीय कलाकृती…
तेंव्हा हे ओरिजिनल्स वगैरे एवढं फोफोवल नव्हतं, त्यामुळे ह्या सिरीज कडे दुर्लक्ष झालं, खरंतर सेक्रेड गेम पेक्षा कईक पटीने दमदार असलेली सिरीज फार कमी लोकांनाच ठाऊक आहे…ह्याच्या मुख्य स्टारकास्ट मध्ये २ अत्यंत गुणी अभिनेते आहेत, एक म्हणजे मनीष चौधरी आणि दुसरा चेहरा म्हणजे पंकज त्रिपाठी…बाकी राहुल बग्गा, गीतिक त्यागी, गौरव शर्मा, विकास कुमार (ज्याला आपण नुकतंच हॉटस्टारच्या आर्या सिरीज मध्ये पाहिलं) हे असे नवीन चेहरे ह्या सिरीजमुळेच पुढे आले!
मी जेंव्हा नेटफ्लिक्सच सबस्क्रिप्शन घेतलं तेंव्हा २०१० ची ही पावडर सिरीजच प्रथम बघितली आणि एकंदरच वेब सिरीज ही कन्सेप्ट प्रचंड भावली!
भारतीय ड्रग मार्केटला कंट्रोल करणारा मुंबईतला ड्रग लॉर्ड नावेद अन्सारी, त्याने वाढवलेलं त्याचं साम्राज्य, त्याची कार्यपद्धती, आणि त्याला पकडण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करणारे मुंबई पोलीस, नार्कोटिक्स डिपार्टमेंट, क्राईम ब्राँच, डीआरआय ह्या मुख्य संस्थांचा स्ट्रगल..शिवाय ह्या संस्थांमध्ये असलेली आपापसातली दुष्मनी, सरकारी यंत्रणेचं प्रेशर, कस्टम डिपार्टमेंट ची त्यांना मिळणारी मदत, राजकारण हे सगळं इतकं बारकाईने ह्या सिरीज मध्ये दाखवलं आहे ते क्वचितच कोणत्या भारतीय सिनेमातून किंवा सिरीज मधून दाखवलं असेल…शिवाय ह्या संस्थांची कार्यप्रणाली, त्यांचे प्रोटोकॉल्स, गुन्हेगारांशी टॅकल करण्याची त्यांची पद्धत, त्यांचे नियम, एथिक्स, हे सुद्धा इतकं डिटेल मध्ये ह्यात दाखवलेलं आहे की ह्या संस्था अशाच काम करत असणार अशी आपली मनोमन खात्रीच होते.
शिवाय नावेद अन्सारी ह्याने त्याचं उभं केलेलं ड्रग्स च साम्राज्य, त्याची काम करण्याची पद्धत, शिवाय हे सगळं करताना आपलं नाव आणि चेहरा कुठेही बाहेर येणार नाही यासाठी त्याने घेतलेली खबरदारी, हे सगळं पाहून असं वाटतं की असा नावेद अन्सारी नामक माणूस कुणीतरी असणारच..ह्या सगळ्या संस्थांना मूर्ख बनवून नावेद ज्या प्रकारे त्याचा धंदा करत असतो त्याची स्टाईल, त्याचा ऑरा, हे सगळं खरंच इतकं रियलिस्टिक घेतलं आहे की कुठेही त्यात फिल्मीपणा जाणवणार नाही..
अर्थात क्राईम थ्रिलर आहे त्यामुळे ह्याचा शेवट तुम्ही जसा विचार करत आहात तसाच आहे पण ह्या संपूर्ण प्रवासात बरेच ट्विस्ट येतात, आणि खासकरुन ह्या कथेचा शेवट तर अपेक्षित असला तरी आणखीनच वेगळा भासतो हेच आहे ह्या सिरिजच वैशिष्ट्य…तब्बल ४५ ते ५० मिनिटांचे २६ एपिसोड असलेली सिरीज बघताना तुम्ही त्या मुंबईच्या ड्रॅग माफिया दुनियेत कधी खेचले जाता हे तुमचं तुम्हालाच कळत नाही!
पटकथा, कॅमेरा, म्युझिक, मुंबईतल्या बहुतांश रियल लोकेशन्स वर घेतलेलं शूटिंग हे सगळं त्या सिरीजची मजा आणखीन वाढवते…खासकरून ह्या सिरिजमधलं कॅरॅक्टर डेव्हलपमेंट मला खूप भावतं…भरपूर पात्र आहेत ह्यात, पण प्रत्येक पात्राची विशिष्ट बॅकग्राउंड शिवाय पुढील कथानकात त्या पात्राचे योगदान आणि त्याचा शेवट अगदी ठसठशीतपणे मांडला आहे, कोणतंही पात्र असं अर्धवट लिहून सोडलेलं नाही. शिवाय २६ एपिसोड असले तरी हि सिरीज कुठेच तुमची ग्रीप सोडत नाही..
मुळात मुंबईतला ड्रग व्यापार आणि त्याच्याशी लढणाऱ्या ह्या संस्था ह्यांच इतकं कमाल आणि परफेक्ट चित्रण तुम्हाला कोणत्याही कलाकृतीत पाहायला मिळणं अशक्य आहे…अतुल सब्रवाल ह्याने ह्या सिरीजचे दिग्दर्शन केले असून ती ह्याची पहिली सिरीज आहे असं बघून कुणालाही वाटणार नाही, इतकी खुबीने ही सिरीज रंगवली आहे, त्यानंतर हा दिग्दर्शक कुठे गायब झालाय देव जाणे!
मनीष चौधरी हा माणूस खरंच आपल्या बॉलिवूड ने वाया घालवला असंच म्हणायला हवं, आजवर बऱ्याच सिनेमात तो दिसला आहे पण रॉकेट सिंग मधल्या खडूस पण महत्वाकांक्षी बॉस सारख्या भूमिका त्याच्या वाट्याला पुन्हा नाहीच आल्या..पावडर सुद्धा तशी जुनी सिरीज तरीही त्याला पुन्हा सिरीज मिळायला आर्या पर्यंत वाट बघायला लागली…पावडर मधला उस्मान अली तो अक्षरशः जगला आहे, दिलेल्या भूमिकेला न्याय कसा द्यायचा हे मनीष चौधरी कडून खरच शिकण्यासारखं आहे..बहुतेक सुरवात ते शेवट प्रत्येक एपिसोड मध्ये उस्मान आहे आणि ते पात्र, त्याच्या विविध छटा मनीष ह्यांनी अगदी खुबीने रंगवल्या आहेत…पंकज त्रिपाठी म्हणजे हुकमी एक्का आहे, ह्या माणसाने केलेले रोल बघता, हा माणूस रियल लाईफ मध्ये इतका साधा असेल ह्याची कुणीच कल्पना करू शकत नाही…वासेपुर मधला त्याचा सुलतान नुसता आठवला तरी छातीत धडकी भरते, गुडगाव मधला त्याचा रोल हा माईलस्टोन होता…
पण मी म्हणेन पंकज त्रिपाठी जर बघायचा असेल तर पावडर मध्ये बघा…ड्रग लॉर्ड उभा करायचा असेल तर त्यासाठी जरब बसवणारे डोळे आणि बॉडीलँग्वेज पुरून उरते हे पावडर मधून स्पष्ट होते…स्टार्ट टू एन्ड पंकज त्रिपाठी च्या नावेद अन्सारी भोवतीच ही सिरीज फिरते तरी त्याचा अत्यंत शांत स्क्रीन प्रेझेंस इतका खतरनाक आहे की तो स्क्रीनवर असला तरी ह्याच्यापासून १० हात लांब असलेलंच बरं असं आपल्याला मनोमन वाटतं.
बाकी विकास कुमार आणि इतर बऱ्याच सहकलाकारांची सुद्धा काम लाजवाब झाली आहेत, खासकरुन ह्यातलं गीतिका त्यागी च ब्रिन्दा हे एनसीबी मधली लेडी ऑफिसर हे पात्र उत्तमरीत्या लिहिलं गेलं असून गीतिका हिने तिला योग्य न्याय दिला आहे…
एकंदरच एका गँगस्टर चा प्रवास आणि त्याचा शेवट इतकीच मर्यादित न राहता ही सिरीज हे ड्रगलॉर्डच विश्व आणि त्यांना आळा घालणाऱ्या ह्या संस्था कसं जीवाचं रान करतात हे सुद्धा आपल्याला खूप डिटेल मध्ये सांगते.
सोनी टेलिव्हिजन वर ही सिरीज एयर केली होती हे फार कमी जणांना ठाऊक आहे. दुर्दैवाने ही सिरीज आता नेटफ्लिक्स वरून काढून टाकली, मध्ये काही दिवस सोनी लिव्ह वर ती होती, आता ती तिथंही दिसत नाहीये, युट्युब वर २ एपिसोड आहेत, पण पुढचे एपिसोड बघायचे असतील तर ते आपल्या देशातल्या लोकेशन साठी ऍक्सेसेबल नाही, व्हीपीएन द्वारे तुम्ही युट्युव वर ही सिरीज बघू शकता. इतर ठिकाणी डाउनलोड साठी ही सिरीज उपलब्ध नाही…इतकी उत्तम सिरीज जाणूनबुजून बाहेर आणू देत नाहीयेत असं मला तरी वाटतं, पण जर तूम्हाला कुठुनही मिळाली तर ही सिरीज चुकवू नका..आवर्जून बघा..धन्यवाद!
- अखिलेश विवेक नेरलेकर