रायगडाला जेव्हा जाग येते नाटकाला ५८ वर्षं पूर्ण..
काही नाटकं इतिहास मांडतात. काही नाटकं इतिहास घडवतात. या दोन्ही गोष्टी ज्या नाटकाने प्रत्यक्षात आणल्या ते नाटक म्हणजे ‘रायगडाला जेव्हा जाग येते’. या आज नाटकाला ५८ वर्षे पूर्ण झाली. त्यानिमित्ताने या नाटकाच्या आठवणींना उजाळा देऊया.
वसंत कानेटकर लिखित, मास्टर दत्ताराम दिग्दर्शित, डॉ.काशिनाथ घाणेकर, मास्टर दत्ताराम, सुधा करमरकर अभिनीत ‘रायगडाला जेव्हा जाग येते’ या नाटकाने ऐतिहासिक नाटकांची व्याख्याच बदलली. वसंत कानेटकर हे मराठी नाट्यसृष्टीतील अग्रणी नाटककार. त्यांची अनेक नाटके गाजली. परंतु छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्यातील नाते केवळ इतिहासाच्या नजरेतून नव्हे तर पिता-पुत्रांच्या दृष्टिकोनातून मांडण्याचा धाडसी प्रयत्न वसंत कानेटकर यांनी या नाटकातून केला. तत्पूर्वी अशाप्रकारे छ. शिवाजी महाराज आणि छ.संभाजी महाराज यांच्या नात्याची मांडणी झाली नव्हती. या अर्थाने हे नाटक क्रांतीकारक ठरते.
या नाटकाला नाव कसे मिळाले याचा एक किस्सा सांगितला जातो.
वसंत कानेटकर यांचे नाटकाचे लिखाण पूर्ण झाले. मा.दत्ताराम हे नाटक दिग्दर्शित करणार हे निश्चित होते. पण कानेटकरांना मनाजोगते नाव सुचत नव्हते. स्वराज्य संग्राम, सह्याद्रीचा अभिषेक , राज्याभिषेक अशी काही नावे वसंत कानेटकरांच्या मनात घोळत होती. एकदा कानेटकर आणि मास्टर दत्ताराम चहाच्या टपरीवर चहा पिताना नाटकाच्या बद्दल गप्पा मारत होते. त्यावेळी मा. दत्ताराम कानेटकरांना म्हणाले, “तुमच्या शब्दात उभा महाराष्ट्र खडबडून जागा करण्याची ताकद आहे.” हे वाक्य कानेटकरांच्या डोक्यात फिरत राहिले आणि आणि त्यातून त्यांना नाव सुचले, “रायगडाला जेव्हा जाग येते.”
हे वाचा : मराठी रसिकांचे भावगंधर्व – पं. हृदयनाथ मंगेशकर
पराक्रमी छत्रपती शिवाजी महाराजांची वडील म्हणून वेगळी बाजू या नाटकाने मांडली. तोपर्यंत संभाजी महाराजांची प्रतिमा विविध इतिहासकारांनी संतापी,व्यसनी राजपुत्र अशीच रेखाटली होती. पण या नाटकात नाटककार कानेटकरांनी छत्रपती संभाजी यांची पुत्र म्हणून बाजू मांडली. ही भूमिका रंगभूमीवर साकार करण्यासाठी तितक्याच ताकदीचा कलावंत आवश्यक होता. गोवा हिंदू असोसिएशनच्या ‘माते तुला काय हवे’ या नाटकात एक तरूण कलाकार नानासाहेब फाटक यांच्यासारख्या दिग्गज कलावंतासमोर ताकदीने उभा राहिला होता. त्याचं नाव होतं डॉक्टर काशिनाथ घाणेकर. मास्टर दत्ताराम यांनी या भूमिकेसाठी घाणेकर हे उत्तम पर्याय ठरतील असे कानेटकरांना पटवून दिले आणि त्यानंतरचा इतिहास आपण जाणतो. डॉक्टर घाणेकरांनी ही भूमिका अजरामर केली. अर्थात त्यासाठी वसंत कानेटकर यांनी वेळोवेळी स्वतःला अभिप्रेत संभाजी डॉक्टर काशिनाथ घाणेकर यांच्यासमोर उलगडला होता.
डॉक्टर घाणेकरांनी या भूमिकेला पूर्ण न्याय दिला.
डॉक्टर घाणेकर यांच्यासाठी ही भूमिका आणखी एका कारणासाठी महत्त्वाची ठरली. डॉक्टर घाणेकर यांचे नाटकात काम करणे त्यांच्या घरच्यांना पसंत नव्हते. त्यांच्या दृष्टीने नाटक म्हणजे वेळेचा अपव्यय. मात्र छत्रपती संभाजी यांची भूमिका घाणेकर साकारत आहेत हे कळल्यावर त्यांचे कुटुंबीय या नाटकाला आले. त्यांच्या वडील बंधूंनी आणि मातोश्रींनी नाटकात काम करण्याबद्दल असलेली अढी दूर झाल्याचे डॉक्टर घाणेकर यांना सांगितले.त्यामुळे डॉक्टर घाणेकर यांच्या वैयक्तिक आयुष्यासाठीही हे नाटक महत्त्वाचे ठरले.
२६ ऑक्टोबर १९६२ रोजी गिरगावातील भारतीय विद्या भवन इथे ‘रायगडाला जेव्हा जाग येते’ नाटकाचा पहिला प्रयोग पार पडला.या नाटकाचं निर्मितीमूल्य भरजरी होतं. प्रयोगाआधी गिरगावमध्ये भव्य मिरवणूक काढण्यात आली. त्यामुळे रसिकांच्या मनात नाटकाविषयी कुतूहल निर्माण झाले.
हे वाचलेत का ? ‘मदर इंडिया’ नावाची अनटोल्ड स्टोरी
हे नाटक विविध नटसंचात सादर झाले. अविनाश देशमुख, मोहन जोशी यांनीही या नाटकाचे प्रयोग केले. येसूबाईची भूमिका सुधा करमरकर यांच्यासोबतच आशालता वाबगावकर यांनीही उत्तम वठवली. या नाटकाने हाऊसफूल्लचा बोर्ड सातत्याने मिरवला. या नाटकाला १९६४ साली संगीत नाटक अकादमी पारितोषिक प्राप्त झाले. वसंत देव यांनी याच नाटकाचे ‘रायगड जाग उठा है’ असं हिंदी नाट्य रूपांतरही केले होते.
५८ वर्षांनंतर आजही शाळा महाविद्यालयातील तरुणांना अभिनय स्पर्धेसाठी ‘रायगडाला..’ मधील विविध स्वगतं सादर करावीशी वाटतात यातच या नाटकाचे यश अधोरेखित होते. मराठी रंगभूमीच्या खजिन्यातील हे ऐतिहासिक सुवर्ण पान म्हणूनच अजरामर आहे.