अमर अकबर अँथनी: महानायकाला सुपरस्टार बनवणारा सिनेमा!
हिरो म्हणून एक गरीबाघरचं पोर, हिरोईन म्हणून एक श्रीमंत बापाची अतिलाडकी पोर, हिरो आणि हिरोईनचे विविध जातीधर्माचे, दिसायला त्यांच्यापेक्षा साधारण असे मित्र, साक्षात यम ज्याला टरकून राहतो अश्या नावाचे आणि चेहऱ्यांचे व्हीलन्स, साधारणतः एवढी सामग्री पुरेशी असते एखादी मनोरंजक मसाला फिल्म बनवायला. मग त्यात पसाभर अॅक्शन, मूठभर ड्रामा, ठसकेबाज संवादांची फोडणी, चवीपुरते विनोद आणि मिश्रण फारच रटरटीत होऊ नये, म्हणून अधून मधून सढळ हाताने काही गाणी टाकणं, हे तर ठरलेलंच. भरमसाठ बजेटच्या मंद आचेवर दोन ते तीन तास शिजवून झाल्यावर वरून वेगवेगळी नैतिक मुल्ये ‘सामाजिक संदेश’ म्हणून हलकीच भुरभुरावीत. झाली तुमची मसाला फिल्म तयार! या अश्या मसाला फिल्म्सचे जनक म्हणून कोणाला श्रेय द्यायचं झालंच तर निर्विवादपणे दिग्दर्शक मनमोहन देसाई यांचीच बहुमताने निवड होऊ शकते. (45 years of Amar Akbar Anthony)
मनमोहन देसाईंनी (Manmohan Desai) आपल्या चित्रपटांमधून मनोरंजन या शब्दाला आणखी व्यापक अर्थ मिळवून दिला. त्यांच्या दिग्दर्शकीय कारकिर्दीतील सर्वाधिक लोकप्रियता मिळवलेला चित्रपट म्हणजे ‘अमर अकबर अँथनी’ (Amar Akbar Anthony). अमिताभ बच्चन, ऋषी कपूर, विनोद खन्ना, निरुपा रॉय, शबाना आझमी, नीतू सिंग, परवीन बाबी, प्राण आणि जीवन असा कलाकारांचा तगडा फौजफाटा या चित्रपटामध्ये होता. मनोरंजन, मनोरंजन आणि मनोरंजन हे एकच उद्दिष्ट असलेल्या या चित्रपटात हिंदू, मुस्लीम आणि ख्रिश्चन नायक-नायिका घेऊन ‘सर्वधर्मसमभाव’ या संकल्पनेला केंद्रस्थानी ठेवण्याची किमया मनमोहनजींनी अचूकरीत्या साधली. धर्मनिरपेक्षतेची मनोरंजनाशी सांगड घालणारा हा सिनेमा १९७७ चा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला. चला तर, जाणून घेऊयात या चित्रपटाशी निगडित काही खास गोष्टी… (Amar Akbar Anthony)
अशी सुचली सिनेमाची कथा!
‘जॅक्सन नावाचा एक बाप आपल्या तीन मुलांच्या खोड्यांना त्रासून त्यांना बागेत सोडून आला’ अश्या आशयाची एक बातमी पेपरमध्ये वाचल्यावर मनमोहनजी त्यांचे मित्र लेखक प्रयागराज यांना भेटले आणि त्यांना ही बातमी दाखवून आपल्याला पडलेल्या प्रश्नांचा भडीमार सुरु केला, “जर जॅक्सन परत आला आणि त्याला त्याची तिन्ही मुलं सापडलीच नाहीत तर? त्या तिघांना तीन वेगवेगळ्या धर्माच्या लोकांनी वाढवलं तर? काही वर्षांनी ती मुले एकमेकांसमोर परत आली तर?” मनमोहनजींच्या या भांडावून सोडणाऱ्या प्रश्नांच्या उत्तरांना प्रयागराज यांनी कथेचे स्वरूप दिले आणि के. के. शुक्ला यांच्या साथीने पटकथा पूर्ण केली. अभिनेते कादर खान यांनी या चित्रपटासाठी संवाद लिहले होते. (Amar Akbar Anthony)
असा बनला अमिताभ ‘अँथनी गॉन्साल्विस’!
अमिताभने (Amitabh Bachchan) साकारलेल्या पात्राचं नाव सर्वात आधी अँथनी फर्नांडिस असं ठेवलं गेलं होतं. त्याच्या वागण्याबोलण्याची ढब ही मनमोहनजींच्याच एका मित्रासारखी ठेवली गेली होती, जी अमिताभने हुबेहूब कॉपी केली आणि सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून आपल्या कारकिर्दीतील पहिल्या फिल्मफेअर पुरस्कारावर नावही कोरलं होतं. गीतकार आनंद बक्षींसोबत जेव्हा संगीतकार लक्ष्मीकांत-प्यारेलाल हे ‘माय नेम इज अँथनी फर्नांडिस’ या गाण्याची तयारी करत होते, तेव्हा फर्नांडिस हा शब्द त्यांना खटकू लागला, कारण त्या शब्दामुळे गाण्याच्या चालीत आणि संगीतरचनेत आवश्यक ती परिणामकारकता साधली जात नव्हती. त्यानंतर ते नाव बदलून ‘अँथनी गॉन्साल्विस’ असं केलं गेलं. योगायोग म्हणजे, याच नावाचे एक पियानो मास्टर हे प्यारेलाल व आर. डी बर्मन यांचे मेंटॉर होते. (Amar Akbar Anthony)
चार दिग्गजांनी एकत्र गायलेलं एकमेव गाणं!
या चित्रपटातील ‘ये सच हैं’, ‘तैय्यब अली’, ‘हमको तुमसे हो गया हैं प्यार’, ‘परदा हैं परदा’, ‘माय नेम इज अँथनी गॉन्साल्विस’ ‘शिर्डीवाले साईबाबा’ अणि टायटल साँग ‘अमर अकबर अँथनी’ ही सर्वच गाणी आज ‘कल्ट क्लासिक’ म्हणून ओळखली जातात. आनंद बक्षींनी लिहलेल्या या गाण्यांसाठी लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी संगीत दिले होते. यातील ‘हमको तुमसे हो गया हैं प्यार’ या गाण्याच्या निमित्ताने प्रथमच लता मंगेशकर(Lata Mangeshkar), किशोरकुमार(Kishore Kumar), मुकेश (Mukesh) आणि मोहम्मद रफी (Mohammad Rafi) या आघाडीच्या पार्श्वगायकांना एकाच गाण्यात ऐकण्याची सुवर्णसंधी चाहत्यांना लाभली. यात रफीसाहेबांनी ऋषी कपूरसाठी, मुकेशने विनोद खन्नासाठी तर किशोरने अमिताभसाठी आवाज दिला होता आणि लताजींनी शबाना, नीतू व परवीनसाठी आवाज देऊन पार्श्वगायनाचा एक उत्तम नमुनाच सादर केला होता. या चौघांनी एकत्रित गायलेलं हे पहिलं अणि शेवटचं गाणं!
अमिताभच्या ‘सुपरस्टार’ कारकिर्दीची सुरुवात!
या चित्रपटातील अमिताभचा आरश्यासमोरचा सीन निव्वळ अविस्मरणीय! हा सीन अमिताभने स्वतःच दिग्दर्शित केला होता, कारण दिग्दर्शक मनमोहन देसाई हे त्यावेळी ‘परवरिश’च्या चित्रीकरणात व्यस्त होते. इंडस्ट्रीतील काही खास लोकांसाठी आयोजित केलेल्या सिनेमाच्या पहिल्या स्क्रीनिंगला हा सीन झाल्यावर मनमोहन देसाई बाहेर आले आणि अमिताभही त्यांच्या पाठोपाठ गेला. आपल्याकडून काही चूक झाली असावी अशी शंका अमिताभने व्यक्त केली. त्यावर त्यांनी अमिताभला सांगितलं की इथून पुढे त्यांच्या प्रत्येक चित्रपटात अमिताभलाच प्रमुख भूमिका दिली जाईल. त्यानंतर त्यांनी अमिताभला सोबत घेऊन ‘सुहाग’, ‘नसीब’, ‘देश प्रेमी’, ‘कूली’, ‘मर्द’अश्या एकापाठोपाठ एक सुपरहिट चित्रपटांचा धडाकाच लावला आणि अमिताभला ‘सुपरस्टार’ बनवलं!
तीन सख्खी भावंडं एकमेकांपासून वेगळी होणं, त्यांना तीन वेगवेगळ्या धर्मांमध्ये वाढवलं जाणं, आईसाठी तिघांनी एकत्र रक्तदान करणं, साईबाबांच्या कृपेने गेलेली दृष्टी परत येणं, अश्या कित्येक अतार्किक प्रसंगांचा या चित्रपटामध्ये समावेश असूनही हा चित्रपट टीकेचा विषय न ठरता प्रेक्षकांच्या मनात घर करून बसला. आजच्या घडीला हे प्रसंग हास्यास्पद आणि अतिरंजित वाटतीलही पण याच प्रसंगांच्या जोरावर हा चित्रपट तिकीटबारीवर धुमाकूळ घालत होता हे विसरून चालणार नाही. २७ मे १९७७ला रिलीज झालेला हा चित्रपट इतक्या वर्षांनंतरही प्रेक्षकांना पुन्हापुन्हा पाहावासा वाटतो. आजही साई भंडाऱ्यात ‘शिर्डीवाले साईबाबा’ गाण्याचे बोल कानी पडतात. आपल्या होणाऱ्या किंवा असलेल्या खडूस सासऱ्याला ‘तैय्यब अली’ म्हणण्याचा मोह कित्येकांना आवरता येत नाही. अमर खन्ना, अकबर इलाहाबादी आणि अँथनी गॉन्साल्विस या पात्रांचा करिष्मा जोवर भारतीय सिनेरसिकांच्या मनातून जात नाही, तोवर चित्रपटसृष्टीतील मनोरंजक मूल्यांना मरण नाही!! (Amar Akbar Anthony)
—–
हे देखील वाचा: जंजीर: फ्लॉप अमिताभचा दणदणीत विजय
—–