Kon Honar Maharashtracha Ladka Kirtankar: ‘कोण होणार महाराष्ट्राचा लाडका कीर्तनकार’

बॉम्बे टू गोवा: सफर एका भन्नाट हास्यजत्रेची
आप्पाऽऽ पकोडा, आप्पाऽऽ पकोडा म्हणत आईबापाला वेठीस धरणारा मद्रासी मुलगा.. ‘जय महाकाली’ म्हणत घुमत राहणारी काशीबाई.. मॅचसाठी गोव्याला निघालेला बॉक्सर नि त्याचा चेला.. सतत हसत राहणारा पारशीबावा.. नौटंकीवाली बेहेन आणि तिची पोरगी.. गाडी गोव्याला जाईपर्यंत डुलक्या काढणारा प्रवासी.. व्हिलनपासून जीव वाचवण्यासाठी बसमध्ये चढलेली सुंदर हिरोईन.. तिच्यावर लाईन मारणारे पंडित नि मौलवी हे दोन म्हतारे आणि हिरोईनच्या केसालाही धक्का लागू न देणारा डॅशिंग हिरो.. हे असे सगळे इरसाल प्रवासी घेऊन निघालेल्या बसचा ड्रायव्हर राजेश आणि कंडक्टर खन्ना.. मुंबई (बॉम्बे) वरून निघालेल्या या बसचा गोव्याला जाईपर्यंतचा प्रवास आज ४९ वर्षांनंतरही प्रेक्षकांच्या मनात घर करून आहे.
‘मेहमूद प्रोडक्शन्स’ची निर्मिती असलेला ‘बॉम्बे टू गोवा’ (Bombay to Goa) आज भारतातील सर्वोत्कृष्ट विनोदी चित्रपटांपैकी एक महत्त्वाचा चित्रपट मानला जातो. हा चित्रपट १९६६च्या ‘मद्रास टू पॉन्डिचेरी’ या तमिळ सिनेमाचा रिमेक होता. ३ मार्च १९७२ ला रिलीज झालेल्या या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं होतं दस्तुरखुद्द मेहमूद (Mehmood) आणि एस. रामानाथन यांनी. मल्याळम चित्रपटसृष्टीतील नामांकित दिग्दर्शक असलेल्या एस. रामानाथन यांची हि पहिलीच हिंदी फिल्म होती. योगायोग असा कि, रामानाथन यांच्या पहिल्या हिंदी चित्रपटात अमिताभची (Amitabh Bachchan) प्रमुख भूमिका होती तर त्यांच्या शेवटच्या हिंदी चित्रपटातही अमिताभचीच मुख्य भूमिका असणार होती, पण काही कारणांमुळे हा चित्रपट कधीच रिलीज झाला नाही. चित्रपटाचे संवादलेखक आणि गीतकार राजेंद्र क्रिशन यांनी लिहलेली आणि सुप्रसिद्ध संगीतकार आर. डी. बर्मन यांनी संगीतबद्ध केलेली ही सहाच्या सहा गाणी आजही तितकीच लोकप्रिय आहेत.

ज्याचं गाणं, त्याचा रोल..
वर्षानुवर्षे प्रेक्षकांच्या मनात रुंजी घालणारी ही सहाही गाणी लता मंगेशकर, आशा भोसले, उषा उत्थूप आणि किशोरकुमार या गायकांनी स्वरबद्ध केलेली आहेत. त्यात सोने पे सुहागा म्हणजे उषा उत्थूप आणि किशोर कुमारने या चित्रपटामध्ये अभिनय देखील केलेला आहे. त्यापैकी ‘ये मेहकी मेहकी थंडी हवा’ या गाण्यामध्ये किशोर कुमारने स्वतःचीच भूमिका साकारली असून उषा उत्थूप यांनी ‘लिसन् टू द पाउरिंग रेन’ या गाण्यामध्ये क्लबमधील गायिकेची भूमिका केली आहे. कालौघात प्रसिद्ध झालेली उषाजींची ही भूमिका तेव्हा मात्र कित्येकांना ओळखूच आली नव्हती.
हे देखील वाचा: विनोदाचा बादशहा ‘मेहमूद’
दोस्ताच्या विनंतीखातर दोस्तच बनला ‘शत्रू’!
‘बॉम्बे टू गोवा’ बनण्यापूर्वी ‘आनंद’ वगळता अमिताभला मोठं यश मिळालं नव्हतं. इतक्या फिल्म्स करूनही तो अपेक्षित यशासाठी चाचपडतच होता. मेहमूदने ‘बॉम्बे टू गोवा’ काढला, तोच मुळी त्याच्या भावाला, अन्वर अलीला आणि अमिताभला ब्रेक मिळवून देण्यासाठी. स्ट्रगल करत असलेल्या अमिताभचं नाव ऐकून कित्येक अभिनेत्रींनी या चित्रपटात काम करायला नकार दिला व अरुणा इराणीला (Aruna Irani) ही सुवर्णसंधी मिळाली. इतकंच नव्हे, तर किशोर कुमारनेही (Kishor Kumar) या चित्रपटासाठी गायला नकार दिला होता पण शेवटी त्याने ही ऑफर स्वीकारलीच आणि खास आग्रहास्तव एक कॅमिओदेखील केला. चित्रपटात खलनायकाची भूमिका साकारण्यासाठी अमिताभने शत्रुघ्न सिन्हाला (Shatrughan Sinha) गळ घातली. बरेच आढेवेढे घेतल्यानंतर अमिताभ आणि त्याच्या मैत्रीच्या खातर शत्रुघ्नने पहिल्यांदाच खलनायकी बाज असलेली ही भूमिका स्वीकारली आणि ती पडद्यावरही उत्तमपणे वठवली.
राजीव गांधी साकारणार होते रवीकुमारची भूमिका!
हा प्रसंग तेव्हाचा आहे जेव्हा राजीव गांधी (Rajiv Gandhi) यांनी राजकारणात प्रवेश केला नव्हता. ‘बॉम्बे टू गोवा’साठी कलाकारांच्या ऑडीशन्स चालू असताना अन्वर अलीने अमिताभला मेहमूदची भेट घ्यायला सांगितलं. त्यावेळी चित्रपटांमध्ये विशेष रस नसलेले राजीव गांधी अमिताभबरोबर एक जिवलग मित्र म्हणून मेहमूदला भेटायला गेले होते. नशेत चूर असलेल्या मेहमूदने गोऱ्यापान राजीवजींना बघताच त्यांना चित्रपटात घ्यायचं ठरवलं नि पाच हजार रुपयांची साईनिंग अमाऊंटदेखील देऊ केली. पण अन्वर अलीने प्रसंगाचे गांभीर्य ओळखून मेहमूदला सत्य परिस्थितीची जाणीव करून दिली. आपली चूक लक्षात येताच मेहमूदने झाला प्रकार विसरून अमिताभची निवड रवीकुमार या प्रमुख पात्रासाठी केली.

असा कसा हा अभिनेता, ज्याला ना नाचता येतंय, ना गाता?
गायन आणि नृत्य हा भारतीय चित्रपटांचा एक अविभाज्य घटक. चित्रपटाच्या नायक-नायिकेला तरी किमान हे अंग हवेच, असा सगळ्यांचाच अट्टाहास असतो. अमिताभ मात्र इथं अपवाद होता. उंचीने ताडमाड असलेला अमिताभ मुळातच स्वभावाने बुजरा! त्यामुळे त्याला त्याच्या नृत्यकौशल्याबद्द्ल प्रचंड न्यूनगंड होता. त्यात नाचता नाचता गाण्याचं लिपसिंक करणं हे तर त्याच्यासाठी कर्मकठीण! त्यामुळेच ‘देखा ना हाये रे’ (Dekha Na Haye Re) गाण्याच्या शूटींगच्यावेळी अंगात तब्बल १०२° ताप असलेल्या अमिताभकडून सतत चुका होऊ लागल्या. वाढत चाललेले रिटेक्स आणि अमिताभची अवस्था लक्षात घेऊन मेहमूदने एक शक्कल लढवली. त्याने सेटवर उपस्थित सर्वांनाच अमिताभचा हुरूप वाढवण्यासाठी प्रत्येक शॉटला टाळ्या वाजवायला सांगितलं. ही आयडिया सुपरहिट ठरली आणि एकदाचं गाणं पूर्ण झालं. अमिताभचा या गाण्यातील अंदाज आजही प्रेक्षकांना प्रचंड भावतो.
हे नक्की वाचा: अमिताभ ‘या’ गाण्यावर नृत्याभिनय करताना अक्षरश: रडकुंडीला आला!
विसंवादी पात्रांची धम्माल हास्यजत्रा!
या चित्रपटात मेहमूद सोबतच मुक्री, सुंदर, मनोरमा, आगा, ललिता पवार, केष्तो मुखर्जी, रणधीर, असित सेन इत्यादी कलाकारांची फौज धुमाकूळ घालताना दिसते. मास्टर कादर (हाच तो पकोडा वाला ‘हाथी मेरा साथी’!) आणि मेहमूद ज्युनियर (ढाब्यावरील वेटर) या बालकलाकारांनीही आपल्या भूमिकांमध्ये कमाल केली आहे. ही सगळीच पात्रं त्या चालत्या बसमध्ये एक जत्रा भरवल्याचाच आभास निर्माण करतात. केष्तोचं झोपेत बसला धक्का देणं असो, मेहमूद आणि युसूफमधली बॉक्सिंग मॅच असो किंवा मेहमूदने ललितासाठी कोंबडीऐवजी जिवंत नाग पकडून आणणे असो, अश्या विविध प्रसंगांमधून उडणारे हास्याचे कारंजे हेच या चित्रपटाचं खरं यश म्हणता येईल.
असा मिळाला बॉलीवूडला ‘अँग्री यंग मॅन’
अमिताभ आणि शत्रुघ्नचा क्लबमधील फाईट सीन आठवतो? आजकालच्या अॅक्शन फिल्म्समधील फाईट सीन्सच्या तुलनेत अतिशय पुळचट वाटत असला, तरीही याच सीनमुळे अमिताभला त्याच्या कारकिर्दीतील मैलाचा दगड ठरावा असा ‘जंजीर’ मिळाला होता. ह्या सीनमध्ये सँडविच खात बसलेल्या अमिताभला शत्रुघ्न लढण्यासाठी आव्हान देतो. सुरुवातीलाच एका बेसावध क्षणी दोनच बुक्क्यांमध्ये शत्रुघ्न अमिताभला जमिनीवर लोळण घ्यायला भाग पाडतो. सावध झालेला अमिताभ पुन्हा लढण्याचा पवित्रा घेतो आणि यावेळीही तो बेफिकीरपणे सँडविचचा घास चावत असतो. अमिताभचं हे बेअरिंग जावेद अख्तर यांना प्रचंड आवडलं आणि त्यांनी ‘जंजीर’साठी हिरो शोधत फिरणाऱ्या प्रकाश मेहराला अमिताभचं नाव सुचवलं. ‘बॉम्बे टू गोवा’ पाहिल्यानंतर मेहरांनाही अमिताभचं काम आवडलं आणि अश्या तऱ्हेने अमिताभच्या नावावर ‘जंजीर’साठी शिक्कामोर्तब केलं गेलं. याच चित्रपटामुळे अमिताभला ‘अँग्री यंग मॅन’चा सुप्रसिद्ध किताबही मिळाला.
आज ह्या ‘दर्जा’ चित्रपटाला ४९ वर्षे पूर्ण झालेली आहेत. २००७मध्ये आलेला राज पेंडुरकर दिग्दर्शित ‘जर्नी बॉम्बे टू गोवा’ हा या चित्रपटाचा रिमेक मानला जातो. सचिन पिळगावकर दिग्दर्शित ‘नवरा माझा नवसाचा’ (२००४, मराठी) आणि ‘एकदंताय’ (२००७, कन्नड) हे चित्रपटही ‘बॉम्बे टू गोवा’वरूनच प्रेरित असल्याचं मानलं जातं. आज इतक्या वर्षांनंतरही हा सव्वादोन तासांचा प्रवास प्रेक्षकांना खळखळून हसवतो आणि आपल्या सुरेल गाण्यांवर ठेकाही धरायला लावतो. अशी अविस्मरणीय हास्यजत्रा भरवल्याबद्दल मेहमूद आणि टीमला कलाकृती मिडीयाचा सलाम!