‘तु मला सगळं काही दिलंस..!’ विशाखा सुभेदाराची ‘ती’ पोस्ट व्हायरल
बॉलिवूडमधील खऱ्या आयुष्यातील लोकप्रिय बहीण- भाऊ
आजकाल प्रत्येक सणाचा किंवा कौटुंबिक कार्यक्रमाचा ‘इव्हेन्ट’ केला जातो. साध्या सरळ पद्धतीने सण समारंभ साजरे करण्यापेक्षा सगळं काही चकचकीत असायला हवं, याचा अट्टाहास वाढला आहे. या सणाला ‘रक्षाबंधन’ कसं अपवाद असणार? बॉलिवूडचे चित्रपट आणि हिंदी मालिकांमध्ये या साध्या सणाचा अगदीच मोठा समारंभ केला जातो. असो. आज रक्षाबंधननिमित्त ऑनस्क्रीन नाही, तर बॉलिवूडमधल्या खऱ्या आयुष्यातल्या बहीण – भावाच्या लोकप्रिय जोड्यांबद्दल माहिती घेऊया (Bollywood Brother-Sister Duos)-
१. एकता कपूर – तुषार कपूर
बॉलिवूडचा अभिनेता जितेंद्रची ही दोन मुलं – एकता कपूर आणि तुषार कपूर. तुषारने अभिनय क्षेत्रात आपलं नशीब आजमावायचा प्रयत्न केला, पण त्याला फारसं यश मिळालं नाही. ‘मुझे कुछ कहना है’ या चित्रपटाद्वारे अभिनेता म्हणून तुषारने बॉलिवूडमध्ये यशस्वी पदार्पण केलं. पण नंतर मात्र तो फार कमाल दाखवू शकला नाही. अलीकडेच त्याने निर्मिती क्षेत्रात पाऊल टाकलं आहे.
एकताने अभिनय क्षेत्रात न येता निर्मिती क्षेत्रात जायचं ठरवलं आणि त्यात आपला चांगला जम बसवला. आधी दैनंदिन मालिकांची, मग चित्रपट निर्मिती आणि आता ओटीटी असा तिचा यशस्वी प्रवास झाला आहे. वयाच्या १७ व्या वर्षांपासून आपली कारकीर्द सुरु करणाऱ्या एकताला २०२० साली पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं.
२. फरहान अख्तर – झोया अख्तर
प्रसिद्ध गीतकार आणि लेखक जावेद अख्तरची दोन्ही मुलं सध्या बॉलिवूडमध्ये आहेत. फरहान अख्तर लेखक, पटकथाकार, दिग्दर्शक असून अभिनेता म्हणूनही त्याने स्वतःला सिद्ध केलं आहे. इतकंच काय तर त्याने पार्श्वगायनही केलं आहे. फरहानने ‘दिल चाहता है’ या सुपरहिट चित्रपटापासून लेखक, दिग्दर्शक आणि निर्माता म्हणून आपली कारकीर्द सुरु केली.
झोया अख्तरने अभिनय क्षेत्राकडे न वळता लेखन – दिग्दर्शन आणि निर्मितीचा मार्ग निवडला. फरहान आणि झोयाने बॉलीवूडला अनेक उत्तमोत्तम चित्रपट दिले आहेत. सुरुवातीला आपल्या भावाची असिस्टंट म्हणून काम करणाऱ्या झोयाने निर्मिती केलेला पहिला चित्रपट होता २००७ साली आलेला ‘हनिमून ट्रॅव्हल्स प्रा. ली.’, तर दिग्दर्शक म्हणून तिचा पहिला चित्रपट होता ‘लक बाय चान्स’. (Bollywood Brother-Sister Duos)
३. अमिषा पटेल – अश्मित पटेल
बॉलिवूडची कुठलीही पार्श्वभूमी नसताना ‘कहो ना प्यार है..’ म्हणत बॉलिवूडमध्ये आलेल्या अमिषा पटेलला पदार्पणातच प्रचंड यश मिळालं. सुरुवातीचे तिचे सलग दोन चित्रपट सुपरहिट झाले. पण नंतर मात्र तिच्या यशाला उतरती कळा लागली.
अश्मित पटेलने २००२ साली ‘आवारा पागल दिवाना’ या चित्रपटासाठी सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम पाहिलं होतं. तिथूनच त्याची बॉलिवूडमधली कारकीर्द सुरु झाली. ‘राज’ या चित्रपटासाठीही त्याने सहाय्य्क दिग्दर्शन केलं होतं. २००३ साली त्याने अभिनय क्षेत्रात आपलं नशीब आजमावायचा प्रयत्न केला, पण सुरुवातीपासूनच त्याच्यावर बसलेला फ्लॉपचा शिक्का आजही कायम आहे.
अलीकडेच अमिषा पटेल आणि अश्मित पटेल यांच्यामध्ये झालेल्या वादाची चर्चा मीडियामध्ये रंगली होती. (Bollywood Brother-Sister Duos)
४. सैफ अली खान – सोहा अली खान
प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री शर्मिला टागोर यांची ही दोन मुलं; सैफ अली खान आणि सोहा अली खान. दोघांनीही अभिनय क्षेत्रात आपलं नशीब आजमावायचा प्रयत्न केला, पण आपल्या आईएवढं यश नाही मिळवू शकले. नाही म्हणायला सुरुवातीची काही वर्ष सोडली, तर सैफने बऱ्यापैकी यश मिळवलं आहे. १९९३ साली आपली कारकीर्द सुरु करणाऱ्या सैफला पहिल्याच चित्रपटासाठी ‘सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला होता. परंतु नंतर तो मल्टीस्टारर चित्रपटांमध्येच जास्त रमला. पण या चित्रपटांमधूनच त्याने त्याची अभिनय क्षमताही सिद्ध केली. २००४ सालच्या ‘हम तुम’ या चित्रपटाने त्याला सोलो हिरो म्हणून खरी ओळख मिळवून दिली.
सोहा अली खानने आपली कारकीर्द २००४ सालच्या ‘दिल मांगे मोर’ या चित्रपटापासून सुरु केली. पण बॉलिवूडमध्ये तिला विशेष यश मिळालं नाही. अखेर २०१५ साली तिने अभिनेता कुणाल खेमूशी लग्न करून संसार थाटला. लग्नानंतरही तिने चित्रपटात काम करणं चालूच ठेवलं आहे. (Bollywood Brother-Sister Duos)
=========
हे देखील वाचा – सुनील शेट्टी: बॉलिवूडचा ॲक्शन हिरो ज्याला सलमानही मानतो…
=========
५. सोनम कपूर – हर्षवर्धन कपूर
बॉलिवूडचा सुप्रसिद्ध अभिनेता अनिल कपूरची ही दोन मुलं; सोनम कपूर आणि हर्षवर्धन कपूर. सोनम कपूरने आपली कारकीर्द बहुचर्चित ‘सावरिया’ चित्रपटापासून रणबीर कपूरसोबत सुरु केली. हा चित्रपट काही फारसा चालला नाही. पण पुढे तिने काही चित्रपटांमध्ये उत्तम अभिनय करत फिल्मफेअर पुरस्कारासह, राष्ट्रीय पुरस्कारही पटकावला. २०१८ साली तिने आनंद आहुजासोबत विवाह केला.
हर्षवर्धनने २०१५ साली ‘बॉंबे वेलवेट’ या चित्रपटासाठी सहाय्य्क दिग्दर्शक म्हणून काम पाहिलं होतं. पुढे २०१६ साली ‘मिर्झ्या’ या चित्रपटाद्वारे त्याने अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. अजूनपर्यंत त्याला म्हणावं तसं यश मिळालं नाही. (Bollywood Brother-Sister Duos)