‘तु मला सगळं काही दिलंस..!’ विशाखा सुभेदाराची ‘ती’ पोस्ट व्हायरल
आनंद: सुवर्णमहोत्सवी ‘आनंद’यात्रा
“बाबूमोशाय, जिंदगी बडी होनी चाहिये, लंबी नही।”
मरणाच्या दारात उभा असलेला आनंद सेहगल, डॉ. भास्कर बॅनर्जीला जीवनाचं सार सामावलेलं हे वाक्य किती सहज सुनावतो, नाही? मध्यमवर्गीय प्रेक्षकांची नस जाणून असलेल्या दिग्दर्शक हृषीकेश मुखर्जींच्या ‘आनंद’ला आज ५० वर्षे पूर्ण झाली. कथा, अभिनय, संवाद, संगीत या चारही आघाड्यांवर उत्कृष्ट कामगिरी करणारा ‘आनंद’ आजही प्रेक्षकांच्या मनात घर करून आहे. राजेश खन्ना, अमिताभ बच्चन, रमेश देव, सीमा देव, सुमिता सन्याल, ललिता पवार, जॉनी वॉकर अशी तगडी स्टारकास्ट आणि त्यांनी साकारलेल्या अजरामर पात्रांच्या तोंडी गुलजार साहेबांच्या लेखणीतून उतरलेले संवाद या चित्रपटाला कल्ट स्टेटस मिळवून देण्यासाठी पुरेसे होते.
एकूण पाच गाणी आणि एक कविता असलेल्या या चित्रपटासाठी सलील चौधरी यांनी संगीत दिग्दर्शन केलं होतं तर मन्ना डे, मुकेश आणि लता मंगेशकर यांनी ‘आनंद’ची गाणी स्वरबद्ध केली होती. ‘आनंद’साठी गीतकार योगेश यांनी ‘कहीं दूर जब’, ‘जिंदगी कैसी है पहेली’ तर गुलजारसाबनी ‘मैने तेरे लिये’ आणि ‘ना जिया लागे ना’ या गीतांची रचना केली होती. त्याचसोबत, गुलजार साहेबांनी या चित्रपटासाठी ‘मौत तू एक कविता है’ ही कविताही लिहली होती.
आनंद (Anand) चित्रपटाची मूळ कथा थोर रशियन साहित्यकार टॉलस्टॉय यांच्या ‘द डेथ ऑफ इव्हान इलिच’ या कादंबरीवर बेतलेली आहे, असं मानण्यात येतं. तसेच, यावर अकिरा कुरोसावा या प्रतिभावंत जपानी दिग्दर्शकाच्या ‘इकिरू’ या सिनेमाचाही प्रभाव दिसून येतो. तीस लाख बजेट असलेला ‘आनंद’ हृषीदांच्या प्रभावी दिग्दर्शनाखाली फक्त २८ दिवसांत पूर्ण झाला होता. बॉक्सऑफिसवर एक कोटीचा गल्ला कमावलेला हा चित्रपट राजेश खन्नाच्या सलग १७ सुपरहिट चित्रपटांपैकी एक मानला जातो. पुढे १९९८मध्ये, दिग्दर्शक के. बी. मधू यांनी ‘चित्रशालभम्’ नावाने ‘आनंद’चा मल्याळम रिमेक बनवला, ज्यात जयराम, बिजू मेनन आणि देवन यांनी प्रमुख भूमिका साकारल्या होत्या.
मृत्यू निकट आलेला असतानाही जीवनाकडे सकारात्मक दृष्टीने बघत आलेला प्रत्येक दिवस आनंदाने जगण्याची प्रेरणा देणारा हा चित्रपट हृषीदांच्या कारकिर्दीतील सर्वोत्तम चित्रपटांपैकी एक मानला जातो. आजच्या काळात, ‘आनंद’ न पाहिलेला भारतीय प्रेक्षक तसा विरळाच! चला तर, आज जाणून घेऊयात, या ‘आनंद’यात्रेचे काही खास किस्से..
नाव ‘आनंद’ पण सुखांत नाही!
चित्रपटाचा नायक चित्रपटाच्या शेवटी मरणार, ही आनंदच्या कथेची अगदीच साधारण रूपरेखा होती. त्यामुळे चित्रपटाला सुखांत नाही, हे प्रेक्षकांना पहिल्याच सीनमध्ये कळेल अश्या पद्धतीने कथा लिहण्यासाठी हृषीदांनी गुलजारसाहेबांना गळ घातली, जेणेकरून प्रेक्षक नायक जिवंत राहतो कि मरतो, अश्या द्विधावस्थेत हा चित्रपट पाहणार नाहीत आणि दिग्दर्शकाला जो विचार प्रेक्षकांसमोर मांडायचा आहे, तोही त्यांच्यापर्यंत व्यवस्थितरीत्या पोहचेल.
‘सुपरस्टार’ नव्हे, ‘शोमॅन’ साकारणार होते आनंदची भूमिका!
‘आनंद’चे दिग्दर्शक हृषीदांनी (Hrishikesh Mukherjee) या चित्रपटाची कथा त्यांच्या ‘शोमॅन’ राज कपूरसोबत असलेल्या मैत्रीला डोळ्यासमोर ठेवूनच लिहली होती, ज्यात आनंदची भूमिका अर्थातच, राज कपूर साकारणार होते. पण, दुर्दैवाने राज कपूर त्यावेळी गंभीर आजाराशी झुंज देत होते आणि अश्यावेळी त्यांना ‘आनंद’सारख्या सुखांत नसलेल्या सिनेमात कास्ट करणे ही हृषीदांसाठी एक मित्र म्हणून अत्यंत वेदनादायी बाब होती. त्याचवेळी, कथा आवडलेली असतानाही आपण त्यातील आपल्या वाट्याला आलेल्या व्यक्तिरेखेपेक्षा जास्त वयस्कर आहोत, हे कपूरसाहेबांनी जाणलं आणि हृषीदांची समजूत काढून त्यांना या भूमिकेसाठी नकार दिला.
निव्वळ गैरसमजामुळे हुकली किशोरकुमारची संधी!
राज कपूर यांनी नकार देतेवेळी हृषीदांना शशी कपूरचं नाव सुचवलं, पण त्यानेही ‘आनंद’मुळे आपली रोमँटिक हिरोची इमेज धोक्यात येईल या कारणास्तव हृषीदांना नकार दिला. त्यानंतर हृषीदांनी सुप्रसिद्ध गायक किशोरकुमारला हा रोल द्यायचं ठरवलं. त्याचसुमारास, एका बंगाली निर्मात्यासोबत मानधनावरून वाद झालेल्या किशोरने ‘कुठल्याही बंगाली इसमाला बंगल्यात सोडायचं नाही’ असा सज्जड दमच त्याच्या बंगल्यावरच्या पहारेकऱ्यांना दिला होता. त्यामुळे बंगाली पेहरावात किशोरला भेटण्यासाठी आलेल्या हृषीदांना गेटवरूनच अपमानित होऊन माघारी यावं लागलं आणि किशोरच्या हातून ही सुवर्णसंधी कायमची गेली!
हे देखील वाचा: जसा आनंद विसरता येत नाही, तसाच भास्कर बॅनर्जी सुद्धा विसरून चालणार नाही…
राजेशची आर्थिक तडजोड नि धरमपाजींचा पत्ता कट!
किशोरची भेट न झालेल्या हृषीदांनी ‘सत्यकाम’च्या सेटवर धर्मेंद्रला ‘आनंद’ची कथा ऐकवली आणि कथा ऐकल्यावर त्यात काम करण्यासाठी धरमपाजी एका पायावर तयारही झाले. पण नेमकं चित्रपटाचं बजेट ठरवताना माशी शिंकली आणि हा रोल राजेश खन्नाकडे (Rajesh Khanna) गेला. लोकप्रियतेच्या सर्वोच्च शिखरावर असलेल्या राजेशने ‘आनंद’साठी त्याच्या मानधनापेक्षा निम्म्या किंमतीत, अवघ्या सात लाखांत, ही भूमिका साकारण्याचं कबूल केलं आणि धर्मेंद्रच्याही हातून हा सिनेमा गेला. या आर्थिक तडजोडींपासून अनभिज्ञ असलेल्या धर्मेंद्रने त्याच रात्री दारूच्या नशेत हृषीदांना फोनवरून बरंच सुनावलं होतं.
अमिताभजींची गुड्डी मधून आनंद मध्ये एन्ट्री
डॉ. भास्कर बॅनर्जीची भूमिका अमिताभकडे येण्यापूर्वी मेहमूद आणि सौमित्र चॅटर्जी या दोन अभिनेत्यांचाही विचार हृषीदांनी केला होता. ‘आनंद’चं शूटिंग चालू असताना जवळच हृषीदांच्या ‘गुड्डी’चंही शूटिंग चालू होतं, ज्यात अमिताभ (Amitabh Bachchan) सहाय्यक भूमिका साकारत होता. बऱ्याच विचाराअंती, हृषीदांनी अमिताभला ‘गुड्डी’मधून काढून ‘आनंद’वर पूर्णतः लक्ष केंद्रित करायला सांगितलं आणि त्याच्याऐवजी समीत भान्जाची ‘गुड्डी’मध्ये वर्णी लागली.
‘बाबूमोशाय’ हाकेमागचं खरं रहस्य!
संपूर्ण चित्रपटात आनंद सेहगल डॉ. भास्कर बॅनर्जीना त्यांच्या नावाने न पुकारता ‘बाबूमोशाय’ अशीच मित्रत्वाची हाक मारत असतो. बंगाली भाषेत ‘बाबूमोशाय’ हे संबोधन सद्गृहस्थ या अर्थाने वापरले जाते. वास्तविक हे संबोधन शोमॅन राज कपूर त्यांच्या जिवलग मित्रासाठी, अर्थात हृषीदांसाठी वापरत असत. चित्रपटाची बहुतांश कथा या दोघांच्या मैत्रीवरून प्रेरित असल्याने राज कपूर यांनी रोल नाकारल्यानंतरही ‘बाबूमोशाय’ हे संबोधन संवादांत वापरण्यासाठी हृषीदा कायम आग्रही राहिले. Babumoshai, Zindagi Badi Honi Chahiye.. Lambi Nahin
समृद्ध सांगीतिक अनुभव देणारी ‘आनंद’यात्रा!
‘आनंद’मधील सर्वच गाणी तेव्हाही गाजली आणि आजही प्रेक्षकांना ती सतत गुणगुणावीशी वाटतात. या चित्रपटासाठी लतादिदींनी संगीत दिग्दर्शन करावं, अशी हृषीदांची इच्छा होती. त्यावेळी लता मंगेशकर ‘आनंदघन’ या टोपणनावाने मराठी चित्रपटांमध्ये संगीत दिग्दर्शन करायच्या, ज्यामुळे हृषीदा प्रभावित झाले होते. काही कारणास्तव लतादिदींनी ‘आनंद’साठी संगीत दिग्दर्शिका बनण्यास नकार दिला मात्र, हृषीदांच्या विनंतीला मान देऊन त्यांनी ‘ना जिया लागे ना’ आणि ‘कही दूर जब’ या दोन्ही गीतांसाठी पार्श्वगायन केले.
सुपरस्टार बिरूद मिळवलेल्या राजेश खन्नाच्या गाण्यांसाठी त्यावेळी किशोरकुमारचा आवाज प्रेक्षकांना आवडायचा. पण ‘आनंद’साठी किशोरऐवजी मुकेशचा आवाज योग्य राहील, असा प्रस्ताव सलीलदांनी मांडला, जो किती योग्य होता, याची प्रचिती आजही येते. मुकेशचे कारुण्यपूर्ण स्वर ‘कही दूर जब’ला एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवतात. खुद्द राजेश खन्नानेदेखील हे गाणं त्याचं आवडतं असल्याची कबुली दिली होती. मन्ना डेने गायलेलं ‘जिंदगी कैसी है पहेली’ हे गाणं जुहूच्या शांत समुद्रकिनाऱ्यावर शूट करताना ‘राजेश खन्ना आणि लिपसिंक’ या अवघड समीकरणाला हृषीदांनी बॅकशॉटसचा खुबीने वापर करत बगल दिली आणि एक अजरामर गीत ‘आनंद’च्या म्युझिक अल्बममध्ये समाविष्ट झालं. गुलजार साहेबांनी लिहिलेली ‘मौत तू एक कविता है’ ही कविता अमिताभ बच्चनच्या आवाजात रेकॉर्ड केली गेली आणि तिचाही समावेश ‘आनंद’च्या म्युझिक अल्बममध्ये केला गेला.
असा हा ‘आनंद’.. जगण्याची कला शिकवणारा.. सकारात्मक दृष्टीकोन रुजवणारा.. प्रत्येकानेच पाहावा आणि आवश्यक तो बोध घ्यावा असा भारतीय सिनेविश्वातील एक मास्टरपीस.. यंदाचं वर्ष हे या ‘आनंद’यात्रेचं सुवर्णमहोत्सवी वर्ष असून, आजही ‘आनंद’ची प्रेक्षकांना शेवटपर्यंत खिळवून ठेवण्याची जादू अबाधित आहे. कारण म्हणतात ना,
“आनंद मरा नही, आनंद मरते नही!!”