Prajakta Gaikwad चं ‘ठरलं’; फोटो शेअर करत अभिनेत्रीने चाहत्यांना दिली

Ghashiram kotwal Natak: ५२ वर्षांनंतर ‘घाशीराम कोतवाल’ हिंदी रंगभूमीवर; ‘हा’ प्रसिद्ध अभिनेता साकारणार महत्वाच पात्र !
ज्येष्ठ नाटककार विजय तेंडुलकर लिखित ‘घाशीराम कोतवाल’ हे केवळ एक नाटक नसून, मराठी आणि भारतीय रंगभूमीवरील एक ऐतिहासिक व सांस्कृतिक ठेवा आहे. १६ डिसेंबर १९७२ रोजी या नाटकाचा पहिला प्रयोग रंगमंचावर आला, आणि आज या घटनेला ५२ वर्षे पूर्ण होत आहेत. या कालात या नाटकाने केवळ मराठीच नव्हे, तर जगभरातील अनेक भाषांमध्ये आपला ठसा उमठवला. आजवर ‘घाशीराम कोतवाल’ सुमारे दहा भारतीय भाषांमध्ये आणि जागतिक स्तरावर जर्मन, फ्रेंच आणि इंग्रजी या भाषांमध्ये सादर झाले आहे. मात्र, आश्चर्य म्हणजे हिंदी या देशातील प्रमुख भाषेमध्ये हे नाटक व्यावसायिक रंगमंचावर अद्याप सादर झाले नव्हते.(Ghashiram kotwal Natak)

या अभावाची दखल घेत लेखक-दिग्दर्शक अभिजित पानसे आणि भालचंद्र कुबल यांनी ‘घाशीराम कोतवाल’ चे हिंदी भाषांतर आणि सादरीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. या महत्त्वपूर्ण संकल्पनेची पत्रकार परिषद नुकतीच पार पडली. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ हिंदी अभिनेता संजय मिश्रा, मराठीतील प्रसिद्ध अभिनेते मकरंद देशपांडे, नृत्यदिग्दर्शिका फुलवा खामकर, दिग्दर्शक अभिजित पानसे आणि भालचंद्र कुबल उपस्थित होते. या वेळी संजय मिश्रा यांनी बोलताना सांगितले की, ‘‘माझ्या आयुष्यात नाटक करायचं हे नेहमीच स्वप्न होतं, परंतु चित्रपटांच्या व्यस्त वेळापत्रकामुळे ते शक्य झालं नव्हतं. ‘घाशीराम कोतवाल’ हे नाटक केवळ एक कथा नाही, तर ही एक प्रवाही शक्ती आहे. या कलाकृतीचा भाग होणं ही माझ्यासाठी कलाकार म्हणून समृद्धीची संधी आहे.’’

दिग्दर्शक अभिजित पानसे यांनी नमूद केलं की, “हे नाटक अमराठी प्रेक्षकांपर्यंत पोहोचावं, हाच मुख्य हेतू आहे. मूळ नाटकात जसं नृत्य आणि संगीत यांना विशेष स्थान होतं, त्याचं आजच्या काळाशी सुसंगत असं सादरीकरण आम्ही करत आहोत. मराठी लावणी, कव्वाली आणि तब्बल १२ ते १५ वाद्यांचा जिवंत संगीतसंच नाटकात पाहायला मिळेल.” दिग्दर्शक भालचंद्र कुबल यांनी सांगितलं, “मराठी रंगभूमी ही अनेक पिढ्यांच्या भावविश्वाला स्पर्श करणारी आहे. ‘घाशीराम कोतवाल’ हे नाटक भाषेच्या पलीकडे जाऊन प्रेक्षकांच्या मनात उतरावं, म्हणूनच आम्ही हे हिंदीत घेऊन येत आहोत.”(Ghashiram kotwal Natak)
==============================
==============================
हिंदीत येणाऱ्या या ऐतिहासिक नाटकाचं नाविन्यपूर्ण सादरीकरण १४ ऑगस्ट रोजी बालगंधर्व रंगमंदिर, बांद्रा येथे रात्री ८ वाजता रंगणार आहे. त्यानंतरचे प्रयोग १५ ऑगस्ट (बालगंधर्व रंगमंदिर) आणि २३ ऑगस्ट (टाटा थिएटर, एनसीपीए) येथे होणार आहेत. या सादरीकरणात संजय मिश्रा, संतोष जुवेकर, उर्मिला कानिटकर यांसारखे ताकदीचे कलाकार झळकणार आहेत. आकांक्षा माळी यांच्या ‘३३ एएम स्टुडिओ’, अनिता पालांडे आणि अभिजित पानसे यांच्या ‘रावण फ्युचर प्रोडक्शन’ या बॅनरखाली हे भव्य नाटक साकारले जात आहे. तब्बल ६० कलाकारांचा संच यामध्ये सहभागी असून, हे सादरीकरण प्रेक्षकांना भुरळ घालणारे ठरणार हे निश्चित!