दिग्दर्शक सुभाष घई आणि गीतकार आनंद बक्षी यांचे जबरदस्त ट्युनिंग!
बालक पालक: आजच्या काळातल्या प्रत्येक पालकाने आवर्जून पाहायलाच हवा असा चित्रपट
मराठी चित्रपटांच्या इतिहासात ज्या चित्रपटाचं नाव आवर्जून घ्यायला हवं असा चित्रपट म्हणजे ‘बालक पालक’. एका अत्यंत वेगळ्या विषयावरचा चित्रपट काढण्याचं धाडस केल्याबद्दल दिग्दर्शक रवी जाधव यांचं कौतुक करायलाच हवं. एक अत्यंत नाजूक विषय प्रभावीपणे आणि कोणताही विवाद उत्पन्न न होता मांडण्याचं शिवधनुष्य रवी जाधव यांनी लीलया पेललं. (Baalak paakal Marathi Movie)
मुलांचं ‘लैंगिक शिक्षण’ हा अत्यंत गहन आणि म्हटलं तर बोल्ड विषय आहे. मुलांना हे शिक्षण द्यायचं की नाही, द्यायचं तर कधी द्यायचं, कसं द्यायचं अशा अनेक प्रश्नांचं अचूक उत्तर या चित्रपटामधून मिळतं. हा विषय मांडताना चित्रपटामध्ये कोणत्याही प्रकारचे अश्लील संवाद आणि दृश्य दाखवण्यात आली नाहीत, ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे.
२०१३ साली हा चित्रपट आला. तेव्हा स्मार्टफोनचा जमाना नुकताच सुरू झाला होता. प्रत्येकाच्या हातात विशेषतः लहान मुलांच्या हातात तेव्हा स्मार्टफोन दिसत नव्हते. इंटरनेटचा वापर आजच्या इतका सहज सोपा नव्हता. परंतु सध्याच्या काळात खास करून लॉकडाऊनमुळे मुलांच्या हातात सर्रास स्मार्टफोन आले. ऑनलाईन शाळा/ क्लासेसमुळे मुलांसाठी इंटरनेटचा वापर करणं सोपं झालं आहे. त्यामुळे सध्याच्या परिस्थितीत पालकांनी आपल्या किशोरवयीन मुलांसोबत बसून हा चित्रपट आवर्जून बघायलाच हवा.
अर्धवट वयातील मुलांना शरीरातील हार्मोन्सच्या बदलामुळे लैंगिक गोष्टींबद्दल आकर्षण निर्माण होतं. या वयात त्यांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण होतात. अनेकदा कुटुंबातील मोठ्या व्यक्तींकडून या प्रश्नांची समाधानकारक उत्तरे मिळत नाहीत किंवा लाज, भीती अशा गोष्टींमुळे मुलं या विषयावर पालकांशी बोलतच नाहीत. (Baalak paakal Marathi Movie)
काही वेळा मोठ्यांच्या चर्चांमधली काही वाक्य कानावर पडतात, पण त्याचा धड अर्थ माहिती नसल्यामुळे मुलांचा अजूनच गोंधळ उडतो. मग हा अर्थ त्यांच्याच आसपासच्या वयाच्या एखाद्या अर्थवट माहिती असलेल्या मुलाला विचारला जातो. काही वेळा ही मुलं पॉर्न साइट्सकडे आकृष्ट होतात (हा धोका सध्या सहजी उपलब्ध होणाऱ्या इंटरनेटच्या जमान्यात अधिकच वाढला आहे.) या साऱ्याच्या एकत्रित परिणाम म्हणजे मुलांना चुकीच्या पद्धतीने लैंगिक गोष्टींची माहिती कळते.बालक – पालक या चित्रपटात नेमका हाच मुद्दा मांडण्यात आला आहे.
या चित्रपटामध्ये एका चाळीत राहणाऱ्या मध्यवर्गीय कुटुंबातील भाग्य, अवी, डॉली आणि चिऊ या मित्र मैत्रिणींची. लहानपणापासून एकत्र असणाऱ्या या चौघांनी किशोरवयात पदार्पण केलेलं असतं. अभ्यास करण्यापासून खेळण्यापर्यंत सर्वजण नेहमी एकत्र असतात आणि यांच्या कुटुंबियांनाही यांची मैत्री खटकत नसते. एके दिवशी अचानक अचानक ज्योती ताई चाळ सोडून जाते. ती का गेली याचं कारण या मुलांना कोणीच सांगत नाही. यामुळे ‘नक्की काय झालं’ याबद्दलचं कुतूहल वाढतच जातं. ताईच्या जाण्याचं कारण शोधत असताना या मुलांना उत्तर मिळतं कारण तिने ‘शेण खाल्लं’. पण या उत्तराने ते अजूनच गोंधळात पडतात. (Baalak paakal Marathi Movie)
‘शेण खाल्लं’ म्हणजे नेमकं काय? या प्रश्नाचं उत्तर शोधताना मुलं भरकटत जातात. यांना भेटणारा त्यांच्याच वयाचा विशू त्यांना पॉर्न मुव्हीज / ब्ल्यू फिल्म्स याबद्दलची माहिती देतो. पॉर्न मुव्हीज /ब्ल्यू फिल्म्स मध्ये दाखवण्यात आलेला सेक्सचं अतिरंजित रूप, त्याचा या मुलांच्या मानसिकतेवर होणारा परिणाम या सर्वाचं चित्रण यामध्ये करण्यात आलं आहे.
चित्रपटाचा क्लायमॅक्स अत्यंत परिणमकारक झाला आहे. यामधून चित्रपट बालक आणि पालक दोघांचंही प्रबोधन करतो. या चित्रपटातील गाणीही उत्तम जमून आली आहेत. ‘हरवली पाखरे’ हे गाणं तर अत्यंत हृदयस्पर्शी झालं आहे. चित्रपटाच्या नावातूनही कमालीची ‘क्रिएटिव्हिटी’ अधोरेखित होते. ब्ल्यू फिल्म्सना ‘बॅड पिक्चर्स’ तसंच बीपी (BP) असंही म्हटलं जातं. बालक पालकांच्या शॉर्ट फॉर्मही बीपी (BP) असा केला जातो. अर्थात दोन्हींचा अर्थ मात्र वेगळा असला तरी यामधून विषय अधोरेखित होतोय. (Baalak paakal Marathi Movie)
चित्रपटामध्ये शाश्वती पिंपळकर, मदन देवधर, भाग्यश्री मिलिंद (भाग्यश्री संकपाळ), रोहित फाळके, प्रथमेश परब, किशोर कदम, सई ताम्हणकर मुख्य भूमिकेत आहेत. तर अविनाश नारकर, विशाखा सुभेदार, आनंद अभ्यंकर, आनंद इंगळे, सुप्रिया पाठारे, माधवी जुवेकर, सतीश तारे यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत.
चित्रपटामध्ये सर्वांच्याच भूमिका सुंदर झाल्या आहेत. यामध्ये काम करणारी मुलं नवीन होती तरीही त्यांनी अत्यंत सुंदर अभिनय केला आहे. या मुलांच्या पालकांनी चित्रपटात काम करायची परवानगी दिल्याबद्दल त्यांचं विशेष कौतुक. चित्रपटामधील शेवटच्या दृश्यातील सुबोध भावे आणि अमृता सुभाषचे संवाद एकदम मस्त जमून आले आहेत. (Baalak paakal Marathi Movie)
=======
हे देखील वाचा – सातच्या आत घरात – तरुणाईला विचार करायला भाग पाडणारा चित्रपट
=======
मराठी चित्रपटसृष्टीने मनोरंजन विश्वाला एकापेक्षा एक सरस चित्रपट दिले आहेत. ज्यामधून केवळ मनोरंजनच नाही तर, समाजप्रबोधनही केलं जातं. लैंगिक शिक्षणासारख्या अत्यंत महत्त्वाच्या आणि ज्याबद्दल बोलणं आवश्यक असूनही टाळलं जातं, अशा नाजूक विषयावर लहान मुलांना घेऊन चित्रपट बनवणं हे सोपं काम नक्कीच नव्हतं. पण रवी जाधव यांचं दिग्दर्शन कौशल्य इथे दिसून आलं. तुम्ही पालक असाल, होणार असाल तर हा चित्रपट आवर्जून बघाच, पण पालक नसाल तरीही हा एका नाजूक विषयावरची सर्वोत्तम कलाकृती म्हणून हा चित्रपट आवर्जून बघा.