मिलिंद गवळींनी ‘समृद्धी’ बंगल्यातून बाहेर पडताना आठवण म्हणून नेली ‘ही’
ती येते, ती पाहते आणि दर वेळी जिंकते…
खरंतर कार्तिक आर्यन एकापेक्षा एक सरस विनोदांची आतिषबाजी करत असतो, हरतऱ्हेनं सगळा पडदा व्यापत असतो. कियारासुद्धा क्यूट, कॉन्फिडन्ट वगैरे दिसत मनोरंजन करत असते आणि त्यांच्या नादात इतरांना फारसा वाव उरलेला नसतो. ‘ती’सुद्धा सगळ्यांच्या मागे, अगदी शांतपणे, उंच कपड्यात वावरत राहते, बोलत राहते. ‘कसले सुमार डायलॉग्ज दिलेत हिला’असंही वाटून जातं. पण हळूहळू ती नशेसी कधी चढत जाते हे आपल्या लक्षात येत नाही. ‘भुलभुलैय्या २’ नामक हे प्रकरण जेव्हा शेवटाला येतं तेव्हा कळतं, की तब्बू (Tabu) नावाच्या बाईनं आपल्याला पार गुरफटून टाकलं आहे. अख्खा सिनेमा कार्तिक आर्यनचा आहे असं पहिल्या सीनपासून ठळकपणे समजलेलं असूनही सिनेमा संपतो आणि आपण काहीसे भानावर येतो, घरीसुद्धा पोहोचतो तेव्हा तब्बूच्या चंगुलमध्ये नव्यानं अडकल्याचं लक्षात येतं. आणि मग त्यातून सुटका नसते होत लवकर.
एक प्रेक्षक म्हणून तब्बू (Tabu), इरफानच्या जातकुळीतल्या कलाकारांची मला फार भीती वाटत राहते. ते बहुतेक वेळा कधीच हिरो-हिरॉईन्स नसतात. सिनेमा सुरू झाल्यापासून अंडररेटेड असतात. आपलं अस्तित्व जाणवून देण्यासाठी वेगळं, विशेष काहीच करत नाहीत. हिरो नाचत असतो, हिरॉईन सुंदर दिसत असते आणि त्यांच्या पार्श्वभूमीवर यांचे चेहरे चक्क कोरे वाटत असतात. त्यांच्या मुख्य भूमिका असल्या, तरी चित्र काही वेगळं नसतं.
पण आपलं मन तरीही डोळा तिरपा करून त्यांच्यावर लक्ष ठेवून असतं, की हे काहीतरी करतील. पण नाही. ते तसेच संथ वावरत राहतात आणि गडद अंधाराला डोळे सरावतात तसं आपण त्यांना सरावत जातो, सैलावतो आणि बरोबर त्याच गाफील क्षणी त्यांच्या लखलखत्या अभिनयाच्या प्रकाशाने आपले डोळे दिपतात. मग बाकीचं काहीच दिसेनासं होतं! कदाचित म्हणूनच मोठमोठ्या सुपरस्टार्सनीही आपण झाकोळून जाऊ या भीतीपोटी तिच्याबरोबर काम करायची हिंमत केली नसावी का?
एफर्टलेस, नैसर्गिक, स्वाभाविक अभिनय वगैरे विशेषणं तिच्या बाबतीत वापरायचा आता फार कंटाळा आलाय. सारखं काय तेच तेच सांगायचं आणि कौतुक करायचं. मला तिचा अभिनय खूपदा थ्रीडी वाटतो, म्हणजे थ्रीडी इफेक्टमध्ये कसं आपल्या शेजारी- समोर- बाजूला घडतंय असं वाटतं, तशी ती खरीखुरी वाटत राहते. ‘अंधाधुन’मध्ये ती आयुषमानला आपल्या नवऱ्याच्या प्रेताजवळून नेते तेव्हा अशी काय निर्विकार दिसते, की वाटावं या शब्दाचा खरा अर्थ म्हणजे हिचे आत्ताचे हे एक्सप्रेशन्स.
आणि मग, नंतर कधीतरी सैफ आणि आल्या एफच्या ‘जवानी जानेमन’ सिनेमात टोटल हिप्पी, झल्ली बनून अशी काही खदाखदा हसते, की वाटावं देव प्रत्येक सिनेमासाठी तब्बूला (Tabu) नवा जन्म देत असावा. कधीकधी एकाच सिनेमात दोन तब्बू दिसतात. म्हणजे ‘दृश्यम’मध्ये कडक वर्दी घालून अजय देवगणच्या कुटुंबाशी निर्दयीपणे वागणारी एक तब्बू आणि नंतर आपल्या नवऱ्याबरोबर अजयला एका पठारावर भेटते ती, वादळातल्या वेलीसारखी थरथरणारी, स्फुंदत स्फुंदत रडणारी तब्बू… (Tabu)
नेटफ्लिक्सच्या ‘अ सुटेबल बॉय’ सीरीजमधे ती प्रत्येकवेळेस इतक्या धीरगंभीरपणे अवतरते, इतका ठेहराव असतो तिच्यात, पण तिला नुसतं पाहून आपल्याला धडधडायला लागलेलं असतं. तलम, रेशमी कपड्यांतल्या तिच्या सईदा बाईची आणि तरुण, ईशान खत्तर अर्थात मानची केमिस्ट्री अनकम्फर्टेबल करणार असं आपल्या सोवळ्या मनाला वाटत असताना तसं काहीच होत नाही. उलट आपण त्यांच्या प्रेमात कधी पडतो हे कळत नाही.
या सीरीजमधला तिचा प्रत्येक पेहराव… खरंतर प्रत्येक सिनेमातलं तिचे कॉश्च्युम्स मला खूप इंटरेस्टिंग वाटत आले आहेत. म्हणजे तिच्या अंगावर कधीच ट्रेंडी आणि हिरॉईन बाजाचे कपडे नसतात, पण तरी तिचा प्रत्येक पेहराव तिच्या सगळ्या अदाकारीला पूरक ठरत असतो. तो कधीच अतिरेकी नसतो, भडक नसतो, सुमार नसतो. बहुतेक हिरॉईन्ससारखा तिच्या दिसण्याला किंवा वावराला वरचढ ठरणारा नसतो, तर तिच्या अभिनयाइतकाच सहज, स्वादाअनुसार असतो.
=======
हे देखील वाचा – ‘शिव’धनुष्य समर्थपणे पेलणारा दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर
=======
किती लिहिणार तब्बूबद्दल… (Tabu) इतकी वर्ष झाली, तरी तिच्याबद्दलचं गूढ काही संपत नाही. दर काही काळानं ती कोणत्या तरी सिनेमात आपल्याला भेटणार, कमाल करत राहणार आणि आपण पुंगीवाल्याच्या मागून जावं तसं गपगुमान तिच्या मागून जात राहणार! तेवढंच आपल्या हातात आहे.
-कीर्ती परचुरे