दिग्दर्शक सुभाष घई आणि गीतकार आनंद बक्षी यांचे जबरदस्त ट्युनिंग!
सत्यघटनेवर आधारित ‘हे’ मराठी चित्रपट तुम्ही पहिले आहेत का?
चित्रपट म्हणजे केवळ मनोरंजनच नव्हे, तर ते समाज प्रबोधनाचंही उत्तम माध्यम आहे. अनेक विषयांवर चित्रपट तयार होत असतात. मराठीमध्ये तर वेगवेगळ्या विषयांवर आधारित अनेक चित्रपट बनत असतात. काही चित्रपट सत्यघटनेवर आधारित असतात. अलीकडेच गाजलेला सैराट हा चित्रपटदेखील सत्यघटनेवर आधारित असल्याच्या चर्चा तेव्हा रंगल्या होत्या. मराठीमधील अशाच काही सत्यघटनेवर आधारित चित्रपटांची माहिती घेऊया (Marathi Movies based on True Stories)
माझं घर माझा संसार
“दृष्ट लागण्याजोगे सारे…” हे लोकप्रिय गाणं आणि या गाण्यामधली गोड अभिनेत्री सर्वानाच आठवत असेल. ‘माझं घर माझा संसार’ हा चित्रपट मुंबईमध्ये घडलेल्या सत्यघटनेवर आधारित असल्याचं सांगण्यात येतं. या चित्रपटामध्ये एकमेकांवर जीवापाड प्रेम करणारं एक जोडपं घरगुती कटकटीला कंटाळून ट्रेनमधून उडी मारून आत्महत्या करतं, परंतु नवरा मरतो आणि बायको जिवंत राहते असं दाखवण्यात आलं आहे. मुंबईमध्ये अशापद्धतीने खरोखरच ट्रेनमधून उडी मारून एका जोडप्याने आत्महत्या केली होती. ही त्यांचीच कहाणी असल्याचं म्हटलं जातं. राजदत्त दिग्दर्शित या चित्रपटात अजिंक्य देव, मुग्धा चिटणीस, रीमा लागू यांच्या प्रमुख भूमिका आहेत.
लालबाग परळ
हा चित्रपट मुंबईतील गिरणी कामगारांच्या जीवनावर आधारित आहे. मुंबईतील गिरणी कामगारांच्या समस्या हा विषय काही महाराष्ट्रातील जनतेसाठी नवीन नाही. लाखो गिरणी कामगारांनी उपजीविकेचे साधन गमावल्यावर त्यांची आणि पर्यायाने त्यांच्या कुटुंबाची झालेली फरफट, न्यायासाठीची धडपड आणि राजकारण्यांसोबतचा लढा अशा अनेक मुद्द्यांवर या चित्रपटात प्रकाश टाकण्यात आला आहे. महेश मांजरेकर दिग्दर्शित या चित्रपटात सचिन खेडेकर, सिद्धार्थ जाधव, अंकुश चौधरी, विना जामकर, सई ताम्हणकर, कश्मिरा शहा, सतीश कौशिक, विनय आपटे, सीमा विश्वास अशा अनेक नामवंत कलाकारांच्या भूमिका आहेत. (Marathi Movies based on True Stories)
माफीचा साक्षीदार
हा चित्रपट पुण्यामध्ये १९७६-७७ साली घडलेल्या जोशी – अभ्यंकर खून खटल्यावर आधारित होता. दीड वर्षात १० खून आणि कित्येक दरोड्यांचा घटनांची शृंखला अशा अंगावर शहारा आणणाऱ्या जोशी- अभ्यंकर खून खटल्याने त्यावेळी केवळ पुणंच नाही, तर अख्खा महाराष्ट्र हादरला होता. राजदत्त दिग्दर्शित ‘माफीचा साक्षीदार’ या चित्रपटामध्ये नाना पाटेकर, मोहन गोखले, अविनाश खर्शीकर, उषा नाईक हे कलाकार मुख्य भूमिकेमध्ये आहेत.
बंदिशाळा
२०१९ साली आलेला ‘बंदिशाळा’ हा चित्रपट सत्यघटनेवर आधारित होता. एका कर्तव्यदक्ष तुरुंग अधिकारी असणाऱ्या महिलेची कथा यामध्ये दाखवण्यात आली होती. या चित्रपटाला महाराष्ट्र राज्य शासनाच्या ५६व्या मराठी चित्रपट पुरस्कार सोहळ्यामध्ये सर्वाधिक पुरस्कार देण्यात आले होते. चित्रपटाचे लेखक आहेत जोगवा’, ‘पांगिरा’, ‘७२ मैल एक प्रवास’ अशा दर्जेदार चित्रपटांचे लेखक – प्रस्तुतकर्ते आणि राष्ट्रीय पुरस्कार विजेते (दशक्रिया- उत्कृष्ट पटकथा) लेखक संजय कृष्णाजी पाटील, तर दिग्दर्शक होते मिलिंद लेले. चित्रपटामध्ये मुक्त बर्वे आणि शरद पोंक्षे प्रमुख भूमिकेत असून प्रवीण तरडे, माधव अभ्यंकर, विक्रम अभ्यंकर महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. (Marathi Movies based on True Stories)
७२ मैल एक प्रवास
अशोक व्हटकर यांच्या ‘७२ मैल एक प्रवास’ याच नावाच्या कादंबरीवर आधारित ७२ मैल एक प्रवास या चित्रपटामध्ये सातारा येथील एका बोर्डिंग स्कूलमध्ये राहून शिकणाऱ्या अशोक या १३ वर्षांच्या मुलाची सत्यकथा दाखवण्यात आली आहे. हॉस्टेलमधल्या कडक शिस्तीला कंटाळून हा मुलगा तिथून पळून कोल्हापूरला आपल्या गावी जात असताना, वाटेत त्याला आयुष्याचा धडा मिळतो. या चित्रपटाचे दिग्दर्शक होते राजीव पाटील. चित्रपटात चिन्मय पंत आणि स्मिता तांबे प्रमुख भूमिकेत आहेत.
२२ जून १८९७
भारतात विशेषतः पुण्यामध्ये आलेली प्लेगची साथ रोखण्यासाठी नियुक्त करण्यात आलेले ब्रिटीश अधिकारी सी. डब्ल्यू. रँड, यांनी प्लेगची साथ तर आटोक्यात आणली पण या दरम्यान त्याच्याकडून करण्यात आलेल्या अत्याचारांमुळे तेव्हा समाजात प्रचंड असंतोष पसरला होता. यामुळेच चापेकर बंधू – दामोदर हरी, वासुदेव हरी आणि बाळकृष्ण हरी आणि महादेव विनायक रानडे आणि खंडो विष्णू साठे यांनी त्याचा वध केला. २२ जून १८९७ हा चित्रपट या घटनेवर आधारित आहे. या चित्रपटात सदाशिव अमरापूरकर टिळकांच्या भूमिकेत दिसले आहेत. (Marathi Movies based on True Stories)
अत्याचार
१९८२ साली प्रदर्शित झालेला अत्याचार हा चित्रपट दया पवार यांच्या ‘बलुता’ या आत्मचरित्रावर आधारित होता. मागासविरहित समजल्या जाणाऱ्या महार समाजातील एका तरुणाच्या लढाईची कथा दाखवण्यात आली आहे. त्याकाळातील समाजाची मानसिकता, अंधश्रद्धा यामुळे अंधाराच्या खोल दरीत अडकलेल्या आणि त्यातून सुटण्यासाठी धडपडणाऱ्या तरुणाने, समाज आणि स्वत:सोबतच केलेला संघर्ष यामध्ये चित्रित करण्यात आला आहे. त्यातून समाजाचा उथळपणा खूप खोलवर दिसून येतो. (Marathi Movies based on True Stories)