‘तु मला सगळं काही दिलंस..!’ विशाखा सुभेदाराची ‘ती’ पोस्ट व्हायरल
श्रीयुत गंगाधर टिपरे: ‘अनुदिनी’चा सहज, सुंदर अविष्कार
एक अनुभवी, खट्याळ, निरागस आणि तोंडाचा बोळकं झालेले आजोबा मालिकेचे ‘हिरो’ असू शकतात, ही संकल्पना जरी अविश्वसनीय वाटत असली तरी केदार शिंदे नावाच्या एका मराठमोळ्या दिग्दर्शकाने हीच संकल्पना घेऊन अवीट गोडीच्या मालिकेची निर्मिती केली होती. ही मालिका होती ‘श्रीयुत गंगाधर टिपरे’ (Shriyut Gangadhar Tipre). आजही अनेकांच्या ‘मोस्ट फेव्हरेट’ मालिकांच्या यादीत या मालिकेचे स्थान अबाधित असणार यात शंकाच नाही.
दिलीप प्रभावळकर यांनी ‘अनुदिनी’ नावाचं सदर ‘लोकसत्ता’मध्ये लिहिलं होतं. पुढे या सदरामधील लेख एकत्रित करून ते पुस्तकरूपाने ‘अनुदिनी’ याच नावाने प्रसिद्ध करण्यात आलं. या पुस्तकावर आधारित मालिका झी मराठीवर प्रसिद्ध करण्यात आली होती ती मालिका म्हणजे श्रीयुत गंगाधर टिपरे. या मालिकेमध्ये स्वतः दिलीप प्रभावळकर मुख्य भूमिकेत होते.
एक सर्वसामान्य मध्यमवर्गीय कुटुंब. एकाच छताखाली गुण्यागोविंदाने नांदणाऱ्या तीन पिढ्या आणि त्यांच्यातलं नातं या मालिकेमध्ये दाखवण्यात आलं होतं. नोकरी करणारा घरातला कर्ता पुरुष शेखर (राजन भिसे), त्याची गृहिणी असणारी पत्नी (शुभांगी गोखले), दोन मुलं (शिऱ्या आणि शलाका) आणि त्याचे वडील आबा उर्फ गंगाधर टिपरे (दिलीप प्रभावळकर); असं एकमेकांवर जीवापाड प्रेम करणारं साधं मध्यमवर्गीय टिपरे कुटुंब आणि या कुटुंबात घडणाऱ्या दैनंदिन आयुष्यातील सामान्य घटना. हाच या मालिकेचा गाभा होता. (Shriyut Gangadhar Tipre)
अलीकडच्या मालिकांमध्ये नात्यांची गुंतांगुंत दाखविण्यात येते. परंतु ‘श्रीयुत गंगाधर टिपरे’ या मालिकेमध्ये मात्र ती होऊ नये म्हणून कशी काळजी घायची हे अगदी साध्या साध्या गोष्टींमधून दाखवण्यात आलं होतं. दैनंदिन आयुष्यातल्या छोट्या छोट्या गोष्टी पण खूप महत्त्वाच्या असतात. त्याकडे दुर्लक्ष केल्यास पुढे अनेक समस्यांना तोंड द्यावं लागू शकतं. आयुष्याचं एवढं मोठं तत्वज्ञान मालिकेमध्ये अत्यंत मार्मिक पद्धतीने मांडण्यात आलं आहे.
कुटुंबातला कर्ता पुरुष जरी शेखर असला तरी आबा श्यामलचाही आदर करत असतात. तिच्या मताला घरात मान असतो. ही मालिका ‘फेमिनिझम’ या संकल्पनेचं कोणतंही अवडंबर न माजवता, कोणताही ‘इमोशनल ड्रामा’ न दाखवता अत्यंत साध्या आणि प्रभावी पद्धतीने गृहिणीचा सन्मान करायला शिकवते. (Shriyut Gangadhar Tipre)
जगातलं सर्वात कठीण काम म्हणजे ‘पालकत्व’. शलाका आणि शिऱ्या आई वडिलांशी चुकीचं वागले तर त्यांचे कान पाळणारे तर कधी त्यांना कोपरखळ्या मारणारे आबा मुलांशी चुकीचं वागणाऱ्या आपल्या मुलाला व सुनेला सौम्य शब्दात किंवा एखाद्या अनुभवाची गोष्ट सांगून समज द्यायलाही कमी करत नाहीत. ही मालिका म्हणजे पालकत्व कसं असावं याचा ‘क्रॅश कोर्स’ आहे, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.
तीन पिढ्यांमधली वैचारिक तफावत हा मुद्दाही मालिकेमध्ये अत्यंत वेगळ्या पद्धतीने अधोरेखित करण्यात आला आहे. ही तफावत दाखवताना एकत्र कुटुंबामध्ये प्रत्येक पिढीनेच जुळवून घेणं आवश्यक आहे, तरंच नातं टिकू शकतं. हा संदेशही ही मालिका देते. (Shriyut Gangadhar Tipre)
एक सभ्य सुसंस्कृत कुटुंब. या कुटुंबातली माणसं एकमेकांवर प्रेम करतात, विश्वास ठेवतात आणि एकमेकांच्या मताचा आदर करतात. एकमेकांची सुख दुःख वाटून घ्यायची, एकमेकांशी मोकळेपणाने बोलायचं, चूक झाली तर माफी मागायची आणि समोरच्याने त्याला उदार मनाने माफ करायचं; चूक दाखवताना ब्लेम गेम न खेळता शांतपणे चुकीची जाणीव करून द्यायची. बस इतकं सगळं साधं सोपं गणित असतं यांचं. जे अर्थातच अभावाने आढळतं. आणि म्हणूनच हे कुटुंब आपल्याला जवळचं वाटतं.
क्रिकेटचं वेड असणारा शिऱ्या आणि ब्युटी कॉन्टेस्ट मध्ये भाग घ्यायचं स्वप्न पाहणारी शलाका ही दोघंही त्या काळातल्या तरुण पिढीचं प्रतिनिधित्व करतात. मालिकेमध्ये शिऱ्याची भूमिका करणारा विकास सावंत मध्यंतरी कोरोना काळात ‘कोरोना योद्धा’ म्हणून चर्चेत होता, तर शलाकाची भूमिका करणारी रेश्मा नाईक मनोरंजन क्षेत्रामधून ब्रेक घेऊन सध्या आपल्या वैयक्तिक आयुष्यात व्यग्र आहे. (Shriyut Gangadhar Tipre)
२ नोव्हेंबर २००१ साली सुरु झालेली ही मालिका ७ जानेवारी २००५ पर्यंत यशस्वीपणे चालू होती. ‘डेली सोप’च्या जमान्यातही दर शुक्रवारी ९.३० वाजता प्रदर्शित होणारी ही साप्ताहिक मालिका प्रचंड लोकप्रिय ठरली होती. दर शुक्रवारी ९.३० वाजता घराघरात “सोयाम धोयन तन धूम तुन ताधानी…” हे मालिकेचं शीर्षक गीत कानी पडत असे. कित्येक केबलवाले तेव्हा या मालिकेमुळे ९ किंवा ९.३० ऐवजी १० वाजता चित्रपट लावत असत.
=======
हे देखील वाचा – प्रपंच: विभक्त कुटुंबातील मुलांच्या मनात एकत्र कुटुंबाची ओढ निर्माण करणारी मालिका
=======
गडबडीची सकाळ, निवांत दुपार, ओढ लागलेली संध्याकाळ आणि निवांत रात्र; दिवसाचे हे सारे प्रहर आणि त्या त्या वेळची घरातली परिस्थिती अत्यंत यामध्ये सहजतेने दाखवण्यात आली आहे. म्हणूनच आजही ही मालिका, त्यामधल्या घटना, प्रसंग बघताना प्रेक्षकांना हे सारं आपल्याच घरात घडतंय असं वाटत राहतं. कलाकारांचे सहज सुंदर अभिनय आणि केदार शिंदेंचं सुरेख दिग्दर्शन यामुळे मालिका एका उंचीवर जाऊन पोचली होती.
मध्यंतरी कोरोना काळात २०२० साली ही मालिका पुन्हा दाखवण्यात आली होती. या मालिकेची लोकप्रियता आजही कायम आहे आणि प्रेक्षकांकडून वारंवार ही मालिका पुनःप्रसारित करण्याची मागणी केली जात आहे. आजही ही मालिका लोकांना परत परत बघावीशी वाटते, हेच या मालिकेचं मोठं यश आहे.