‘हे’ दोन चित्रपट जुहीने नाकारले नसते तर ती होऊ शकली असती नंबर १ अभिनेत्री
जुही चावला (Juhi Chawla)! बॉलिवूडमधली एक गोड अभिनेत्री. आजही ही अभिनेत्री अनेकांची आवडती अभिनेत्री असणार, यात शंकाच नाही. १९८४ साली ‘मिस इंडिया’चा किताब जिंकल्यावर जुहीने ‘सल्तनत’ या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. पण हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर अयशस्वी ठरला. अर्थात या मायानगरीला तिची खरी ओळख झाली ती ‘कयामत से कयामत तक’ या चित्रपटातून.
‘कयामत से कयामत तक’ या चित्रपटात आमिर-जुहीची जोडी प्रेक्षकांना विशेष भावली. चॉकलेट बॉय आमिर आणि गोड चेहऱ्याच्या जुहीने कमाल केली. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट झाला. या चित्रपटासाठी जुहीला फिल्मफेअर अवॉर्डही मिळालं. पण हे यश पुरेसं नव्हतं कारण तिच्या समोर माधुरी नावाचं एक मोठं आव्हान उभं राहणार होतं. कारण त्याच वर्षी माधुरीचा तेजाब आणि एक दो, तीन हे गाणं सुपरहिट झालं होतं.
एकीकडे माधुरीचे ‘तेजाब’नंतर ‘राम लखन’, ‘त्रिदेव’, ‘थानेदार’, ‘किशन कन्हैय्या’, ‘साजन’, ‘दिल’, ‘बेटा’ असे एकामागून एक चित्रपट सुपरहिट होत होते. तर दुसरीकडे जुही दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये आपलं नशीब आजमावत होती. ‘कयामत से कयामत तक’नंतर बॉलिवूडमध्ये एकही ‘ब्लॉकबस्टर हिट’ तिच्या खात्यात जमा झाला नव्हता. पण १९९२ साली आलेल्या ‘बोल राधा बोल’ या चित्रपटाने मात्र जुहीला मदतीचा हात दिला आणि त्यानंतर ‘राजू बन गया जेंटलमन’, ‘लुटेरे’, ‘हम है राही प्यार के’, ‘आईना’, ‘डर’ असे एकामागून एक सुपरहिट चित्रपट देत तिने माधुरीसमोर कडवं आव्हान निर्माण केलं.
तसं बघायचं तर, तो काळ होता माधुरी दीक्षित, जुही चावला (Juhi Chawla) आणि श्रीदेवीचा. या तिन्ही अभिनेत्री नंबर १ च्या स्पर्धेत होत्या. श्रीदेवी या दोघींना तशी सिनिअर. पण माधुरी आणि जुही मात्र एकमेकींच्या कट्टर स्पर्धक होत्या. अर्थात रविना, मनीषा कोईराला, आयेशा, उर्मिला अशा इतर अनेक अभिनेत्रीही स्पर्धेत होत्या, पण पुढे त्यांचा फारसा प्रभाव पडला नाही. त्यात दिव्या भारतीच्या मृत्यूमुळे एक मोठं आव्हान संपुष्टात आलं होतं. पण १९९३ साली आलेला ‘खलनायक’ आणि पुढच्याच वर्षी १९९४ साली आलेल्या ‘हम आपके है कौन’ या सुपरडुपर हिट चित्रपटांनी नंबर १ पदासाठी माधुरीच्या नावावर जणू शिक्कामोर्तबच केला.
एकीकडे माधुरीला ‘ब्लॉकबस्टर हिट’ मिळाला होता, तर दुसरीकडे जुहीचे चित्रपट पुन्हा अपयशी ठरू लागले होते. ‘रामजाने’, ‘कर्तव्य’, ‘नाजायज’, ‘आतंक ही आतंक’ असा एकामागून एक फ्लॉप चित्रपटांचा सिलसिला चालूच होता. या दरम्यान तिने एक मोठा ‘ब्लॉकबस्टर हिट’ झालेल्या चित्रपटाची ऑफर नाकारुन मोठी चूक तर केलीच आपल्यासाठी एक नवीन स्पर्धकही निर्माण केली होती.
पुढे १९९७ साली आलेल्या ‘इश्क’, ‘दिवाना मस्ताना’ या चित्रपटांनी पुन्हा जुहीला (Juhi Chawla) मदतीचा हात दिला. याच दरम्यान माधुरीच्या कारकिर्दीला उतरती कळा लागली होती. ‘प्रेमग्रंथ’, ‘राजकुमार’, ‘कोयला’, ‘मृत्युदंड’ असे एकामागून एक चित्रपट फ्लॉप होत होते. पण तिला पुन्हा एक मोठा हिट मिळाला तो ‘दिल तो पागल है’च्या रूपाने. आणि पुन्हा एकदा माधुरी नंबर १ ठरली.
याच काळात करिष्माला कपूरचं करिअर आकार घेत होतं. त्यामुळे नंबर १ च्या स्पर्धेवर अधिराज्य गाजवायला अजून एक नायिका तयार होत होती. प्रेक्षकांना खरंतर जुही चावला (Juhi Chawla) आणि माधुरी दीक्षित या दोन्ही अभिनेत्रींना एकत्र बघायची खूप इच्छा होती. तसा योगही आला होता पण निव्वळ सहाय्य्क अभिनेत्रीची भूमिका असल्यामुळे (की माधुरी मुख्य भूमिकेत असल्यामुळे) जुहीने ती भूमिका नाकारली.
हा चित्रपट होता ‘दिल तो पागल है’. या चित्रपटातील करिष्माच्या भूमिकेसाठी आधी जुही चावलाला विचारण्यात आलं होतं. पण तिने नकार दिल्यामुळे ही भूमिका करिश्माला मिळाली. वर म्हटल्याप्रमाणे जेव्हा एका मागून एक चित्रपट फ्लॉप होत होते तेव्हा जुहीने एक ब्लॉकबस्टर हिट चित्रपट नाकारून मोठी चूक केली होती. हा चित्रपट होता ‘राजा हिंदुस्थानी’. या चित्रपटाची ऑफर करिश्माच्या आधी जुहीला देण्यात आली होती, पण तिने ती नाकारली. पुढे हा चित्रपट करिश्माला मिळाला आणि या चित्रपटाने तिला थेट नंबर १ च्या स्पर्धेत नेऊन बसवलं.
यानंतर जुहीने जय मेहता या उद्योगपतींशी गुपचूप केलेल्या विवाहाच्या चर्चाही रंगू लागल्या होत्या. पण पुढे शाहरुख खानसोबत तिची मैत्री बहरली आणि या दोघांनी मिळून स्थापन केलेल्या ‘ड्रीम्स अनलिमिटेड’ या कंपनीच्या चर्चांमुळे जुहीच्या लग्नच्या चर्चा काहीशा मागे पडल्या. ‘ड्रीम्स अनलिमिटेड’ या कंपनीच्या माध्यमातून तयार करण्यात आलेल्या ‘फिर भी दिल है हिंदुस्थानी’ या चित्रपटाने जुहीच्या करिअरला मदतीचा हात दिला. पण तो पर्यंत काळ खूप पुढे निघून गेला होता.
=======
हे देखील वाचा – …तर अक्षयकुमार ठरला असता खरा बाजीगर
=======
या काळात काजोल, करिष्मा, ऐश्वर्या, राणी, प्रीती या नव्या दमाच्या नायिका नंबर १ पदाच्या प्रबळ दावेदार समजल्या जाऊ लागल्या. जुही चावला ((Juhi Chawla)) आणि माधुरी दीक्षित दोघीही या स्पर्धेमधून बाहेर पडल्यातच जमा होती. अखेर नंबर १ पदाच्या पलीकडे गेलेल्या या दोन्ही अभिनेत्री २०१४ सालच्या ‘गुलाब गॅंग’ या चित्रपटात एकत्र आल्या. अर्थात हा चित्रपट काही फारसा यशस्वी झाला नाही. पण या दोघींचे चाहते आजही कमी झालेले नाहीत आणि आजही त्यांना चाहत्यांचं भरभरून प्रेम मिळतंय.