दिग्दर्शक सुभाष घई आणि गीतकार आनंद बक्षी यांचे जबरदस्त ट्युनिंग!
‘झॉलिवूड’ कागदावर उतरविणारी मनस्वी कलावंत: आसावरी नायडू
आईचं झाडीपट्टीत कुठलंसं नाटक सुरू होतं. कॉलेजला सुट्या असल्यानं आसावरी सहज प्रयोगाच्या त्या गावी गेली. तोपर्यंत झाडीपट्टी म्हणजे काय वगैरे तिच्या फारसं ध्यानीमनीही नव्हतं. एक कुणीतरी कलावंत कमी पडत होता म्हणून दिग्दर्शकानं, “तू ही छोटी भूमिका करशील का”, असं विचारलं. आसावरी तयार झाली. झाडीपट्टीच्या रंगभूमीवर पहिल्यांदाच पाऊल पडलं अन् ते तिथंच स्थिरावलं. आजपर्यंतच्या आयुष्यात तिला झाडीपट्टीनं भरभरून दिलंय. म्हणूनच की काय, तिच्या लेखणीतून झाडीपट्टी रंगभूमीची ओळख करून देणाऱ्या ‘झॉलिवूड’ची कथा आकाराला आली.
मुंबईनंतरची व्यावसायिक म्हणून कुठली यशस्वी रंगभूमी असेल तर ती झाडीपट्टी. मोसमात सव्वाशे कोटींची उलाढाल झाडीपट्टीत होते. दिवाळी ते होळी असा या नाट्यप्रयोगांचा सीझन असतो. चंद्रपूर, भंडारा, गोंदिया जिल्ह्यांतील गावोगावी नाटकांचे प्रयोग होत असतात. काही नाटके रात्रभर चालतात. याच ग्लॅमरस रंगभूमीनं मुंबईच्या कलावंतांनाही भुरळ पाडलेय. म्हणूनच, कित्येक नावाजलेले कलावंत झाडीपट्टीच्या नाटकांत काम करण्यासाठी येतात. अशा या झाडीपट्टी रंगभूमीचा इतिहास आसावरी नायडू लिखित आणि तृषांत इंगळे दिग्दर्शित ‘झॉलिवूड’मधून कळणार आहे. आसावरीनं यात रजनी हे पात्रही साकारलं आहे, एक गीतही लिहिलं आहे. (Asawari Naidu and Zadipatti Natak)
आसावरी गेल्या २० वर्षांपासून झाडीपट्टी रंगभूमीवर सक्रिय आहे. दोन हजारांवर प्रयोग तिनं केले आहेत. काही नाटकंही लिहिली आहेत. झाडीपट्टीचे दिलीपकुमार अशी ओळख असलेले प्रभाकर आंबोणे आणि प्रसिद्ध अभिनेत्री वत्सला पोलकमवार यांची आसावरी ही लेक. आई-वडिलांचा वारसा ती चालवतेय.
आसावरी सांगते, “योगायोगानंच मी झाडीपट्टीत आले. खरंतर प्रारब्धच मला इथं घेऊन आलं. छोट्याशा भूमिकेतही प्रेक्षकांची उत्स्फूर्त दाद मला कमालीची आकर्षित करून गेली. शिवाय, नंतर मिळालेलं मानधनाचं पाकिट तर अधिकच ऊर्जा देऊन गेलं. मी नागपुरात प्रायोगिक रंगभूमीवर काम करायचे. मात्र, एवढी दाद, एवढे उत्साही प्रेक्षक अनुभवले नव्हते. (Asawari Naidu and Zadipatti Natak)
तुम्ही शहरात नाटकं करता तेव्हा तुमचा प्रेक्षक ठराविक पातळीवरचा असतो. झाडीपट्टीत तसं नाही. ते त्या लोकांचं नाटक असतं. ‘झाडीपट्टीत येऊनच जा’, असा आग्रह झाल्यानंतर मी येथे आले. रात्ररात्रभर नाटकं कशी चालतात, याचं अप्रूप होतं. तेव्हा कळलं, हे केवळ नाटक नसतं, तर तेथील लोकांसाठी तो उत्सव असतो. शेकडो-हजारो प्रेक्षक या नाट्यरूपी उत्सवात सहभागी व्हायला आले असतात.
इथे नाटकातील प्रत्येक कलावंत त्यांच्यासाठी सेलिब्रिटी असतो. बरं, त्यांच्यासमोर पाट्या टाकून चालत नाहीत. ते मनापासून दाद देतात, तसंच काही आवडलं नाही, तर तुम्हाला स्टेजवरून खाली उतरवायलाही मागेपुढे पाहात नाहीत. दर्दी लोकांचीच ही गर्दी असते. इथले लोक कुठल्या स्वार्थानं नाटकाला येत नाहीत. ते सच्चे प्रेक्षक आहेत. हा ‘लाइव्हनेस’च कलावंतालाही अधिक समाधान देऊन जातो.
नंतरच्या काळात याच क्षेत्रात स्थिरावायचं ठरवलं. तोवर लग्न झालं होतं. दोन पर्याय होते, मुंबईत जाऊन नाट्य-सिनेक्षेत्रात नशीब आजमवायचं की, झाडीपट्टी करून नाटक आणि संसार अशा दोन्ही बाजू सांभाळायच्या? मी दुसरा पर्याय निवडला. पती तुषार, सासरे ज्येष्ठ रंगकर्मी गणेश नायडू यांनीही पाठिंबा दिला. त्यामुळेच हा प्रवास यशस्वीरीत्या सुरू आहे.” (Asawari Naidu and Zadipatti Natak)
असा घडला ‘झॉलिवूड’
आसावरी आणि चित्रपट असा काही संबंध नव्हताच. नाटक आणि घर हेच तिचं विश्व. नाही म्हणायला चार-पाच चित्रपटांत तिनं त्या त्या दिग्दर्शकांच्या आग्रहाखातर छोट्या-मोठ्या भूमिका केल्या होत्या. मात्र चित्रपट हे माध्यम कधी स्वीकारलं नाही. नाटकाचा प्रवास सुरू असताना तृषांत इंगळे तिच्याकडे आला. तृषांतनं कित्येक नाटकांतून आसावरीच्या मुलाची भूमिका केली होती. त्यामुळे ट्युनिंग चांगलं होतं.
अतिशय हलाखीच्या परिस्थितीत दिवस काढलेल्या तृषांतला झाडीपट्टीनंच तारलं होतं, आर्थिक बाजू सावरली होती. दिग्दर्शक व्हायची त्याची महत्त्वाकांक्षा आधीपासूनच होती. “मी सिनेदिग्दर्शक झालो, तर पहिला चित्रपट झाडीपट्टीवरचाच करेन”, असं त्यानं ठरवून टाकलं होतं. (Asawari Naidu and Zadipatti Natak)
झाडीपट्टीने त्याच्यावर केलेल्या उपकारांची त्याला जाणीव आहे. आपली ही मनीषा त्यानं आसावरीकडे बोलून दाखविली अन् कथा लिहिण्याचा प्रस्ताव ठेवला. आसावरीचा सुरुवातीला विश्वास बसला नाही. मात्र, तृषांतनं पिच्छाच पुरविला. तृषांतची जिद्द पाहून आसावरीनं कथा लिहायला सुरुवात केली. कथा पूर्ण झाली. नंतर पात्रनिवडीचं काम सुरू झालं. निर्माता मिळविण्यासाठी तृषांतची धावपळ सुरू होती. दोनशे लोकांकडे त्यानं ‘नरेशन’ दिलं. मात्र, नकारच आला. तरी त्यानं जिद्द सोडली नाही. त्यादरम्यान तो मुंबईत पृथ्वी थिएटरमध्ये दाखल झाला. तेथील ओळखी त्याच्या कामी आल्या.
अमित मासूरकर यांच्या ‘न्यूटन’ चित्रपटाचा तो कास्टिंग असोसिएट होता. मासूरकर यांच्यासोबत यानिमित्ताने चांगले संबंध निर्माण झाले. मासूरकरांनी अमितची धडपड पाहिली होती. त्यांनी मदतीचा हात पुढं केला. शिवाय, मातीतील चित्रपट बनविणारे नागराज मंजुळे यांनीही खूप मदत केली.
मुंबईत चांगले लोक एकत्र आले. काल्पनिक कथेच्या आधारावर काही वास्तविक घटनांचा संदर्भ घेऊन झाडीपट्टीचं चित्र पूर्ण केलं. दोन माणसांतला संघर्ष, दोन निर्मात्यांमधली स्पर्धा, अपघातात आठ कलावंतांचं निघून जाणं आदींचा कथेत अंतर्भाव करण्यात आला. अभ्यास करून एकेक दृश्य लिहिण्यात आलं, त्यांवर चर्चाही झाल्या. असं करत करत दीड वर्षानंतर कथा पूर्ण झाली. नंतर खूप संघर्षातून चित्रपट पूर्ण झाला. तो रिलीज होणार होता. मात्र, कोव्हिडमुळे तीन वर्षे प्रदर्शन रखडले. आता तो प्रेक्षकांपुढे आलाय. (Asawari Naidu and Zollywood Movie)
-अन् शूटिंगस्थळी वाघ आला
चित्रपट खूप अडचणी पार करून पूर्ण झाला. तरी यादरम्यान काही गमतीजमती घडल्याच. एकदा तर शूटिंगस्थळी चक्क वाघ आला होता. आसावरीनं तो प्रसंग सांगितला. चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाहीजवळच्या मरेगाव इथं शूटिंग सुरू होतं. तो शूटिंगचा शेवटचा दिवस होता. काही ॲक्शन सीन्स शूट होत होते. तिथं फारसं काही काम नसल्यानं आसावरी अन् तिची मैत्रीण बाजूलाच उभारण्यात आलेल्या ग्रीनरूममध्ये आराम करत होत्या. ग्रीनरूमला ग्रीलचं दार होतं.
तेवढ्यात युनिटचा एक सहकारी ग्रीलजवळ आला आणि इशाऱ्यानंच सांगू लागला, “इथून जा, निघून जा…” आसावरी व तिच्या मैत्रिणीला वाटलं, कदाचित तिथं काहीतरी शूट होत असावं आणि आपण मध्ये येतोय म्हणून त्या फक्त सावरून बसल्या. मात्र, तो सहकारी डोक्यावर हात मारून पुन्हा पुन्हा इशारे करू लागला. मागे पडदा उघडून पाहतो तर काय, वाघ जाताना दिसला. सगळ्यांची पाचावर धारण बसली. अर्धा तास कुणीच कुणाशी काही बोललं नाही. वाघ मात्र काही वेळासाठी तिथं आला, शांतपणे निघूनही गेला होता. (Asawari Naidu and Zadipatti Natak)
जे काही करायचं, ते दर्जेदार…
“झाडीपट्टी ही रसिकाश्रय मिळालेली रंगभूमी आहे. त्यामुळे संपूर्ण आयुष्यभर इथंच काम करीन. कारण, या रंगभूमीनं जे काही दिलंय, त्याची मोजदाद कशातच नाही, असं आसावरी सांगते. ‘झॉलिवूड’च्या निमित्तानं चित्रपट या तंत्राला जवळून अनुभवता आलं. फिल्ममेकिंग काय असतं, हे इथं खऱ्या अर्थानं कळलं. हे माझ्यासाठी वर्कशॉप होतं.
=========
हे ही वाचा: छोट्या शहरातून आंतरराष्ट्रीय पातळीवर झेप घेणारा गुणी कलावंत: निशांत रॉय बोम्बार्डे
लपाछपी: थरारक, रहस्यमय, उत्कट आणि भीतीदायक
या चित्रपटाच्या प्रमोशन निमित्तानं ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मध्ये सहभागी होण्याची संधी मिळाली, मुंबईत ग्रँड प्रीमियर झाला. या गोष्टी माझ्यासाठी, आमच्या युनिटसाठी खूप महत्त्वाच्या आहेत”, अशी भावना आसावरीनं व्यक्त केली.
भविष्यात संधी मिळाली तर चांगलंच काहीतरी करेन. एखादी फिल्म करायची, तर मनातून ती करण्याची इच्छा निर्माण व्हावी. शंभर सुमार चित्रपट करण्यापेक्षा दोनच चांगले करण्यावर भर राहील. माझे प्रयत्न प्रेक्षकांपर्यंत पोहोचावेत, त्यांची दाद महत्त्वाची ठरेल, असंही आसावरी म्हणते. रंगदेवता तिच्यावर प्रसन्न आहेच, चित्रपटक्षेत्रातही तिची वाटचाल दर्जेदार स्वरूपाची असेल, अशी आशा करायला हरकत नाही.