दिग्दर्शक सुभाष घई आणि गीतकार आनंद बक्षी यांचे जबरदस्त ट्युनिंग!
‘हे’ मराठी चित्रपट अडकले होते वादाच्या भोवऱ्यात
मराठी चित्रपट आणि विवाद हा प्रकार तुलनेने कमी वेळा घडतो. अलीकडे सोशल मीडियाच्या जमान्यात काही प्रकार घडले आहेत, नाही असं नाही. पण मुळात मराठी चित्रपट वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत, त्यावरून आंदोलनं झाली, कोर्ट केस झाल्या असे प्रकार सहसा मराठी चित्रपटसृष्टीमध्ये होत नाहीत. परंतु काही मराठी चित्रपट असे आहेत ज्यावरून समाजामध्ये विवादित स्थिती निर्माण झाली होती. हे चित्रपट कोणते आहेत याबद्दल आपण माहिती घेऊया (Controversial Marathi Movies) –
खैरलांजीच्या माथ्यावर
हा चित्रपट २००६ मध्ये विदर्भातील एका गावात घडलेल्या ‘खैरलांजी’ हत्याकांडावर आधारित होता. या गावातील दलित शेतकरी भय्यालाल भोतमांगे यांच्या पत्नी व मुलांची अमानुष हत्या करण्यात आली होती. अत्यंत भीषण अशा या हत्याकांडावर आधारित ‘खैरलांजीच्या माथ्यावर’ हा चित्रपट मात्र प्रदर्शित होऊ शकला नाही.
या चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी आणण्याची विनंती करणारी याचिका खुद्द भय्यालाल भोतमांगे आणि अखिल भारतीय धम्मसेनेचे संयोजक रवी शेंडे यांनी दाखल केली होती. याचिका दाखल करण्याचं कारण म्हणजे चित्रपटामध्ये भोतमांगे यांचे व्यक्तिमत्व चुकीच्या पद्धतीने मांडण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं. तसंच यामधील काही दृशांमुळे त्यांच्या मुलीची प्रतिमा मलिन होत असल्याचं मतही त्यांनी व्यक्त केलं होतं. अर्थात संपूर्ण चित्रपटावर त्यांनी आक्षेप घेतला नव्हता. परंतु प्रदर्शनाआधी चित्रपट न दाखविल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली होती.
या याचिकेनंतर पुढे सेन्सॉर बोर्डने दिलेले प्रमाणपत्र कोर्टाने रद्दबादल ठरवलं व चित्रपटावर बंदी घातली. पुढे मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठानेही या चित्रपटावरील बंदी कायम ठेवली.
या चित्रपटावर बंदी घालण्यात आली असली तरी याच हत्याकांडावर आधारित ‘कथा खैरलांजी’ हे नाटक औरंगाबादसह मुंबई, कोल्हापूर, वाशीम, आंबेजोगाई, वाशी आदी ठिकाणी येथे यशस्वीरीत्या सादर करण्यात आले होते. (Controversial Marathi Movies)
नाय वरण भात लोणचा कोण नाय कोन्चा
अलीकडच्या काळात प्रदर्शित झालेल्या चित्रपटांमध्ये सर्वात जास्त विवादित ठरलेला चित्रपट म्हणजे ‘नाय वरण भात लोणचा कोण नाय कोन्चा’. महेश मांजरेकर दिग्दर्शित या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाल्यावर लगेचच राष्ट्रीय महिला आयोगाने त्यावर नाराजी व्यक्त केली होती.
चित्रपटाच्या ट्रेलर विरोधात महाराष्ट्रातील एका संस्थेकडून राष्ट्रीय महिला आयोगाकडे तक्रार करण्यात आली. यानंतर आयोगाच्या प्रमुख रेखा शर्मा यांनी माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या सचिवांना चित्रपटाच्या ट्रेलरमधील काही आक्षेपार्ह लैंगिक दृश्यांना सेन्सॉर करण्यासंदर्भात पत्र लिहिले. यामध्ये चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये महिलांशी संबंधित आक्षेपार्ह दृश्ये आणि अश्लीलता दाखवल्याचा आरोप करण्यात आला होता.
तसंच, चित्रपटाचं ट्रेलर फेसबुक, यूट्यूब, ट्विटर इत्यादी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर कोणत्याही वयाच्या बंधनाशिवाय प्रसारित करण्यात आल्यामुळे आयोगाने त्यावरही नाराजी व्यक्त केली होती. अखेर झालेला वाद मिटून चित्रपट प्रदर्शित झाला. (Controversial Marathi Movies)
न्यूड
न्यूड हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात सापडला होता तो दोन गोष्टींमुळे. पहिली गोष्ट म्हणजे ‘कॉपीराईट’. हिंदी लेखिका मनिषा कुलश्रेष्ठ यांनी या चित्रपटाची कथा आपल्या पुस्तकातून घेण्यात आल्याचं सांगत या विरोधात कोर्टात जाणार असल्याचंही सांगितलं. यासंदर्भात रवी जाधव यांच्याशी अगोदरच संपर्क करण्याचा प्रयत्न केल्याचंही त्यांनी सांगितलं होतं. परंतु नंतर या वादावर पडदा पडला. (Controversial Marathi Movies)
दुसरी गोष्ट होती ती गोवा येथे होणाऱ्या इफ्फी (IFFI) आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची. या महोत्सवाचे उद्घाटन ‘न्यूड’ चित्रपटाने होणार होते. परंतु आयत्यावेळी माहिती आणि प्रसारण मंत्रालयामार्फत चित्रपट नाकारल्याचं कारण सांगून एका मल्याळम चित्रपटासह ‘न्यूड’ चित्रपटाला महोत्सवांमधून वगळण्यात आलं. इफ्फीचे संयोजक विवेक अग्निहोत्री यांनी एका मुलाखतीत सांगितलं की, न्यूडला वगळण्यात आले कारण चित्रपट अपूर्ण होता. तर गोव्याचे तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी सांगितले, “चित्रपटाला सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्मकडून प्रमाणपत्र मिळत नाही, तोपर्यत संपूर्ण प्रक्रिया पूर्ण होत नाही.”
==========
हे देखील वाचा – सत्यघटनेवर आधारित ‘हे’ मराठी चित्रपट तुम्ही पहिले आहेत का?
==========
यावर रवी जाधव यांनी नाराजी व्यक्त करत एका मुलाखती दरम्यान सांगितलं, “इफ्फीसाठी सेन्सॉर प्रमाणपत्राची अजिबात गरज नसते. शिवाय माझा चित्रपट किमान ९९ टक्के पूर्ण होता. उर्वरित एक टक्का काम मीडिया पार्टनर बोर्डवर आल्यानंतर केलं जातं. त्याचा चित्रपटाशी काही संबंध नसतो. त्यावेळी न्यूडचे दिग्दर्शक रवी जाधव यांनी न्यायासाठी कोर्टाचे दार ठोठावले होते. तसंच सर्व मराठी चित्रपटसृष्टी रवी जाधव यांच्या बाजूने उभे राहिली होती. (Controversial Marathi Movies)
मराठी टायगर्स
महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्न हा गेले कित्येक वर्ष न सुटलेला विवादित मुद्दा आहे. याच प्रश्नाशी संबंधित येळ्ळूर घटनेवर आधारित ‘मराठी टायगर्स’ हा चित्रपट बेळगावात प्रदर्शित करण्यास विरोध करण्यात आला होता. मात्र त्यावेळी शिवसैनिकांनी कर्नाटक सीमेजवळील महाराष्ट्रातील शिनोळी गावच्या हद्दीत तंबू उभारून सीमा भागातील मराठी नागरिकांना हा चित्रपट दाखवला होता.