ज्यू नरसंहाराची कहाणी चित्रपटात, खुद्द नाझी सैतानाच्या आवाजात!
दुसऱ्या महायुद्धाच्या काळात हिटलरच्या नाझी राजवटीत साठ लाख ज्यू धर्मियांची अतिशय क्रूरपणे कत्तल करण्यात आली. या भीषण नरसंहाराचे आदेश हिटलरने दिले आणि अंमलबजावणी केली ती अडॉल्फ आईकमन (Adolf Eichmann) सारख्या अधिकाऱ्यांनी. हा क्रूरकर्मा आईकमन युद्धानंतर अर्जेंटिनामध्ये पळून गेला आणि तिकडे नाव बदलून राहत होता.
इस्रायलच्या ‘मोसाद’ या गुप्तहेर संघटनेनं चौदा वर्षानंतर त्याला शोधून काढलं आणि इस्रायलमध्ये आणलं. आईकमनवर इस्रायलमध्ये खटला चालवण्यात आला आणि त्याला फाशी देण्यात आली. आईकमनचा शोध, त्याचा पाठलाग, त्याचं अपहरण ही ‘मोसाद’ची कामगिरी अतिशय नाट्यपूर्ण आणि चित्तथरारक आहे. २०१८ साली आलेल्या ‘ऑपरेशन फिनाले’ या चित्रपटात वरील सर्व घटनाक्रम उत्कंठावर्धक पद्धतीने दर्शवण्यात आला आहे. (नेटफ्लिक्सवर हा चित्रपट बघू शकता.)
याच विषयावरील अशोक जैन यांनी लिहिलेले ‘पारध’ हे पुस्तकही अतिशय वाचनीय आहे. नरसंहाराला कारणीभूत ठरलेल्या याच आईकमनवर आणखी एक चित्रपट येतोय, ज्यामध्ये खुद्द आईकमनचा आवाज ऐकू येणार आहे. (The Lost Eichmann Tapes)
अर्जेन्टिनामध्ये अटक होण्यापूर्वी आईकमनने विल्यम सॅसेन (Willem Sassen) या डच पत्रकाराला मुलाखत दिली होती. हा डच पत्रकारही मूळचा नाझी अधिकारीच होता आणि तो सुद्धा युद्धानंतर दक्षिण अमेरिकेत पळून आला होता. विल्यमने आईकमनकडे त्याचं चरित्र लिहिण्याचा प्रस्ताव मांडला होता आणि आईकमनने त्यासाठी तयारी दर्शवली होती. त्यानंतर मग पुढचे सहा महिने हे मुलाखतींचं सत्र सुरु होतं आणि रेकॉर्डिंग होतं सत्तर तासांचं!
विल्यमने काळजीपूर्वक त्यातील महत्त्वाचा भाग लिहून काढला आणि तो पुन्हा आईकमनकडे तपासायला दिला. आईकमनने त्यावर स्वतःच्या हस्ताक्षरात काही नोट्स लिहून दिल्या. हे रेकॉर्डिंग आणि त्यावरून केलेलं लिखाण हे माझ्या मृत्यूनंतरच प्रकाशित करता येईल अशी अटही आईकमॅनने घातली होती. पण आईकमनला अटक झाल्यावर विल्यमने अमेरिकेतील ‘लाईफ’ मॅगझिनमध्ये मुलाखतीवर आधारित एक दीर्घ लेख लिहिला, ज्यातून त्याला बक्कळ कमाई झाली. या मुलाखतीत आईकमनने नरसंहाराची कबुली तर दिलीच होती, वर अतिशय संतापजनक बढायाही मारल्या होत्या. (The Lost Eichmann Tapes)
रेकॉर्डिंगमधलं आईकमनचं वाक्य…
“आम्ही लाखो ज्यूंना मारलं असं तुम्ही म्हणत असाल, तर मी अगदी समाधानाने म्हणेन की, आम्ही शत्रूचा खात्मा केला हे उत्तमच झालं. मी जे कृत्य केलं त्याबद्दल मला कसलाही पश्चाताप नाही.”
याउलट १९६० मध्ये जेव्हा जेरुसलेममधील कोर्टात आईकमनवर खटला सुरु होता तेव्हा तो आपण कसे निर्दोष आहोत असा आव आणत होता. विल्यमने आपल्याकडील टेप्स आईकमन कुटुंबियांकडे सोपवल्या होत्या, पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे याच मुलाखतीची ७०० पानांची प्रत आणि ‘लाईफ’ मॅगझिनमध्ये छापून आलेला लेख इस्रायलमधील कोर्टात पुरावा म्हणून सादर करण्यात आला. हे पुरावे इस्रायलपर्यंत कसे पोचले हे तेव्हा एक गूढच होतं. याच पुराव्यांच्या आधारे आईकमनला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती. (The Lost Eichmann Tapes)
द डेविल्स कन्फेशन: द लॉस्ट आईकमन टेप्स (The Devil’s Confession: The Lost Eichmann Tapes)
या चित्रपटातून आता पुन्हा एकदा क्रूरकर्म्याची कबुली जगासमोर येणार आहे. यारीव्ह मोझर (Yariv Mozer) या दिग्दर्शकाने मोठ्या खुबीने आईकमनच्या आवाजाचाच वापर करून या चित्रपटाची निर्मिती केली आहे. आईकमन टेप्स जर्मनीमधील राष्ट्रीय संग्रहालयात आहेत ही माहिती दिग्दर्शक मोझर याला दोन वर्षांपूर्वी समजली होती. ही माहिती देणारा जेकब सिट (Jacob Sitt) हाच पुढे जाऊन मोझरच्या चित्रपटाचा निर्माता बनला.
काहीसं माहितीपटाचं स्वरूप असलेल्या या ‘द डेविल्स कन्फेशन – द लॉस्ट आईकमन टेप्स’’ चित्रपटामध्ये डच पत्रकार विल्यमने घेतलेल्या आईकमनच्या मुलाखतीचं नाट्यरूपांतर करण्यात आलं आहे. इस्रायली अभिनेता एली गोरेन्स्टन (Eli Gorenstein) याने आईकमनची भूमिका केली आहे, पण यात ‘एली’चा नाही, तर खुद्द आईकमनचा आवाज ऐकू येतो.
=========
हे ही वाचा: रणदीप हुडा: ट्रोलर्सच्या कमेंट्सना माध्यमांचीच फूस
सौदीमध्ये मानवी हक्कांची पायमल्ली, हॉलिवूडसाठी मात्र पायघड्या
=========
मूळ रेकॉर्डिंग मिळवून त्यातील आईकमनचा आवाज यासाठी वापरण्यात आला आहे. नुकताच इस्रायलमधील तेल अवीव शहरात झालेल्या फिल्म फेस्टीवलमध्ये या चित्रपटाची निवड करण्यात आली होती. हा चित्रपट जून महिन्यात इस्रायलमधील ‘कान टीव्ही’ या वाहिनीवरून तीन भागात प्रसारित होणार आहे.