दिग्दर्शक सुभाष घई आणि गीतकार आनंद बक्षी यांचे जबरदस्त ट्युनिंग!
..तर बिग बी दिसले असते ‘खलनायक’!
“नायक नहीं खलनायक हूँ मैं…” चित्रपटात हे गाणं ज्याच्यावर चित्रित करण्यात आलं होतं, तो त्यावेळी खऱ्याखुऱ्या आयुष्यातही खलनायक ठरला. कहानी कभी कभी पुरी फिल्मी नही होती…१९९३ साली आलेला खलनायक चित्रपट सर्वांना चांगलाच आठवत असेल. संजय दत्त, माधुरी दीक्षित, जॅकी श्रॉफ अभिनित हा चित्रपट त्या वर्षीचा ‘आँखे’ नंतरचा दुसरा ‘ब्लॉकबस्टर हिट’ ठरला होता. या चित्रपटाने केवळ भारतातच नाही, तर परदेशातही छप्पडतोड कमाई केली होती. त्यावेळच्या हॉलिवूडच्या कितीतरी चित्रपटांपेक्षा जास्त लोकप्रियता ‘खलनायक’ला मिळाली होती.
एक कुख्यात, धूर्त गुन्हेगार बल्लू (संजय दत्त), कर्तव्यनिष्ठ महत्त्वाकांक्षी इन्स्पेक्टर राम (जॅकी श्रॉफ) आणि त्याची प्रेयसी गंगा (माधुरी दीक्षित) ही या चित्रपटातील मुख्य पात्र. खूप वर्षांपासून पोलीस बल्लूला पकडायच्या प्रयत्नात असतात. अखेर राम त्याला पकडण्यात यशस्वी होतो, पण दुर्दैवाने बल्लू तुरुंगातून पळून जातो आणि त्याचा दोष रामवरच येतो. प्रसारमाध्यमांमध्ये रामविरुद्ध उलट सुलट बातम्या छापून येतात. यानंतर रामची प्रेयसी गंगा बल्लूला पुन्हा पकडण्यासाठी आणि रामने गमावलेली प्रतिष्ठा त्याला परत मिळवून देण्यासाठी कंबर कसते. पुढे नेहमीचा टिपिकल बॉलिवूड लव्ह ट्रँगल, परिस्थितीमुळे बल्लू गुन्हेगार कसा झाला याचं वर्णन आणि नंतर सत्याचा विजय दाखवून चित्रपट संपतो. (khalnayak – Lesser known facts)
बॉलिवूडच्या टिपिकल मसालापट चित्रपटांपैकी एक असूनही खलनायक वेगळा ठरला तो सुभाष घई यांच्या दिग्दर्शनामुळे. अभिनयाच्या बाबतीत बोलायचं तर संजय दत्त जॅकी श्रॉफ समोर उजवा ठरतो. माधुरी नेहमीप्रमाणेच या चित्रपटातही सुंदर दिसली आहे आणि अभिनयही लाजवाब! चित्रपटातील विवादित “चोली के पीछे क्या है…” या गाण्यासाठी त्या वर्षीचे दोन फिल्मफेअर पुरस्कार मिळाले होते – एक सर्वोत्कृष्ट पार्श्वभागायनासाठी इला अरुण आणि अलका याज्ञीक यांना, तर दुसरा सरोज खान यांना सर्वोत्कृष्ट नृत्य दिग्दर्शनासाठी.
‘खलनायक’ चित्रपटामध्ये संजय दत्त नकारात्मक भूमिकेत आहे. म्हणजे चित्रपटातला खलनायक संजय दत्त आहेच, पण चित्रीकरण चालू असताना संजय दत्तला एके ४७ जवळ बाळगल्याच्या कारणावरून ‘टाडा’ कायद्याअंतर्गत अटक करण्यात आली होती. त्यांनतर त्याचे अंडरवर्ल्डशी संबंध असल्याच्या चर्चाही रंगल्या होत्या. या पार्श्वभूमीवर त्यावेळी संजय दत्ताच्या रिलीज झालेल्या सर्व चित्रपटांचे खेळ बंद करण्याची मागणी समाजमाध्यमांमधून आणि काही पक्षांच्या कार्यकर्त्यांकडून करण्यात आली होती. यानंतर अनेक ठिकाणी चित्रपटाचे खेळ बंद करण्यात आले होते. (khalnayak – Lesser known facts)
या सगळ्या प्रसंगांनंतर चित्रपटाचे निर्माते – दिग्दर्शक सुभाष घई यांना प्रचंड टेन्शन आलं होतं. अर्थात पुढे चित्रपट पूर्ण झाला. पण चित्रपटासंबंधित विवाद काही संपला नाही. चित्रपटातील ‘चोली के पीछे क्या है’ या गाण्यावरून नवीन विवाद उत्पन्न झाला. अखेर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी, गाण्याचे बोल ही कथानकाची गरज असल्याचं सांगून लोकांना विरोध मागे घ्यायचं आवाहन केलं आणि वादळ शांत झालं.
या गोष्टी तर सर्वांचा माहिती असतील, पण खलनायक चित्रपटाच्या मेकिंग संदर्भात अशा काही गोष्टी आहेत ज्या फार कमी लोकांना माहिती असतील. त्याबद्दलच थोडंसं (khalnayak – Lesser known facts) –
संजय दत्त नव्हता पहिली पसंती
चित्रपटातील बल्लूच्या भूमिकेसाठी सर्वात आधी नाना पाटेकर यांच्या नावाचा विचार करण्यात आला होता. नाना पाटेकर या भूमिकेसाठी तयारही होते. परंतु स्क्रिप्ट पूर्ण झाल्यावर मात्र घई यांनी मध्यमवयीन नायकापेक्षा तरुण नायक या स्क्रिप्टसाठी जास्त योग्य आहे, असा विचार करून ही भूमिका संजय दत्तला ऑफर केली. अर्थात यानंतर नाना पाटेकर आणि घई यांच्यामधील संबंध बिघडले. या भूमिकेसाठी आधी अनिल कपूरच्या नावाचा पण विचार घई यांनी केला होता.
रामच्या भूमिकेसाठी आमिर खान होती पहिली पसंती
सुभाष घई यांनी रामची भूमिका आधी आमिर खानला ऑफर केली होती. परंतु आमिरला बल्लूची भूमिका विशेष भावली. पण ती भूमिका संजय दत्त करणार हे निश्चित झालेलं असल्याचं कळल्यावर रामची भूमिका न आवडल्यामुळे आमिरने नकार दिला आणि ही भूमिका जॅकी श्रॉफला मिळाली. (khalnayak – Lesser known facts)
अमिताभ बच्चन दिसू शकले असते खलनायकाच्या भूमिकेत
प्रसिद्ध वेबसाईट IMDB नुसार सुभाष घई अमिताभ बच्चनसोबत ‘देवा’ नावाचा चित्रपट बनवत होते. परंतु काही कारणांनी हा चित्रपट पूर्ण होऊ शकला नाही. पुढे काही वर्षांनी स्क्रिप्टमध्ये थोडा बदल करून नवीन कलाकारांसह ‘देवा’ला ‘खलनायक’ बनवण्यात आलं. त्यावेळी जी भूमिका अमिताभ बच्चन साकारणार होते ती पुढे संजय दत्तने साकारली.
=======
हे ही वाचा: ‘या’ अभिनेत्रीच्या ‘टॉपलेस’ फोटोने देशात उडाली होती मोठी खळबळ!
========
खलनायक चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान संजय दत्त आणि माधुरीचे सूर जुळले होते. परंतु पुढे संजय दत्तला अटक झाल्यावर दोघांचे संबंध बिघडले, अशा चर्चा तेव्हा प्रसारमाध्यमांमध्ये रंगल्या होत्या. कारण काहीही असो, पण खलनायक चित्रपटामध्ये संजय दत्त – माधुरी दीक्षितची केमिस्ट्री एकदम भन्नाट जुळून आलेली आहे. हा चित्रपट बघितला नसेल, तर बाकी कशासाठी नाही पण किमान या केमिस्ट्रीसाठी तरी आवर्जून बघा.