दिग्दर्शक सुभाष घई आणि गीतकार आनंद बक्षी यांचे जबरदस्त ट्युनिंग!
अवंतिका: एका छोट्या कथेची प्रदीर्घ चाललेली मालिका
आपलं शिक्षण पूर्ण करून उत्तम करिअर घडविण्याचं स्वप्न बघणारी एक मध्यमवर्गीय घरातली कर्तबगार मुलगी, एका मोठ्या श्रीमंत घरात लग्न होऊन जाते. त्या घरात तिचा संसार फुलू लागतो. संसार वेलीवर फूलही उमलतं. आयुष्य खूप साधं, सुंदर आहे असं वाटत असतानाच तिच्यासमोर येतं एक सत्य…आणि ती कोलमडून जाते. (Memories of Avantika)
स्नेहलता दसनूरकर यांच्या एका छोट्या कथेवर आधारित असणाऱ्या अवंतिका या मालिकेला कथाविस्तार करून खुलवलं ते रोहिणी निनावे यांनी. मूळ कथेमध्ये मालिकेतील अनेक पात्रं समाविष्ट नव्हती. फक्त अवंतिका, तिचे आई-वडील, सौरभ, त्याचं कुटुंब आणि मैथिली एवढ्याच पात्रांवर आधारित ही कथा होती. परंतु मालिका बनवताना एवढ्या मर्यादित व्यक्तिरेखांच्या आधारे बनवता येत नाही. त्यामुळे यामध्ये अवंतिकाची बहीण, मित्र मैत्रिणी यांची उपकथानकं जोडण्यात आली.
त्यावेळी समाजामध्ये वेगाने सांस्कृतिक बदल घडून येत होते. मुली शिकून-सवरून स्वावलंबी बनत होत्या. महानगरांमध्येच नव्हे, तर छोट्या शहरांमधील मुली (आणि त्यांचे पालकही) करिअरला प्राधान्य देऊ लागल्या होत्या. त्यांना त्यांच्या आत्मसन्मानाची जाणीव झाली होती. शिक्षण आणि संस्कारांमुळे सारासार विचार करून योग्य तो निर्णय घेण्याचा आत्मविश्वास त्यांच्यामध्ये निर्माण झाला होता. कुटुंबातील वृद्ध व्यक्तींनाही सुशिक्षित, सुसंस्कारित आणि स्वावलंबी मुलींचं प्रचंड कौतुक वाटत असे. ‘अवंतिका’ याच पिढीचं प्रतिनिधित्व करत होती. त्यामुळे अल्पावधीतच ही मालिका लोकप्रिय झाली. (Memories of Avantika)
अवंतिकाचा बालपणीपासूनच मित्र अनिश तिच्यावर मनापासून प्रेम करत असतो. परंतु अवंतिकाला मैत्री आणि प्रेम यातला फरक समजत असतो. तिला अनिश आयुष्यात हवा असतो, पण केवळ मित्र म्हणून पती म्हणून नाही. तिला अनिशला दुखवायचं नसतं. एक चांगली मैत्री तिला गमवायची नसते. प्रत्येक नात्याला त्याचा अधिकार देणारी, नात्यांचा मान ठेवून नातं जपणारी अवंतिका त्या काळातल्या तरुण मुलींना आपली ‘आयडॉल’ वाटू लागली होती. (Memories of Avantika)
कथानकाबद्दल बोलायचं तर, ही कथा होती एका स्त्रीच्या आत्मसन्मानाची आणि त्यासाठी तिने लढलेल्या लढाईची. मध्यमवर्गीय सुसंस्कृत कुटुंबातील सुंदर, सुशील अवंतिका सौरभशी लग्न करून एका श्रीमंत घराण्याची सून होते. पण सौरभचं अवंतिकावर प्रेम नसतं. त्याचं प्रेम असतं त्याच्या घरात राहणाऱ्या एका आश्रित मुलीवर – मैथिलीवर. परंतु सौरभ आणि मैथीलीचं नातं त्याच्या आईला मान्य नसतं. त्यामुळे तो अवंतिकाशी लग्न करायला होकार देतो. मात्र सौरभ अवंतिकाशी मनाविरुद्ध लग्न करतो असंही नसतं. त्यालाही अवंतिका आवडलेली असते, पण आवडणं आणि प्रेम करणं यात फरक असतो. हा फरक समजून घेताना झालेली सौरभची द्विधा मनस्थिती मालिकेमधून व्यवस्थित अधोरेखित केल्यामुळे सौरभच्या वागण्याचा राग येत नाही. नकारात्मक असूनही नसलेली अशी वेगळीच व्यक्तिरेखा संदीप कुलकर्णी यांनी अगदी सहजपणे साकारली.
मालिकेमध्ये मैथिलीची भूमिका करणाऱ्या सारिका निलाटकर या नवीन अभिनेत्रीने अत्यंत सुंदर अभिनय केला आहे. आश्रित म्हणून होणार अपमान, अव्हेरलं जाणं, डोळ्यासमोर प्रियकराचा संसार फुलताना बघणं अशा अनेक दुःखांना ती सामोरी जात असते. आपल्यापेक्षा प्रत्येक गोष्टीत सरस असणाऱ्या आपल्या प्रियकराच्या बायकोचा तिला राग येणं अगदी स्वाभाविक आहे. पण तो करत असतानाही कुठेतरी आपण तिच्या अधिकारावर हक्क सांगत असल्याची भावनाही तिच्या मनात असते. मैथिलीचं दुःख, राग, मानसिक अस्वस्थता; या साऱ्या भावना व्यक्त करताना सारिखा नवखी असूनही ती कुठेही कमी पडली नाही. त्यामुळे मैथिली प्रेक्षकांना भावली. तिच्यासाठी मनात राग नाही, तर सहानुभूती निर्माण झाली. (Memories of Avantika)
आपल्या पतीला दुसऱ्या स्त्री सोबत बघितल्यावर अवंतिकाला मानसिक धक्का बसतो. ती चिडत नाही, रडतही नाही, ती फक्त एक पुतळा बनून जाते. पण जेव्हा वास्तवाचं भान येतं तेव्हा आपल्या आत्मसन्मानासाठी लहानग्या बाळाला घेऊन सौरभचं घर सोडते. घटस्फोट घेऊन आपलं आयुष्य नव्याने सुरु करते. अर्थात आयुष्य सोपं नसतं याची प्रचिती तिला प्रत्येक वळणावर येत राहते.
मालिकेमध्ये अवंतिकाची बहीण, भाऊ आणि मित्र मैत्रिणींची जोडण्यात आलेली उपकथानकंही तितकीच प्रभावी आणि कथेचाच एक भाग वाटतात. त्यामुळे मालिकेचे भाग वाढविण्यासाठी उगाचच पाणी घातल्याची भावना अवंतिका बघताना कधीही आली नाही.
मृणाल कुलकर्णी या अभिनेत्रीने अवंतिकाची भूमिका इतक्या सहजपणे निभावली आहे की, तिच्याशिवाय दुसरं कोणी अवंतिका इतक्या प्रभावीपणे साकारूच शकत नाही. तिच्याव्यतिरिक्त मालिकेमध्ये संदीप कुलकर्णी, श्रेयस तळपदे, गिरीश ओक, स्मिता तळवलकर, सुलेखा तळवलकर, सुचेता बांदेकर, आदेश बांदेकर, शर्वाणी पिल्ले, पुष्कर श्रोत्री, राहुल मेहंदळे, पूर्णिमा भावे, सुबोध भावे, सुनील बर्वे, सारिका निलाटकर असे अनेक कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत होते. पुढच्या भागांमध्ये तर तुषार दळवी, रवींद्र मंकणी, सोनाली खरे अशा अनेक नवीन कलाकारांची मालिकेत एंट्री झाली. (Memories of Avantika)
=======
हे देखील वाचा – इंजिनिअर मुलांनी बनवला रोमँटिक चित्रपट, कोणतंही मोठं नाव नसताना चित्रपट झाला सुपरहिट!
=======
मालिकेची निर्मिती केली होती स्मिता तळवलकर यांनी, तर दिग्दर्शक होते संजय सूरकर. आभाळमाया नंतर झी मराठीवर (तेव्हा अल्फा मराठी) प्रचंड लोकप्रिय ठरलेली ही अजून एक नायिकाप्रधान मालिका. सलग तीन वर्ष ही मालिका सुरु होती. या मालिकेने मृणाल कुलकर्णीच्या लोकप्रियतेमध्ये भर घातली, तर कित्येक नवीन कलाकरांना लोकप्रियता मिळवून दिली. आजही ही मालिका झी मराठीच्या टॉपच्या लोकप्रिय मालिकांमध्ये गणली जाते.