‘तु मला सगळं काही दिलंस..!’ विशाखा सुभेदाराची ‘ती’ पोस्ट व्हायरल
ज्युलिया गार्नर साकारणार ‘मॅडोना’, स्वतः ‘मॅडोना’च करणार दिग्दर्शन!
नेटफ्लिक्सवरील ‘ओझर्क’ आणि ‘इन्वेंटींग ॲना’ या दोन सिरीजमधून नावारूपाला आलेली ज्युलिया गार्नर (Julia Garner) हिचं नाव मॅडोना बायोपिकसाठी पक्कं करण्यात आलं आणि या भूमिकेसाठी सुरू असलेला कलाकाराचा शोध दोन वर्षांनंतर अखेर संपला.
स्वतःच्या आयुष्यावरील चित्रपट स्वतःच दिग्दर्शित करणं, हे कदाचित पहिल्यांदाच होत असावं. काहीसा आत्मचरित्रासारखाच हा प्रकार. जगप्रसिद्ध पॉपस्टार आणि अभिनेत्री मॅडोनाने हे आव्हान पेलायचं ठरवलं आणि २ वर्षांपूर्वी तशी घोषणाही झाली. डियाब्लो कोडी (Diablo Cody) या सहलेखकासोबत या बायोपिकचं लेखनही मॅडोनाच करणार, हेसुद्धा जाहीर झालं. पण मॅडोनाची भूमिका कोण साकारणार याचा शोध संपतच नव्हता.
फ्लोरेन्स प्यू (Florence Pugh), ऍलेक्सा डेमी (Alexa Demie) आणि ओडेसा यंग (Odessa Young) या अभिनेत्रीची नावं आघाडीवर होती, पण शेवटी ज्युलिया गार्नरने बाजी मारली. मॅडोनाची व्यक्तिरेखा साकारायची म्हणजे अभिनयाबरोबर संगीत आणि नृत्य याचीही उत्तम जाण हवी, असा खुद्द मॅडोनाचा आग्रह होता. त्यामुळे ऑडिशनसाठी बऱ्याचदा ती स्वतः हजर असायची.
अंतिम फेरीत जेव्हा पाच अभिनेत्री उरल्या होत्या, तेव्हा तर तब्बल ११ तास ऑडिशन चालायची. ही ऑडिशनची प्रक्रिया अतिशय दमवणारी होती असं ज्युलिया गार्नरनेही सांगितलं. तिथे अभिनयकौशल्याबरोबरच नृत्यकौशल्यही दाखवावं लागायचं. स्वतः मॅडोनासुद्धा या अभिनेत्रींचे नृत्याचे ‘क्लास’ घ्यायची. मॅडोनासोबत वाचन तर व्हायचंच आणि पॉप गाण्यांचा सरावही व्हायचा.
अजूनही लेखनाची प्रक्रिया सुरू असून लवकरच अंतिम आराखडा तयार होईल, असं मॅडोनाने गेल्यावर्षी सांगितलं होतं. आपल्या आयुष्यातील कोणत्या घटना निवडायच्या, त्यासंबंधित घटनांचा कितपत तपशील उघड करायचा, कोणत्या पात्रांना किती महत्त्व द्यायचं असा सगळा बारकाईने विचार करून संहिता पूर्ण करण्याचं काम सुरु आहे.
मॅडोनाच्या आयुष्यावर बायोपिक बनवण्याचा प्रयत्न यापूर्वीही झाला होता. एलिझ होलँडर (Elyse Hollander) याने लिहिलेल्या पटकथेची खुद्द मॅडोनानेच जाहीर चिरफाड केली होती. “मी माझं आयुष्य कसं जगले, हे केवळ मलाच माहिती आहे. त्यामुळे माझी जीवनकहाणी केवळ मीच योग्य प्रकारे सांगू शकते. ‘मॅडोनाचं आयुष्य माहिती आहे’, असा दावा करणारे एकतर भोंदू आहेत किंवा मूर्ख आहेत. मुळात माझ्याबद्दल अपप्रचार असलेल्या पटकथेवरून चित्रपट बनवण्याची गरज युनिव्हर्सल स्टुडिओला का वाटतेय?” असा मॅडोनाने जाहीर हल्ला चढवला होता. अर्थातच युनिव्हर्सल स्टुडिओने त्यावेळी म्हणजे २०१६ मध्ये हा विषय बाजूला ठेवला असला तरी कायमचा रद्द केला नाही. अखेर मॅडोना स्वतः दिग्दर्शन करणार हे नक्की झाल्यावर त्यांनी पुन्हा २०२० मध्ये नव्याने घोषणा केली.
२०२० मध्ये माध्यमांशी बोलताना मॅडोनाने सांगितलं होतं की, एक कलाकार, पॉपस्टार आणि नृत्यांगना असा माझा प्रवास मला जगासमोर मांडायचा आहे. हा चित्रपट अर्थातच म्युझिकल असेल, कारण संगीत हा माझ्या आयुष्यातला अविभाज्य घटक आहे. माझ्या आयुष्यातल्या अशा अनेक घटना आहेत ज्या मी कधीच कुणाला सांगितल्या नाहीत, म्हणूनच माझ्याशिवाय कोण प्रभावीपणे मांडू शकेल. माझं आयुष्य म्हणजे वळणावळणांचा खडतर प्रवास आहे, जो मला जगासमोर ठेवायचा आहे.
अतिशय हलाखीत गेलेलं बालपण ते १९९० साली गाजलेली ब्लॉन्ड अँबीशन वर्ल्ड टूर (Blonde Ambition World Tour) इथपर्यंतचा मॅडोनाचा जीवनपट चित्रपटात दिसणार आहे.
दिग्दर्शक म्हणून मॅडोनाला आजपर्यंत फारसं यश मिळालेलं नाही. २००८ साली मॅडोनाने फिल्थ अँड विस्डम (Filth & Wisdom) आणि २०१२ साली दिग्दर्शित केलेला W.E. हे दोन्ही चित्रपट बॉक्स ऑफिसवर यशस्वी ठरू शकले नाहीत आणि समीक्षकांनी तर खूपच खिल्ली उडवली होती.
=====
हे देखील वाचा – ज्यू नरसंहाराची कहाणी चित्रपटात, खुद्द नाझी सैतानाच्या आवाजात!
=====
अगदी ताजी माहिती अशी आहे की ज्युलिया गार्नरचं नाव निर्माते युनिव्हर्सल स्टुडिओने जाहीर केलं असलं तरी ज्युलियाच्या मॅनेजरनी माध्यमांना सांगितलंय की, आम्ही अजून ऑफरचा नीट विचार करतोय. पण सध्यातरी आम्ही या ऑफरबद्दल सकारात्मक आहोत.
चित्रपटातील इतर भूमिकांमध्ये कोण कोण कलाकार दिसणार याबद्दल कोणतीही माहिती जाहीर करण्यात आली नसली तरी मॅडोनाची जवळची मैत्रीण डेबी मझार (DEBI MAZAR) ही व्यक्तिरेखा ज्युलिया फॉक्स साकारणार अशी चर्चा आहे.