Medium Spicy Movie Review: निस्सीम शांततेचा कल्लोळ
सिनेमातील एक प्रसंग… नायक निस्सीम (ललित प्रभाकर) मुंबईच्या लोकल ट्रेनने प्रवास करतोय. एरवी हा निस्सीम स्वतःच्या गाडीनेच प्रवास करतो. पण, त्याच्या गाडीच्या डायर पंक्चर झाल्यानं तो लोकलचा डबा पकडतो. आता लोकलच्या डब्यात किती आणि कोणते नानाविविध आवाज आपल्या कानी पडतात? हे मी तुम्हाला वेगळं सांगायला नको. बाहेर प्रत्यक्षात इतका आवाज असूनही निस्सीमच्या मनात त्यांच्या नावाप्रमाणेच ‘निस्सीम शांतता’ आहे. (Medium Spicy Movie Review)
तो त्या ट्रेनच्या डब्यातील गोंगाटातही स्वमग्न होऊन स्वतःच्या मनाचा आवाज ऐकण्याचा प्रयत्न करतोय. ( कोणतीतरी गोष्ट त्याच्या मनाला सतावते आहे. पण, ती गोष्ट कोणती? याचा शोध घेण्याच्या वाटेवर तो चालतोय. किंबहुना सिनेमात हा प्रसंग येईपर्यंत आपणही या प्रवासाचे भाग झालेलो असतो. स्वतःच प्रतिबिंबी आपण या ‘निस्सीम’मध्ये शोधण्याचा प्रयत्न करतो. कधी निस्सीममध्ये आपल्यालाच आपण पाहतो तर कधी आपल्या जावळीची किंवा आजूबाजूची व्यक्ती आपल्याला या निस्सीममध्ये दिसते.)
ट्रेनच्या दुसऱ्या एका दरवाज्यात सिनेमाच्या कथेतील एक नायिका गौरी (सई ताम्हणकर) चा हात निस्सीमला दिसतो. हात पाहून तो ओळखतो; ती गौरीच आहे. गौरी ट्रेनमधून उतरते; तिच्या पाठोपाठ निस्सीम देखील उतरतो. तिला हाक मारतो? पण, ती प्रतिउत्तर देत नाही. तो तिचा पाठलाग करु लागतो. ती त्याला सावध करते. पाठलाग करु नकोस असं सांगते. परंतु, निस्सीम तिच्या मागे चालत राहतो…. (आणि पार्श्वसंगीत सुरु होतं… ते बोल असे…)
‘बोलायला बोल
का पाहिजे
सांगायला शब्द
का पाहिजेचालायला वाट
का पाहिजे
सांधायला स्पर्श’
का पाहिजे’ हे जितेंद्र जोशीने लिहिलेले शब्द सिनेमाचा मर्म सांगू पाहतात. (अबोल असण्यातही बोल असतात.) ते बोल प्रत्येकाने स्वतःच्या कुवतीने समजून घ्यायचे असतात. हेच आवाहन सिनेमा प्रेक्षकांना करतो. लेखिका इरावती कर्णिक आणि दिग्दर्शक मोहित टाकळकर याने सिनेमातील कोणतीही गोष्ट, प्रसंग, घटना प्रेक्षकाला ‘स्पून फिडींग’ करुन सांगण्याचा प्रयत्न केलेला नाही. जी बाब या सिनेमाला समकालीन सिनेमांपासून वेगळं ठरवते.
वर वर बोलायचं झालं तर.. नजीकच्या महिन्यांमध्ये निखिल महाजन लिखित ‘जून’ हा सिनेमा प्रदर्शित झाला होता. त्या सिनेमांच्या पठडीतील हा ‘मीडियम स्पाइसी’चा प्रपंच आहे. इकडे मी या दोन सिनेमांची तुलना अजिबात करत नाहीय. केवळ कथानकाची तीव्रता तुम्हा वाचकांना समजून घेता यावी; यासाठी हे केवळ एक उदाहरण. (Medium Spicy Movie Review)
काही हिप्पी माणसं स्वत्वाच्या शोधासाठी भटकंती करत सैरावैरा फिरत असतात. अनेकदा ने इतरांनी तुडवलेल्या मार्गावर चालतात. तर कधी स्वतःचा नवा मार्ग शोधून इतरांसाठी नवी वाट बनवतात. पण, या नव्या वाटेवर ते आंधळे असतात. धुक्यानी वेढलेल्या या वाटेवर चालताना चाचपडत त्यांना पावलं टाकावी लागतात. एकदा का या नव्या वाटेची पायांना सवय झाली…की, मग उघड्या डोळ्यांनी वा डोळे मिटूनही ते त्या वाटेवर कधी एकटे तर कधी कोणातरी सोबत घेऊन चालत राहतात. अशा या मनाच्या स्वछंदी पण काहीसा स्वतःच्या शोधात गुंतलेल्या प्रवासाची ‘सफर’ घडवणारा हा ‘मीडियम स्पाइसी’ सिनेमा आहे.
हा सिनेमा समजून घ्यायचा असेल तर तुम्हाला तुमचे कान टवकारुन ऐकावं लागेल. तिक्ष्ण नजरेने पडद्यावर घडणाऱ्या प्रत्येक प्रसंगाकडे बारकाईने पाहावं लागेल. हे करणं मान्य असेल तरच हा सिनेमा पाहण्याचं धाडस करा. नाहीतर लेखक-दिग्दर्शकाच्या बुद्धि कल्पकतेला तुम्ही अपशब्दांची लाखोली वाहाल. हा सर्व मनाच्या गुंतागुंतीत तुम्हाला पडायचं नसेल तर; सिनेमातील सर्वच कलाकारांच्या खासकरून ललित प्रभाकर, सई ताम्हणकर, पर्ण पेठे, नीना कुळकर्णी, सागर देशमुख आणि राधिका आपटे यांच्या अभिनय कौशल्यासाठी तुम्ही सिनेमा पाहू शकता.
मूळ सिनेमाची गोष्ट सांगताना, दाखवताना.. लेखिका, दिग्दर्शकाने उपकथानकांचा आधार घेत विविधांगी नातेसंबंधाचे पैलू देखील आपापल्या समोर मांडले आहेत. मग ते निस्सीमच्या घरातील त्याच्या आई-वडिलांचं नाव असो, निस्सीमच्या बहिणीचं आणि तिच्या नवऱ्याचं नातं असो, किंवा निस्सीमचा मित्र शुभंकर आणि त्याच्या बायकोच नातं किंवा संवादांमधून येणार गौरीच्या आई-वडिलांचं नातं. सोबतच दोन पिढ्यांमधील नातं निभावण्याची विभिन्न दृष्टिकोन देखील हा सिनेमा आपल्याला देऊ पाहतो.
आत्ताच्या काळात जिथे नात्यांना सहज तडे जाऊ लागले आहेत, त्या विपरीत जुन्या पिढीतील लोक मात्र अनुकूल परिस्थितीत देखील आपले नातेसंबंध वर्षानुरूप दृढ करण्यासाठी प्रयत्नशील असतात. नातेसंबंध शोधण्याची, टिकण्याची आणि टिकवून ठेवण्याचा व्यावसायिक दृष्टीकोन हा सिनेमा आपल्याला देतो.
=====
हे देखील वाचा: आवर्जून पाहाव्यात अशा मराठीमधील ६ रोमँटिक वेबसीरिज
=====
सिनेमांच्या मूळ कथनकाविषयी सांगायच झालं तर ही मूळ गोष्ट निस्सीम, गौरी आणि प्राजक्ता (पर्ण पेठे) या तिघा भोवती फिरणारी आहे. निस्सीम आणि गौरी हे हॉटेलमध्ये शेफ आहेत तर प्राजक्ता ही फ्रंट ऑफिसची हॉटेल कर्मचारी आहे. सध्या निस्सीम प्राजक्ताच्या प्रेमात आहे. पण, याबाबात त्यानं तिला कधी खुलेपणाने काही सांगितलेलं नाही. गौरी काहीशी या दोघांपेक्षा अधिक ‘मॅच्युअर’ आहे; असं म्हणावं लागेल. ती काहीसा पुढचा विचार करणारी मुली, धाडसी आहे, मनात असलेलं खुलेपणाने व्यक्त करणारी आहे. विचारांपेक्षा कृतीला ती अधिक भर देते. तर दुसरीकडे निस्सीम कृतीपेक्षा विचारांवर अधिक भर देतो.
निस्सीम त्याच्या कामाच्या बाबतीत कमालीचा ‘पॅशिनेट’ आहे. पण, वैयक्तिक जीवनातील नाते संबंधांमध्ये तो काहीसा गोंधळलेला आहे. तो ना पूर्वेला छुकलेला आहे ना पश्चिमेला. तो मध्यावर आहे; असं म्हणता येईल. कोणत्या दिशेला जायचं? या प्रश्नात तो गुंतला आहे. त्याच्या या नातेसंबंधांमाधील अव्यक्त पणामुळे त्याच्या जीवनाचा प्रवास हा एखाद्या ‘रोलर कोस्टर राईड’ प्रमाणे झाला आहे. हा प्रवास प्रेक्षकरुपी पाहताना आपण स्वतःही मनातल्या मनात विविधांगी पैलूंचा विचार करु लागतो. कदाचित हेच लेखिका, दिग्दर्शकाला देखील अपेक्षित आहे. (Medium Spicy Movie Review)
सिनेमातील प्रत्येक पात्र अगदी वास्तवदर्शी आहे. त्यांची देहबोली, अभिनिवेश, संवाद; सारं काही नैसर्गिक पठडीतील आहे. ललितने कथानकातील निस्सीम ही भूमिका अत्यंत प्रामाणिकपणे साकारली आहे. आजवरच्या ललितच्या कामापेक्षा यावेळचा निस्सीम काही औरच आहे. निस्सीम या व्यक्तिरेखेतील शांतता त्यानं लीलया पडद्यावर साकारली आहे. ही व्यक्तिरेखा जिवंत होण्यात स्वतः ललित, लेखिका इरा आणि दिग्दर्शक मोहित या तिघांचा वाटा आहे. दुसरीकडे भरभरून कौतुक करावं असं काम सईनं तिच्या ‘गौरी’ या व्यक्तिरेखेत केलं आहे. ‘गोल्डन ऐरा’ म्हणावं असं सई काम प्रेक्षक म्हणून आपल्या नजरेत पडतंय.
‘मिम्मी’ हा हिंदी चित्रपट असो, ‘पॉंडिचेरी’ सारखा प्रयोगशील मराठी सिनेमा, ‘पेटपुराण’, ‘बेरोजगार’ सारख्या वेबसिरीज आणि आता ‘मीडियम स्पाइसी’ मधील तिचं काम लाजवाब आहे. उपरोक्त प्रत्येक कलाकृतीत विभिन्न ‘सई’ आपल्याला दिसते. त्यामुळे सई बाबत बोलायचं झालं तर आज तिचा ‘गोल्डन ऐरा’ असा असेल तर ‘प्लॅटिमन ऐरा’ याहूनही लाजबाव असणार. केवळ या सिनेमा पुरतं सईच्या अभिनयाविषयी बोलायचं; तर प्रत्येक फ्रेम सईनं तितक्याच निस्सीमतेने… प्रामाणिकपणे रेखाटली आहे. तिच्या चेहऱ्यावरील आणि डोळ्यातील भाव अधिक बोलके आहेत. सिनेमाची सर्वच गाणी प्रासंगिक आणि सुरेख आहे. त्याहून अधिक सिनेमांचं बीजीएम सिनेमात जीव ओतण्याचं काम करते. तर ललितच्या मनातील शांतता जितकी आपल्या त्याच्या अभिनिवेशात दिसते तितकीच प्रभावी सूचकता आपल्या छायांकनात देखील दिसते.
एकंदरच सांगायचं तर; चौकटी पल्याड गोष्ट सिनेमात सामावलेली आहे. तुम्हाला जसा या गोष्टीचा अर्थ उमजेल; तसा तुम्ही घ्यायचा आहे. हा अर्थ प्रत्येकाचा वेगळा असू शकतो.. शेक्सपिअरची बहुतांश कथांमधील शोकांतिका ही का शोकांतिका आहे? याच उत्तर कदाचित तुम्हाला या सिनेमात सापडेल. रोमियो आणि ज्युलिएट एकत्र यावेत की येऊ नयेत? याचं उत्तर तुम्हाला मिळेल किंवा मिळणार ही नाही. पण रोमियोला समजून घेण्याचा प्रयत्न तुम्ही केलात याचं समाधान हा सिनेमा तुम्हाला देईल… शेवट करण्यापूर्वी.. लेखिका इरावती साठी एक सूचना… तू लिहीत राहा.. दिल्ली अभी दूर नही!
चित्रपट: मीडियम स्पाइसी
निर्माते: विधी कासलीवाल
दिग्दर्शन:मोहित टाकळकर
कलाकार: ललित प्रभाकर, सई ताम्हणकर, पर्ण पेठे, नीना कुलकर्णी, रवींद्र मंकणी
लेखन : इरावती कर्णिक
स्टार : ३.५ स्टार