‘तु मला सगळं काही दिलंस..!’ विशाखा सुभेदाराची ‘ती’ पोस्ट व्हायरल
वाढता हिंसाचार कमी करण्यासाठी आता हॉलीवूड पुढाकार
बंदूक, रायफल किंवा एकूणच शस्त्रास्त्रांवरचा निर्बंध हा अमेरिकेतील अतिशय नाजूक आणि संवेदनशील विषय होत चालला आहे. अमेरिकेच्या राज्यघटनेने तेथील नागरिकांना शस्त्र बाळगण्याचा अधिकार दिलेला आहे. घटनेत दुरुस्ती व्हावी आणि शस्त्र खरेदी आणि बाळगण्यासंबंधीचे कायदे अधिक कडक करावेत, अशी मागणी तिकडे जोर धरतेय. पण अशाप्रकारे बंधनं घालू नयेत, असं मानणाराही खूप मोठा वर्ग तिकडे आहे.
या सगळ्या चर्चेला कारणीभूत आहेत याच वर्षात घडलेल्या अंदाधुंद गोळीबाराच्या घटना… टेक्सास, फिलाडेल्फिया, इंडियानापोलीस, ओक्लाहोमा अशा विविध प्रांतात गेल्या सहा महिन्यात गोळीबाराच्या ४१ घटना घडलेल्या आहेत. यावर आता सरकारने त्वरित काही कडक उपाययोजना कराव्यात यासाठी दबाव वाढत चालला आहे. या पार्श्वभूमीवर आता हॉलिवूडने आपणही समाजाचं देणं लागतो या भावनेतून काही सकारात्मक पावलं उचलण्याचा पण केला आहे.
चित्रपटात बंदुका, रायफल्स आणि एकूणच हिंसाचाराचं चित्रण अधिक जबाबदारीने करण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत, असं हॉलिवूडमधील जाणत्यांनी जाहीर केलंय. ‘ब्रॅडी कॅम्पेन टू प्रिव्हेंट गन व्हायलन्स (The Brady Campaign to Prevent Gun Violence)’ या संस्थेने पुढाकार घेऊन एक पत्रक काढलंय, ज्यावर हॉलिवूडमध्ये कार्यरत असलेल्या २०० हून अधिक व्यक्तींनी स्वाक्षरी केली आहे. यात अभिनेता मार्क रॅफेलो, निर्माते टॉम जेकब्सन, बिल लॉरेन्स, पटकथाकार मार्क हेमन, लेखक-दिग्दर्शक गॅरी रॉस, कार्यकारी निर्माता डेव्हिड झकर, अभिनेत्री आणि नृत्यदिग्दर्शिका डेबी ॲलन, लेखक आणि प्रसिद्ध निवेदक जिमी किमेल यांचा समावेश आहे.
काय लिहिलंय या पत्रकात?
“कुठल्याही देशातला सिनेमा बघा, त्यात तुम्हाला बंदुका, रायफली, गोळीबार, हिंसाचार हे सगळं कमी-अधिक फरकाने दिसेलच, पण केवळ आमच्या अमेरिकेतच अंदाधुंद गोळीबाराच्या घटना वारंवार घडताना दिसतात. या घटनांसाठी आम्हाला जबाबदार ठरवलं जातं, पण खरंतर सत्तापिपासू राजकारणीच यासाठी जबाबदार आहेत. आम्ही जरी कारणीभूत नसलो, तरीही सद्य परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न करणं, हे आम्ही आमचं कर्तव्य समजतो.
समाजाचं मनोरंजन करणं हे आमचं कामच आहे, पण त्याच समाजाला भेडसावणाऱ्या समस्यांबाबतीत आम्ही संवेदनशीलही आहोत. चित्रपटात बंदुका वापरणारच नाही, असं काही आम्ही म्हणत नाही आणि तशी सक्तीसुद्धा आम्ही कुणावर करू इच्छित नाही. (The Brady Campaign to Prevent Gun Violence)
लेखक, दिग्दर्शक आणि निर्मात्यांना आमचं हेच सांगणं आहे की हिंसाचार, गोळीबाराचं चित्रण अधिक जागरूकपणे करावं. हिंसाचाराचे जे प्रसंग असतील त्याबद्दल संबंधितांनी निर्मितीपूर्व प्रक्रियेत किमान एकदा चर्चा करावी आणि आशयाला धक्का न लावता पर्यायी मार्ग काढता येतो का यावर विचार करावा, हेच आमचं समस्त सर्जनशील कलावंतांना सांगणं आहे. चित्रपटातील पात्रांनी बंदुका हाताळत असताना नीट लॉक कराव्यात, लहान मुलांपासून बंदुका दूर ठेवणं कसं महत्वाचं आहे, अंदाधुंद गोळीबाराचे काय दुष्परिणाम आहेत असा संदेश कथेमधून देता आला, तर त्याला प्राधान्य द्यावं.”
पुढे या पत्रकात हेही स्पष्ट करण्यात आलंय…
“आमच्या या पुढाकाराने गोळीबाराच्या घटना थांबतील, अशा भ्रमात आम्ही बिलकुल नाही. तसंच आम्ही केलेल्या सूचनांचं पालन करणं प्रत्येक चित्रपटात शक्य नाही याची जाणीवही आम्हला आहे. पण एक समाज म्हणून आपण सर्व अशा छोट्या छोट्या प्रयत्नांतून मोठा बदल घडवू शकतो अशी आशा आम्हाला आहे.” (The Brady Campaign to Prevent Gun Violence)
‘मायकल मूर’ची सरकारवर पुन्हा टीका
मायकल मूर या दिग्दर्शकाने २००२ साली अंदाधुंद गोळीबाराची कारणं, समाजाची मानसिकता, शस्त्रात्रं कायदे, बंदुकीचं अर्थकारण आणि राजकारण याचा मागोवा घेणारा ‘बोलिंग फॉर कोलंबाइन’ हा माहितीपट बनवला होता. शस्त्र बाळगण्याचं घटनेनं दिलेलं स्वातंत्र्य आता कोणत्या थराला पोचलंय याचं भीषण वास्तव त्याने या माहितीपटातून जगासमोर ठेवलं होतं. याच मायकल मूरने सरकारवर पुन्हा एकदा टीका केली आहे.
बंदुका बाळगण्याचं स्वातंत्र्य की जिवंत राहण्याचा हक्क, यातलं काय महत्वाचं आहे हे जनतेला आणि सरकारलाही कळायला हवं. १७८७ साली घटना लिहिली गेली तेव्हा बंदुका होत्या का? मग आता आधुनिक काळात घटनादुरुस्ती आवश्यक वाटत नाही का? असा सवाल त्याने सरकारला विचारला आहे. भीतीपोटी बंदुका बाळगणं ज्यांना गरजेचं वाटतं त्यांनी कुत्रे पाळावे असा सल्लाही त्याने दिलाय.
हॉलिवूडने पत्रक काढून जेमतेम चार दिवस झाले असतील, तेवढ्यातच हॉलिवूडची खिल्ली आणि टीका सुरु झालेली आहे. हॉलिवूडने घेतलेल्या पुढाकाराचं काहीजणांनी कौतुक केलंय, पण त्याचवेळी हा निव्वळ देखावा आहे, असा सूरही सोशल मीडियावर उमटलेला दिसतोय. हॉलिवूडला खरंच काही करावंसं वाटत असेल, तर त्यांनी गोळीबाराचे प्रसंग अधिक वास्तवपणे दाखवावेत अशा सूचनाही होतायत. (The Brady Campaign to Prevent Gun Violence)
==========
हे देखील वाचा – ज्युलिया गार्नर साकारणार ‘मॅडोना’, स्वतः ‘मॅडोना’च करणार दिग्दर्शन!
==========
चित्रपटात बंदुकीच्या गोळीचा आघात झाल्यावर ज्या सहजपणे माणसं मरतात, तसं प्रत्यक्ष आयुष्यात होत नाही. बंदुकीच्या गोळीने आलेला मृत्यू किती वेदनादायक असतो, हे जरी हॉलिवूडने दाखवलं तरी गोळीबाराच्या घटना कमी होऊ शकतील असंही काहीजणांना वाटतंय.
गोळीबाराच्या वाढत्या घटनांमुळे अमेरिकेतील समाजमन ढवळलेलं आहे. सरकार एका रात्रीत या घटना रोखू शकत नाही, तसंच टीव्ही मालिका आणि चित्रपटातून कितपत बदल होऊ शकेल हेही आत्ता सांगता येणार नाही, पण हॉलिवूडने काढलेल्या पत्रकाने शस्त्रविरोधी लढ्याला नवं बळ मिळेल हे नक्की.