‘तु मला सगळं काही दिलंस..!’ विशाखा सुभेदाराची ‘ती’ पोस्ट व्हायरल
जेव्हा ‘ऑल द बेस्ट’ नाटकाचे प्रेक्षक भरत जाधव यांच्या वडिलांवर चिडले…
मराठी चित्रपटसृष्टीमध्ये काही अभिनेते असे आहेत ज्यांचं विनोदाचं टायमिंग अप्रतिम आहे. यामधलंच एक नाव म्हणजे भरत जाधव (Bharat Jadhav). १९९३ साली आलेल्या ‘ऑल द बेस्ट’ या व्यावसायिक नाटकापासून सुरु झालेला त्यांचा अभिनयाचा प्रवास आजही अविरत चालू आहे. अर्थात त्याआधी त्यांनी अनेक आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धा गाजवल्या होत्या.
‘ऑल द बेस्ट’ नाटक जेव्हा रंगमंचावर आलं तेव्हा भरत जाधव स्ट्रगल करत होते. घरची परिस्थिती यथातथाच. तरीही कुटुंबीयांनी त्यांच्या अभिनयाच्या आवडीला, या क्षेत्रात कारकीर्द घडवायला कधीच विरोध केला नाही. पण सर्वसामान्य कुटुंबातील आई वडिलांची जशी अपेक्षा असते तशीच भरतच्या आई वडिलांचीही होती. त्यांचं म्हणणं होतं, “तू तुझी आवड जप, पण नोकरीचाही विचार कर.”
आई – वडिलांचं म्हणणं भरत (Bharat Jadhav) यांना पटत होतं. त्यामुळे भरत त्यावेळी नोकरीच्या शोधात होते. त्यावेळी कलाकार कोट्यातून बँक, बीएसटी मध्ये नोकरी मिळायची. ग्रॅज्युएशन पूर्ण झालेलं नसल्यामुळे बँकेत नोकरी मिळणं जरा कठीण होतं. त्यामुळे त्यांनी बीएसटी साठी कंडक्टरचा बॅच काढला होता व त्यासाठीची परीक्षाही दिली होती. परंतु त्याच दरम्यान ‘ऑल द बेस्ट’ हे नाटक रंगमंचावर आलं आणि तुफान लोकप्रिय झालं.
भरत जाधव यांचे वडील टॅक्सी चालवायचे. त्यावेळी ते दुसऱ्याची टॅक्सी चालवत होते. पण काही दिवसांनी भरत यांच्या मोठ्या भावाने स्वतःची टॅक्सी घ्यायचं ठरवलं आणि त्याने बँकेमधून कर्ज काढून स्वतःची टॅक्सी विकत घेतली. ही टॅक्सी भरत यांचे वडील चालवत असत. ‘ऑल द बेस्ट’ नाटक नुकतंच लोकप्रिय होत होतं. त्यादरम्यान घडलेल्या एका घटनेमुळे भरत यांनी आपल्या वडिलांनी आता यापुढे तुम्ही टॅक्सी चालवायची नाही, असं सांगितलं.
झालं असं की, त्यावेळी शिवाजी नाट्यमंदिर, मुंबई येथे दुपारी साडेतीन वाजता ‘ऑल द बेस्ट’ नाटकाचा शो होता. भरत जाधव (Bharat Jadhav) यांच्या वडिलांच्या टॅक्सिमध्ये बसलेले पॅसेंजर ‘ऑल द बेस्ट’ नाटक बघायला जात होते. सुरुवातीला आपल्या टॅक्सिमध्ये बसलेले पॅसेंजर आपल्या मुलाचं नाटक बघायला जाणारे प्रेक्षक आहेत याची त्यांना कल्पनाच नव्हती. अचानक वाटेमध्ये ट्रॅफिक लागल्यामुळे, उशीर होऊ लागला. तसा त्या पॅसेंजरचा पारा चढला. नाटकाची वेळ चुकणार म्हणून ते त्यांच्याशी वडिलांशी चिडून बोलू लागले. पण ते मात्र काहीही न बोलता सगळं शांतपणे ऐकून घेत होते. त्यांना त्यांच्या बोलण्याचा राग येत नव्हता उलट आपल्या मुलाचं नाटक बघण्यासाठी त्यांची एवढी धडपड चाललेय, हे पाहून त्यांचं उर अभिमानाने भरून आलं होतं.
रात्री नाटकाचा प्रयोग संपल्यावर जेव्हा भरत घरी गेले तेव्हा त्यांना वडिलांनी विचारलं, “आज शिवाजी नाट्यमंदिरला दुपारी साडेतीन वाजता तुझ्या नाटकाचा प्रयोग होता का?” यावर भरत यांनी होकार दिल्यावर त्यांनी टॅक्सिमध्ये घडलेला सर्व प्रसंग सांगितला. एकीकडे या प्रसंगाबद्दल वडील कौतुकाने बोलत होते. आपल्याला ऐकून घ्यायला लागलं, अपमान सहन करावा लागला ही गोष्ट त्यांच्या मनातही आली नाही. पण हे ऐकून भरत मात्र उदास झाले आणि त्यांनी वडिलांना सांगितलं, “बास झालं आता! यापुढे तुम्ही टॅक्सी चालवायची नाही.”
भरतच्या (Bharat Jadhav) वडिलांनी आपल्या मुलाचं म्हणणं मान्य केलं. पण त्यांना माहिती होतं, ज्या क्षेत्रात आपला मुलगा काम करतोय ते क्षेत्र बेभरवशी क्षेत्र आहे. तिथं सगळंच क्षणभंगुर असतं. त्यामुळे त्यांनी टॅक्सी न चालवण्याचं तर मान्य केलं, पण टॅक्सी विकली मात्र नाही. तब्बल ६ महिने टॅक्सी तशीच ठेवून दिली. सहा महिन्यांनंतर जेव्हा भरत या क्षेत्रात स्थिरस्थावर झाले तेव्हा त्यांनी टॅक्सी विकून टाकली.
===========
हे देखील वाचा – खराखुरा ‘सुपरहिरो’ फरहान अख्तर; जीवाची बाजी लावून वाचवले एका कर्मचाऱ्याचे प्राण
===========
कित्येक कलाकारांनी प्रचंड स्ट्रगल करून आपली कारकीर्द घडवली आहे. शून्यातून विश्व निर्माण केलं आहे. माणूस कितीही यशस्वी झाला तरी त्याचे ‘स्ट्रगलिंगचे दिवस’ तो नाही विसरू शकत. ते दिवस, त्या दिवसातले काही प्रसंग आठवून ते नेहमीच भावुक होतात. भरत जाधव (Bharat Jadhav) जेव्हा जेव्हा या प्रसंगाबद्दल सांगतात तेव्हा त्यांना अश्रू अनावर होतात.