‘तु मला सगळं काही दिलंस..!’ विशाखा सुभेदाराची ‘ती’ पोस्ट व्हायरल
डॅनियल क्रेगनंतर ‘जेम्स बॉन्ड’ची भूमिका कोण साकारणार?
‘नो टाइम टू डाय’ हा डॅनियल क्रेगचा जेम्स बॉन्ड म्हणून शेवटचा चित्रपट असणार हे प्रदर्शनाआधीच स्पष्ट झालं होतं. ५४ वर्षीय डॅनियल क्रेगने २०२० साली अधिकृतपणे जाहीरच केलं होतं आणि तेव्हापासूनच आता पुढचा जेम्स बॉन्ड कोण यावरून जोरदार चर्चा सुरु झाली. नुसती चर्चाच नाही तर आगामी जेम्स बॉन्ड कोण साकारणार यावरून सट्टेबाजीही सुरु आहे. (Who Will Be the next James Bond)
खरंतर २०२० पासून जेम्स बॉन्डच्या भूमिकेसाठी टॉम हार्डी (Tom Hardy) या अभिनेत्याचं नाव आघाडीवर होतं. टॉम हार्डीच हा पुढचा जेम्स बॉन्ड असणार असं पक्कं झालंय असं वाटत असतानाच इतर नावंही स्पर्धेत आली आणि आता तर टॉम हार्डीचं नाव खूप मागे पडणार अशी शक्यता दिसतेय. ‘इन्सेप्शन’, ‘व्हेनम’, ‘डंकर्क’ सारख्या चित्रपटातून लोकप्रियता मिळाल्यावर ‘टॉम हार्डी’ हा जेम्स बॉन्ड म्हणून कसा शोभून दिसेल यावर लेखच्या लेख छापून यायला लागले. बॉन्डपटांची निर्मिती करणाऱ्या MGM किंवा EON प्रॉडक्शन यांच्याकडून अधिकृतपणे कोणतीही घोषणा झालेली नसतानाही टॉम हार्डीच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याचं मानलं जात होतं. पण आता टॉम हार्डीला बरेच स्पर्धक तयार झाले आहेत. यातलं लेटेस्ट नाव आहे ‘ल्युसिफर’ फेम टॉम एलिस (Tom Ellis).
‘ल्युसिफर’ या सिरीजचा शेवटचा सीझन आता संपलेला आहे, त्यामुळे टॉम एलिस नवी जबाबदारी घेऊ शकतो आणि जेम्स बॉन्डसाठी तोच कसा योग्य आहे हे ‘ल्युसिफर’मधील सहकलाकार सगळीकडे सांगत सुटले आहेत. टॉम एलिस स्वतः मात्र यावर काहीच बोलत नाहीये. (Who Will Be the next James Bond)
मार्गारेट ब्रोकोली आणि मायकल विल्सन या ‘बॉन्ड’ निर्मात्यांचं आपल्याविषयी प्रतिकूल मत व्हायला नको याची तो काळजी घेतोय. एलिसच्या चाहत्यांनी तर change.org या संकेतस्थळावर ‘टॉम एलिस फॉर जेम्स बॉन्ड’ अशी मोहीम सुरु केली आहे आणि त्यावर ७००० जणांनी स्वाक्षरीही केलेय. हा आकडा रोज वाढतच चालला आहे. टॉम हार्डी आणि टॉम एलिस यांच्या स्पर्धेत इतरही तागडे उमेदवार आहेत. त्यातलंच एक नाव ‘इद्रीस अल्बा’ (Idris Alba).
‘ऑर्डर ऑफ द ब्रिटिश एम्पायर’ असा सन्मान मिळवणाऱ्या ‘इद्रीस अल्बा’चं नाव जेम्स बॉन्ड भूमिकेसाठी अनेकदा चर्चेत आलेलं आहे. यापूर्वी बॉन्ड सिरीजमध्ये खलनायकाच्या भूमिकेसाठी ‘इद्रीस अल्बा’चा विचार सुरु होता, पण तेव्हाही त्याचं नाव जेम्स बॉन्ड भूमिकेसाठी अधिक समर्पक आहे, असं मार्केट रिसर्च सांगत होता. ‘जेम्स बॉन्ड’ सिरीज निर्माती मार्गारेट ब्रोकोलीने एका मुलाखतीत इद्रीसच्या अभिनयाचं तोंड भरून कौतुक केलं होतं. त्यानंतर पुन्हा एकदा इद्रीसच्या नावाची चर्चा जोर धरू लागली होती. अभिनेता म्हणून तो उत्कृष्ट आहेच, पण त्याचं नाव आघाडीवर असायला आणखी एक पैलू आहे. (Who Will Be the next James Bond)
जेम्स बॉन्ड ही व्यक्तिरेखा कृष्णवर्णीय अभिनेता का करू शकत नाही, असा सवाल काही काळापासून सोशल मीडियावर वारंवार विचारला जात होता. निर्माती मार्गारेट ब्रोकोली यांनाही हाच प्रश्न विचारला तेव्हा त्यांनी उत्तर दिलं की जेम्स बॉन्ड हे पात्र साकारणारा कलाकार कोणत्याही वर्णाचा असू शकतो. याच उत्तरामुळे जेम्स बॉन्ड भूमिकेसाठी कलाकारांचे पर्यायही वाढले आणि त्यात ‘इद्रीस अल्बा’चं नाव पुढे आलं.
याशिवाय ‘क्रेझी रीच एशियन्स’ गाजवणारा ‘हेन्री गोल्डींग’ तसंच ‘डंकर्क’ आणि ‘इटर्नल्स’ फेम हेन्री स्टाइल्स हे दोघेही प्रमुख दावेदार मानले जात आहेत. हेन्री स्टाइल्स तर दिग्दर्शक आणि निर्मात्यांना भेटूनही आलाय अशा बातम्या नुकत्याच प्रसिद्ध झाल्या होत्या.
‘नो टाइम टू डाय’ च्या यशाने जेम्स बॉन्डची लोकप्रियता जगभरात अजूनही टिकून आहे हे अधोरेखित झालं आहे. त्यामुळेच ही भूमिका आपल्याला साकारायला मिळावी यासाठी चढाओढ असणार हे साहजिक आहे. आपल्या आवडत्या अभिनेत्याला ही संधी मिळावी यासाठी चाहत्यांची मोर्चेबांधणीही जोरदार सुरु आहे. पण निर्मात्यांनी स्पष्टपणे सांगितलंय, “हा खूप मोठा निर्णय आहे. नुसतं कास्टींग म्हणून याकडे न बघता आम्हाला आगामी काळासाठी सर्व वयोगटात लोकप्रिय होईल, असं व्यक्तिमत्व शोधायचं आहे, त्यामुळे बराच रिसर्च करावा लागेल आणि त्यासाठी थोडा पेशन्सही ठेवावा लागेल.” (Who Will Be the next James Bond)
========
हे देखील वाचा – वाढता हिंसाचार कमी करण्यासाठी आता हॉलीवूड पुढाकार
========
जगाच्या कानाकोपऱ्यात पसरलेल्या जेम्स बॉन्ड चाहत्यांना बरीच उत्सुकता असली आणि त्याबद्दल सोशल मीडियापासून सर्वत्र बरीच चर्चा सुरु असली तरी प्रत्यक्ष स्पर्धेत असलेले कलाकार काहीही बोलत नाहीयेत. टॉम हार्डीने याचं कारणही सांगितलं आहे – “आम्हा कलाकारांच्या दुनियेतला एक अलिखित नियम आहे. तुम्ही स्वतः जर भाष्य केलंत, तर तुम्ही स्पर्धेतून बाद होता. त्यामुळेच मी याबद्दल काहीही न बोलणंच पसंत करेन.”
‘जेम्स बॉन्ड’ कोण साकारणार याविषयी प्रेक्षकांमध्ये कमालीची उत्सुकता आहे. यासंदर्भात कितीही चर्चा होत असल्या तरी सध्यातरी याबद्दल ठोस असा अंदाज बांधणं कठीण आहे.