‘तु मला सगळं काही दिलंस..!’ विशाखा सुभेदाराची ‘ती’ पोस्ट व्हायरल
शाळा: शाळेच्या बेंचवर नेऊन बसवणारा, उमलत्या वयातील ‘अबोल प्रेमाचा’ सहज सुंदर प्रवास!
तारुण्यावरच्या उंबरठ्यावर असणारं १३-१४ वर्षांचं कोवळं वय. हाच काळ असतो कोणीतरी खास असं आवडू लागतं. स्वतःतच हरवून जाणं, मनातल्या मनात कोणाचा तरी विचार करत राहणं या साऱ्या गोष्टी अगदी नकळत घडत असतात. पण पुढे काय होतं? अर्थात प्रत्येकाची कहाणी वेगळी असते. अशीच एक कहाणी आहे, मुकुंद आणि शिरोडकरची आणि ती मांडण्यात आली आहे २०११ साली आलेल्या ‘शाळा’ या मराठी चित्रपटामध्ये. (Marathi Movie Shala)
‘शाळा’ हा चित्रपट मिलिंद बोकील यांच्या २००४ साली आलेल्या ‘शाळा’ या कादंबरीवर आधारित होता. या चित्रपटामध्ये साधारणतः सत्तरच्या दशकातील काळ दाखवण्यात आला आहे. स्मार्टफोन, मोबाईल इ. च्या आगमनाचा इतकंच काय तर, लँडलाईनही क्वचितच कोणाकडे असण्याचा तो काळ. गावातलं शांत, रम्य वातावरण, गावातली शाळा, या शाळेत जाणारी गावातली वेगवेगळी कौटुंबिक पार्श्वभूमी असणारी मुलं, त्यांची मैत्री, शाळेतल्या गमती जमती यांचं अगदी ‘परफेक्ट’ चित्रण करण्यात आलं आहे.
एक साधीशी इमारत. ना कुठलं लॉन, ना प्रशस्त गेट. शाळेत चालत किंवा सायकल वरून जाणारी साध्या युनिफॉर्म मधली मुलं. या शाळेत नववीमध्ये शिकणाऱ्या जोश्या, सुऱ्या, फावड्या, केटी, शिरोडकर, केवडा या मुलांची मानसिकता, प्रेम म्हणजे काय याबद्दल वाटणारं सुप्त आकर्षण, अभ्यास, भविष्याची थोडीफार चिंता या साऱ्या भावनांचं चित्रण यामध्ये करण्यात आलं आहे. याच्या जोडीला मांजरेकर सरांचं एक उपकथानकही दाखवण्यात आलं आहे.
जोश्या आणि शिरोडकरची अबोल प्रेमकहाणी अत्यंत सुंदर. बॉलिवूडच्या उथळ प्रेमकहाण्यांच्या तुलनेत ही अबोल प्रेमकहाणी कितीतरी पटींनी उजवी आहे. या दोन्ही कलाकारांचं (अंशुमन जोशी, केतकी माटेगावकर) कौतुक करावं तेवढं कमी आहे. यांची प्रेमकहाणी बघताना अनेकजण आपल्या भूतकाळात जातील, यात काही शंकाच नाही. मुकुंदचं शिरोडकरच्या घराभोवती चकरा मारणं, तिच्या घरी जाणं हे सर्व प्रसंग अत्यंत सुंदर जमून आले आहेत. मुकुंदाच्या वडिलांचं आणि मुख्याध्यापकांचं संभाषणही विचार करायला लावणारं. (Marathi Movie Shala)
सामान्यतः लोकप्रिय कादंबरीवर आधारित चित्रपट बनवताना दिग्दर्शकासमोर सर्वात मोठं आव्हान असतं ते तुलनेचं. कारण चित्रपट बनवताना तीन तासांत संपूर्ण कादंबरी दाखवणं सहज शक्य नसतं. पण कथेचा गाभा आणि गोडवा या दोन्हीही गोष्टींचा सुंदर मिलाफ करून हे आव्हान दिग्दर्शक सुजय डहाके यांनी यशस्वीपणे पेललं आहे. उमलत्या वयातील भावभावनांचं चित्रण करताना दिग्दर्शक आणि कलाकार कुठेही कमी पडलेले नाहीत.
हा एक असा काळ होता जेव्हा मुलं ‘ओव्हर प्रोटेक्टिव्ह’ नव्हती. शिक्षक मुलांना हक्काने ओरडत असत आणि पालक स्वतःहून त्यांना “मुलाला तुमच्या ताब्यात दिला आहे. त्याला बिनधास्त झोडपून काढा आम्ही काही बोलणार नाही”, असं सांगत असत. हा तो काळ होता जेव्हा संपर्काचं कोणतंच साधन अस्तित्वात नव्हतं. नजरेची भाषा, चिठ्ठी आणि नंतर प्रत्यक्ष संवाद असा होणारा प्रचंड ‘रोमँटिक’, अत्यंत गोड आणि हवाहवासा वाटणारा असा प्रेमाचा प्रवास होत असे.
संवादाची साधनं सहजी उपलब्ध असणाऱ्या आजच्या जनरेशनमध्ये प्रेमाच्या हळवेपणापेक्षा उथळपणाच जास्त दिसतो. ‘शाळा’ पाहताना मन नकळत त्या काळात हरवून जातं जेव्हा अलवार अबोल प्रेमाला, नजरेच्या भाषेलाही अर्थ होता. (Marathi Movie Shala)
सत्तरच्या दशकातला काळ, त्या कालानुरूप वेशभूषा, भाषा, राहणीमान आणि एकूणच त्या काळातील सामाजिक मानसिकता दाखवण्यात दिग्दर्शक यशस्वी झाला आहे. या चित्रपटाचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे या चित्रपटासाठी सिनेमॅटोग्राफी केली होती, ‘दिएगो रोमेरो (Diego Romero)’ नावाच्या एका स्पॅनिश सिनेमॅटोग्राफरने. यांनी अर्थातच आपली निवड सार्थ ठरवली आहे. एक उत्तम कथानक, त्याला साजेसं दिग्दर्शन आणि कलाकारांचे सुरेख अभिनय आणि जोडीला तितकंच शांत आणि प्रवाही संगीत बस! उत्तम कलाकृतीसाठी अजून काय हवं?
चित्रपटामध्ये अंशुमन जोशी, केतकी माटेगावकर यांच्यासह केतन पवार, चिन्मय कुलकर्णी, ओंकार माने, उन्नती आगरकर यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. या नवीन कलाकारांच्या जोडीला दिलीप प्रभावळकर, जितेंद्र जोशी, संतोष जुवेकर, अमृता खानविलकर, नंदू माधव, देविका दफ्तरदार, वैभव मांगले असे नामांकित कलाकारही चित्रपटामध्ये आहेत. (Marathi Movie Shala)
========
हे देखील वाचा – जस्सी जैसी कोई नही: एका कुरूप मुलीची हटके कहाणी
========
चित्रपटामध्ये कोणताही मेलोड्रामा नाही, रोमान्सच्या नावाखाली झाडांमागे फिरत गाणी गाणं नाही, ‘एक दुजे के लिए’ म्हणत केलेली हाणामारी नाही की, कोणतेही उथळ किंवा आक्रमक संवादही नाहीत. यामध्ये आहे फक्त एका हळव्या भावनेचा नितांतसुंदर प्रवास; शाळेच्या आठवणींचे कप्पे अलगद उलगडत जाणारा… IMDB वर या चित्रपटाला ८.२ रेटिंग देण्यात आलं आहे. हा चित्रपट बघायचा असेल तर डिस्ने + हॉटस्टार वर उपलब्ध आहे.