Forensic Movie Review: एका मुलीची तिच्या वाढदिवसाच्या दिवशीच हत्या होते आणि…
रहस्यपट कसा असावा…तर शेवटपर्यंत आपल्याला त्यात गुंतवून ठेवणारा. आरोपी म्हणून एकावर संशय घ्यावा, अगदी शेवटपर्यंत तोच गुन्हेगार आहे याची खात्री पटावी आणि प्रत्यक्षात काही भलतंच समोर यावं. रहस्यपट बघताना एकदाही उठावेसे वाटू नये एवढा तो आपल्याला गुंतवून ठेवणारा असावा. असे रहस्यपट फार क्वचित येतात. अशा मोजक्या चित्रपटांत विक्रांत मेसी आणि राधिका आपटे यांच्या अप्रतिम अभिनयाचा ‘फॉरेन्सिक’ हा चित्रपट सामिल होतोय. (Forensic Movie Review)
‘फॉरेन्सिक’ हा चित्रपट नुकताच झी 5 या ओटीटी माध्यमावर प्रदर्शित झाला आहे. अगदी दोन तासांचा हा चित्रपट सुरुवातीपासून खिळवून ठेवतो. ओटीटी म्हणजे आपण घरी बसून जरी फॉरेन्सिक बघणार असलो तरी चित्रपटाची कथा आणि दिग्दर्शन यामुळे तुम्हाला एकदाही ‘ब्रेक’ घ्यावासा वाटणार नाही.
दिग्दर्शक विशास फुरीया यांनी दोन तासांच्या चित्रपटात आपल्या दिग्दर्शनाचं कसब दाखवलं आहे. विक्रांत मेसी, प्राची देसाई, राधिका आपटे, विंदू दारा सिंग आणि रोहित रॉय या मोजक्या स्टारकास्टच्या अभिनयामुळे फॉरेन्सिक अधिक चांगला झालाय. ‘विक्रांत मेसी’ या गुणी अभिनेत्याचे अनेक चित्रपट ओटीटी माध्यमावर प्रदर्शित झाले आहेत. मात्र त्यातही विक्रांतनं बाजी मारली आहे. यात फॉरेन्सिकचे नाव आता जोडले जाणार आहे. (Forensic Movie Review)
सस्पेन्स क्राईम थ्रिलर असलेल्या फॉरेन्सिकची कथा मसुरी शहरापासून सुरु होते. तिथे एका लहान मुलीची तिच्या वाढदिवसाच्या दिवशीच हत्या होते. अतिशय क्रूरपणे या लहानगीला मारले जाते. या हत्येच्या तपासाची जबाबदारी पोलीस अधिकारी मेघा शर्मा (राधिका आपटे) आणि फॉरेन्सिक तज्ज्ञ जॉनी खन्ना (विक्रांत मॅसी) यांच्यावर येते.
मेधा आणि जॉनी या हत्येचा तपास करणयासाठी एकत्र येतात. पण त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातील समस्याही त्यापाठोपाठ येतात. प्राची देसाई मानसोपचारतज्ज्ञ डॉ. रंजना यांच्या भूमिकेत आहे. एका हत्येचा गुन्हा उलगडतांना मेधा, जॉनी आणि डॉ. रंजना या त्रिकुटामधील गुढ अधिक गडद होत जाते आणि हाच चित्रपटाच्या रहस्याचा गाभा आहे. (Forensic Movie Review)
फॉरेन्सिकमध्ये छाप पडते ती विक्रांत मेसीची. फॉरेन्सिक तज्ज्ञ म्हणून तो छाप पाडतो. त्यासोबत राधिका आपटेचा वावरही खिळवून ठेवणारा आहे. फोबिय, सेक्रेड गेम्स, रात अकेली यासह अनेक वेब सीरिजमधून राधिका आपल्याला परिचित झाली आहे. फॉरेन्सिकमध्ये ती पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेतही तेवढीच चपखल बसली आहे.
============
हे ही वाचा: Y Movie Review: पुरुषप्रधान संस्कृतीला आरसा दाखवणारा ‘वाय’ सिनेमा
बॉलिवूडमध्ये चमकलेल्या ‘या’ मराठी अभिनेत्री सध्या कुठे गायब आहेत?
============
प्राची देसाईने फॉरेन्सिकमध्ये उत्तम काम केले आहे. सुरुवातीला तिची भूमिका अतिशय छोटी वाटते. पण नंतर तिच्या डॉक्टरच्या भूमिकेचं महत्त्व आणि गूढ वाढत जातं. रोहित रॉय आणि विंदू दारा सिंग यांच्या भूमिकाही उत्तम झाल्या आहेत. विशाल फुरियाने याआधी नुसरत भरुचासोबत ‘छोरी’ हा चित्रपट केला होता. आता फॉरेन्सिकमध्ये त्यांनी त्यापुढचे पाऊल टाकले आहे.
फॉरेन्सिक हा मल्याळम चित्रपटाचा हिंदी रिमेक आहे. मल्याळम चित्रपट हिट झाला होता. हिंदीतील फॉरेन्सिकही उत्तम झाला आहे. घरी बसून बघण्यासाठी ‘फॉरेन्सिक’ हा चांगला सस्पेन्स क्राईम थ्रिलर चित्रपट आहे.