दिग्दर्शक सुभाष घई आणि गीतकार आनंद बक्षी यांचे जबरदस्त ट्युनिंग!
‘बीटल्स’ का विभक्त झाले? ‘बीटल्स’मध्ये आलेल्या दुराव्याचा शोध घेणारी डॉक्यु-सिरीज
‘बीटल्स’ या जगप्रसिद्ध बँडची नवलाई, त्यांचं जादुई संगीत, त्यांच्याबद्दलच्या दंतकथा याची भुरळ अगदी आजच्या तरुणाईलाही आहे. ६० च्या दशकात संपूर्ण जगाला त्यांच्या संगीताची, देखणेपणाची, त्यांच्या स्टाईलची अक्षरशः मोहिनी घातली होती. अवघ्या काही वर्षात त्यांनी जगाला त्यांच्या तालावर नाचायला लावलं होतं.
जॉन लेनन, पॉल मॅकार्टनी, जॉर्ज हॅरिसन आणि रिंगो स्टार या चार तरुणांनी युरोपमधून थेट अमेरिकेत आणि नंतर जगभर अमाप प्रसिद्धी मिळवली. जेव्हा ब्रिटनमध्ये अमेरिकन संगीताचा प्रभाव होता तेव्हा हे ‘बीटल्स’ अमेरिकेतील टॉप बँड बनले. सलग तीन वर्षं त्यांनी जगभरात तुफानी दौरे केले.
१९६५ नंतर त्यांनी दौरे बंद करून स्टुडिओत बसून गाणी रचायला सुरुवात केली होती. लव्हसॉंग्स किंवा रॉक अन रोल पेक्षा वेगळं काहीतरी करावं या जाणिवेतून त्यांनी नवनवीन प्रयोग करायला सुरुवात केली. आपल्या गाण्यांमधून कधीही न हाताळले गेलेले विषय त्यांनी आणले आणि नवं तंत्रही विकसित केलं. ‘रिव्हॉल्व्हर’, ‘रबर सोल’, ‘सार्जंट पेपर’ आणि ‘व्हाईट अल्बम’ हे प्रायोगिकदृष्ट्या अति उच्च म्हणावे असे अल्बम्स होते. यामध्ये अचाट सांगीतिक प्रयोग होते आणि हे चारही अल्बम्स प्रचंड गाजले.
साल १९६९… आपल्या आगामी कॉन्सर्टसाठी नवी गाणी रचायची असा ‘बीटल्स’नी संकल्प सोडला आणि ते कामाला लागले. २२ दिवसात त्यांनी तब्बल १४ गाणी रेकॉर्ड केली. गाणी बनत असताना ती संपूर्ण प्रक्रिया कॅमेराबद्ध होत होती. त्यासाठी एक फिल्म क्रू मागवण्यात आला होता. ही चौदा गाणी म्हणजेच बीटल्सचा बारावा आणि शेवटचा अल्बम, ज्याचं नाव होतं ‘लेट इट बी’. ‘बीटल्स’ ग्रुप विभक्त झाल्यानंतर एक महिन्याने ८ मे १९७० रोजी हा अल्बम रिलीज झाला.
‘बीटल्स’ विभक्त झाल्यावर जगभरात हळहळ व्यक्त करण्यात आली. ते नेमके का वेगळे झाले याच्या सुरस कहाण्या प्रसिद्ध व्हायला लागल्या. खरं कारण काय होतं हे कधीच कुणी छातीठोकपणे सांगू शकलं नाही. ही कारणं जाणून घेण्यासाठी त्या २२ दिवसात १४ गाणी रेकॉर्ड होत असताना जे चित्रण करण्यात आलं ते फुटेज खूपच महत्त्वाचं होतं. तब्बल ५७ तासांचं हे रेकॉर्डिंग लंडनमध्ये ॲपल कॉर्पोरेशनच्या मुख्यालयात होतं. याशिवाय १३० तासांचं ऑडिओ रेकॉर्डींगही होतं. याच फुटेजमधून १९७१ साली ‘लेट इट बी’याच नावाने एक माहितीपट बनला होता, पण तरीही मूळ फुटेज जगासमोर आलेलं नव्हतं. (The Beatles: Get Back)
काही वर्षांपूर्वी या मूळ रेकॉर्डिंगबद्दलची माहिती पीटर जॅक्सन या नामांकित दिग्दर्शकाला समजली तेव्हा त्याने थेट लंडन गाठलं. ॲपल कॉर्पोरेशनने त्याला सांगितलं की, आम्ही या फुटेजवरून एक भव्य माहितीपट बनवण्याचा विचार करतोय. दिग्दर्शक पीटर जॅक्सनने लगेच संमती दर्शवली. ‘लॉर्ड ऑफ द रिंग्स’ सारखे भव्यपट बनवणारा पीटर जॅक्सन स्वतः खूप मोठा ‘बीटल्स’ फॅन आहे. त्याने या माहितीपटासाठी पुढे चार वर्षं अथक मेहनत घेतली आणि ‘गेट बॅक’ ही तीन भागांची डॉक्यु-सिरीज तयार झाली. तीन भागांचा मिळून कालावधी हा जवळपास आठ तासांचा आहे. (The Beatles: Get Back)
पीटर जॅक्सनने जेव्हा मूळ फुटेज बघायला सुरुवात केली तेव्हा त्याला वाटत होतं की, ‘बीटल्स’ बँड का विभक्त झाला याची कारणं सापडतील, पण हे ‘फॅब फोर’ आपली गाणी रेकॉर्ड करत असताना त्यांच्यात कुठेही भांडणं, तंटे, हेवेदावे असं काहीही होताना दिसत नव्हतं, पण तरीही कुठेतरी काहीतरी बिनसलं होतं. त्यांच्यात विसंवाद नव्हता पण तरीही त्यांना एकमेकांचा कंटाळा आलाय अशी शंका येत होती. काहीही असलं तरी ते चार घट्ट मित्र होते आणि त्यांची निष्ठा त्यांच्या गाण्यांशी, संगीतकलेविषयी होती हे स्पष्टपणे दिसत होतं. (The Beatles: Get Back)
रेकॉर्डिंगनंतर ॲपल कॉर्पोरेशनच्या रुफटॉपवर त्यांनी १४ गाणी सादरही केली, तेव्हा कुणालाही वाटलं नव्हतं की, आपल्या सादरीकरणात समरसून गेलेले हे चार अवलिये लवकरच वेगळे होणार आहेत. हाच या डॉक्यु-सिरीजचा क्लायमॅक्स आहे. २२ दिवसात या चार ‘बीटल्स’च्या मनात काय चाललं होतं, त्यांच्यातले वाद नेमके कोणत्या स्वरूपाचे होते, चौघांमध्ये उत्तम गीतकार कोण होता, बीटल्स विभक्त व्हायला जॉन लेननची प्रेयसी ‘योको ओनो’ ही खरंच कारणीभूत होती का, अशा असंख्य प्रश्नांची उत्तरं या सिरीजमधून मिळू शकतात. (The Beatles: Get Back)
==========
हे देखील वाचा – डॅनियल क्रेगनंतर ‘जेम्स बॉन्ड’ची भूमिका कोण साकारणार?
==========
पीटर जॅक्सनच्या शब्दात सांगायचं, तर हा एक ऐतिहासिक ठेवा आहे आणि त्याकाळात हे चित्रण झालं हीच येणाऱ्या असंख्य पिढ्यांच्या दृष्टीने, संगीत अभ्यासकांच्या दृष्टीने खूप मोठी घटना आहे. ‘गेट बॅक’ ही डॉक्यु-सिरीज भारतात हॉटस्टारवर पाहता येईल. ‘बीटल्स’चे चाहते असलात तरी आणि अगदी नसलात तरीही, प्रत्येक सिनेमाप्रेमीने आवर्जून बघायला हवी अशी ही डॉक्यु-सिरीज आहे.