मिलिंद गवळी यांनी त्यांच्या पोस्टमधून दिला ‘सवतीचे कुंकू’ चित्रपटाच्या आठवणींना
चित्रपटसृष्टीच्या प्रसारासाठी प्रभात चित्र मंडळाचे योगदान; राबवले जातात विविध उपक्रम
प्रभात चित्र मंडळाच्या ऑफिसमध्ये डिसेंबर १९९९ मी पहिल्यांदा आलो. वास्तव रुपवाणीसाठी मामि महोत्सवाचा वृत्तांत श्रीकांत बोजेवारने लिहायला सांगितला होता. वृत्तांत लिहिला आणि नांदगावकरांना येऊन भेटलो. “तुम्हाला प्रभात चित्र मंडळाविषयी (Prabhat Chitra Mandal) काहीच माहिती नाही?” त्यांनी त्यांच्या नेहमीच्या आश्चर्ययुक्त स्वरात विचारलं. चांगले चित्रपट पहायची सवय लहानपणापासून असूनही ‘प्रभात’विषयी माहिती नव्हती ही वस्तुस्थिती आहे.
गरवारे इन्स्टिट्यूट मधून पत्रकारितेचा अभ्यासक्रम करताना अशोक राणेंनी चित्रपट रसास्वादाची दोन व्याख्याने घेतली होती. त्यात प्रभात चित्र मंडळाचा उल्लेख प्रथम ऐकला होता. त्यानंतर श्याम बेनेगलच्या समरच्या खेळाला नीला उपाध्ये आणि पत्रकारितेच्या सहाध्यायी मित्रांबरोबर चव्हाण सेंटरला हजेरी लावली होती. समरचे दिग्दर्शक श्याम बेनेगल, कलावंत किशोर कदम, दिव्या दत्ता, राजेश्वरी यांच्या उपस्थितीत समर पाहणं हा माझ्यासाठी विलक्षण अनुभव होता.
या पहिल्या अनुभवाने माझ्या मनात अनेक आशाआकांक्षांनी मूळ धरलं. चित्रपट व चित्रपट समीक्षा या प्रातांत आपल्याला काही करता येईल असा विश्वासही निर्माण झाला. नोव्हेंबर महिन्यात होणाऱ्या मामि महोत्सवात प्रतिनिधी म्हणून हजेरी लावली. महाराष्ट्र टाईम्स मधील इंटर्नशीपमुळे मुकेश माचकरशी चांगलाच परिचय झालेला होता.
मुकेश, श्रीकांत बोजेवार यांच्याबरोबर ‘मामि’ महोत्सवातील चित्रपट पाहण्याची खुमारी काही वेगळीच होती. चव्हाण सेंटर व टाटा थिएटरमध्ये जागतिक दर्जाचे चित्रपट पाहण्यासाठी केलेली पळापळ, सिनेमा पाहून झाल्यानंतर केलेल्या चर्चा यामुळे चित्रपटांकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलून गेला होता. या महोत्सवात जो अनुभवलं ते वृत्तांत रुपाने लिहण्याची संधी मिळाली आणि प्रभात चित्र मंडळामध्ये माझा प्रवेश झाला. (Prabhat Chitra Mandal)
प्रभातचं ऑफिस, तिथली लायब्ररी, प्रभात तर्फे चव्हाण सेंटर आणि एनसीपीए मध्ये आयोजित केलेले चित्रपट याची भुरळ पडायला फार वेळ लागला नाही. गुरुनानक कॉलेजच्या अध्यापनाशिवाय इतर काहीच व्यवधाने नसल्यामुळे प्रभात सारख्या सांस्कृतिक संस्थेशी स्वतःला जोडून घेणं मला सहज शक्य झालं. चित्रपट निर्मिती व चित्रपट विषयक लिखाण यांच्याबरोबरीनेच चांगले चित्रपट दाखवून चांगला प्रेक्षक निर्माण करणं हे देखील या क्षेत्राचं एक महत्त्वाच अंग आहे, याची जाणीव पुढील काही महिन्यात झाली.
प्रभातच्या बरोबरीनेच नांदगावकरांनी ‘फेडरेशन ऑफ फिल्म सोसायटीज् ऑफ इंडिया’ या शिखर संस्थेशी मला जोडून घेतलं आणि चित्रपट संस्कृतीचा प्रसार करणाऱ्या या देशव्यापी चळवळीचा मी एक कार्यकर्ता बनून गेलो. फेडरेशनच्या निमित्ताने दिल्ली, कलकत्ता येथील विविध देशांचे राजदूतावास व तिथल्या फिल्म सोसायटीमधील माझ्यासारखेच कार्यकर्ते यांच्याशी संपर्क निर्माण झाला. या संपर्कांचा पुढे प्रभातमध्ये अनेक कार्यक्रमांचं आयोजन करण्यासाठी उपयोग झाला आणि आजही होतो आहे. (Prabhat Chitra Mandal)
पुढील तीन वर्ष फेडरेशनचं काम करत असलो तरीही प्रभातच्या कार्यक्रमांमध्ये कार्यकर्ता म्हणून अधिकाधिक सहभागी होऊ लागलो. मामि महोत्सवात मुंबईत आपलं स्थान निर्माण केलं होतं आणि दिल्लीच्या ‘एशियन फेस्टिव्हल’च्या धर्तीवर मुंबईतही ‘थर्ड आय एशियन फेस्टिव्हल’ची सुरुवात झाली. माजिद मजिदी, ह्यूयो जान्की, ख्येनट्स नोर्बु या दिग्दर्शकांच्या कामाची ओळख महोत्सवाने करुन दिली.
एनसीपीएत नियमित होणाऱ्या खेळांमधून अकिरा कुरोसावा, आन्द्रे तारकोव्हस्की, झोल्तान फाब्री, थिरी मेंझल, करेल ककिना या जागतिक दर्जाच्या दिग्दर्शकांचे अनेक चित्रपट पाहता आले. फिल्म सोसायटीच्या कार्यकर्त्याला प्रथम उत्तम प्रतीचा प्रेक्षक असण गरजेचं असतं. प्रभातच्या पहिल्या तीन वर्षात मला प्रेक्षक म्हणून अभिरुची संपन्न होता आलं. प्रेक्षक म्हणून चित्रपटविषयक भान येत असताना या चित्रपटांविषयी मला वास्तव रुपवाणी व इतर वर्तमानपत्रांतून लिखाणाची संधी मिळत गेली. परिक्षण समीक्षा व आस्वाद चर्चा या क्षेत्रात आपण काही योगदान देऊ शकू, असा विश्वास देखील या दरम्यान निर्माण झाला. (Prabhat Chitra Mandal)
प्रभातच्या घटनेनुसार सदस्यत्व स्वीकारल्यानंतर तीन वर्षांनी प्रभातच्या कार्यकारणीवर निवड होऊ शकते. मी प्रभातच्या कार्यालयाशी जोडलो गेलो होतोच, २००३ मध्ये झालेल्या वार्षिक सभेनंतर मी कार्यकारिणीमध्ये आलो. अशोक राणे सचिव व मी सहाय्यक सचिव अशी नेमणूक झाली आणि प्रभातच्या कामकाजाच्या काही जबाबदाऱ्या नियमितपणे पार पाडू लागलो. हा काळ फिल्म सोसायटी चळवळीचा बहाराचा काळ होता. मुंबई व गोवा येथील आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव, भारतीय चित्रपट निर्मितीमध्ये मल्टिप्लेक्स संस्कृतीने घडवून आणलेले सकारात्मक बदल, लगानसारख्या व्यावसायिक चित्रपटाने ‘ऑस्कर’पर्यंत मारलेली मजल यामुळे चांगले चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षक फिल्म सोसायटी स्क्रिनिंगसाठी आवर्जून हजेरी लावत असत. (Prabhat Chitra Mandal)
नव्वदच्या दशकात समांतर चित्रपटांची लाट ओसल्यानंतर पुन्हा एकदा प्रेक्षकांना चांगले चित्रपट पहायला मिळू लागले होते. याच दरम्यान संदीप सावंतच्या ‘श्वास’ या चित्रपटाने मराठी चित्रपटसृष्टीत देखील मन्वंतर घडवून आणलं. श्वासचा मुंबईतील पहिला शो करण्याचा मान प्रभातला मिळाला. आमचे फेडरेशनमधील सहकारी सुभाष देसाई हे सेन्सॉर बोर्डच्या निवड समितीवर होते. एके दिवशी त्यांनी मला भारावून जाऊन एका मराठी चित्रपटाविषयी सांगितलं. अनेक दिवसांत अशाप्रकारचा मराठी चित्रपट पाहिला नसल्याचंही त्यांनी नमूद केलं.
या चित्रपटाविषयी मी राणेंशी बोललो आणि त्याचं चव्हाण सेंटरमधील स्क्रिनिंग आम्ही नक्की केलं. श्वासच्या या खेळासाठी चव्हाण सेंटरच्या मुख्य सभागृहाच्या बाहेर प्रेक्षकांच्या रांगा लागल्या होत्या. संदीप सावंतच्या चित्रपटाला प्रदर्शनाआधीच या खेळाने उत्तम प्रसिद्धी मिळवून दिली. नंतर श्वासला सुवर्णकमळ मिळालं, त्याची निवड ऑस्करसाठी भारतातर्फे पाठवल्या जाणारा चित्रपट म्हणून झाली. श्वास मराठी चित्रपटसृष्टीतील मैलाचा दगड ठरला पण प्रभातच्या कार्यवर असलेल्या विश्वासापोटी अरुण नलावडे व त्यांच्या सहकाऱ्यांनी प्रभातमध्ये श्वास सर्वप्रथम दाखवण्यासाठी अनुमती दिली यातच प्रभातचं वेगळेपण आहे. (Prabhat Chitra Mandal)
श्वास नंतर हरिश्चंद्राची फॅक्टरी, धग, सिंधुताई सकपाळ यासारख्या प्रदर्शनानंतर गाजलेल्या चित्रपटांचं पहिलं स्क्रिनिंग प्रभातमध्ये झालयं. सातच्या आत घरातच्या स्क्रिनिंगला चव्हाण सेंटर तुडूंब भरलं शेवटी सभागृहाच्या पायऱ्यांवर स्मिता तळवळकरांच्या बाजूला बसून सिनेमा पाहिला. यापैकी हरिश्चंद्राची फॅक्टरीचं स्क्रिनिंग हा न विसरता येण्याजोगा अनुभव आहे.
परेश मोकाशीच्या हरिश्चंद्राची फॅक्टरी या चित्रपटाने निर्मिती अवस्थेत असतानाच सगळ्यांचं कुतूहल जागं केलं होतं. भारतीय चित्रपटांची मुहुर्तमेढ उभारणाऱ्या दादासाहेब फाळके यांच्या कर्तृत्त्वावर चित्रपट निर्माण करण्याचं आव्हान तोपर्यंत कोणत्याच भारतीय दिग्दर्शकाने केलं नव्हतं. मराठी चित्रपटांच्या नेहमीच्या बजेटपेक्षा असलेलं मोठं बजेट, पिरियड फिल्म असल्यामुळे त्याच्या चित्रिकरणासाठी परेश मोकाशी घेत असलेली मेहनत याच्या बातम्या प्रसार माध्यमांतून ऐकायला येत होत्या. चित्रपट पूर्ण झाला व परेश मोकाशी त्याचं पहिलं प्रदर्शन प्रभातमध्ये करण्यासाठी तयार झाला.
परेश आणि प्रकाश चित्रकार अमलेन्दू चौधरी दोघंही स्क्रिनिंगच्या दिवशी चार वाजताच चव्हाण सेंटरवर रिळांचे डब्बे घेऊन हजर झाले. मी ही पोहचलो. प्रोजेक्शन रुममध्ये गेलो आणि प्रोजेक्शनिस्ट मात्र गैरहजर असल्याचं लक्षात आलं. चव्हाण सेंटरमध्ये नियमितपणे प्रोजेक्शन करणारा बाबा सूरतला गेलेला असल्यामुळे त्याने बदली प्रोजेक्शनिस्टची व्यवस्था केली होती, पण हा बदली कामगार मात्र वेळेत पोहचलेला नव्हता. तो पाच साडेपाचच्या सुमारास आला व प्रोजेक्शन रुममधील व्यवस्था पाहताच या मशिनवर मला ऑपरेट करता येणार नाही असं सांगून मोकळा झाला. मला व अमलेन्दूला त्याच्या या विधानाने घामच फुटला. (Prabhat Chitra Mandal)
मी बाहेर येऊन परेशला आतल्या परिस्थितीची कल्पना दिली. पण तो मात्र एखाद्या स्थितप्रज्ञासारखा शांत होता. होईल सगळं ठीक, असं तो निर्विकारपणे म्हणाला. पण माझ्या मात्र काळजाचे ठोके चुकले होते. चव्हाण सेंटरच्या बाहेर हरिश्चंद्राची फॅक्टरी पहायला खुद्द श्माम बेनेगल, विजया राज्याध्यक्ष रांग लावून उभे होते. साडेसहाला स्क्रिनिंग सुरु करायचं, तर एव्हाना रिळं मशिनवर चढायला हवी होती. मग फोनाफोनी करुन रॉक्सी थिएटरच्या प्रोजेक्शनिस्टला बोलवलं. तो आला पण त्याच्यासाठी सुद्धा ही प्रोजेक्शन व्यवस्था नवीन होती. शेवटचा उपाय म्हणून बाबाला सूरतला फोन लावून त्याच्या सूचनांनुसार तो मशिन ऑपरेट करु लागला.
सात वाजता प्रेक्षकांना सभागृहात प्रवेश दिला. मी व परेशने मंचावर जाऊन प्रेक्षकांना परिस्थितीची कल्पना दिली. फिल्म सोसायटी संस्कृतीचा परिणाम, प्रेक्षक शांत होते. दादासाहेब फाळकेंना पहिला चित्रपट निर्माण करण्यासाठी जितके कष्ट पडले असतील तितकेच कष्ट हरिश्चंद्राची फॅक्टरीचा पहिला खेळ सुविहित करण्यासाठी आम्हाला झाले. अखेरीस साडेसात वाजता हरिश्चंद्राची फॅक्टरीचं स्क्रिनिंग सुरु झालं आणि आम्ही हुश्श केलं.
या प्रसंगाने खूप काही शिकवलं. स्क्रिनिंगसाठी चव्हाण सेंटरपर्यंत येणारा प्रेक्षक आपला वेळ काढून इतक्या दूरवर येत असतो. एक चांगला चित्रपट पाहिल्याचं समाधान त्याला देणं हे आयोजक म्हणून सर्वात पहिलं उद्दिष्ट्य असणं महत्त्वाचं आहे, याची जाणीव या प्रसंगाने करुन दिली. गेल्या अठरा वर्षांमध्ये १६ एमएम, ३५ एमएम, सीडी, डिव्हिडी, पेन ड्राईव्ह असे चित्रपटांचे फॉरमॅट बदलले. रिळांचे प्रोजेक्शन जाऊन, डिव्हिडी प्लेयर, लॅपटॉप ही साधनं आली. उपकरणात सुटसुटीतपणा आला पण त्याच बरोबर ही उपकरणं कधी दगा देतील याचा अंदाजही येईनासा झाला. (Prabhat Chitra Mandal)
डिव्हिडी अडकणे, त्याचा साऊंड योग्य नसणे असे प्रकार अधेमधे घडतात आणि अशावेळी जर शो रद्द करावा लागला, तर अपराधी भावना मनात निर्माण होते. एनडीटिव्ही ल्युमिएर चॅनेलच्या मदतीने दाखवलेल्या ‘ऑरफनेज’ला झालेल्या गर्दीनंतर खेळ हाऊसफुल्ल होण्याचं प्रमाण कमी झालं. ही वस्तुस्थिती आहे. त्यानंतर प्रभातचे कार्यक्रम चव्हाण सेंटरच्या मुख्य सभागृहातून रंगस्वर मध्ये होऊ लागले. साडे आठशे असलेली सभासद संख्याही कमी झाली.
प्रभात चित्र मंडळाचे सदस्य नेहमीच वेगळ्या चित्रपटांची अपेक्षा ठेवणारे आहेत. स्वाभाविकच दर महिन्याचा कार्यक्रम ठरवताना या प्रेक्षकांच्या मानसिकतेचा विचार करावा लागतो. डाऊनलोडिंगमुळे घरच्या घरी उपलब्ध होणारे ताजे चित्रपट आणि कॉपीराईट व स्क्रिनिंग फी मुळे प्रभातमुळे दाखवल्या जाणाऱ्या चित्रपटांवर येणारी बंधनं ही कसरत करणं अवघड असलं तरीही आव्हानं देणारी व त्यातून नवनवीन कल्पनांना जन्म देणारी ठरली.
चित्रपटांच्या आस्वादनासाठी स्क्रिनिंग बरोबर शब्द माध्यमाची जोड देण्यासाठी वास्तव रुपवाणीचं प्रकाशन सुरु झालं. त्याचप्रमाणे प्रत्यक्ष स्क्रिनिंगला येणं जरी जमलं नाही तरीही प्रभातच्या सदस्यांनी महिन्यातून एकदा एकत्र येऊन चित्रपटविषयक चर्चा घडवून आणण्यासाठी फिल्म स्टडी सर्कल सुरु करावं याबाबात नांदगांवकर आग्रही होते. सदस्यांना त्याबद्दल कळवून त्यांच्या प्रतिसादानुसार फिल्म स्टडी सर्कल प्रभातच्या कार्यालयावरील छोट्याशा सभागृहात सुरु केलं.
अशोक राणेंनी या स्टडी सर्कलचे समन्वयक म्हणून जबाबदारी घेतली. परंतु सदस्यांच्या अनियमित उपस्थितीमुळे हा उपक्रम फार काळ सुरु राहिला नाही. फिल्म स्टडी सर्कलचा पुढचा टप्पा चित्रपट रसास्वाद शिबिरचं आयोजन हा होता. गेली चार वर्ष प्रभात चित्र मंडळातर्फे आयोजित होत असलेल्या या रसास्वाद शिबिराला वाढता प्रतिसाद मिळतोय. (55th Anniversary of Prabhat Chitra Mandal)
प्रभातच्या कार्यकारिणी टीम बरोबरच रवी जाधव, संदीप कुलकर्णी, जयप्रद देसाई, विजू माने, रोहित प्रधान, देवेंद्र गोलटकर, अमोल गोळे, नितिन कक्कड, प्रशांत नायक, निखिलेश चित्रे या चित्रपटसृष्टीशी संबंधित कलावंत व तंत्रज्ञाच्या अभ्यासपूर्ण व्याख्यानांमुळे चित्रपट रसास्वादाचे वेगवेगळे आयाम प्रतिनिधींना कळत गेले. चित्रपट निर्मितीमध्ये प्रवेश करण्याआधी चित्रपट समजून घेणं महत्त्वाचं आहे याची जाणीव झालेल्या तरुण-तरुणींची उपस्थिती या शिबिराला लाभते आहे. या शिबिराचं आयोजन महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी करण्याच्या उद्देशाने प्रभातने पावलं उचलली.
गेल्या दशकात बी एम् एम् चा कोर्स अधिक विद्यार्थीप्रिय झालाय. त्याच्या अभ्यासक्रमात चित्रपट रसास्वादाचा एक संपूर्ण पेपर आहे. अशा विद्यार्थ्यांच्या गटाला व सिनेमा माध्यम समजून घेण्याची इच्छा असणाऱ्या कॉलेजमधील विद्यार्थ्यांसाठी अभिजीत देशपांडे, गणेश मतकरी, अमित चव्हाण व यांच्या सहकार्याने एक मॉड्युल तयार केलं. रुईया, रुपारेल, व्हीपीएम्, के.जे.सोमय्या या महाविद्यालयांमध्ये या शिबिरांच्या निमित्ताने प्रभात चित्र मंडळाचं कार्यही पोहचवता आलं. (55th Anniversary of Prabhat Chitra Mandal)
पूर्ण लांबीच्या चित्रपटांबरोबरीनेच लघुपट निर्मितीचं एक वेगळ दालन गेल्या दशकात खुलं झालंय. सहज उपलब्ध असणारं तंत्रज्ञान, कमी बजेट व सर्जनशीलता यांच्या बळावर अनेक नवोदित लघुपट बनवू लागले. या सर्वांना प्रभाततर्फे प्रोत्साहन देण्यासाठी ‘अँन इव्हिनिंग विथ शॉर्टफिल्म’ हा उपक्रम जानेवारी २००६ मध्ये सुरु केला.
पहिल्याच वर्षी सचिन कुंडलकर (द बाथ), अमित राय (रॉ मटेरियल), इमाम गोसावी (हाऊसवाईफ) यासारख्या नवोदितांच्या लघुपटांचं प्रदर्शन केलं. महाविद्यालयीन तरुणांचा चांगला प्रतिसाद या उपक्रमाला लाभला. सचिन कुंडलकर व अमित राय यांनी पुढील काही वर्षातच चित्रपटसृष्टीत आपलं स्थान निर्माण केलं. नागराज मंजुळेची पिस्तुल्या व अमृता सुभाषने दिग्दर्शित केलेल्या आज्जी या लघुपटांच्या प्रदर्शनाचा एक विशेष कार्यक्रम केला. गेली पाच वर्ष चित्रभारतीमध्ये व्ही. शांताराम फाऊंडेशनच्या सहाय्याने लघुपटांची स्पर्धा प्रभाततर्फे घेण्यात येते. यंदा १४० लघुपटांच्या प्रवेशिका आल्या यावरुन या प्रयत्नाला यश मिळाल्याचा निष्कर्ष काढता येईल. (Prabhat Chitra Mandal)
१२ जून २००८ रोजी पुलोत्सव मुंबईत साजरा करण्याचा प्रस्ताव आशयच्या जकातदार व चित्राव यांनी दिला व नेहमीच्या स्क्रिनिंग आणि शिबिरापेक्षाही वेगळा कार्यक्रम आयोजित करण्याचं आव्हान मिळालं. पु. ल. देशपांडे कला अकादमीच्या मुख्य सभागृहात कार्यक्रम करायचा व त्यावर्षी राष्ट्रीय पुरस्कार मिळालेल्या मराठी कलावंताचा सत्कार व पुलंच्या लेख व नाट्यवाचनाचा कार्यक्रम असं स्वरुप ठरलं.
मुंबईत सुमारे हजार प्रेक्षक भर पावसाच्या दिवसात फारशा प्रसिद्धी शिवाय जमवणं हेच खरं आव्हान होतं. पण १२ जूनला रवींद्र मंदिरच्या बाहेर प्रेक्षकांची भलीमोठी रांग लागली व मी कार्यक्रमाच्या शेवटी कार्यक्रमाला न आलेल्या पावसाचे आभार मानले. या कार्यक्रमाच्या आयोजनाच्या निमित्ताने संदीप मांजरेकर आणि अमित चव्हाण हे नवीन सहकारी माझ्या प्रभातच्या कार्यात सहभागी झाले. अभिजीत देशपांडे यांनी उदय व ज्योती रोटे या त्यांच्या मराठीचे प्राध्यापक असलेल्या मित्रांच्या आग्रहामुळे प्रभातचं सदस्यत्व घेतलं व तो नांदगावकरांना वास्तव रुपवाणीच्या संपादनात मदत करु लागला.
गणेश मतकरी आपलं महानगरमध्ये जागतिक चित्रपटांची समीक्षा करत होता. एका कार्यक्रमात तो भेटला. त्याला प्रभातची माहिती दिली व तोसुद्धा लगेच प्रभातचा सदस्य झाला. अभिजीत, गणेश, उमेश कुलकर्णी, किशोर कदम (सौमित्र) व सचिन कुंडलकर यांच्याबरोबर अरुण खोपकरांच्या घरी जाऊन चित्रपट रसास्वादाची काही सत्र अटेन्ड करण्याची संधीही मिळाली. चित्रपट व अभिजात कलांचा परस्पर संबंध आणि चित्रपटाचे तंत्र याबद्दल खोपकरांसारख्या विद्वानांकडून ऐकणं हा दुर्मिळ योग होता. चित्रपट पाहण्याची शिस्त देखील त्यानिमित्ताने अंगी बाणवता आली. (Prabhat Chitra Mandal)
मुंबईतल्या प्रवासाच्या गैरसोयीमुळे चव्हाण सेंटरमध्ये येणाऱ्या सदस्यांची संख्या कमी होत होती. पुण्याच्या फिल्म आर्काव्हमधून होणारा क्लासिक चित्रपटांचा पुरवठा जवळ जवळ बंदच झाला होता. फेडरेशनकडून परदेशी चित्रपटांची दोन तीन पॅकेजेस् उपलब्ध होत होती, पण एवढ्या मर्यादीत पुरवठ्यावर बारा महिने सदस्यांना आकर्षित करणं कठीण होतं. अनेक सदस्य केवळ प्रभातच्या सांस्कृतिक चळवळीला योगदान म्हणून वार्षिक वर्गणी भरत होते पण प्रत्यक्ष कार्यक्रमांना उपस्थिती मात्र लावत नव्हते.
२०१३ला भारतीय चित्रपटसृष्टीच्या स्थापनेला शंभर वर्ष झाली. या वर्षात प्रभाततर्फे सदस्यांसाठी कोणता नवीन कार्यक्रम देता येईल? याचा विचार करत असताना चित्रभारतीची कल्पना सुचली. दरवर्षी मे महिन्यापर्यंत राष्ट्रीय व राज्यस्तरीय चित्रपट पुरस्कार जाहिर होतात. मात्र अनेक पुरस्कार प्राप्त प्रादेशिक चित्रपट मुंबईतील प्रेक्षकांना पाहता येत नाहीत.
अशा पारितोषिक विजेत्या चित्रपटांचे प्रदर्शन व त्या निमित्ताने राष्ट्रीय पुरस्कार विजेत्यांचा सत्कार करण्याचं ठरवलं. इन्व्हेस्टमेंट, धग, संहिता, कातळ (लघुपट) या त्यावर्षी राष्ट्रीय पुरस्कार मिळालेल्या चित्रपटांबरोबर बंगाली, आसामी व मल्याळम, इंग्रजी चित्रपटांचं प्रदर्शन करता आलं. लघुपटांची स्पर्धा घेऊन रोख रकमांची पारितोषिकही दिली. चित्रभारतीने गेल्या पाच वर्षात फिल्म सोसायटी वर्तुळात आपलं स्थान निर्माण केलं.
मे महिन्यात चित्रभारती होत असल्यामुळे पारितोषिक पात्र चित्रपट पाहण्याची उत्सुकता प्रेक्षकांच्या मनात असते ती पूर्ण होते. यंदाचं चित्रभारतीचं पाचवं वर्ष अनेक अर्थाने वैशिष्ट्यपूर्ण ठरलं. प्रि.एल्.एन्. वेलिंगकर संस्थेचं सभागृह गेल्यावर्षीपासून डॉ.उदय साळुंखे व यशोधरा काटकर मॅडम यांच्या सहकार्याने चित्रभारतीसाठी उपलब्ध होत आहे. या वर्षी वेलिंगकर इन्स्टिट्यूटच्या बरोबरीनेच ठाणे आर्ट गिल्ड व सिनेमॅटिक एंटरटेनमेंट विजन या संस्था देखील चित्रभारतीच्या आयोजनासाठी सोबतीला आल्या. (Prabhat Chitra Mandal)
ठाणे आर्ट गिल्डमुळे ठाण्यात प्रथमच सिनेपोलिससारख्या सुसज्ज थिएटरमध्ये चित्रभारतीचं आयोजन करता आलं. सुमित्रा भावे सुनिल सुकथनकर यांच्या बहुचर्चित कासव बरोबर लेथ जोशी, मुक्तिभवन, हंदुक व इतर राष्ट्रीय आणि राज्य पुरस्कार चित्रपट पाहण्याची मेजवानी मुंबई व ठाण्याच्या प्रेक्षकांना मिळाली. प्रभात चित्र मंडळाचं कार्य मुंबईच्या कक्षा ओलांडून पुढे गेलं. प्रभात चित्र मंडळाची ठाणे शाखा देखील डॉ.बेडेकर व विद्याधर ठाणेकरांच्या सहकार्याने सुरु केली गेली. स्मिता तळवळकरांनी ठाणे शाखेच्या सदस्य नोंदणीचं उद्घाटन केलं होतं. आता पुन्हा नव्याने ठाणे शहरात प्रभातची शाखा सुरु झाली आहे त्याला उत्तम प्रतिसाद मिळतो आहे.
सुधीर नांदगावकरांनी वीस वर्षाहून अधिक काळ वास्तव रुपवाणीची धुरा यशस्वीपणे सांभाळल्यानंतर गेल्या काही वर्षात अभिजीत देशपांडेने वास्तव रुपवाणीचं संपादन करणं सुरु केलं. संपूर्ण महाराष्ट्रात रुपवाणीचे हजारो वाचक असले तरीही त्याचं वितरण अधिक प्रभावी करण्याचं आव्हान प्रभात पुढे आहे. (Prabhat Chitra Mandal)
मुंबई शहरात चित्रपटाचे लाखो रसिक असताना मामि, एशिएन फेस्टिव्हलला हजारो प्रेक्षकांची उपस्थिती लाभत असताना प्रभात चित्रमंडळाची प्रेक्षकांची सदस्य संख्या तीनशेच्या आसपासच आहे याची खंत सतत जाणवत असते. प्रेक्षकांच्या गैरसोयीचे सभागृह, सदस्यांना सातत्याने आकृष्ट करतील अशा चित्रपटांचे स्क्रिनिंग करण्यातील तांत्रिक आणि कॉपीराईटच्या अडचणी यावर मात करण्यासाठी दादर व उपनगरांमध्ये सभागृह पाहण्याचे प्रयत्न केले. दादर-माटुंगा सांस्कृतिक केंद्राने सहकार्याचा हात पुढे केला. त्यामुळे तीन वर्ष चव्हाण सेंटरच्या बरोबरीनेच माटुंग्यालाही चित्रपट प्रदर्शन, चर्चासत्र व पुस्तक प्रकाशन असे कार्यक्रम करता आले. बालगंधर्व चित्रपटाच्या निमित्ताने घडवून आणलेली चर्चा वादळी ठरली. अरुण खोपकर, विजय पाडाळकर, गणेश मतकरी यांच्या पुस्तकांच्या प्रकाशनाचे कार्यक्रम देखील त्याच्यांबरोबरीने केलेल्या नाविन्यपूर्ण कार्यक्रमामुळे अविस्मरणीय ठरले.
दादर-माटुंगा सांस्कृतिक सभागृहाच्या दरवाढीमुळे तिथले कार्यक्रम थांबवावे लागले. इतर उपनगरात प्रभातचा विस्तार करण्याचे प्रयत्न थांबले नाहीत. सध्या ऐरोलीच्या महाराष्ट्र सेवा संघ व वाशी मधील साहित्य संस्कृती मंडळाचे सभागृह येथे नियमितपणे चित्रपट प्रदर्शनाचं आयोजन केलं जातं. या सभागृहामध्ये चित्रपट पहायला येणाऱ्या प्रेक्षकांच्या अभिरुचीनुसार चित्रपट निवडावे लागतात. पण हळूहळू या प्रेक्षकांना जागतिक दर्जाचे चित्रपट पाहण्याची गोडी लागेल हे निश्चित!
==========
हे देखील वाचा – चित्रपट संस्कृतीचा प्रसार करणाऱ्या ‘प्रभात चित्र मंडळ’चं यंदा ५५व्या वर्षात होतंय पदार्पण
==========
गेल्या दोन दशकांमध्ये मुंबई शहरामध्ये जे सांस्कृतिक व सामाजिक बदल घडून आले. त्याचा प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष परिणाम इथल्या सांस्कृतिक संस्थावर झालाय. प्रभात चित्र मंडळ देखील याला अपवाद नाही. संस्थेची ध्येय, कार्य आणि त्यात सहभागी होणाऱ्या सभासदांची संख्या ही प्रायोजकांना आकर्षित करु शकत नाही, ही वस्तुस्थिती आहे त्यामुळे कार्यक्रमाचे स्वरुप ठरवताना आर्थिक बाजूचा विचार करावा लागतोच. सुदैवाने प्रभातच्या कार्याचं महत्त्व जाणून असलेले चित्रपटसृष्टीतले श्याम बेनेगल, गोविंद निहलानी यांच्यासारखे दिग्गज कलावंत नेहमीच आपुलकीने प्रभातच्या कार्यक्रमांमध्ये सहभागी होत असतात.
५ जुलै २०२२ ला प्रभात चित्र मंडळ चोपन्नाव्या वर्षात पदार्पण करतयं. पन्नास वर्ष अथकपणे चित्रपट संस्कृतीचा प्रसार करणाऱ्या संस्थेचं काम करण्याची संधी मला मिळाली हे माझं भाग्यचं! या कालावधीत अनेक गोष्टी अनुभवता आल्या. कार्यकर्ता व माणूस म्हणून स्वतःची जडणघडण करता आली. काही वेळा अप्रिय निर्णय घ्यावे लागले, काही माणसं दुखावली, दुरावली, काही अधिक जवळ आली. (Prabhat Chitra Mandal)
प्रभात बरोबर माझं नाव जोडलं गेलं आहे. येणारी पुढील वर्ष अधिक आव्हानाची आहेत याची जाणीव आहेच. पण बदलत्या काळाबरोबर कार्यक्रमांचं बदलतं नियोजन व सोबतीला असणारे कार्यकर्ते मित्र यामुळे पुढचा प्रवास गौरवशाली असणार याची खात्री आहेच!