दिग्दर्शक सुभाष घई आणि गीतकार आनंद बक्षी यांचे जबरदस्त ट्युनिंग!
सचिन दरेकर: सदैव ‘ॲक्शन’ मोडवर असलेला मनस्वी कलावंत
ऐन चौथीत असेल सचिन तेव्हा. बाबांनी त्याच्या हातात एक जाडजूड पुस्तक दिलं. सचिनच्या छोट्या हातांनी ते सावरलं, बघितलं. ती रणजित देसाईंची ‘स्वामी’ कादंबरी होती. आतापर्यंत ‘चांदोबा’, ‘ठकठक’ वगैरे वाचून झालं होतं. बाबांनी सांगितलं, ‘ही कादंबरी वाचायला सुरुवात कर. संपली की दुसरी देईन.’ सचिननं झपाटल्यासारखी ‘स्वामी’ पूर्ण केली. एक चांगला कलाकार, लेखक, दिग्दर्शक होण्यासाठी कुठंतरी एक बीज रुजायला हवं असतं. ते इथंच रुजलं होतं. (Success Story of Sachin Darekar)
सचिन दरेकर! भन्नाट आहे हा कलावंत. याची प्रत्येक कलाकृती रसिकांसाठी एक ‘ट्रीट’ असते. मग त्यानं लिहिलेल्या मालिका, चित्रपट असो वा ‘एक थी बेगम’ सारखी खत्तरनाक वेबसीरिज. लिखाण आणि दिग्दर्शनातला हा तेजस्वी तारा आहे. वाचनातूनच गुणांचा अधिक विस्तार होत गेला, याची कबुली तो देतो. मनोरंजन क्षेत्रातला त्याचा प्रवास इतरांसाठी प्रेरणादायी असाच आहे.
सचिनचे बाबा सुरेश दरेकर यांना वाचन आणि लिखाणाची आधीपासूनच आवड. नाट्यक्षेत्रातही ते कार्यरत होते. त्याकाळी राजाराम शिंदे यांच्या नाट्यसंस्थेमध्ये सामील झाले होते. टाटा स्टीलमधील नोकरीनिमित्तानं त्यांना बोरिवलीत स्थायिक व्हावं लागलं आणि नाटक काहीसं दुरावलं. सचिन शाळेत असल्यापासूनच नाटकांत सक्रिय असायचा. त्यामुळे सुरेश यांना समाधान वाटायचं. आपली अपूर्ण स्वप्नं ते त्याच्यात पाहात असावेत कदाचित. सचिनवर त्यादृष्टीनं चांगले संस्कार होणं गरजेचं होतं. म्हणून त्यांनी त्याच्यात सर्वप्रथम वाचनाची गोडी निर्माण केली. दररोज वर्तमानपत्र वाचलंच पाहिजे, हा त्यांचा शिरस्ता होता. (Success Story of Sachin Darekar)
वर्तमानपत्र दारात पडलं रे पडलं की सचिन, आणि त्याच्या बहिणी त्याच्यावर तुटून पडत. पहिली घडी कोण मोडणार, याचीच स्पर्धा चालायची जणू. त्यातल्या त्यात रविवार पुरवणीचा दिवस असला की विचारायलाच नको. शब्दकोडी सोडविण्याचीही चढाओढ असायची. याशिवाय, लायब्ररी वगैरे लावण्याच्या भानगडीत बाबा प्रत्येक महिन्याला एक पुस्तक विकत घेत, ते मुलांकडे सोपवत.
वर्तमानपत्र वाचनापासून झालेली सुरुवात ‘चांदोबा’, ‘ठकठक’ आदींपर्यंत आली. नंतर बाबांनी ‘स्वामी’, ‘मृत्युंजय’ ‘श्रीमान योगी’ आदींसह पु. ल. देशपांडे, व. पु. काळे, नारायण धारप अशा कित्येक लेखकांची पुस्तकं छोट्या वयातच सचिनकडे सोपविली. त्याचा वैचारिक परीघ वाढत होता. वाचन तुम्हाला विचार करण्याची नवी दृष्टी देते. सचिनसोबतही तेच घडत होतं. वाचनाच्या माध्यमातून प्रगल्भतेच्या दिशेनं प्रवास सुरू होता. (Success Story of Sachin Darekar)
नाटक, एकांकिका असं सुरू होतं. आई स्मिता यांना चिंता वाटायची. सचिनचे बरेच बॅचमेट्स तेव्हा नोकरीला लागले होते, कुणी परदेशात गेले होते. त्यामुळे आपल्या मुलानंही नोकरी करून स्थायिक व्हावं, अशी स्वाभाविक काळजी त्यांना होती. मात्र, बाबा आवर्जून सचिनच्या एकांकिकांच्या प्रयोगांना जात. मुलं काय करताहेत ते बघत. त्यांना मार्गदर्शन करीत. अखेर आई-बाबांनी सल्ला दिला, आधी शिक्षण पूर्ण कर, मग तुला वाटतं ते कर. सचिननं इंजिनीअरिंग पूर्ण केलं. यादरम्यान ऑल इंडिया रेडिओ, ईटीव्ही न्यूजसाठी डबिंग आर्टिस्ट म्हणून काम केलं. पण, नोकरीत रमेल तो कलावंत कसला. प्रशांत लोके, अवधूत गुप्ते, अंशुमन विचारे अशा कित्येक शाळकरी मित्रांचा ग्रुप होता. कट्ट्यावर चर्चा झडत, लिखाणाचे विषय येत.
“त्याकाळी नवनव्या वाहिन्या नुकत्याच येऊ लागल्या होत्या. त्यामुळे आम्ही सुदैवी होतो, कारण आम्हाला त्यानिमित्ताने संधी प्राप्त झाल्या होत्या”, असं सचिन सांगतो. सुरुवातीच्या काळात कित्येक एकांकिकांचे सीन तो ‘रिराइट’ करायचा. कित्येकजण म्हणायचेही, “तू लिखाण कर.” मात्र, मामला जुळत नव्हता. (Success Story of Sachin Darekar)
राकेश सारंग यांनी सचिनला खऱ्या अर्थानं लिहितं केलं अन् कित्येक मालिका सचिनच्या लेखणीतून अवतरल्या. ‘जगावेगळी’, ‘कळत नकळत’, ‘या गोजिरवाण्या घरात’, ‘अधुरी एक कहाणी’, ‘मन उधाण वाऱ्याचे’, ‘अनुबंध’, ‘दुर्वा’… कित्ती कित्ती नावं घ्यावीत? सुमारे तीस टॉपच्या मालिकांचं लिखाण सचिननं केलंय. तेही तब्बल सात हजार एपिसोड्स! मालिकांच्या श्रेयनामावलीत नाव यायचं तेव्हा आईला समाधान वाटायचं.
मालिकालेखन सुरू असताना ज्ञानेश भालेकर यांनी चित्रपट लेखनासाठी विचारलं, अन् ‘गोलमाल’ साकारला. चित्रपट लेखनाचाही प्रवास सुरू झाला. अवधूत गुप्तेला ‘झेंडा’ची संकल्पना सुचली होती. त्याची कथा लिहिण्यास त्यानं सचिनला सांगितलं. “असा चित्रपट प्रदर्शित होईल तरी का”, ही शंका सचिननं बोलून दाखविली. मात्र, “करून तर पाहू”, म्हणत अवधूत अडून बसला. ‘झेंडा’ पूर्ण झाला. काही राजकीय वादही झाले. मात्र, चित्रपटाची चर्चा झाली. त्याचा फायदा सचिनला झाला. (Success Story of Sachin Darekar)
“बरेच लोक तेव्हा ‘आमच्या साहेबांवर चित्रपट करायचाय’, असा फोन करायचे. मात्र, वादाचा अनुभव पाहता मी त्यांना ‘पाहू’ असंच उत्तर द्यायचो”, अशी मिश्किल आठवणही सचिन सांगतो. बऱ्याच जणांनी नंतर दिग्दर्शनाचाही आग्रह धरला. त्यातूनच मोठ्या अडचणी पार करीत ‘पार्टी’ आकाराला आला. मित्रांच्या सहकार्यानेच हे आव्हान स्वीकारू शकलो, असं सचिन नम्रपणे नमूद करतो.
अशी साकारली ‘ब्युरो रिपोर्ट’
एखादी एकांकिका लिहावी, अशी सचिनची मनोमन इच्छा. मात्र, काही कारणास्तव हे जुळून येत नव्हतं. एका वाहिनीच्या न्यूजरूममध्ये काम करत असताना आलेल्या काही अनुभवांनी मात्र तो अस्वस्थ झाला. ‘एका मोठ्या सामाजिक कार्यकर्त्याची प्रकृती गंभीर होती. अख्खा देश त्यांच्यासाठी प्रार्थना करीत होता. न्यूजरूममध्ये मात्र वेगळंच वातावरण होतं. सॅड म्युझिक लावून प्रसंग तयार केले जात होते, ते जिवंत असतानाही. प्रार्थना करण्याऐवजी आपण स्टोरीची तयारी करतोय, हेच कुठंतरी बोचत होतं.
अशीच घटना चिपळूणची. तिथं कोकण रेल्वेचा मोठा अपघात झाला होता. एकजण कमरेपर्यंत अडकला होता. त्याच्या पोटात पत्रा घुसला घुसला होता. तो पाणी प्यायला मागत होता, जिवाची याचना करीत होता. सगळे त्याला धीर देत होते. पत्रा काढल्याशिवाय त्याला काढणं शक्य नव्हतं. प्रशासनाचे प्रयत्न सुरू होते. त्याचा तो आक्रोश पीळ आणणारा होता. तेच, सॅड म्युझिक वगैरे टाकून त्याचीही स्टोरी संध्याकाळच्या बुलेटिनसाठी केली होती. नंतर कळलं, तो गेला.
माणूस म्हणून हे स्वीकारणं आव्हानात्मक होतं. स्पर्धेच्या काळात वाहिन्यांची ही अपरिहार्यता असेलही कदाचित. मात्र, ते दृश्य पाहून दोन-दोन दिवस झोप आली नाही. त्या व्यक्तीचा चेहरा दिसायचा. असे कित्येक प्रसंग आले. काही प्रसंग तुम्हाला अस्वस्थ करतात अन् काहीतरी करण्यासाठी प्रेरितही. तिथूनच मग ‘ब्युरो रिपोर्ट’ या एकांकिकेनं जन्म घेतला. राज्यस्तरीयसह बरीच बक्षिसं मिळवली’, असं सचिन सांगतो. (Success Story of Sachin Darekar)
वाचनातूनच मिळाली ‘बेगम’
‘एक थी बेगम’ या सीरिजनं तर सचिनला बरंच काही दिलं. वर्तमानपत्रात आलेल्या एका लेखातून ‘अशरफ बेगम’ सापडली. या सत्यकथेवर चांगली कलाकृती करायचं ठरलं. सचिननं लिखाण सुरू केलं. या सीरिजचे दोन सीझन झाले. देशविदेशात ते सुपरहिट ठरले. आज टॉपच्या सीरिजमध्ये ‘एक थी बेगम’चा उल्लेख होतो, यामागे सचिनचं वाचन, त्याची मेहनत या बाबी आहेत.
कौतुकाची थाप…
मोठ्या व्यक्तींकडून कौतुकाची थाप बळ देणारी असते. सचिनलाही हा अनुभव आलाय. सर्वोत्कृष्ट लिखाणाच्या पारितोषिकासाठी विनय आपटे यांनी ‘सर्वोत्कृष्ट लेखक अर्थातच सचिन दरेकर’ असा उल्लेख केला होता, तेव्हा भारावून गेलो. तसंच मधुर भांडारकर यांच्या बाबतीत. ‘झेंडा’ प्रदर्शित झाला तेव्हा वेगळं पर्व सुरू झालं. मधुर यांनी खास बोलवून घेतलं. माझेच संवाद मला ऐकविले”, हे अविस्मरणीय प्रसंग आहेत, असं सचिन नमूद करतो.
सगळी माध्यमं एकमेकांना पूरकच…
“प्रत्येक माध्यमाचा आनंद घेण्याची मजा वेगळी आहे. ८५ टक्के सीरिज मोबाइलवर बघितल्या जातात, ते पर्सनलाइज माध्यम आहे. सिनेमा मोठ्या पडद्यावर पाहण्याची मजा काही औरच आहे, तर टीव्ही मालिका हे कुटुंबासोबत एकत्र मजा घेत बघण्याचं माध्यम आहे. ही तिन्ही माध्यमं एकमेकांना पूरक आहेत. त्यांना एकमेकांपासून धोका नाही”, असं सचिनचं म्हणणं आहे. “वैचारिक पातळीवर मी लेखक आधी आहे. कुठलीही कथा सर्वात आधी लेखक बघतो, व्हिज्युअलाइज्ड करतो. दिग्दर्शक ती मांडतो. मी लेखक आणि दिग्दर्शक दोन्ही आहे. त्यामुळे माझ्या मनात लेखक-दिग्दर्शक असा संघर्ष होत नाही”, असंही तो म्हणतो. (Success Story of Sachin Darekar)
प्रभाव म्हणाल तर…
“वेगवेगळ्या वयात, वेगवेगळ्या टप्प्यात वेगवेगळी व्यक्तिमत्त्व आपल्याला खुणावत असतात. माझंही तसंच आहे. रणजित देसाई, नारायण धारप आदी लेखक, अभिनेता कमल हसन, काही शेड नसलेला साधा माणूस म्हणून भूमिका साकारणारा ऋषी कपूर, ‘तेजाब’, ‘रंग दे बसंती’सारखे वेगळ्या धाटणीचे चित्रपट लिहिणारे कमलेश पांडे, लेखक-पटकथाकार वसंत सबनीस, संवेदनशील दिग्दर्शक राजदत्त, दिग्दर्शक अनुभव सिन्हा, रॉबिन भट… प्रभाव पाडणारी अशी कितीतरी व्यक्तिमत्त्व आहेत. आपण जुन्यांना विसरत नाही, मात्र पुढच्या स्टेशनवर आणखी नव्या व्यक्ती तयार असतात”, असं सचिन सांगतो.
वेळ मिळेल तेव्हा भटकंती…
लिखाण, दिग्दर्शनाव्यतिरिक्त सचिनला जर काही आवडत असेल, तर ती आहे भटकंती. आपल्या देशातील शहरं, खेडी फिरून तिथली संस्कृती जाणून घेण्याची त्याला कमालीची आवड आहे. प्रांतानजीक सगळं काही बदलत जातं, मातीचा रंगही! मग आपल्याच देशातील या विविधतेचा आपण आनंद घ्यायला नको का, असा सवालही तो करतो. प्रसंगी पब्लिक ट्रान्स्पोर्टमधून फिरून तो माणसंही वाचतो.
=========
हे देखील वाचा – ‘ख्वाडा’ ते ‘वाय’… रसिका चव्हाणचा प्रेरणादायी प्रवास
=========
सध्या त्याचं एका हिंदी सिनेमाचं लिखाण सुरू आहे. वेबसीरिजचीही तयारी सुरु आहे. एका चांगल्या कलावंतानं, लेखकानं, दिग्दर्शकानं आधी एक चांगली, संवेदनशील व्यक्ती असावं लागतं. सचिन ते ‘पॅकेज’ आहे. पाय जमिनीवर असणारा, कमालीचा नम्र, इतरांचा आदर करणारा, ‘यारीसाठी कुछ भी’ म्हणणारा आणि सदैव ‘ॲक्शन’ मोडवर असणारा हा मनस्वी कलावंत आहे.