‘आई तुळजाभवानी’च्या पौराणिक गाथेत उलगडणार एक नवा अध्याय; चिंतामणी पाषाणाचा
अर्थव्यवस्था सुधारण्याचा थायलंडचा ‘फिल्मी’ मार्ग
कोरोना काळ सरल्यावर आता अर्थव्यवस्थेला पुन्हा सुस्थितीत आणण्यासाठी थायलंड सरकार वेगवेगळे उपाय योजतंय. फूड, फॅशन, थाई बॉक्सिंग अशा सर्व मार्गाने परदेशी चलन आपल्या देशात यावं यासाठी वेगवेगळे महोत्सव आयोजित केले जात आहेत. थायलंड सरकारला पर्यटनातून मोठा महसूल मिळत असतो, म्हणूनच परदेशी पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी विविध योजना आखल्या जात आहेत. पण यात आणखी एक ‘फिल्मी’ मार्गही आहे.
जगभरातील चित्रपट निर्मात्यांनी थायलंडमध्ये येऊन चित्रीकरण करावं यासाठी सरकारकडून जे सबसिडी धोरण ठरवण्यात आलं होतं, त्यात आता मोठे बदल करण्यात आले आहेत. जे परदेशी कलाकार/निर्माते थायलंडमध्ये चित्रीकरण करतील त्यांना त्यामधून मिळालेल्या उत्पन्नावर कोणताही कर आता थायलंडला द्यावा लागणार नाही.
२०१७ साली हे सबसिडी धोरण ठरवण्यात आलं होतं. त्यानुसार, परदेशी कलाकार/निर्माते यांना थायलंडमध्ये चित्रित झालेल्या चित्रपटाच्या कमाईतून काही हिस्सा हा थायलंड सरकारकडे कराच्या रूपात भरावा लागत होता, त्याचबरोबर मायदेशातही त्यांना त्याच उत्पन्नावर कर द्यावा लागत होता. पण आता थायलंड सरकारने करसवलतीचा दिलासा दिलेला आहे, आणि ही सवलत पुढील पाच वर्षांसाठी तरी राहणार आहे.
२०१७ पासून २०२१ पर्यंत दरवर्षी सरासरी १०० मिलियन डॉलर्स म्हणजेच जवळजवळ ८०० कोटी रुपयांचं उत्पन्न थायलंड सरकारला मिळत होतं. सबसिडी धोरणातील नवीन बदलांमुळे हे उत्पन्न आणखी वाढेल अशी त्यांना आशा आहे.
थायलंडमधले टूर ऑपरेटर्स गाजलेल्या चित्रपटांच्या लोकेशनवर पर्यटकांना घेऊन जातात. जेम्स बॉंड आयलंड असेल किंवा ‘द ब्रिज ऑन द रिव्हर क्वाय’ मधला पूल ही काही उदाहरणं. थायलंडमध्ये चित्रित झालेले जितके जास्त चित्रपट जगभरातील गाजतील त्या प्रमाणात या अशा रिअल लोकेशन टूर्सची संख्याही वाढेल आणि त्यातून अर्थात उत्पन्नही वाढेलच.
थायलंडमधील स्थानिक तंत्रज्ञांची मोठी फौज, विविधरंगी निसर्गसौंदर्य, शहरांमधील उत्तम सोयी-सुविधा अशा कारणांमुळे थायलंडमधील बँकॉक, क्राबी, पट्टाया असे प्रदेश हे पर्यटकांबरोबरच जगभरातील चित्रपटकर्मींनाही खुणावत असतात. हँगओव्हर पार्ट २, द बीच, नो एस्केप, द इम्पॉसिबल असे मोठमोठे चित्रपट यापूर्वी थायलंडमध्ये चित्रित झाले आहेत. आत्तासुद्धा स्टार वॉर फेम दिग्दर्शक गॅरेथ एडवर्ड्सच्या (Gareth Edwards) एका भव्य साय-फाय चित्रपटाचं चित्रीकरण थायलंडमध्ये सुरु आहे.
थायलंडमध्ये कोरोना काळातील निर्बंधही शिथिल झाले आहेत. २०२२ या वर्षात इथे पर्यटन उद्योगाने जोरदार कमबॅक केलंय. हॉटेल आणि रिसॉर्टमधील सोयी-सुविधा हळूहळू पूर्वपदावर येतायत. त्यामुळे आता पर्यटकांबरोबरच देशोदेशीचे निर्माते थायलंड कडे पुन्हा आपलं लक्ष वळवतायत.
पर्यटन आणि चित्रपट उद्योग यांच्या वाढीसाठी प्रोत्साहन देत असतानाच स्थानिक जनतेच्या मनाला उभारी देण्याचा प्रयत्नही सरकारकडून होतोय. कोरोना काळात भोगलेल्या असंख्य हालअपेष्टातून पोळलेल्या स्थानिक जनतेत नवा उत्साह यावा यासाठी थायलंड सरकारने महिनाभर चालणाऱ्या ओपन एअर फिल्म फेस्टिव्हलचं . (Bangkok Open Air Cinema) आयोजन केलंय. बँकॉकमधील चार मध्यवर्ती ठिकाणी साजऱ्या होणाऱ्या या अनोख्या चित्रपट महोत्सवात एकूण २५ चित्रपट दाखवले जाणार आहेत. दर गुरुवारी,शुक्रवारी आणि शनिवारी हे चित्रपट दाखवले जातील. स्थानिक असो वा परदेशी पर्यटक, सर्वाना मोफत प्रवेश हे या महोत्सवाचं वैशिष्टय आहे. अगदी १९६१ सालापासूनचे गाजलेले चित्रपट यात समाविष्ट करण्यात आले आहेत. (Bangkok Open Air Cinema)
खुल्या मैदानावर सर्वानी एकत्रितपणे चित्रपटाचा आस्वाद घेणं ही कल्पना स्थानिकांनाही आवडतेय हे ७ जुलै रोजी झालेल्या गर्दीवरून दिसून आलेलं आहे. मोफत प्रवेश आणि फिल्म स्क्रीनिंग सोबतच फास्ट फूडची चंगळ यामुळे पर्यटकही मोठ्या संख्येने इथे आकर्षित होतायत. फिल्म फ़ेस्टीव्हलबरोबरच गार्डन फेस्टिव्हल, बँकॉक मॅरेथॉन, आर्टस् अँड क्राफ्ट्स फेअर असे अनेक उपक्रम सरकार राबवतंय. (Bangkok Open Air Cinema)
=======
हे देखील वाचा – ‘बीटल्स’ का विभक्त झाले? ‘बीटल्स’मध्ये आलेल्या दुराव्याचा शोध घेणारी डॉक्यु-सिरीज
=======
केवळ महसूल वाढावा यासाठी नाही तर देशाचा हॅपीनेस इंडेक्सही काही प्रमाणात सुधारावा असंच तिथल्या सरकारला वाटतंय, आणि त्यासाठी चित्रपट हे प्रभावी माध्यमही (Bangkok Open Air Cinema) त्यांनी वापरलंय. जुलै महिन्यात बँकॉकला जाणार असाल, तर जनतेसाठी साजऱ्या होणाऱ्या अशा उत्सवांमध्ये जरूर सहभागी व्हा.