अर्चना जोगळेकरच्या बाबतीत घडला होता ‘हा’ दुर्दैवी प्रसंग
मराठी चित्रपटसृष्टीच्या ८० आणि ९०च्या दशकात सुप्रिया, वर्षा उसगावकर, निवेदिता जोशी, अश्विनी भावे, निशिगंधा वाड, किशोरी शहाणे या अभिनेत्री लोकप्रियतेच्या शिखरावर होत्या. या नायिकांसोबतच एक नाव आवर्जून घ्यायला हवं ते म्हणजे अर्चना जोगळेकर (Archana Joglekar). घारे बोलके डोळे, नृत्यनिपुणता, ५ फूट ६ इंच उंची, गोड चेहरा आणि सहजसुंदर अभिनयाने अल्पावधीतच लोकप्रिय झालेली ही नायिका ‘सध्या काय करते’ असा प्रश्न अनेकांना पडला असेल.
अर्चना जोगळेकर यांचा जन्म १ मार्च १९६५ रोजी झाला. त्यांची आई आशा जोगळेकर कथ्थक विशारद होत्या. बालपणापासूनच अर्चना यांनी आपल्या आईकडून कथ्थक शिकायला सुरुवात केली. पुढे त्यांनी कथ्थक आणि अभ्यास दोन्ही गोष्टींचा अगदी व्यवस्थित समतोल राखला. कथ्थक विशारद असणाऱ्या अर्चना यांनी कॉमर्समध्ये पदवी घेऊन नंतर कायद्याची पदवीही घेतली आहे.
शिक्षण पूर्ण झाल्यानंतर अर्चना (Archana Joglekar) यांनी कलाक्षेत्रात आपलं नशीब आजमावायचं ठरवलं. अर्थात या क्षेत्रात येण्यासाठी आवश्यक असणाऱ्या सर्व गोष्टी त्यांच्याकडे होत्या. ओडिसा चित्रपटातून कारकीर्द सुरू करणाऱ्या अर्चना ‘पान पसंद’च्या जाहिरातीमध्येही झळकल्या होत्या. इथूनच त्यांची खरी ओळख निर्माण झाली. या जाहिरातीमध्ये त्यांनी साकारलेली खट्याळ गोड मुलगी सर्वानाच आवडली. पुढे दूरदर्शनवरील ‘चुनौती’ या मालिकेमधून त्या घराघरात पोहोचल्या.
मराठी, हिंदी आणि ओडिसा भाषेतील अनेक चित्रपटांमध्ये त्यांनी काम केलं आहे. ‘निवडुंग’ या चित्रपटातील ‘तू तेव्हा तशी…” आणि ‘केव्हा तरी पहाटे उलटून रात्र गेली’ ही दोन्ही लोकप्रिय गाणी त्यांच्यावर चित्रित करण्यात आली होती.
मराठीमधील एकापेक्षा एक, अनपेक्षित, निवडुंग, तर हिंदीमध्ये संसार, बिल्लू बादशहा, आतंक ही आतंक अशा काही चित्रपटांमधील, तसंच चुनौती, कर्मभूमी, फुलवंती, चाहत और नफरत अशा मालिकांमधील त्यांच्या भूमिका लोकप्रिय झाल्या होत्या. यशाच्या शिखरावर असतानाच त्या लग्न करून अमेरिकेला निघून गेल्या. तिथेही त्या त्यांच्या कलेमुळे लोकप्रिय झाल्या आहेत.
अर्चना (Archana Joglekar) यांनी अमेरिकेला गेल्यावर त्यांच्या आईने मुंबईमध्ये सुरू केलेल्या अर्चना नृत्यालयाची शाखा तिकडे सुरू केली. २००९ साली न्यू जर्सी डेमोक्रॅटिक पार्टीतर्फे त्यांना कलाक्षेत्रात दिलेल्या योगदानासाठी सन्मानित करण्यात आले होते. २०१२ साली ‘मॅरीड टू अमेरिका’ या हिंदी चित्रपटात त्या शेवटच्या दिसल्या होत्या. त्यानंतर जणू त्यांनी मनोरंजनसृष्टीला रामराम ठोकला.
२०१४ साली आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त ‘मराठी विश्व न्यू जर्सी’ तर्फे अर्चनाजींना त्यांच्या सांस्कृतिक योगदानासाठी, तर त्याच वर्षी महाराष्ट्र दिनाच्या दिवशी भारताचे कॉन्सुल जनरल (न्यूयॉर्क) श्री ज्ञानेश्वर मुळ्ये यांनी, सांस्कृतिक क्षेत्रातील एक उत्कृष्ट मराठी व्यक्तिमत्व म्हणून त्यांना सन्मानित केलं होतं. त्यांना सुर श्रृंगार समसाद यांच्याकडून ‘श्रृंगार मनी’ आणि हिंदी साहित्य परिषदेकडून ‘नृत्य भारती’ पुरस्कारही मिळाला आहे.
अर्चनाजींना (Archana Joglekar) केवळ भारतातच नाही तर, देशाबाहेरही चाहत्यांकडून भरपूर प्रेम आणि आदर मिळाला. अर्थात लोकप्रिय कलाकारांना असं प्रेम आणि सन्मान नेहमीच मिळतो. परंतु काही वेळा मात्र या कलाकारांना त्यांच्या चाहत्यांमुळे मनस्तापही सहन करावा लागतो. अर्चनाजींवरही असाच एक कठीण प्रसंग ओढवला होता.
ही गोष्ट आहे ३० नोव्हेंबर १९९७ ची. एका ओडिसी चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान घडलेली. त्यावेळी अर्चनाची चित्रीकरणामुळे ओडिशामध्ये ‘पंथा निवास’ या ठिकाणी राहत होत्या. एक दिवस रात्री तिथे एक व्यक्ती सही घेण्याच्या बहाण्याने अर्चना यांच्या खोलीत शिरला आणि त्याने त्यांच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. पुढे डिसेंबर १९९७ रोजी त्या माणसाला पकडण्यात आले. त्याच्याविरुद्ध खटला भरवण्यात आला आणि एप्रिल २०१० साली त्याला १८ महिन्यांची कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली. ही केस तशी बरीच वर्ष चालली, पण अखेर अर्चना यांना न्याय मिळाला.
=======
हे देखील वाचा – अग्निहोत्र: अग्निहोत्राची परंपरा आणि त्यामागच्या रहस्याचा शोध घेणारी मालिका
=======
आयुष्यात घडलेले कटू प्रसंग विसरून अर्चना जोगळेकर (Archana Joglekar) यांनी स्वतःचं एक वेगळं विश्व निर्माण केलं. अमेरिकेमध्ये हजारो विद्यार्थ्यांना त्या ‘कथ्थक’ या भारतीय नृत्यप्रकाराचे धडे देत आहेत. भारतीय कलाक्षेत्रात त्यांचं योगदान खूप मोठं आहे. त्या सध्या काय करतात म्हणण्यापेक्षा, त्या सध्या एका भारतीय कलेला जगाच्या कानाकोपऱ्यात पोचवण्याचं काम करतायत, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.
– भाग्यश्री बर्वे