दिग्दर्शक सुभाष घई आणि गीतकार आनंद बक्षी यांचे जबरदस्त ट्युनिंग!
Tamasha Live Review – रंगतदार वृत्ताचा सामाजिक फड
‘चौथा खांब लोकशाहीचा, बळकट मोठा झाला,
आज त्यावरी रोज पडे हा, क्षणाक्षणाला घाला.
जसा वाढला व्याप देवा, सुरु जाहला ताप देवा,
‘जीवघेण्या स्पर्धेचा, लागला शाप देवा!’
हे सिनेमांच्या गाण्यातील शब्द सिनेमाचा मर्म सांगू पाहतात. संजय जाधव दिग्दर्शित ‘तमाशा लाईव्ह’ हा सिनेमा नेहमीच्या मराठी सिनेमांच्या चौकटीतील नाही. तो काहीसा वेगळा आहे. किंवा तो महाराष्ट्रातील लोकनाट्याचा विस्तीर्ण वाढलेल्या वडाच्या पारंब्यानी विणलेला एक रंगतदार तमाशाचा फड आहे. हा तमाशा म्हणजे? समाजात समाजातील काही घटकांनी मांडलेला स्वार्थाचा खेळ आहे. हा खेळ कधी भावनिक असतो, कधी हेवेदावे सांगणारा, तर कधी राजकारण करणारा.
आता तुम्हाला प्रश्न पडला असेल. हे असं ‘तमाशा लाईव्ह’.. असलं कसलं सिनेमांचं नाव. त्याचा नेमका अर्थ काय? पण, हा अर्थ समजून घेण्यासाठी तुम्हाला नक्कीच एकदा सिनेमा पाहायला हवा. हा सिनेमा अत्यंत प्रयोगशील आहे. त्यासाठी लेखक मंडळींचं आणि दिग्दर्शकाचं कौतुक आहे. पण, सिनेमा पूर्ण मनोरंजक आहे का? याचं उत्तर मात्र चर्चात्मक आहे. काहींना हा रंगलेला ‘तमाशा’ आवडेल; रंजक वाटेल तर काहींना तो तद्दन ‘तमाशा’ आणि काहीसा कंटाळवात देखील वाटू शकतो. पण, लेखक दिग्दर्शकाने सिनेमात रंगत आणण्याचा पूर्ण प्रयत्न केला आहे. (Tamasha Live Movie Review)
तमाशा हा गायन, वादन, नृत्य, विनोद आणि प्रबोधन यांनी युक्त असलेला लोकनाट्याचा एक आविष्कार. तमाशा हा शब्द मूळ अरबी असून, त्याचा अर्थ दृश्य, खेळ वा नाट्यप्रयोग असा होतो. महाराष्ट्राच्या लोकजीवनाशी एकरुप झालेला मनोरंजनाचा लोककला अविष्कार म्हणजे तमाशा. गीतकथा असं ही म्हणता येईल. हे सर्व फोड करून सांगण्याचं प्रयोजन म्हणजे याच लोककलेचा आधार घेत दिग्दर्शक संजय जाधव आणि गीतकार क्षितिज पटवर्धन यांनी हा ‘तमाशा लाईव्ह’चा अनोखा फड खुबीने रंगवला आहे.
वृत्तवाहिन्या आणि त्यांच्या पत्रकारिता यावर वर्मी बोट ठेवण्याचा प्रयत्न या सिनेमांच्या निमित्तानं लेखक दिग्दर्शकाने केला आहे. त्यासाठी नजीकच्या वर्षातील दोन महत्वाच्या घटनांचा कमी अधिक फरकाने आवश्यक बदल करून त्या ‘बातम्यांचा प्लॉट’ कथानकात समाविष्ट करण्यात आला आहे. आता या ‘सत्य’ बातम्या नेमक्या कोणत्या? हे तुम्हाला सिनेमा पाहिल्यावर जाणवेल. सिनेमात वृत्तवाहिन्यांच्या कार्यप्रणालीची महत्वपूर्ण स्पर्धात्मक बाजू मांडताना ती थेट ‘वास्तववादी’ न मांडता ‘बतावणी’ नाट्य रुपी मांडण्यात आली आहे. जे मी उपरोक्त ‘प्रयोगशील’ म्हंटल होतं; तो हाच प्रयोग. (Tamasha Live Movie Review)
सिनेमा या वृत्तवाहिन्यांवर भाष्य करतोयच; सोबतच तो राजकारणात देखील हात घालतो. कोण नेमका कोणाचा गुलाम आहे? कोणत्या कुलुपाच्या चाव्या कोणाच्या खिशात आहे? असा रंगतदार ‘सवाल-जवाब’ सिनेमात रंगलेला आपल्याला दिसतो. हा सर्व सिनेमाचा मामला उत्तम आहे. पण, सिनेमा काही ठिकाणी कमकुवत झालाय. पटकथेच्या मांडणीत सिनेमा तितकासा प्रभावी ठरलेला नाही. सिनेमाचा जीव असलेली सिनेमाची गाणी प्रासंगिक क्षणावर येतात त्याला पार्श्वसंगीताची देखील सुरेख जोड आहे. पण यासर्व घटकांना एकसाथ बांधणारी पटकथा ठिसाळ झाली आहे. परिणामी सिनेमा काही ठिकाणी; रटाळ होतो.
सिनेमांच्या कथानकाविषयी सांगायचं झाल्यास; उंच उच्चभ्रू इमारतीतून खाली पडून एका मुलीचं निधन होतं. आता ही आत्महत्या आहे? खून आहे की अपघात? याच प्रपंच्याभोवती सिनेमा फिरतो. या आत्महत्या? घात? अपघात? यांचा तर्कवितर्क लावून ही बातमी वृत्तवाहिनीवर रंगवली जाते. दोन वृत्तवाहिन्यांच्या वृत्तनिवेदकामध्ये आता चढाओढ निर्माण होते. ही स्पर्धा इतक्या थराला जाते की; त्या घटनेतील पिडीत मुलीच्या अब्रूची लक्तरे वेशीवर टांगली जातात. टीआरपीच्या या खेळात कुरघोड्यांवर कुरघोडी होतात. आणि दुसरीकडे यात राजकारणी आपली राजकीय पोळी देखील भाजून घेतात. यासगळ्यात खऱ्या पत्रकारितेचं प्रतिनिधित्व देखील जाणीवपूर्वक कथानकात लेखकाने ठेवले आहे. ती बाब मनाला समाधानी करते आणि दुसरीकडे पत्रकारितेतील स्वार्थाची हिंसा पाहून आपल्याला त्या विरुद्ध चीड देखील येते. (Tamasha Live Movie Review)
या सिनेमाचं सर्वात जमेची बाजू म्हणजे या सिनेमाचे संवाद. अरविंद जगतापच्या संवादांनी सिनेमाला एक प्रकारची उंची दिली आहे. आणि त्यांना पूरक असं बळ सिनेमातील गीतांनी दिलं आहे. क्षितिज पटवर्धन या गीतकाराने एकसोएक शब्दरचना करत मार्मिक सत्य मांडण्याचा प्रयत्न या सिनेमाच्या गीतांमध्ये केला आहे. अत्यंत प्रामाणिकपणे त्याने शब्द मनातून कागदावर आणि कागदावरुन सिनेमांच्या पटलावर उतरवले आहे. त्याला साजेचे संगीत देण्याचे सुरेल काम अमितराज आणि पंकज पडघन यांनी केलं आहे.
जनतेच्या पाठीवर, ढोलकीची थाप हाय!
पोचणाच्या पेटीतून, मनी मनी नाद हाय!
पब्लिकनं कधीचाच, बांधलेला चाल आहे,
कधी याचा कधी त्याचा, घेतलेला ताल हाय!
हे ‘फड लागलाय’ गाणं शब्दरूपी विशेष उजवे आहे तर ‘रंग लागला; हे सिनेमातील गाणं संगीत रुपी सुरेख आहे. सिनेमातील गाण्याच्या तालावर अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिने जो ठेका धरला आहे; तो लाजवाब आहे. तिचं नृत्यकौशल्य खरंच उत्कृष्ट आहे. साथीला आवश्यक अभिनय कौशल्याचं सादरीकरण देखील तिनं सिनेमात केलं आहे. अभिनेता सचित पाटील याने सिनेमात एका अनुभवी मुसद्दी नटासारखं काम केलं आहे. त्याची देहबोली आणि चेहऱ्यावरील हावभाव त्याच्या संवादांपेक्षा अधिक बोलके आहेत. आता सिनेमातील दोन महत्वाच्या पात्रांना विसरुन अजिबात चालणार नाही. ज्यांनी या रंगलेल्या फडाचं सूत्रसंचालन केलं आहे. अभिनेता सिद्धार्थ जाधव आणि हेमांगी कवी यांनी संपूर्ण सिनेमाभर अत्यंत धमाल-मस्ती केली आहे. त्यांनी सिनेमांच्या पटलावर घेतलेले विविधांगी सोंग मनोरंजक आहेत. विविध पैलू त्यांच्या या कामात आपल्याला दिसतात. सोबतच सिनेमातील नागेश भोसले, मृणाल देशपांडे, योगेश सोमण, पुष्कर जोग, आयुषी भावे, मनमित पेम, भरत जाधव, सुबोध घाडगे आदी सर्वच कलाकारांनी उत्तम काम केलं आहे. सर्वांनीच आपापल्या परीनं या फडात रंग भरण्याचे काम केले आहे. (Tamasha Live Movie Review)
=======
हे देखील वाचा – हेमांगी कवी: ‘चार आण्याच्या घटनेला आठ आण्याची प्रतिक्रिया’ अशी आजची परिस्थिती..
=======
हा एकदंरच रंगतदार आणि तितकाच सामाजिक संदेश देऊ पाहणारा ‘तमाशा लाईव्ह’ थेट सिनेमागृहात जाऊन ‘लाईव्ह’ नक्कीच बघायला हवा. एक प्रयोगशील सिनेमा म्हणून याकडे पाहायला हवं. सिनेमातील नाट्याचा आणि गाण्याचा आनंद आपण सुजाण प्रेक्षक म्हणून लुटायला हवा. आणि कलाकारांना त्यांची दाद द्यायला हवी. (Tamasha Live Movie Review)
सिनेमा : तमाशा लाईव्ह
निर्मिती : अक्षय बर्दापूरकर
दिग्दर्शक, पटकथा, छायांकन : संजय जाधव
लेखन : संजय जाधव, मनीष कदम, अरविंद जगताप
कलाकार : सिद्धार्थ जाधव, सोनाली कुलकर्णी, सचित पाटील, हेमांगी कवी
संगीत : अमितराज, पंकज पडघन
गीत : क्षितिज पटवर्धन
दर्जा : तीन स्टार