हॉलिवूड निर्मात्यांचा अखेर चीनला ‘दे धक्का’
याच सदरात काही दिवसांपूर्वी चीनमधील सेन्सॉरशिपचा हॉलिवूडला कसा सामना करावा लागतो हे आपण पाहिलं होतं. हॉंगकॉंगमधील निदर्शनं किंवा तैवानचं स्वातंत्र्य किंवा तिबेटींचं आंदोलन अशा गोष्टींचा अगदी ओझरता उल्लेख जरी असेल, तरी लगेच कात्री चालवली जाते किंवा मग निर्मात्यांना चित्रपटात बदल करावे लागतात, ही परिस्थिती होती, पण यामध्ये आता अचानक बदल झालेला आहे. चिनी सेन्सॉरशिपला भीक घालायची नाही असा पवित्रा हॉलिवूड निर्मात्यांनी घेतलेला दिसतोय. (Hollywood movies and China)
नुकताच प्रदर्शित झालेल्या ‘टॉप गन: मेव्हरीक’ चित्रपटाचं उदाहरण घेऊया. रेकॉर्डब्रेक कमाई करणारा हा चित्रपट चीनमध्ये प्रदर्शित झालेला नाही. कोविडपूर्व काळात ‘टॉप गन’चं टीझर आलं होतं. ज्यात टॉम क्रूझच्या बॉम्बर जॅकेटवर तैवानचा झेंडाही दिसत होता, त्यावेळी त्यात बदल करण्यात आले होते. तैवानच्या झेंड्यात दिसणारं लाल वर्तुळ काढून तिथे लाल त्रिकोण झळकला. पण कोविडोत्तर काळात जेव्हा ‘टॉप गन’ प्रदर्शित झाला तेव्हा त्यात ते दृश्य तसंच ठेवण्यात आलं.
तैवानला स्वतंत्र देश म्हणून मान्यता देण्यास चीन तयार नाही, त्यामुळे चीन आणि तैवानचे संबंध नाजूक आहेत. अशावेळी टॉम क्रूझच्या जॅकेटवर तैवानचा झेंडा बघणं चीनमधील जनतेला मान्य नाही. चीनमध्ये चित्रपट प्रदर्शित करायचा तर तेवढं एक दृश्य वगळावं लागणार, पण निर्माते ‘पॅरामाउंट स्टुडिओज’ यांनी चित्रपटात असा कोणताही बदल करायचा नाही अशी भूमिका घेतली. डिस्नीच्या ‘लाईटईअर’ या ॲनिमेशनपटातील समलिंगी चुंबनदृश्य वगळण्यात यावं असं चीनमधील अधिकाऱ्यांनी कळवलं. अखेर ‘हा चित्रपट चीनमध्ये प्रदर्शित होणार नाही’ असं डिस्नीकडून जाहीर करण्यात आलं. (Hollywood movies and China)
सोनी पिक्चर्सच्या ‘स्पायडरमॅन: नो वे होम’ या चित्रपटातील क्लायमॅक्सची हाणामारी काढून टाकावी अशी अजब मागणी चीन सेन्सॉरकडून करण्यात आली. जवळपास २० मिनिटांचा क्लायमॅक्स काढून टाकण्यास अर्थातच ‘सोनी’ ने नकार दिला. कम्युनिस्ट चिनी अधिकाऱ्यांचं असं म्हणणं होतं की, जगप्रसिद्ध ‘स्टॅच्यू ऑफ लिबर्टी’भोवती उभारण्यात आलेल्या लोखंडी परातींवर सगळी हिंसा सुरु असते, हा स्वातंत्र्य-समतेच्या पुतळ्याचा अवमान आहे. क्लायमॅक्समध्ये कोणताही बदल होणार नाही असं ‘सोनी पिक्चर्स’नी स्पष्टपणे सांगितल्यावर ‘क्लायमॅक्सचा कालावधी थोडा कमी करा’ अशी मागणी चीनने केली, पण त्यालाही ‘सोनी पिक्चर्स’ तयार नव्हतं. अखेर जगभरात प्रचंड कमाई केलेला ‘स्पायडरमॅन’ चीनमध्ये प्रदर्शित होऊ शकला नाही. (Hollywood movies and China)
वर्षभरात किती परदेशी चित्रपट प्रदर्शित होतील, याबद्दल चीनमध्ये सरकारी धोरण ठरलेलं आहे, ज्यात परिस्थितीनुसार बदल करण्यात येतात. २०१८ पर्यंत वर्षभरात ३० ते ४० हॉलिवूड चित्रपट प्रदर्शित होऊ शकत होते. पण कोविड काळात धोरण बदललं आणि ही संख्या २० वर आली.
चीनमधील अब्जावधी रुपयांचं बॉक्स ऑफिस हे हॉलिवूडमधील निर्मात्यांना नेहमी खुणावत आलेलं आहे. हीच अब्जावधी कमाई डोळ्यासमोर ठेवून हॉलिवूड निर्माते चीनमधील सेन्सॉरशिपसमोर आत्तापर्यंत झुकत होते, पण चीनमधील कमाईचं चित्र आता बदलू लागलंय. २०२० मध्ये जगभरात कोविडचा प्रकोप असताना चीनी बॉक्स ऑफिस हे सर्वात बलाढ्य ठरलं होतं, पण २०२२ मध्ये अमेरिकेतील बॉक्स ऑफिसने ३.६ अब्ज डॉलर्सची कमाई केली, तर याच काळात चिनी बॉक्स ऑफिसचा आकडा होता २.७ अब्ज डॉलर्स. (Hollywood movies and China)
चीनला वगळूनही अब्जावधी रुपयांची रेकॉर्डब्रेक कमाई करता येते हे ‘टॉप गन’ आणि स्पायडरमॅन या चित्रपटांनी दाखवून दिलेलं आहे. दुप्पट कमाईच्या नादात चीनमधील सेन्सॉरला खुश करायचं, चित्रपटात बदल करायचे आणि एवढं करून चीनमध्ये चित्रपट कमाई करेलच याची खात्री नाही, अशी सध्या अवस्था आहे. बरं, चीनच्या सांगण्यावरून चित्रपटात बदल केले, तर त्यावरून मायदेशात टीका आणि ट्रोलिंग सहन करावं लागतं आणि येणाऱ्या काळात हॉलिवूडला ते परवडणारं नाही. असं संकट ओढवून घेण्यापेक्षा चाललंय ते बरं आहे, असा हॉलिवूड निर्मात्यांनी विचार केला असावा.
=====
हे देखील वाचा – अर्थव्यवस्था सुधारण्याचा थायलंडचा ‘फिल्मी’ मार्ग
=====
आता तर अमेरिकेतील राजकारणातही याचे पडसाद उमटू लागले आहेत. हॉलीवूड निर्मात्यांनी चिनी सेन्सॉरशिपला बळी पडून चित्रपटात कोणतेही बदल करू नयेत, यासाठी एक ‘स्क्रीन ऍक्ट’ लागू व्हावा अशी मागणी अमेरिकेत व्हायला लागली आहे. निर्माता कोणताही असो, त्याच्यासाठी अर्थकारण हे सर्वात महत्त्वाचं असतं. उद्या चीनने धोरण बदललं तर हेच निर्माते पुन्हा चीनमध्ये जातीलही, पण सध्यातरी चीनवरून आपल्याच देशात वादंग नको आणि जे मिळतंय तेही हातचं जायला नको असा हिशोबी विचार हॉलिवूडने केलेला दिसतोय. (Hollywood movies and China)