भूपिंदर सिंग: गाण्यात रस नव्हता म्हणून गिटार शिकली आणि गिटारीनेच पुन्हा गायनाकडे नेलं…
घरातल्या संगीतमय वातावरणामुळे त्याला खरंतर संगीत अजिबात शिकायचं नव्हतं. म्हणूनच आवाज चांगला असूनही त्यानं गाणं सोडून दिलं आणि गिटार उचलली… सुदैवानं पुढे त्यानं आपली गायकी आणि गिटारीनं सगळ्यांना वेड लावलं. तो मुलगा म्हणजे स्वर्गीय गायक भूपिंदर सिंग (Bhupinder Singh).
अमृतसरमधे राहणारे नाथा सिंग स्वतः प्रसिद्ध संगीत शिक्षक होते आणि त्यांची मोठी मुलंही उत्तम वादक होती. संगीत त्यांच्या घरातल्या कणाकणात भरून राहिलेलं होतं, पण धाकट्या भूपिंदरला मात्र त्यात अजिबात रस नव्हता. वडिलांच्या धाकामुळे भूपिंदर गायकी शिकला खरी, पण त्यांच्या शिकवण्याची कडक पद्धत त्याला आवडायची नाही. त्याचा आवाज चांगला होता, पण घरातल्या संगीतमय वातावरणाचा त्याला कंटाळा यायचा. खरंतर त्यामागचं मुख्य कारण वेगळंच होतं.
घरात सगळेच संगीत क्षेत्रात असताना आपणही त्याच क्षेत्रात गेलो, तर आपल्याला कोणी विचारणार नाही अशी त्याची ठाम समजूत होती. म्हणून एके दिवशी त्यानं गायकी सोडून देत, चक्क गिटार उचलली! काहीतरी वेगळं करायचं या ईर्षेने भूपिंदर (Bhupinder Singh) त्याच्या हवाईयन गिटारवर मुद्दाम अवघड गाणी नाहीतर शास्त्रीय संगीत वाजवायला शिकला… पण याच गिटारनं त्यानं सोडून दिलेली गायकी त्याच्याकडे परत आणली.
सुरुवात दिग्गजांच्या साथीनं
गिटारीवर प्रभूत्व मिळवल्यानंतर भूपिंदर सिंग ऑल इंडिया रेडिओमध्ये संगीतकार सतीश भाटिया यांच्या मार्गदर्शनाखाली काम करायला लागले. भूपिंदर यांच्या आवाजातलं वेगळेपण लक्षात आल्यावर भाटिया यांनी त्यांना मदन मोहन यांच्याकडे पाठवलं. त्यांनाही भूपिंदर यांचा आवाज पसंत पडला आणि त्यांनी त्याला पहिलं गाणं दिलं हकीकत सिनेमातलं “मजबूर मुझे उसने भुलाया होगा…”
विशेष म्हणजे, या गाण्यात त्यांच्या साथीला होते, थेट महंमद रफी, मन्ना डे आणि तलद मेहमूद यांसारखी मोठी नावं. काळाच्या कसोटीवर खरं उतरलेलं हे गाणं आजही मास्टरपीस मानलं जातं. गायकीबरोबर हळूहळू इलेक्ट्रिक, हवाईयन आणि स्पॅनिश गिटारीवर असलेल्या त्यांच्या कौशल्याची कीर्ती इंडस्ट्रीत पसरली आणि त्यांचा समावेश झाला, तो तेव्हा प्रसिद्धीच्या शिखरावर असलेल्या आरडी बर्मन यांच्या टीममध्ये.
‘दम मारो दम’ गाण्याची आजही आयकॉनिक मानली जाणारी धून भूपिंदर (Bhupinder Singh) यांनीच तयार केली होती. या दरम्यान त्यांनी चिंगारी कोई भडके, चुरा लिया है तुमने, बीती ना बिताई रैना, कभी किसी को मुकम्मल जहां नही मिलता अशी अजरामर गाणी गायली… पण त्या काळात हिंदी सिनेमात वेगळंच स्थित्यंतर येत होतं. संगीतात गिटारीचं महत्त्व वाढलं होतं. त्यांना गायक म्हणून कमी आणि गिटारिस्ट म्हणून जास्त मागणी मिळायला लागली. त्यांनीही ते मान्य करत गिटारवर लक्ष केंद्रित केलं, पण दुसरीकडे गझलांवर आधारित खाजगी अल्बम्स काढायला सुरुवात केली. गझल संगीतात पहिल्यांदा त्यांनीच गिटार आणली असं म्हणतात.
क्लासिक आणि अविस्मरणीय
आजच्या हिंदी सिनेमा संगीतात वेगळ्या आवाजाला वाव मिळत असला, तरी भूपिंदर सिंग यांचा काळ निराळा होता. त्यांचा आवाज तेव्हाच्या हिरोला साजेसा मानला जायचा नाही. गिटारवरचं कौशल्य आणि वेगळ्या जातकुळीच्या आवाजामुळे त्यांची गायकी प्रचलित होईपर्यंत वेळ गेला. शिवाय तेव्हाच्या गाण्यांवर महमंद रफी, किशोर कुमार आणि मुकेश या त्रयीचं वर्चस्व होतं. मात्र, भूपिंदर यांना त्याची कधीच खंत वाटली नाही. उलट “आपला आवाज त्यांच्यासारखा नव्हता म्हणून मी टिकलो”, असं त्यांनी पुढे एका मुलाखतीत सांगितलं. पण त्यांच्या गायकीला न्याय मिळालाच.
त्या पुढच्या काळात त्यांनी गायलेली गाणी हिंदी सिनेमातल्या ५० सर्वोत्कृष्ट ‘क्लासिक्स’ची यादी करायची झाली, तर त्यात आघाडीवर असतील. भूपिंदर (Bhupinder Singh) यांचे मेंटॉर मदन मोहन यांनी त्यांना मौसम सिनेमात संजीव कुमारसाठी एकच गाणं दोन वेगळ्या मूडमध्ये गायला दिलं आणि ते गाणं होतं, ‘दिल धुंडता है फिर वही.’ मदन मोहन यांनी ते गाणं वेगवेगळे ताल वापरून आनंदी आणि दुःखी मूडमध्ये भूपिंदर यांच्याकडून गाऊन घेतलं आणि त्याची दोन्ही व्हर्जन्स सुपरहिट ठरली.
काही वर्षांत परत काळ बदलला आणि ७० च्या दशकातला सिनेमाचा हिरो ‘अँग्री यंग मॅन’ झाला. त्याच्या गायकीची गरज परत एकदा भूपिंदर यांच्या आवाजापेक्षा वेगळी होती… पण मारधाड करणाऱ्या हिरोंच्या गर्दीत सामान्य माणसाचं आयुष्य टिपणाऱ्या सिनेमात त्यांनी गायलेल्या ‘एक अकेला इस शहर में’ गाण्यात पुरेपूर उतरलेलं स्थलांतरिताचं दुःख रसिकांना भावलं आणि परत एकदा भूपिंदर यांच्या नावावर क्लासिक गाणं जमा झालं.
======
हे देखील वाचा – मराठी चित्रपट होतायत नायिकाप्रधान! ‘या’ लोकप्रिय नायिका साकारत आहेत जबरदस्त भूमिका…
======
गुलजार, ख्यायम, जयदेव, मदन मोहन यांच्या संगीत- काव्याला न्याय देणाऱ्या भूपिंदर (Bhupinder Singh) यांनी बाप्पी लाहिरी यांच्यासारख्या त्यांच्यापेक्षा वेगळ्या धाटणीच्या संगीतकाराबरोबरही दर्जेदार काम केलं. पुढे पत्नी मिताली यांच्या साथीनं गझलांचे बरेच खासगी अल्बम्स काढले आणि लाइव्ह कार्यक्रमांतून प्रेक्षकांना भरपूर आनंद दिला.
गेल्या काही महिन्यांत संगीत क्षेत्रातील अनेक दिग्गज कलाकारांच्या निधनाच्या बातम्या येत आहेत. अशातच काल भूपिंदर सिंग यांच्या निधनाची बातमी आली आणि अनेक संगीतप्रेमी हळहळले. भूपिंदर यांनी आपल्या कारकीर्दीत गायलेल्या गाण्यांची संख्या कदाचित त्यांच्या काळातल्या इतर गायकांच्या तुलनेत बरीच कमी असेल, पण त्यांनी गायलेली गाणी आणि त्यांचा आवाज चिरकाल टिकणारा आहे.
– कीर्ती परचुरे