‘आई तुळजाभवानी’च्या पौराणिक गाथेत उलगडणार एक नवा अध्याय; चिंतामणी पाषाणाचा
दिग्दर्शक जाफर पनाही यांच्या अटकेचा होतोय जगभरातून निषेध
जगप्रसिद्ध चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शक जाफर पनाही (Jafar Panahi) यांना इराणमधील तेहरानमध्ये ११ जुलै रोजी अटक झाली. एका आठवडाभरात अटक झालेले हे इराणमधील तिसरे दिग्दर्शक. जाफर पनाही यांच्याआधी महंमद रसूलोफ (Mohammad Rasoulof) आणि मुस्तफा आलेहमद (Mostafa Aleahmad) यांना अटक झाली होती. इराणमधील चित्रपट दिग्दर्शकांना तुरुंगात डांबण्याचं कारण काय, तर सरकारी दडपशाहीच्या विरोधात आवाज उठवणे!
२३ मे रोजी इराणमधील खुझस्तान भागात मेट्रोपोल ही १० मजली इमारत कोसळली आणि या दुर्घटनेत ४३ जणांना जीव गमवावा लागला. या दुर्घटनेनंतर मृतांच्या नातेवाईकांनी सरकारकडे मागणी लावून धरली की, या दुर्घटनेला जबाबदार असणाऱ्या भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांवर कडक कारवाई झालीच पाहिजे. आंदोलक रस्त्यावर उतरले, मग त्यांच्यावर अश्रूधुराचा मारा करण्यात आला. आंदोलकांची धरपकड करण्यात आली.
दिग्दर्शक महंमद रसूलोफ आणि इतर दिग्दर्शकांनी पत्रक काढून या सरकारी दडपशाहीचा निषेध केला. याच कारणामुळे रसूलोफ आणि आलेहमद यांना अटक करण्यात आली. ११ जुलै रोजी दिग्दर्शक जाफर पनाही हे रसूलोफ आणि आलेहमद यांची विचारपूस करण्यासाठी तुरुंगात गेले, तेव्हा तिथेच त्यांनाही ताब्यात घेण्यात आलं आणि त्यांना आता सहा वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली.
खरंतर, पनाही यांना जेव्हा २०१० मध्ये अटक झाली तेव्हाच सहा वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा जाहीर झाली होती, पण तेव्हा दोनच महिन्यात काही अटी आणि निर्बंध लादून त्यांना सोडून देण्यात आलं होतं. त्यावेळी राहिलेली शिक्षा पनाही यांनी आता पूर्ण करावी, असा आदेश तेथील न्यायालयाने दिला आहे.
२०१० साली जेव्हा त्यांना सोडण्यात आलं तेव्हा देश सोडण्यास आणि चित्रपटनिर्मिती करण्यास मनाई करण्यात आली होती. याच मुख्य अटींवर त्यांची सुटका झाली होती. पण तरीही जाफर पनाही यांनी ‘गनिमी काव्याने’ चित्रपट निर्मिती सुरूच ठेवली.
‘धिस इज नॉट अ फिल्म’, ‘क्लोज्ड कर्टन्स’ आणि ‘टॅक्सी’ हे अफलातून चित्रपट त्यांनी बनवले. विकिपीडिया वर या चित्रपटांची नोंद ‘बेकायदेशीर’ अशी करण्यात आलेली आहे. पण जगभरात या चित्रपटांचं प्रचंड कौतुक झालं. जाफर पनाही यांच्या फिल्ममेकिंगचे चाहते जगभर आहेतच, पण त्यांचे चित्रपट हा अभ्यासाचा विषय झालेला आहे.
२०१५ साली बनवलेल्या ‘टॅक्सी’ या चित्रपटाला बर्लिन फेस्टीव्हलमध्ये ‘गोल्डन बेअर’ पुरस्कार मिळाला होता. देशातून बाहेर पडण्यास मनाई असल्यामुळे पनाही यांना याकाळात एकाही फेस्टिव्हलला हजेरी लावता आली नाही. इराणमधलं वास्तव, तेथील समाजाची स्थिती, सरकारकडून सहन करावा लागणार अन्याय, तेथील विषमता, गरिबी असे विषय अतिशय प्रभावीपणे मांडणं, ही जाफर पनाही यांच्या फिल्ममेकिंगची खासियत आहे. आता अशा विषयांवर चित्रपट बनवल्यावर इराणमधलं सरकार त्यांच्यावर नाराज असणारच. म्हणूनच संधी मिळताच सरकारने सहा वर्षांसाठी पनाही यांना तुरुंगात डांबलेलं आहे. जाफर यांची पत्नी तहरीर सैदी यांनी ‘ही अटक नसून सरळ सरळ अपहरण आहे’ असा आरोपच इराण सरकारवर केलाय. (Jafar Panahi sent to prison to serve 6-year sentence)
जाफर पनाही यांच्या अटकेनंतर जगभरातून निषेध नोंदवण्यात येत आहे. कान फिल्म फेस्टीव्हल समिती आणि बर्लिन फेस्टीव्हल समिती यांनी जाफर पनाही यांच्या अटकेनंतर तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली आहे.
पनाही त्यांच्याआधी अटक झालेले रसूलोफ यांची यापूर्वी सरकारी अन्यायाचा सामना करावा लागला होता. २०१७ साली कान फेस्टीव्हलमध्ये दिग्दर्शक रसूलोफ यांच्या ‘अ मॅन ऑफ इंटेग्रिटी’ या चित्रपटाचं प्रीमिअर होतं, तेव्हा इराण सरकारने रसूलोफ यांचा पासपोर्ट जप्त केला होता. (Jafar Panahi sent to prison to serve 6-year sentence)
अमस्टरडॅममधील ‘इंटरनॅशनल कोएलिशन फॉर फिल्ममेकर्स ॲट रिस्क (ICFR)’ या संघटनेने जगभरातील चित्रपटकर्मीना आवाहन केलं आहे की, कलाक्षेत्राचा आवाज दडपण्याचा जो प्रकार इराणमध्ये सुरु आहे त्याविरुद्ध एकत्र येऊन आवाज उठवूया.
========
हे देखील वाचा – हॉलिवूड निर्मात्यांचा अखेर चीनला ‘दे धक्का’
========
इराणमध्ये आर्थिक संकट गडद होत चाललेलं आहे. तेथील चलन रियालचा दर घसरत चाललाय. महागाई, बलाढ्य देशांनी घातलेले निर्बंध, रशिया-युक्रेन युद्ध आणि कोरोना या कारणांमुळे जनतेमध्ये असंतोष वाढतोय. मे महिन्यापासून ४० शहरांमध्ये मोठ्या प्रमाणावर सरकारविरोशी निदर्शनं सुरु आहेत. बिकट आर्थिक परिस्थितीचा सामना करण्याऐवजी टीकाकारांची तोंडं बंद करणं, यावरच सरकारचा भर आहे. आणि या जुलमी व्यवस्थेचा बळी ठरलेला जाफर पनाही सारखा दिग्दर्शक आता आंदोलनाचा चेहरा बनलेला आहे.