दिग्दर्शक सुभाष घई आणि गीतकार आनंद बक्षी यांचे जबरदस्त ट्युनिंग!
ओंकारा: लंगडा त्यागीची भूमिका आमिरला डावलून सैफला का दिली?
तीन मोठे स्टार, तीन लोकप्रिय नायिका, राजकारण, हाणामारी, प्रेम, रोमान्स, संगीत अशा साऱ्या गोष्टी एकाच चित्रपटात जुळून आल्या होत्या. या चित्रपटाचं नाव होतं ओंकारा! २००६ साली आलेला हा चित्रपट ब्लॉकबस्टर तर ठरलाच शिवाय या चित्रपटाने सैफ अली खानला एक प्रगल्भ अभिनेता म्हणून ओळखही मिळवून दिली. (Omkara)
ओंकारा हा चित्रपट विल्यम शेक्सपियरच्या ‘ऑथेलो’ या कथेवर आधारित होता. अर्थात या कथानकाला उत्तर प्रदेशातील हिंसाचार, राजकारण आणि बाहुबली अशा अनेक गोष्टींमध्ये रूपांतरित करून अभिषेक चौबे, रोहित भट आणि विशाल भारद्वाज या लेखकांनी कथेला खास ‘भारतीय टच’ दिला.
गुन्हेगारी जगतामधील वातावरणावर आधारित या चित्रपटात ओंकारा किंवा ओमी हा गुन्हेगारांचा ‘सरदार’ असतो. याच टोळीतील ‘लंगडा त्यागी’ बाहुबली न झाल्यामुळे नाराज झालेला असतो. त्यात ओमी केसूला त्याचा चीफ लेफ्टनंट म्हणून नियुक्त करतो. त्यामुळे लंगडा त्यागीला हा अपमान चांगलाच झोंबतो. याच कारणामुळे ओमी आणि केसूबद्दल लंगडा त्यागीच्या मनात प्रचंड राग निर्माण होतो. ओमी आणि केसूला मारून स्वतः बाहुबली म्हणजेच सरदार बनण्याची योजना तो आखत असतो. यासाठी तो अशी खेळी खेळायची ठरवतो की, ओमी स्वतःहून केसूला संपवून स्वतःलाच दुबळं करेल आणि मग त्याला संपवणं सोपं जाईल. पण हे अर्थातच सोपं नसतं.
सत्ता, राजकारण, नाती, प्रेम, संशय, विरह या साऱ्या गोष्टींभोवती हा चित्रपट फिरत राहतो. चित्रपटात अजय देवगण (ओंकारा), सैफ अली खान (लंगडा त्यागी) आणि विवेक ओबेरॉय (केसू) या तिघांच्याही भूमिका जबरदस्त झाल्या आहेत. यांच्या जोडीला चित्रपटात करीना कपूर, कोंकणा सेन शर्मा आणि बिपाशा बासू, नसरुद्दीन शहा महत्त्वपूर्ण भूमिकेत आहेत. नायिकांमध्ये नि:संशयपणे कोंकणा सेन शर्माने करीनाला मात दिली आहे. बिपाशाला तसाही फारसा वाव नव्हता. पण तिचं ‘बीड़ी जलइले जिगर से पिया’ हे गाणं मात्र प्रचंड हिट झालं होतं. या चित्रपटात हिंदी भाषेपेक्षा जास्त ‘खारीबोली’ भाषेतले संवाद आहेत. (Omkara)
या चित्रपटाचा समावेश ‘कैरो इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल’मध्ये करण्यात आला होता. त्यावेळी विशाल भारद्वाज यांना या सर्वोत्कृष्ट कलात्मक योगदानासाठी पुरस्कार देण्यात आला. या चित्रपटाने कारा फिल्म फेस्टिव्हलमध्ये ३ पुरस्कार, एशियन फेस्टिव्हल ऑफ फर्स्ट फिल्म्समध्ये १ पुरस्कार, ३ राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार आणि ९ फिल्मफेअर पुरस्कार जिंकले आहेत. २८ जुलैला या चित्रपटाला १६ वर्ष पूर्ण होतील. हा चित्रपट त्यावर्षीचा सुपरहिट चित्रपट ठरला होता. या सुपरहिट चित्रपटाच्या मेकिंगबद्दल थोडंसं –
विशाल भारद्वाज आणि आमिर खानमध्ये झाले होते मतभेद
ओंकारा चित्रपटातील लंगडा त्यागीची भूमिका प्रचंड हिट झाली. या भूमिकेसाठी दिग्दर्शक विशाल भारद्वाज यांनी आमिर खानची निवड केली होती. आमिर ही भूमिका करायला तयारही झाला होता, परंतु अचानक विशाल यांनी सैफ अली खानला साइन केलं. आमिर या चित्रपटाच्या निर्मितीसाठीही उत्सुक होता. परंतु पुढे सगळंच फिस्कटलं. या साऱ्यामुळे आमिर आणि विशाल दोघांमध्ये गैरसमज झाले होते. पण नंतर मात्र दोघांमध्ये सगळं ठीक ठाक झालं. (Omkara)
केसूच्या भूमिकेसाठी इरफान खान होता पहिली पसंती
केसूची भूमिका आधी इरफान खान यांना ऑफर करण्यात आली होती. परंतु तारखांच्या अनुपलब्धतेमुळे त्यांनी नकार दिला आणि ती भूमिका विवेक ओबेरॉयला मिळाली.
शीर्षक ठरवले गेले स्पर्धेद्वारे
चित्रपटाचे शीर्षक ठरवण्यासाठी सिनेरसिकांमध्ये स्पर्धा घेण्यात आली होती. ही स्पर्धा सर्वांसाठी खुली होती. या स्पर्धेतून तीन शीर्षकांची निवड करण्यात आली – ‘ओंकारा’, ‘ओ साथी रे’ आणि ‘इसक’. त्यांनतर यामधून योग्य शीर्षक निवडण्यासाठी एसएमएसद्वारे वोट अपील करण्यात आलं आणि त्यामध्ये ‘ओंकारा’ या नावाला भरभरून मतं मिळाली आणि चित्रपटाचं नाव ‘ओंकारा’ निश्चित करण्यात आलं.
ओम पुरी किंवा अनुपम खेर दिसू शकले असते चित्रपटात
भाईसाबच्या भूमिकेसाठी आधी ओम पुरी आणि अनुपम खेर या दोघांचाही विचार करण्यात आला होता. परंतु नंतर ती भूमिका नसीरुद्दीन शाह यांना देण्यात आली. (Omkara)
मनोज वाजपेयीला साकारायचा होता लंगडा त्यागी
मनोज वाजपेयीला लंगडा त्यागीची भूमिका करायची होती, पण निर्मात्यांनी नकार दिल्यामुळे विशाल यांनी ही भूमिका सैफला दिली.
==========
हे देखील वाचा – सुप्रसिद्ध गायक मुकेश यांनी एका टांगेवाल्यासाठी गायली गाणी कारण..
==========
‘ओंकारा’ हा चित्रपट अमेझॉन प्राईम, झी 5 वर आणि जिओ सिनेमावरही उपलब्ध आहे. IMDB वर या चित्रपटाला ८.१ रेटिंग देण्यात आलं आहे.