मीना कुमारी: बॉलिवूडच्या ट्रॅजिडी क्वीनची एक सुखद आठवण
बॉलिवूडची ट्रॅजिडी क्वीन म्हणून जिचा उल्लेख केला जातो अशी गोड चेहऱ्याची नायिका म्हणजे मीना कुमारी (Meena Kumari). मीना कुमारीच्या चित्रपटातील भूमिकांपेक्षा जास्त दुःख तिने तिच्या वैयक्तिक आयुष्यात भोगलं आहे. खऱ्या प्रेमाच्या शोधात ती आयुष्यभर मृगजळामागे धावत राहिली. पण तिच्या पदरी नेहमी निराशाच आली.
मीना कुमारीची चित्रपटसृष्टीतील कारकीर्द लहान वयातच सुरु झाली. तिचं खरं नाव मेहजबीन. बालवयात जेव्हा मुलं घरच्या अंगणात बागडत असतात तेव्हा मीना कुमारी घरची गरिबी मिटवण्यासाठी कष्ट करत होती. या चित्रपटसृष्टीत ती बालवयात लोकप्रिय झाली ती ‘बेबी मीना’ या नावाने. पुढे वाढत्या वयाबरोबर सौंदर्यही बहरत गेलं आणि तिला मुख्य नायिकेच्या भूमिका मिळू लागल्या.
तिचं सौंदर्य आणि तिचा अभिनय या दोन्ही गोष्टी प्रेक्षकांना चित्रपटगृहाकडे खेचून आणत. पडद्यावरचं तिचं दुःख पाहून कित्येकांच्या डोळ्यातून आपसूकच आसवं ओघळत. मीना कुमारीचे असंख्य चाहते होते. पण मिळालेल्या यशाने ती कधी हुरळून गेली नाही. कित्येक नावेदित कलाकारांसोबत काम करताना तिने कधीही ‘स्टारडम’ दाखवला नाही. उलट त्यांची कारकीर्द घडवायला मदतच केली. (Memories of Meena Kumari)
मीना कुमारी म्हटलं की, नेहमी तिच्या वैयक्तिक आयुष्यात तिने भोगलेल्या दुःखाचीच चर्चा जास्त होते. पण आज या सौंदर्यवतीचा जन्मदिवस. किमान आजच्या दिवशी तरी तिच्या दुःखाबद्दल नको लिहायला. म्हणूनच तिच्या आयुष्यातली एक आगळीवेगळी घटना इथे आवर्जून नमूद केली आहे.
प्रसिद्ध पत्रकार विनोद मेहता यांनी लिहिलेल्या पुस्तकातही मीना कुमारीच्या आयुष्यातल्या अनेक घटनांचा उल्लेख आहे. हे पुस्तक लिहिण्याची प्रेरणा होते, सलग १० वर्ष मीना कुमारीचा मेकअप करणारा मेकअप आर्टिस्ट. हा कलाकार तिच्या आयुष्यातल्या ट्रॅजिडीवरचे लेख वाचून अस्वस्थ झाला व त्याने विनोद मेहतांना विनंती केली की, तिच्या आयुष्यात अनेक चांगल्या घटना घडल्या आहेत. त्याही लोकांपर्यंत पोचायला हव्यात. तिची दुसरी बाजूही लोकांना समजू दे. याच पुस्तकातला एक किस्सा-
हा किस्सा आहे पाकिजाच्या चित्रीकरणादरम्यान घडलेला. त्यावेळी या चित्रपटाचं चित्रीकरण मध्यप्रदेशमध्ये चालू होतं. चित्रीकरण संपवून परत येत असताना गाडीमधलं पेट्रोल संपलं. दुसरी गाडी मागून येत होती. त्यामुळे तसं काळजीचं कारण नव्हतं. पण रात्रीची वेळ आणि घनदाट झाडीतला निर्जन रस्ता ..तरीही पुढे किती अंतरावर पेट्रोल मिळेल याची कल्पना नसल्यामुळे सर्वानी गाडीतच रात्र काढायचा निर्णय घेतला. (Memories of Meena Kumari)
दिवसभराच्या चित्रीकरणामुळे सर्व कलाकार थकलेले होते. त्यामुळे गाडीतही त्यांना गाढ झोप लागली. मात्र काही वेळाने एका गाडीला चहूबाजूंनी बुरखाधारी दरोडेखोरांनी वेढा घातला. त्यांच्या आवाजामुळे गाडीतले सर्वजण जागे झाले. त्यांना पाहून कमल अमरोही गाडीतून बाहेर आले आणि त्यांनी दरोडेखोरांच्या म्होरक्याशी संवाद साधायचा प्रयत्न केला.
या म्होरक्याचं नाव होतं अमृतलाल. तो अत्यंत खुनशी चेहऱ्याचा. त्यामुळे कमल अमरोही त्याच्याशी सावधपणे बोलत होते. बोलताना त्यांनी जेव्हा आम्ही ‘शूटिंगसाठी’ आलो होतो, असं सांगितलं तेव्हा मात्र दरोडेखोरांचा गैरसमज झाला. ‘शूटिंग’ म्हणजे ही पोलिसांची माणसं आहेत आणि आपल्यालाच पकडायला आली आहेत, असं समजून त्यांनी गाडीला पुन्हा घेरलं. कमल अमरोही यांना झालेला समजुतीचा घोळ लगेच लक्षात आला आणि त्यांनी शुटिंग म्हणजे चित्रपटाचं शूटिंग हे त्यांना पटवून दिलं.
चित्रपटाचं शूटिंग म्हटल्यावर दरोडेखोरांच्या मनातल्या रागाची जाग उत्सुकतेनं घेतली आणि त्यांनी चित्रपटाविषयी चौकशी केली. दुसऱ्या गाडीत प्रसिद्ध अभिनेत्री मीना कुमारी आहे, हे समजल्यावर तर त्यांना प्रचंड आनंद झाला. अमृतलालच्या खुनशी चेहऱ्यावरही हसू उमटलं कारण तो मीना कुमारीचा खूप मोठा चाहता होता. मग काय, दरोडेखोरांनी सर्व टीमला सन्मानाने त्यांच्या अड्ड्यावर नेलं. तिथं त्यांचं जेवण आणि झोपेची चोख व्यवस्था केली आणि त्यांना कोणताही त्रास होणार नाही याची सर्वोतपरी काळजी घेतली. (Memories of Meena Kumari)
दुसऱ्या दिवशी सकाळी निघायच्या वेळी त्यांची गाडी पेट्रोल भरून तयार होती. त्यांचं ते अगत्य पाहून सर्वांचंच मन भरून आलं. पण निघताना अमृतलालने मीना कुमारीची स्वाक्षरी मागितली…ती ही हातावर…रक्ताने लिहिलेली.
मीना कुमारीच्या हातात चाकू देऊन अमृतलालने आपला हात तिच्यासमोर धरला. तिची हिम्मत होत नव्हती. पण सही केल्याशिवाय इथून जाऊ देणार नाही असं अमृतलालने ठामपणे सांगितल्यामुळे तिचा नाईलाज झाला आणि तिने थरथरत्या हाताने चाकू हातात घेऊन त्याच्या हातावर सही केली. त्याचा रक्तबंबाळ हात पाहून मीना कुमारी घाबरली, पण अमृतलालच्या चेहऱ्यावर मात्र आनंद स्पष्ट दिसत होता.
==========
हे ही वाचा: जेव्हा उमेश कामतला एक ‘नॉन मराठी मुलगा’ पोलिओग्रस्त समजला…
मालगुडी डेज: मालिकेची आठवण म्हणून चक्क रेल्वे स्टेशन बदललं म्युझिअममध्ये!
==========
उणंपुरं अवघं ३९ वर्षांचं आयुष्य. पण त्या आयुष्यात किती आणि काय काय घडून गेलं. यामुळेच कित्येक लेखकांनी तिच्यावर लेखन केलं. सिनेपत्रकार बनी रुबेन (Bunny Reuben) यांनी त्यांच्या Follywood Flashback” या पुस्तकामध्ये मीनाकुमारीवर लिहिलेल्या लेखाचं शीर्षकच मीना कुमारी – वेदना आणि परमानंद (Meena kumari – Agony and Ecstasy) असं दिलं आहे. परंतु या लेखामध्ये मीना कुमारीच्या आयुष्याची दर्दभरी कहाणी नाही तर, त्या काळातल्या काही आठवणी त्यांनी लिहिल्या आहेत. (Memories of Meena Kumari)
या शापित राजकुमारीने पुढे ३१ मार्च १९७२ रोजी सेंट एलिझाबेथ नर्सिंग होम मध्ये अखेरचा श्वास घेतला. तिच्या मृत्यूबद्दल लिहिताना बनी यांनी लिहिलं आहे मीना कुमारीच्या मृत्यूचं खरं कारण ‘Cirrhosis of Liver’ नाही तर, ‘cirrhosis of emmotions’ हे आहे.
– भाग्यश्री बर्वे