दिग्दर्शक सुभाष घई आणि गीतकार आनंद बक्षी यांचे जबरदस्त ट्युनिंग!
काजोल: गौतम राजाध्यक्षांचं ‘कुरूप वेडे पिल्लू’
“ती पाहताच बाला..” असं तिच्याबद्दल कोणी म्हणणार नाही. इतकंच काय तर कारकिर्दीच्या सुरुवातीला अशी काळी, काहीशी स्थूल मुलगी अभिनेत्री? त्यातही हिंदी चित्रपटामधली अभिनेत्री? निव्वळ बॉलिवूडमधल्या अभिनेत्रीची मुलगी म्हणून तिला संधी मिळतेय … ही मुलगी काही फार काळ टिकणार नाही… अनेकांनी तिच्यावर अशी वेगवेगळी टीका केली. तिचा पहिला चित्रपटही फ्लॉप गेला, पण त्यानंतर आलेल्या बाजीगरमध्ये मात्र तिने आपण ‘लंबी रेस का घोडा’ आहोत, हे सिद्ध करून दाखवलं. ती अभिनेत्री कोण हे वेगळं सांगायची गरज नाही. ती आहे बोलक्या डोळ्यांची काजोल (Kajol).
सुप्रसिद्ध छायाचित्रकार गौतम राजाध्यक्ष तिला आपली मानस कन्या मानत असत. प्रचंड लाडकी होती ती त्यांची. एकदा त्यांनी तिचा उल्लेख ‘कुरूप वेडे पिल्लू’ असा केला होता आणि खरंच सुरुवातीला ‘कुरुप वेडे पिल्लू’ वाटणारी ही अभिनेत्री प्रत्यक्षात मात्र ‘राजहंस’ होती.
आई -वडील, आजी, मावशी, काका,… सर्वच चित्रपटसृष्टीतील प्रस्थापित मंडळी. घरात पूर्ण फिल्मी वातावरण. अशातच तिला ‘बेखुदी’ चित्रपटाची संधी मिळाली. हा चित्रपट आला तेव्हा ती खरंच ‘कुरूप वेडे पिल्लू’ होती. अवघे १६/१७ वर्षांचे वय, गाठीशी फारसा अनुभव नाही. शिक्षणही सुरु होतं. हा चित्रपट पूर्ण झाल्यावर ती शिक्षण पूर्ण करणार होती. पण तिला बाजीगरची ऑफर आली आणि ती बॉलिवूडमध्येच रमली.
बाजीगर नंतर ये दिल्लगी, करन -अर्जुन, दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे असे एकापेक्षा एक हिट चित्रपट तिच्या नावावर जमा झाले. ‘दिलवाले दुल्हनिया…’ चित्रपटात तिने साकारलेली ‘सिमरन’ तर लोकांना प्रचंड आवडली. पण तिच्या सरस अभिनयाचं खरं दर्शन घडलं ते ‘गुप्त’ या चित्रपटामध्ये. या चित्रपटात तिने कमालीचा अभिनय केला आहे. यानंतर आलेल्या दुश्मन, कुछ कुछ होता है, हम आपके दिल मे रहते है, अशा अनेक चित्रपटांमधून तिने स्वतःला प्रगल्भ अभिनेत्री म्हणून सिद्ध केलं.
काजोलने इश्क, कभी ख़ुशी कभी गम सारखे मल्टी स्टारर चित्रपटही केले. या चित्रपटांमध्येही तिने समरसून अभिनय केला. काजोल (Kajol) आवडत नाही कारण ती चांगली दिसत नाही, ती काळी सावळी आहे, तिला झिरो फिगर नाही, ती आकर्षक नाही, असं कदाचित कोणी म्हणू शकेल. पण काजोल आवडत नाही कारण तिचा अभिनय खास नाही किंवा अमुक एका चित्रपटात तिने बकवास अभिनय केलाय, असं कोणीही म्हणू शकत नाही. कारण भूमिका कोणतीही असू काजोलने नेहमीच त्या भूमिकेला न्याय देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे.
बॉलिवूडच्या नायिकांच्या अफेअर्सची गॉसिप्स चित्रपटसृष्टी आणि मीडियामध्ये चवीने चघळली जातात. पण काजोल (Kajol).यापासून शक्य तितकं लांब राहिली. तिच्या आणि अजय देवगणच्या अफेअर्सची चर्चा रंगली पण अल्पावधीतच दोघं विवाहबंधनात अडकली. अगदी वेळेवर तिने आपलं वैवाहिक आयुष्य सुरु केलं. वैवाहिक आयुष्य सुरु करण्यापूर्वी काजोलची एकच इच्छा होती की, तिच्या आणि अजयच्या जोडीला लोकांनी ऑनस्क्रीनही स्वीकारावं.
त्या काळात शाहरुख – काजोल ही बॉलिवूडमधली सुपरहिट जोडी होती. त्यांची ऑनस्क्रीन केमिस्ट्रीही भन्नाट होती. शाहरुख सोडून इतर कोणत्याही अभिनेत्यासोबत तिची जोडी विशेष जमली नाही. अजय देवगण बरोबर तिने केलेले बरेचसे चित्रपट फ्लॉप गेले होते. (इश्क हिट झाला होता, पण तो मल्टीस्टारर होता.) त्यामुळे काजोल (Kajol) काहीशी नाराज होती. अशातच ‘प्यार तो होना हि था’ हिट झाला आणि काजोल सुखावली. चित्रपटाच्या यशापेक्षा जास्त आनंद तिला प्रेक्षकांनी त्यांची जोडी स्वीकारली या गोष्टीचा झाला. त्यावेळी हा चित्रपट हिट व्हावा म्हणून काजोलने नवस बोलल्याच्या चर्चाही रंगल्या होत्या. केवढा हा निरागस वेडेपणा! बॉलिवूडची सुप्रसिद्ध नंबर १ ची अभिनेत्री आपल्या होणाऱ्या पतीसोबतची ऑनस्क्रीन जोडीही प्रेक्षकांनी स्वीकारावी म्हणून इतके प्रयत्न क्वचितच कोणी केले असतील. अर्थात तोपर्यंत या कुरूप वेड्या पिल्लाचं राजहंसामध्ये रूपांतर झालं होतं. वैवाहिक आयुष्यात स्थिरस्थावर झाल्यावर तिने आपली फिल्मी कारकीर्द पुन्हा सुरु केली. पण आपला संसार सांभाळून!
काजोल (Kajol) प्रचंड हुशार आहे. तिचं वाचन, इंग्रजी भाषेवरील प्रभुत्व तसंच व्यावसायिक व वैयक्तिक आयुष्य वेगळं ठेवण्याचा तिचा स्वभाव कौतुकास्पद आहे. अजय देवगण आणि शाहरुख या दोघांचं फारसं पटत नव्हतं. पण लग्नानंतरही काजोलने शाहरुखसोबत चित्रपट केले. तिची आणि शाहरुख मैत्री, व्यावसायिक संबंध या गोष्टींनी ना तिच्या वैयक्तिक आयुष्यावर परिणाम झाला ना तिच्या लग्नामुळे या गोष्टी बदलल्या.
=============
हे देखील वाचा – ‘या’ गोष्टीमुळे काजोलने केले होते आईसोबत भांडण; दोन आठवडे धरला होता अबोला..
=============
‘काजोल आणि कॉट्रोव्हर्सी’ या शब्दांचा तसा एकमेकांशी फारसा संबंध नाही. पण काजोल (Kajol) भडक डोक्याची, फटकळ आणि जजमेंटल असल्याच्या चर्चा इंडस्ट्रीमध्ये चांगल्याच रंगतात. तिच्या हजरजबाबीपणापेक्षा तिच्या फटकळ वागण्याचे किस्से विशेष प्रसिद्ध आहेत. असो. ती कशीही असली तरी एक उत्तम अभिनेत्री आहे. ती स्वप्नसुंदरी नाही, तरीही बॉलिवूडचं एक दशक तिने आपल्या अभिनयाच्या जोरावर गाजवलं आहे. आणि ही निश्चितच साधी गोष्ट नाही.
– भाग्यश्री बर्वे