दिग्दर्शक सुभाष घई आणि गीतकार आनंद बक्षी यांचे जबरदस्त ट्युनिंग!
सामाजिक जाण असलेली संवेदनशील कलावंत ‘घाडगे अँड सून’ फेम रिचा अग्निहोत्री
रिचा डोळे विस्फारून मुंबईची फिल्मसिटी पाहात होती. या मायानगरीनं तिला भुरळ घातली होती. त्यातही तिचं नशीब, तिथं महानायक अमिताभ बच्चन यांचं शूटिंग सुरू होतं. ते बघायला लोकांनी वेड्यासारखी गर्दी केली होती. त्यात छोटी रिचाही सामील होती. महानायकाला अगदी जवळून पाहण्याची संधी तिला मिळाली होती. त्यांची काम करण्याची पद्धत, कामाविषयीची निष्ठा, कमालीची नम्रता, तेजस्वी व्यक्तिमत्त्व पाहून ती भारावली. (Success journey of Richa Agnihotri)
आपणही अमिताभ यांच्यासारखंच बनायचं, माझ्या नावानं माझे नातेवाईक ओळखले जावेत, त्यांना माझा अभिमान वाटावा, असं काहीतरी करायचं, या महत्त्वाकांक्षेनं तिच्या मनात मूळ धरलं होतं. स्वप्नं नुसती पाहून चालत नाहीत, तर ती पूर्ण करण्याची जिद्द अन् साथीला गुण अंगी असावे लागतात. रिचानं कठोर मेहनतीनं ते साधलं. आज ती तिच्या क्षेत्रात यशस्वी वाटचाल करत आहे.
नृत्य, फॅशन, गाणं, अभिनय अशा कितीतरी गुणांचं पॅकेज असलेली प्रतिभावान कलावंत म्हणजे रिचा अग्निहोत्री. नृत्य अन् फॅशनमध्ये तिचा दबदबा आहे. ‘घाडगे अँड सून’सारखी मालिका तिनं गाजविली आहे. कित्येक जाहिरातींतून ती झळकली आहे. एक चांगली कलाकार असण्यासोबतच सामाजिक कळकळ असलेली ती एक उत्तम व्यक्ती आहे. कमालीची नम्र आणि जमिनीवर असलेल्या रिचाचा प्रवास रोचक अन् प्रेरणादायी असाच आहे.
तिची आई वैष्णवी अग्निहोत्री नावाजलेल्या शास्त्रीय नृत्यांगना. कथक आणि संगीतात त्या विशारद. शिवाय, त्यांना बरीच वाद्येही वाजविता येतात. आईचे हेच गुण रिचात उतरले. कलेचा वारसा घरातूनच मिळाला. बालपणापासूनच तिची पावलं थिरकायला लागली, संगीत अंगात भिनू लागलं. तीन-चार वर्षांची असेल ती, तिनं पहिल्यांदा स्टेजवर ‘देवदास’मधल्या ‘मार डाला’ गाण्यावर नृत्य केलं.
आईनं तिला त्या गाण्यातील माधुरी दीक्षितसारखीच वेशभूषा करून दिली होती. छोट्याशा रिचाचं पदलालित्य, नृत्याभिनय इतका लाजवाब होता की पाहणारे अचंभित झाले. प्रचंड कौतुक झालं. तेव्हाच आत्मविश्वास वाढला. नृत्यावर लक्ष केंद्रित करायचं ठरवलं. यापेक्षा अजून छान केलं पाहिजे, अधिक शिकलं पाहिजे, असं तिनं ठरविलं. पहिला गुरू अर्थातच आई. पुढंही तिनं अनेक स्पर्धा गाजवल्या, बक्षिसं मिळविली. (Success journey of Richa Agnihotri)
सुरुवातीला कथक, गायन ती आईकडून शिकली. आणखी वाव मिळावा, मोठ्या गुरूचा आशीर्वाद मिळावा म्हणून मंजिरी श्रीरामदेव यांच्याकडे तिनं धडे गिरवायला सुरुवात केली. याचदरम्यान अभिनयाचीही आवड निर्माण होऊ लागली होती.
‘मिस ठाणे’ ही मानाची सौंदर्यस्पर्धा. स्वत:तील आत्मविश्वास सिद्ध करण्यासाठी तिनं या सौंदर्यस्पर्धेसाठीचा अर्ज भरला. तिची निवडही झाली. त्यावेळी ती नुकतीच शाळा आटोपून कॉलेजमध्ये आलेली. आपल्यापेक्षा मोठ्या, टॅलेंटेड, सुंदर मुली या स्पर्धेत आहेत. आपला काय टिकाव लागणार, असं तिला सुरुवातीला वाटलं. मात्र, कुटुंबीय तसेच आयोजकांनीही हिंमत दिली. ‘तू ऑडिशन तर पार केलीस. याचा अर्थ तुझ्यात काहीतरी आहे’, असं समजावून सांगितलं.
ही स्पर्धा फक्त सौंदर्यापुरती सीमित नसते तर तुमची हुशारी, व्यक्तिमत्त्व, स्वभाव इथं बघितला जातो. रिचा अधिक आत्मविश्वासानं प्रत्येक राउंडला पुढं गेली अन् फायनलमध्ये पोहोचली. शेवटी प्रश्नोत्तराचा राउंड असतो. त्यावेळी तिला विचारण्यात आलं, ‘तुझ्या दृष्टीनं महत्त्वाचं काय? पैसा, फेम की रिस्पेक्ट?’ रिचानं उत्स्फूर्तपणे उत्तर दिलं, ‘रिस्पेक्ट.’ तिच्यातील हा बेधडकपणा जजेसना आवडला अन् अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांच्या हस्ते तिच्या डोक्यावर ‘मिस ठाणे’चा क्राउन ठेवण्यात आला. नंतर ‘महाराष्ट्र टाइम्स श्रावणक्वीन’ सौंदर्यस्पर्धेचीही ती सेकंड रनरअप ठरली. (Success journey of Richa Agnihotri)
शास्त्रीय नृत्य, फॅशन असा प्रवास सुरू होता. आता अभिनयक्षेत्र खुणावत होतं. त्यावेळी कलर्स वाहिनीवरील ‘ढोलकीच्या तालावर’ या रियालिटी शोमध्ये सेलिब्रिटी म्हणून तिचा समावेश झाला. त्यादरम्यान न्यूयॉर्कमधून तिनं अभिनयाचं रीतसर शिक्षणही घेतलं.
कॅमेऱ्याला सामोरं जाताना…
नृत्याचा रियालिटी शो झाल्यावर अभिनयाची संधी मिळाली. पहिल्यांदा संतोष कोल्हे यांच्या ‘ऑसम टुसम’ नावाच्या यूट्युबवरील वेबसीरिजमध्ये काम केलं. त्यानंतर कलर्स वाहिनीवरील ‘घाडगे अँड सून’ मालिका तिला मिळाली. आधी स्टेज आणि आता कॅमेरा. सगळं नवीन होतं. कॅमेरा फेसिंग काय असतं, माहिती नव्हतं. काही चुका झाल्या. मात्र, दिग्गजांनी शिकवलं. वाइड, मास्टर, लाँग, मिडल हे सगळे शॉट्स, अँगल, त्यात कसं वावरायचं याचं तंत्र कळू लागलं.
कॅमेऱ्यासमोरचा अभिनय वेगळाच असतो. छोट्या छोट्या गोष्टी तिथं पाळायच्या असतात. तुमचे प्रत्येक भाव प्रेक्षकाला दिसत असतात. त्यामुळे विशेष काळजी घ्यावी लागते. अतिशा नाईक, उदय सबनीस, चिन्मय उदगीरकर आदी सीनियर्सनी या बाबी समजावून सांगितल्या. त्याचा बराच फायदा झाला, असं रिचा सांगते. यादरम्यान दिग्दर्शकाच्या बाजूला बसून त्यातील टेक्निक शिकण्यावरही तिचा भर होता. (Success journey of Richa Agnihotri)
वेळ उपयोगात आणायला हवा…
बरेचदा ‘मला वेळ मिळाला नाही, म्हणून मी अमुक गोष्ट साध्य करू शकलो वा शकले नाही’, अशी अनेकांची तक्रार असते. मात्र, वेळ आपल्याच हातात असते. त्याचा योग्य वापर करता आला पाहिजे, असं रिचाचं स्पष्ट मत आहे.
“आपल्यातलं पॅशन जिवंत असलं, तर सगळं काही सोपं होत जातं. मी शिक्षण घेत असतानाच कथक विशारद झाले. शिक्षणादरम्यानच बऱ्याच गोष्टी साध्य केल्या. माझं ध्येय ठरलेलं होतं. नृत्य, अभिनयात जायचं, गायनात उंची गाठायची, हा ठाम निश्चय होता. वेळ वाया घालवायचा नव्हता. जो वेळ मिळाला, त्याचा सदुपयोगच केला. माझे मित्र-मैत्रिणी पार्ट्या करायचे, सिनेमाला जायचे. अर्थात, त्यांच्या दृष्टीने ते योग्य होतं, तो त्याचा एंजॉय होता. मात्र, मी माझ्या ‘गोल’वर लक्ष केंद्रित केलं. जो वेळ मी त्यात गुंतवला, त्याची फळं आज मला मिळत आहेत”, असं रिचा सांगते.
मोठ्या व्यक्तिमत्त्वांची पात्रं साकारायचीत…
ड्रीम रोल काय, असं विचारताच रिचा सांगते, “मला ॲक्शनची आवड आहे. ॲक्शन याचा अर्थ फक्त स्टंट, मारधाड नाही, तर आपल्या इतिहासात, पुराणात, समाजात अशा कित्येक असामान्य महिला आहेत, ज्यांनी स्वत:च्या कर्तृत्वानं स्वत:ला सिद्ध केलंय. ती पात्रं साकारायला आवडेल. ‘राजी’, ‘उरी’, ‘बेबी’ असे चित्रपट मला आवडतात. शिवाय, अनेक चित्रपटांत मुली ‘ॲक्शन सीन’ करतात, याचंही कौतुक वाटतं.”
सिनेमा, नाटक, टीव्ही, ओटीटी हे एकमेकांना पूरक असलेली माध्यमं आहेत. त्यांचा एकमेकांना धोका नाही, तर एकमेकांपासून फायदाच आहे. प्रत्येक माध्यम आपापल्या ठिकाणी उत्तम आहे, असं तिचं मत आहे. (Success journey of Richa Agnihotri)
समाजासाठीचं देणं…
रिचाची सामाजिक जाणीव मोठी आहे. झोपडपट्टीतील मुलांसोबत ती दिवाळी साजरी करते. त्यांना भेटवस्तू देऊन त्यांच्यात आनंद पेरते. आई-बाबांनी मोठी केलेली त्यांची तपस्या संगीत ॲकेडमी आहे. त्याच्या सात शाखा आहेत. जवळपास सातशे विद्यार्थी आहेत. ही ॲकेडमी सामाजिक कार्यातही अग्रेसर आहे. “आम्ही आमच्या ॲकेडमीतर्फे गरजू मुलामुलींना मदत करतो. त्यांना ज्यात रुची आहे, त्याचे मोफत प्रशिक्षण देतो. शिवाय, त्यांना गरजेनुसार संधीही उपलब्ध करून देतो”, असं ती अभिमानानं सांगते.
“आई माझी प्रेरणा आहे. तिच्याकडून बरंच काही शिकायला मिळालं. ती नव्या कलाकारांना घडवते. कलागुणांनी ती संपन्न आहे. हे सगळं जोपासत असताना तिनं घराकडे कधीच दुर्लक्ष केलं नाही. कुठलीही अडचण असली तरी कुटुंबाची मनं तिनं सांभाळली. तिनं शिस्त शिकविली, स्वावलंबी बनवलं. कुठल्याही परिस्थितीला हसतच सामोरं जावं, याचा परिपाठ घालून दिला. बाबा विकास अग्निहोत्री मोठ्या पदावर नोकरीला होते. ॲकेडमीला सपोर्ट म्हणून त्यांनी नोकरी सोडली अन् आम्हाला प्रोत्साहन दिलं. त्यांच्या पाठिंब्यामुळे आम्ही मोठा पल्ला गाठू शकतोय”, असंही ती गहिवरून नमूद करते. आता तर ॲकेडमीतर्फे प्ले ग्रुप नर्सरीही चालविली जातेय. आई-बाबा, आजी आणि डॉगी सिम्बा असं रिचाचं मस्त कुटुंब आहे.
==============
हे देखील वाचा – ‘प्लस साइज फिगर’ला स्वत:चं बलस्थान बनविणारी यशस्वी मॉडेल: अश्विनी लोकरे
==============
भविष्यात लक्षात राहील असं बरंच काम करायचंय, चांगल्या भूमिका साकारायच्या आहेत, हीच तिची महत्त्वाकांक्षा आहे. “कासवगतीनं मात्र प्रभाव पाडणारं काम मला करायचंय. त्यासाठी कुठलीही तडजोड मला मान्य नाही’, असं सांगताना, “स्वत:चा आदर निर्माण करा. तो कमवा. आजचा क्षण जगा. करिअरच्या मागे इतकेही धावू नका की, जगणं सोडाल, महत्त्वाच्या नात्यांना विसरू नका. प्रत्येक गोष्टीचा समतोल साधता आला पाहिजे”, असा मोलाचा सल्लाही ती देते.(Success journey of Richa Agnihotri)
सुस्वभावी, प्रतिभावंत, तत्त्वांशी एकनिष्ठ अशा रिचाची चमक इतरांत ऊर्जा पेरणारी अशीच आहे. कला माणसाला समृद्ध करते, स्पेशल बनवते. रिचात तर कला ठासून भरल्या आहेत. म्हणून ती ‘सुपर स्पेशल’ ठरते. यशाची उत्तुंग शिखरं ती पार करते आहे.