Boycott Trend: बहिष्कार नेमका कशासाठी- कोणासाठी?
आधी आमिर खान, अक्षय कुमार आणि आता आलिया भट्टच्या सिनेमावर ‘बॉयकॉट (Boycott Trend)’ घालण्याची मागणी करणारे हॅशटॅग्ज गेल्या काही दिवसांपासून ट्विटरवर सतत ट्रेंड करत आहेत. अशाप्रकारे एखादी कलाकृती न पाहताच बंदी घालणं योग्य आहे का आणि मुख्य म्हणजे, त्यामुळे सिनेमा उद्योगात काम करत असलेल्या लहानसहान घटकांना याचा कसा फटका बसत आहे, याचा विचार प्रेक्षकांनी करण्याची वेळ आली आहे.
“काही लोकांना वाटतं, की माझं भारतावर प्रेम नाही, पण हे खरं नाहीये. लोकांना असं वाटणं माझ्यासाठी खरंच दुर्देवी आणि दुःखदायक आहे. प्लीज माझ्या सिनेमावर बहिष्कार घालू नका. प्लीज माझा सिनेमा पाहा…” आमिर खानसारख्या गेल्या काही दशकांपासून बॉलिवूडमध्ये कार्यरत असलेल्या आघाडीच्या अभिनेत्याला अखेर काकुळतीनं अशी विनंती करावी लागली, कारण त्याचा आगामी लाल सिंग चढ्ढा या सिनेमाचं पहिलं पोस्टर प्रदर्शित झाल्यापासूनच त्याच्यावर बहिष्कार घालण्याची मागणी सोशल मीडियावर सुरू झाली.
२०१५ मध्ये आमिरने आपल्या पत्नीला किरण रावला भारतात असुरक्षित वाटत असल्याबद्दल केलेलं विधान, तसंच पीके सिनेमात त्यानं हिंदू देवदेवतांचा अपमान केल्याच्या आरोपावरून आमिरच्या सिनेमावर बहिष्कार घालण्याची मागणी सातत्यानं केली जात होती आणि आता तर या मागणीनं चांगलाच जोर धरला आहे. केवळ आमिरच नव्हे, तर अक्षय कुमार आणि आलिया भट्टच्या सिनेमांनाही बॉयकॉटच्या या ट्रेंडचा फटका बसत आहे. (Boycott Trend in India)
अक्षय कुमारच्या आगामी रक्षाबंधन सिनेमाची लेखिका कनिका धिल्लननं पूर्वी हिंदुविरोधी ट्विट केल्याच्या आरोपावरून या सिनेमावर बहिष्कार टाकण्याची मागणी केली जात आहे, तर आलियाच्या नुकत्याच ओटीटीवर प्रदर्शित झालेल्या ‘डार्लिंग’ या सिनेमात पुरुषांवर होणारी घरगुती हिंसा मोठ्या प्रमाणावर दाखवल्याने चुकीचा संदेश जात असल्यावरून बहिष्कार घालण्याची मागणी केली जात आहे.
Boycott Trend: बहिष्कार नेमका कशासाठी- कोणासाठी?
बहिष्काराची मागणी केल्या जात असलेल्या सिनेमांच्या नावावर नजर टाकली, तर लक्षात येईल, की एका विशिष्ट व्यक्तीबाबत मूठभर प्रेक्षकांच्या मनात असलेल्या रोषावरून असे ट्रेंड्स सुरू केले जात आहेत. उदा. आमिर खान, शाहरूख खान, सलमान खान अक्षय कुमार, करण जोहर, आदित्य चोप्रा किंवा जान्हवी कपूर, आलिया भट्ट सारखे स्टार किड्स वगैरे. पण सिनेमा हा एका कोणाचाच नसतो, तर तो तयार करण्यामध्ये स्पॉटबॉयपासून सिनेमाचं वितरण करणाऱ्यांपर्यंत शेकडो- हजारो लोकांचे हात लागलेले असतात. किंबहुना बहिष्काराच्या मागणीमुळे सिनेमा अपयशी ठरल्यास त्यामुळे सेलिब्रेटींचे इतके नुकसान होत नाही, तितकं या सामान्य माणसांचं होतं.
हजारो लोकांना रोजगार देणाऱ्या बॉलिवूडचं एक उद्योग म्हणून प्रचंड मोठे नुकसान त्यामुळे होत असतं. सिनेमाकडे स्वतंत्र कलाकृती म्हणून पाहाण्याऐवजी त्यात काम केलेल्या कलाकारानं व्यक्ती म्हणून केलेलं विधान किंवा त्याच्या वैयक्तिक धार्मिक निवडीवरून सिनेमावर बहिष्कार घालण्याची मागणी करणं साफ चुकीचं आहे. त्याचबरोबर असे सिनेमे प्रदर्शित होण्याआधीच त्यावर बंदी घालण्याची मागणी करणं आणखीनच चुकीचं आहे, कारण त्यामुळे सिनेमा बनवण्यासाठी लागलेला वेळ, अतोनात कष्ट आणि पैसा वाया जाऊ शकतो. एखाद्या सेलिब्रेटीचं वैयक्तिक आयुष्य, त्याची मतं, आवडीनिवडी आणि त्याचं काम यांची सरमिसळ थांबवणं आता खूप गरजेचं झालं आहे.
Boycott Trend: वस्तूस्थिती काय
बॉयकॉट ट्रेंडसवरून सहज लक्षात येईल की, एकेकाळी प्रेक्षकांना आकर्षित करणाऱ्या सुपरस्टार्सवरच आता जनतेचा जास्त रोष आहे. स्टार किड्सना मिळणाऱ्या संधींवरून बॉलिवूड किती अन्याय्यकारक आहे अशी धारणा प्रेक्षकांमध्ये निर्माण झाली आहे. मात्र, नेपोटिझम अगदी राजकारणापासून प्रत्येक क्षेत्रात अस्तित्वात असताना बॉलिवूड प्रकाशझोतात असल्यामुळे ते उठून दिसतंय हे लक्षात घ्यायला हवं. (Boycott Trend in India)
बॉलिवूडमध्ये फक्त नेपोटिझम चालत असतं, तर आयुषमान खुराना, सिद्धांत चतुर्वेदी, क्रीती सेनॉन, कार्तिक आर्यन यांसारखे कलाकार आज दिसलेच नसते किंवा ट्विंकल खन्ना, तुषार कपूर, सोहा अली खान, प्रतीक बब्बर असे स्टारकिड्स सुपरहिट असते. आजकाल आणि याहीपूर्वी सिनेमा त्यातले कलाकार, संगीत, निर्मिती मूल्यं याहीपेक्षा आशय किंवा कथानकाच्या जोरावर चालले आहेत.
=======
हे देखील वाचा – बॉलिवूडलाही पडतेय प्रमोशनसाठी ‘मराठी’ इन्फ्लुएन्सरची गरज…
=======
दिल चाहता है व जिंदगी न मिलेगी दोबारा यांसारख्या स्टारकिड्सचा प्रामुख्याने समावेश असलेले पण जबरदस्त कथानकाच्या जोरावर चाललेले सिनेमे त्याचं उत्तम उदाहरण आहेत. नेपोटिझम, वैयक्तिक मतं, जीवनशैली, व्यक्तीगत आयुष्य अशा सिनेमाशी काहीही संबंध नसलेल्या गोष्टींपेक्षा केवळ आशयघन निर्मितीचा निकष लावत प्रेक्षकांनी अशाप्रकारच्या ‘बॉयकॉट’ ट्रेंड्सच्या आंधळेपणाने आहारी जायचं का, हा विचार करायला हवा.
– कीर्ती परचुरे