दिग्दर्शक सुभाष घई आणि गीतकार आनंद बक्षी यांचे जबरदस्त ट्युनिंग!
हरे रामा हरे कृष्णा: चित्रपटाचं शूटिंग बघणारा मुलगा नेपाळचा राजकुमार आहे हे समजलं तेव्हा…
पूर्वी केबल टीव्ही नव्हता (आणि तो आल्यावरही काही वर्ष त्याचा प्रसार झाला नव्हता) तेव्हा छायाचित्र, चित्रहार, रंगोली असे गाण्याचे कार्यक्रम लागायचे. या कार्यक्रमांचं वैशिष्ट्य म्हणजे सणवार जवळ आले की, त्याच्याशी संबंधित गाणी यामध्ये दाखवली जात. उदा. १५ ऑगस्ट किंवा २६ जानेवारी जवळ आल्यावर जवळपास आठवडाभर या कार्यक्रमांमध्ये देशभक्तीपर गाणी दाखवली जात, तर रक्षाबंधन जवळ आल्यावर बहीण भावाच्या प्रेमाची गाणी दाखवली जात असत. यामध्ये ‘एक हजारो मे मेरी बहना है’ हे गाणं हमखास दाखवलं जात असे. हे गाणं होतं ‘हरे रामा हरे कृष्णा’ या चित्रपटातील. (Lesser known story of Haré Rama Haré Krishna)
१९७१ साली आलेला ‘हरे रामा हरे कृष्णा’ हा चित्रपट म्हणजे कहाणी आहे एकमेकांवर खूप प्रेम करणाऱ्या पण आई वडिलांच्या मतभेदांमुळे लहान वयातच एकमेकांपासून दुरावलेल्या बहीण भावाची म्हणजेच प्रशांत आणि जसबीरची. जसबीरला वडिलांजवळ सोडून तिची आई प्रशांतला घेऊन निघून जाते. प्रशांत बोर्डिंग स्कुलमध्ये राहून पायलट होतो, तर आई व भावाच्या मृत्यूची खोटी बातमी आणि वडिलांचं दुसरं लग्न यामुळे जसबीर एकाकी पडते आणि मोठी झाल्यावर घरातून निघून जाते.
प्रशांतला वडिलांचं पत्र येतं ज्यात त्यांनी, जसबीरनं घर सोडलं असून ती सध्या काठमांडू, नेपाळमध्ये हिप्पींच्या गटासोबत राहत असल्याचं नमूद केलेलं असतं. प्रशांत जसबीरला शोधायचा निर्णय घेतो आणि काठमांडूला जातो. तिथे तो शांतीच्या प्रेमात पडतो. तिथे त्याला जसबीर नाही, पण जेनिस भेटते. प्रशांतला संशय येतो की, जेनीस हीच जसबीर आहे. पण जेनिसला तिचं बालपण आठवत नसतं आणि ती नेहमीच हिप्पींसोबत ड्रग्ज आणि दारूच्या नशेत बुडालेली असते.
प्रशांतला जसबीर भेटते का, जेनीस कोण असते, शांती आणि त्याची प्रेमकहाणी सफल होते का, या सगळ्या प्रश्नाची उत्तरं वाचण्यापेक्षा चित्रपटात पाहणं जास्त रोमांचक आहे. यामध्ये देव आनंद, मुमताज, झीनत अमान, प्रेम चोपडा, राजेंद्रनाथ यांच्या प्रमुख भूमिका आहेत. आता थोडं या चित्रपटाच्या मेकिंग दरम्यानच्या किस्स्यांबद्दल – (Lesser known story of Haré Rama Haré Krishna)
जेनीसच्या भूमिकेसाठी झीनत अमान नव्हती पहिली पसंती
जेनीसच्या भूमिकेसाठी आधी झहीदा या अभिनेत्रीची निवड करण्यात आली होती. परंतु तिने नकार दिला. यानंतर ही भूमिका मुमताजला ऑफर करण्यात आली. परंतु तिने शांतीची भूमिका करण्यात रुची दाखवली. अनेकांनी तिला समजावून सांगितलं की, हा चित्रपट बहीण भावाच्या नात्यावर आधारित आहे त्यामुळे जेनीसची भूमिका जास्त महत्त्वाची आहे. पण देव आनंदच्या बहिणीची भूमिका करणं तिला मान्य नव्हतं, त्यामुळे ती आपल्या निर्णयावर ठाम राहिली आणि ही भूमिका झीनत अमानला मिळाली.
२. अशी सुचली चित्रपटाची संकल्पना
नेपाळमध्ये प्रेम पुजारी या चित्रपटाच्या निर्मितीदरम्यान देव आनंदने एका हिप्पी मुलीला सिगारेट ओढताना पाहिले आणि त्याला ‘हरे रामा हरे कृष्णा’ चित्रपटाची कल्पना सुचली. (Lesser known story of Haré Rama Haré Krishna)
३. संगीतासाठी पहिली पसंती होती एस डी बर्मन यांना
देव आनंदच्या प्रेम पुजारीच्या यशामध्ये संगीताचाही मोठा वाटा होता. त्यामुळे याही चित्रपटात देव आनंदला संगीतकार म्हणून एस डी बर्मन हवे होते. परंतु या चित्रपटासाठी पाश्चिमात्य धाटणीचे संगीत द्यावं लागणार होतं. त्यामुळे त्यांनी त्यांचा मुलगा आर.डी.बर्मन यांची शिफारस केली. (Lesser known story of Haré Rama Haré Krishna)
४. कथानक नव्हतं ओरिजिनल
चित्रपटाची संकल्पना जरी देव आनंदला सुचली असली तरी चित्रपटाचं कथानक जॅक निकोल्सनच्या सायक आउट चित्रपटापासून प्रेरित होतं.
५. लहान वयातील प्रशांत आणि जसबीरच्या भूमिका
देव आनंदला त्याची मुले सुनील आणि देविना यांनी लहानपणीचा प्रशांत आणि जेनिसची भूमिका साकारावी असं मनापासून वाटत होतं. पण देव साहेबांची दोन्ही मुलं प्रचंड लाजाळू होती त्यामुळे त्यांनी नकार दिला.
६. नेपाळमध्ये चित्रीकरण सुरू असताना दिसलेला मुलगा
नेपाळमध्ये चित्रीकरण सुरू असताना देव आनंदला गर्दीत एक २०-२२ वर्षांचा मुलगा मन लावून चित्रीकरण पाहताना दिसला. चित्रीकरणानंतर देव आनंद स्वतःहून त्याच्याशी बोलायला गेले तेव्हा कळलं की, तो मुलगा नेपाळचा राजकुमार ज्ञानेंद्र आहे. (Lesser known story of Haré Rama Haré Krishna)
७. चित्रीकरणादरम्यान हरवले होते स्क्रिप्ट
नेपाळच्या डोंगराळ प्रदेशात लोकेशन निश्चित केल्यानंतर हॉटेलवर परतल्यावर देव आनंदच्या लक्षात स्क्रिप्ट हरवल्याचं लक्षात आलं. त्याने त्वरित रिसेप्शनला फोन करून पायलटला परत लोकेशनवर पाठवण्यासाठी विनंती केली, पण तोपर्यंत पायलट निघून गेला होता. यानंतर देव आनंदला राजा ज्ञानेंद्र यांचे वडील राजा महेंद्र यांच्याकडे एअरक्राफ्ट असल्याचे कळल्यावर त्यांना विनंती केली व घटनास्थळी गेला. खूप शोधाशोध करूनही त्याला स्क्रिप्ट मिळालं नाही. अखेर अंधार पडायला लागल्यावर पायलटने त्याला परत निघूया अशी विनंती केली. परत जात असताना देव आनंदला झुडपात कसलातरी आवाज आला म्हणून त्याने बघितलं, तर त्या झुडपांत त्याला स्क्रिप्ट सापडलं.
=========
हे देखील वाचा – आवर्जून पाहावेत असे, थरकाप उडवणारे दक्षिणेतील ‘सायकॉलिजिकल थ्रिलर’ चित्रपट
=========
या चित्रपटातील भूमिकेसाठी झीनत अमानला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला होता. IMDB वर या चित्रपटाला ७.१ रेटिंग देण्यात आलं आहे. हा चित्रपट झी 5 वर उपलब्ध आहे.