दिग्दर्शक सुभाष घई आणि गीतकार आनंद बक्षी यांचे जबरदस्त ट्युनिंग!
प्रदीप पटवर्धन: एकेकाळी रिझर्व्ह बँकेत केली होती नोकरी पण …
मनोरंजन क्षेत्राची आजची सकाळ एका वाईट बातमीने झाली. रंगभूमी, मालिका आणि चित्रपट या तिन्ही क्षेत्रांमधील ज्येष्ठ कलाकार प्रदीप पटवर्धन (Pradeep Patwardhan) यांचं आज गिरगाव येथील त्यांच्या निवासस्थानी हृदयविकाराच्या तीव्र झटक्यामुळे दुःखद निधन झालं. त्यांचं असं अचानक जाणं रसिकांच्या मनाला चटका लावून गेलं आहे.
आपल्या अभिनयानं गेले कित्येक दशकं प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे प्रदीप पटवर्धन यांना लहानपणापासूनच अभिनयाची आवड होती. जन्माने मुंबईकर प्रदीप पटवर्धन मूळचे कोकणातल्या, दापोलीजवळच्या आंजर्ले गावातले. त्यांची आई संगीत विशारद होती आणि त्या म्युन्सिपाल्टीच्या नाटकांमधून काम करत असतं. त्यामुळे अभिनयाची थोडीफार पार्श्वभूमी घरात होतीच. दहावी नंतर त्यांनी सिद्धार्थ कॉलेजला ॲडमिशन घेतलं आणि तिथेच त्यांच्या अभिनयाचा प्रवास सुरू झाला.
कॉलेज जीवनात त्यांनी अनेक नाट्यस्पर्धा गाजवल्या होत्या. त्यांनी जवळपास २० पेक्षा जास्त नाटकांमधून काम केलं आहे. तसंच त्यांना महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धेचं सिल्व्हर मेडलही मिळालं होतं. मोरूची मावशी, सखी प्रिय सखी बायकोची खंत, अशी त्यांची अनेक नाटकं लोकप्रिय झाली होती. प्रदीप पटवर्धन सतीश पुळेकर यांना आपले गुरु मानत असतं. (Memories of Veteran Actor Pradeep Patwardhan)
प्रदीप पटवर्धन याचे विचार अत्यंत साधे सरळ होते. अभिनयक्षेत्रात लोकप्रिय झाल्यावरही ते बस, ट्रेनने प्रवास करत असतं. त्यावेळच्या एका मुलाखतीमध्ये त्यांनी सांगितलं होतं, “मला आवडतं लोकांना भेटायला. आणि सार्वजनिक गाड्यांमधून प्रवास करायला हरकत काहीच नाही. मी सुद्धा एक सामान्य माणूसच आहे.” त्यांना बघून त्यांच्याशी बोलायला येणाऱ्या माणसांशी ते आपुलकीने बोलतं असत. त्यांनी कधीही स्टारडम दाखवला नाही. ते एक उत्तम सामाजिक जाण असणारे अभिनेते होते. चित्रीकरणाच्या ठिकाणी किंवा नाटकांच्या दौऱ्यावरही त्यांनी कधी नखरे केले नाहीत. जशी व्यवस्था असे त्यामध्ये कुठलीही तक्रार न करता ते राहत असतं.
फार कमी लोकांना माहिती असेल, पण या महान अभिनेत्याने सुरुवातीला रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामध्ये २५ रुपये रोजदारीवर (Daily Wages) काम केलं होतं. अर्थात त्यावेळी ही रक्कम काही अगदीच कमी नव्हती. त्यावेळी इंटरबँक एकांकिका स्पर्धा खूप गाजायच्या. त्यामुळे रिझर्व्ह बँकेत काम करत असताना त्यांनी टेम्पल एम्प्लॉयमेंट नावाच्या एकांकिकेत काम केलं होतं. या एकांकिकेला त्यावर्षी अनेक पुरस्कार मिळाले. यामध्ये प्रदीप यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला. त्यावेळी बँकेमध्ये त्यांचा सत्कार झाला होता.
या प्रसंगानंतर बँकेतली त्यांची नोकरी पर्मनंट होणार असं अनेकजणांना वाटत होतं. पण शनिवारच्या सत्कार सोहळ्यानंतर त्यांना सोमवारी कामावरून काढून टाकण्यात आलं. का… हे त्यांना कधी कळलंच नाही आणि रोजदारीची नोकरी असल्यामुळे बँकेकडून कारण देणं अपेक्षितही नव्हतं. या घटनेनं प्रदीप यांना खूप मोठा धक्का बसला होता. परंतु नंतर मात्र त्यांना बँक ऑफ इंडियामध्ये नोकरी मिळाली. (Memories of Veteran Actor Pradeep Patwardhan)
मोरूची मावशी तुफान लोकप्रिय होत होतं, त्यावेळी प्रदीप पटवर्धन मृच्छकटिका नावाच्या एका संस्कृत मालिकेमध्येही काम करत होते. परंतु या मालिकेच्या चित्रीकरणादरम्यान झालेल्या एका अपघातामुळे त्यांना जवळपास दीड वर्ष घरात बसून राहावं लागलं होतं. त्यावेळी नाटकाचे प्रयोग चालू असताना घरी बसून राहणं त्यांच्यासाठी प्रचंड दुःखद ठरलं होतं. अर्थात अर्थार्जनाचा तसा प्रश्न नव्हता कारण तेव्हा त्यांची नोकरी सुरू होती.
प्रदीप पटवर्धन यांनी नेहमीच ‘कमिटमेंट’ला महत्त्व दिलं. स्वतःला चांगली संधी मिळतेय म्हणून त्यांनी कशीही दुसऱ्याचं नुकसान केलं नाही; त्यांना ते कधी पटलंही नाही. नवीन कलाकारांसोबत काम करण्यासही त्यांनी कधीच नकार दिला नाही. ते नेहमी म्हणतं, “मी देखील कधीतरी नवीन होतो. तेव्हा मला असं कोणी म्हटलं असतं, तर आज मी ज्या जागी आहे त्या जागी नसतो.”
=========
हे देखील वाचा – ‘तो’ चित्रपट सुरेश वाडकर यांच्या आयुष्यामधली खूप मोठी चूक होती
=========
विनोदी अभिनेता म्हणून नाव कमावलेले प्रदीप पटवर्धन (Pradeep Patwardhan) मनोरंजन क्षेत्रात ‘पट्या’ म्हणून लोकप्रिय होते. त्यांचं असं अचानक जाणं रसिकांच्या मनाला चटका लावून गेलं आहे.
– भाग्यश्री बर्वे