माझिया प्रियाला प्रीत कळेना: बालाजी टेलिफिल्म्सची पहिली मराठी मालिका
हिंदी चॅनेल्समध्ये लोकप्रियतेच्या शिखरावर असणाऱ्या बहुतांश मालिका या बालाजी टेलिफिल्म्सखाली तयार झालेल्या होत्या. ‘डेली सोप’ म्हणजे बालाजी टेलिफिल्म्स किंवा एकता कपूर असं जणू एक समीकरणच झालं होतं. त्याच वेळी प्रादेशिक भाषांसाठीही स्वतंत्र चॅनेल्स निर्माण झाली होती. झी मराठीची लोकप्रियता एव्हाना प्रचंड वाढली होती. त्यामुळे एकता कपूरने प्रादेशिक मालिकांच्या निर्मितीमध्येही उतरायचं ठरवलं आणि मराठीमध्ये तिने पहिली मालिका तयार केली ती, ‘माझिया प्रियाला प्रीत कळेना…’ (Maziya Priyala Preet Kalena)
‘माझिया प्रियाला प्रीत कळेना…’ ही मालिका सोमवार ते शनिवार रोज रात्री ८ वाजता प्रदर्शित होत असे. या मालिकेमधून अभिजीत खांडकेकर – मृणाल दुसानिस अशी फ्रेश जोडी लोकांसमोर आली. अभिजित खांडकेकरने या आधी ‘महाराष्ट्राचा सुपरस्टार’ या रियालिटी शो मध्ये नशीब आजमावण्याचा प्रयत्न केला होता. पण तिथे तो अंतिम फेरीत प्रवेश करू शकला नव्हता. तर, मृणाल दुसानिस या गोड चेहऱ्याच्या अभिनेत्रीची मात्र ही पहिलीच मालिका होती आणि पदार्पणातच तिने रसिकांना घातलेली भुरळ आजही कायम आहे.
या मालिकेमध्ये ‘मेलोड्रामा’ होता, पण टिपिकल एकता कपूरचा ‘फॅमिली’ टच नव्हता. म्हणजे या मालिकेत दाखवण्यात आलेलं नायकाचं कुटुंब सर्वसाधारण मध्यमवर्गीय कुटुंब होतं. कुठलाही बडेजाव नाही, मोठमोठे महाल नाहीत, महागड्या साड्या नेसून, अंगभर दागिने घालून घरात वावरणाऱ्या बायका नाहीत की, मुळूमुळू रडणारी नायिकाही नाही. होती फक्त एक तरल प्रेमकहाणी. त्यामुळे ही मालिका जरी बालाजी टेलिफिल्म्सची असली तरी टिपिकल सास- बहू टाईप नव्हती. (Memories of Maziya Priyala Preet Kalena)
एनआरआय फॅशन डिझायनर शमिका आपली सावत्र आई संध्या आणि बहिण रियासह भारतात येते. शमिकाच्या सावत्र आईने तिच्यासाठी तिच्या मैत्रिणीच्या मुलाची – जयची निवड केलेली असते. याचं कारण एकच असतं ते म्हणजे, शमिकाच्या वडिलांनी त्यांची सर्व संपत्ती शमिकाच्या नावावर केलेली असते आणि तिच्या लग्नानंतरच ती तिला मिळणार असते. शमिकाला संपत्ती मिळाल्यावर त्या संपत्तीतला अर्धा वाटा संध्याला द्यायचं जयची आई आणि जय या दोघांनीही मान्य केलेलं असतं. पण शमिका मात्र या गोष्टीबद्दल अनभिज्ञ असते. शमिका आणि रियाची जयचा मामेभाऊ अभिजीतची ओळख होते. मात्र शमिकाला जय पसंत नसतो त्यामुळे ती शमिका जयशी लग्न करायला नकार देते. यामुळे अस्वस्थ झालेली संध्या जयला शमिकाचा होकार मिळवण्यासाठी प्रयत्न करायला भाग पाडते.
हळूहळू रिया अभिजीतच्या प्रेमात पडते. पण त्या आधीच शमिका आणि अभिजीत एकमेकांच्या प्रेमात पडलेले असतात. यानंतर शमिका आणि अभिजीतला एकमेकांपासून दूर करण्यासाठी जय, त्याची आई आणि संध्या बरेच प्रयत्न करतात. पण खरं प्रेम जिंकतं आणि सर्व अडचणींवर मात करून अभिजित – शमिकाचं लग्न होतं. लग्नानंतर शमिका आपल्या सासरच्या मंडळींचंही मन जिंकून घेते. श्रीमंत घरात, अमेरिकेत वाढलेली शमिका भारतातल्या एका मध्यमवर्गीय कुटुंबात सहज विरघळून जाते.
मालिकेमध्ये अनेक नवनवीन व्यक्तिरेखांची आवक – जावक झाली. ती सर्वच मालिकांमध्ये होते, पण मेलेल्या व्यक्तीला जिवंत करून ‘कहानी मे ट्विस्ट’ आणणं, ही तर एकता कपूरच्या मालिकांची खासियत आणि या मालिकेमध्येही असंच झालं. शमिकाचे वडील जिवंत असल्याचं सत्य समोर येतं आणि सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसतो. यानंतर शमिकाच्या सावत्र आईचे कारनामेही उघड होतात आणि त्यानंतर शमिका खूप दुखी होते. बरेच ट्विस्ट अँड टर्न्स घेऊन आणि गोड गोड शेवट करून वर्षभर चाललेल्या या मालिकेनं सर्वांचा निरोप घेतला. (Memories of Maziya Priyala Preet Kalena)
केवळ वर्षभरात मालिका संपली हे अनेकांसाठी धक्कादायक होतं कारण एकतर मालिकेने आल्या आल्या झी मराठीच्या अनेक पुरस्कारांवर आपलं नाव कोरलं होतं, तसंच मालिकेची लोकप्रियताही काही फारशी कमी झाली नव्हती. अर्थात विनाकारण कथानक न खेचता, मालिका रटाळ न करता वेळीच संपल्यामुळे मालिका आणि त्यातील पात्र अधिक संस्मरणीय झाली आहेत.
या मालिकेमध्ये मृणाल दुसानिस (शमिका), अभिजित (अभिजित खांडकेकर) यांच्यासह हर्षदा खानविलकर (संध्या), प्रसाद जावडे (जय), स्नेहा कुलकर्णी (रिया), संजय मोने, इ कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत होते. मालिकेची निर्मिती बालाजी टेलिफिल्म्सची असून मालिकेने एकूण ३५४ भाग पूर्ण केले. (Memories of Maziya Priyala Preet Kalena)
============
हे देखील वाचा – देवयानी: “तुमच्यासाठी कायपन….” एक हळवी प्रेमकहाणी
============
झी मराठीच्या मालिकांचं वैशिष्टय म्हणजे सर्व मालिकांची शीर्षक गीतं नेहमीच श्रवणीय असतात. या मालिकेचं शीर्षक गीतही कमालीचं लोकप्रिय झालं होतं. आजही कधीतरी गर्दीत एखाद्या मोंबाईलची रिंगटोन वाजल्यावर हे गीत ऐकायला येतं. हे शीर्षक गीत लिहिलं होतं अश्विनी शेंडे यांनी. या गीतासाठी अश्विनी यांना झी मराठीचा सर्वोत्कृष्ट शीर्षक गीतकार म्हणून पुरस्कार मिळाला होता. विशेष म्हणजे या पुरस्कारामुळे अश्विनी यांच्या पुरस्कारांची हॅट्रिक झाली. हे शीर्षक गीत गायले होते, महालक्ष्मी अय्यर आणि स्वप्नील बांदोडकर यांनी.
ही मालिका बघायची असल्यास झी 5 या ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहता येईल. तसंच यु ट्यूबवरही उपलब्ध आहे.