दिग्दर्शक सुभाष घई आणि गीतकार आनंद बक्षी यांचे जबरदस्त ट्युनिंग!
रोजा (Roja): या सत्यघटनेवरून मणिरत्नम यांना सुचली चित्रपटाची संकल्पना
पूर्वी १५ ऑगस्ट किंवा २६ जानेवारी जवळ आल्यावर टीव्हीवर दाखवण्यात येणाऱ्या देशभक्तीपर चित्रपटांमध्ये एक चित्रपट आवर्जून दाखवला जात असे, तो चित्रपट म्हणजे, रोजा. १५ ऑगस्ट १९९२ साली तामिळ भाषेत प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला दक्षिणेत प्रेक्षकवर्ग आणि समीक्षकांची प्रशंसा या दोन्ही गोष्टी भरभरून मिळाल्या. यानंतर हिंदी भाषेत डब करून संपूर्ण भारतात प्रदर्शित झाला. तामिळ इतकीच किंबहुना त्याहीपेक्षा जास्त लोकप्रियता या चित्रपटाला मिळाली. (Roja)
तसं बघायला गेलं तर, ‘रोजा’ हा चित्रपट ‘देशभक्तीपर’ या कॅटेगरीमध्ये मोडत नाही. ही एक प्रेमकहाणी आहे. दक्षिणेमधील सुंदरपांडियापुरम गावातली एक मुलगी रोजा, ऋषी कुमार नावाच्या इंजिनिअरशी लग्न होतं. ऋषी खरंतर रोजाच्या बहिणीला बघायला आलेला असतो. पण तिचं दुसऱ्याच मुलावर प्रेम असल्यामुळे ती ऋषीला नकार द्यायची विनंती करते. त्यामुळे ऋषी रोजाला पसंत करतो. या गोष्टीबद्दल अनभिज्ञ असणाऱ्या रोजाला असं वाटत असतं की, ऋषीने बहिणीला नाकारून तिला पसंत केल्यामुळे तिची बहीण दुखावली आहे. त्यामुळे तिचा ऋषीवर राग असतो. पण जेव्हा ऋषी तिला सत्य सांगतो तेव्हा तिच्या मनात ऋषीबद्दल आदर निर्माण होतो आणि ती त्याच्या प्रेमात पडते.
रोजा आणि ऋषीचा संसार सुखाने सुरु होतो. अचानक त्याला लष्करी गुप्तचरांना रोखण्यासाठी बारामुल्ला येथील लष्करी संप्रेषण केंद्रात नियुक्त करण्यात येतं. दक्षिणेत राहिलेली रोजा उत्तरेमधील जम्मू काश्मीरचं सौंदर्य बघून हरखून जाते. अशातच अतिरेकी ऋषीचे अपहरण करतात. ऋषीच्या बदल्यात त्यांना दोनच गोष्टी हव्या असतात, एक म्हणजे काश्मीर आणि दुसरं म्हणजे भारताच्या ताब्यात असणाऱ्या अतिरेकी वसीम खानची सुटका. या सगळ्यात जगाची धड ओळखही न झालेली नाही रोजा गोंधळून जाते. पण म्हणतात ना, परिस्थिती माणसाला सगळं शिकवते. तसंच रोजाही ऋषीच्या सुटकेसाठी जीव तोडून प्रयत्न करते. अनेक घटना घडत जातात आणि अखेर रोजा आणि ऋषीची भेट होते. (Roja)
चित्रपटाची कथा अत्यंत सुंदर आणि प्रभावी होती, त्याला मणिरत्नमच्या दिग्दर्शनाने ‘चार चाँद’ लावले. अरविंद स्वामी आणि मधु ही जोडी केवळ दक्षिणेतच नाही तर संपूर्ण भारतभर हिट झाली. आता थोडंसं या चित्रपटाबद्दलच्या काही रंजक गोष्टींबद्दल –
अशी सुचली चित्रपटाची कल्पना
२८ जून १९९१ रोजी इंडियन ऑइल कॉर्पोरेशनचे कार्यकारी के. दोराईस्वामी यांचे काश्मिरी अतिरेक्यांनी अपहरण करून त्यांना दोन महिने कैदेत ठेवले होते. त्यावेळी दोराईस्वामीची पत्नी त्याच्या सुटकेसाठी लढत होती. यातूनच मणिरत्नम यांना ‘रोजा’ चित्रपटाची प्रेरणा मिळाली. (Roja)
करिष्मा कपूरला ऑफर झाली होती भूमिका
चित्रपटातील काश्मिरी मुलीची भूमिका करिश्मा कपूरला ऑफर करण्यात आली होती. काश्मिरी मुलीची भूमिका ऑफर करण्यात आली होती. पण तिला सहाय्यक अभिनेत्रीची भूमिका करायची इच्छा नसल्यामुळे तिने नकार दिला.
नाना पाटेकर यांची झाली होती निवड
या चित्रपटासाठी नाना पाटेकर यांना साईन करण्यात आले होते, परंतु नंतर काही कारणांनी त्यांच्या जागी पंकज कपूरची वर्णी लागली.
रोजाच्या भूमिकेसाठी मनीषा होती पहिली पसंती
मणिरत्नम यांनी रोजाच्या भूमिकेसाठी खरंतर मनीषा कोइरालाची निवड केली होती. पण सुभाष घई यांच्याशी केलेल्या करारात अडकल्यामुळे तिने नकार दिला आणि नायिकेची भूमिका मधूला मिळाली. पण मणिरत्नमने पुढे मनिषासोबत बॉम्बे आणि दिल से असे चित्रपट केले. (Roja)
चित्रपटाचा एक मोठा भाग काश्मीरमध्ये चित्रित होऊ शकला नाही
चित्रपटामध्ये काश्मीरची पार्श्वभूमी असल्यामुळे एक मोठा भाग काश्मीरमध्ये चित्रित केला जाणार होता. परंतु त्या दरम्यान तिथे दहशतवाद वाढल्यामुळे या भागाचं चित्रीकरण दुसऱ्या हिल स्टेशनवर करण्यात आलं.
=========
हे देखील वाचा – हिरॉईन: या चित्रपटाने बॉलिवूडची ‘अंदर कि बात’ सर्वांसमोर आणली….
========
‘रोजा’ चित्रपटाला अनेक राष्ट्रीय पुरस्कार व फिल्मफेअर पुरस्कार मिळाले. यावर्षी हा चित्रपट प्रदर्शित होऊन ३० वर्ष पूर्ण झाली. हा चित्रपट झी 5, अमेझॉन प्राईम तसंच युट्यूबवरही उपलब्ध आहे. IMDB वर या चित्रपटाला ८.१ रेटिंग देण्यात आलं आहे. (Roja)