‘तु मला सगळं काही दिलंस..!’ विशाखा सुभेदाराची ‘ती’ पोस्ट व्हायरल
‘या’ प्रचंड लोकप्रिय ठरलेल्या गाण्यामुळे सुभाष घईंवर दाखल झाली होती कोर्ट केस…
१९९३ साली आलेला ‘खलनायक’ हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात सापडला होता, तो यामधील गाण्यामुळे. या चित्रपटात संजय दत्त, माधुरी दीक्षित जॅकी श्रॉफ प्रमुख भूमिकेत होते. चित्रपटाचे चित्रीकरण चालू असतानाच संजय दत्तला एके -४७ बाळगल्यासंदर्भात अटक करण्यात आली होती. (Controversial Song)
संजय दत्तच्या अटकेनंतर देशभरात वादळ उठलं होतं. त्याच्या प्रदर्शित झालेल्या चित्रपटाचे खेळ बंद पाडण्यात आले. या पार्श्वभूमीवर खलनायकचे दिग्दर्शक सुभाष घई प्रचंड चिंतेत पडले होते. कारण खलनायक हा बिग बजेट चित्रपट होता. परंतु सर्व अडथळे पार होऊन चित्रपटाच्या प्रदर्शनाचा मार्ग मोकळा झाला पण तोपर्यंत एक नवीन विवाद सुरु झाला, तो यामधील एका गाण्यामुळे. खरंतर या गाण्याचं चित्रीकरण निर्विघ्नपणे पार पडलं होतं. चित्रपटाच्या म्युझिकचे राईट्स टिप्सने खरेदी केले. इथपर्यंत ठीकठाक सुरु होतं, पण खरी लढाई पुढे लढावी लागली.
इंडिया टुडेमध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीनुसार टिप्स (TIPS) कंपनीने ‘खलनायक’च्या साउंड ट्रॅकवर तब्बल सव्वा कोटी रुपये खर्च केले होते. यामध्ये प्रसिद्धीचा खर्च इत्यादींचा समावेश होता. आणि कंपनीची सर्व मेहनत यशस्वीही ठरली कारण ‘खलनायक’च्या देशभरात ५० लाखांहून अधिक कॅसेट विकल्या गेल्या. त्यावेळच्या मीडिया रिपोर्टनुसार यामधून कंपनीला सुमारे तीन कोटी रुपयांचा नफा झाला होता. रेडिओवर चित्रपटातील गाणी वाजत होती. लोक दूरदर्शनवर ही गाणी पाहत होते. (Controversial Song)
सगळं ‘ओक्केमध्ये’ चाललं आहे असं वाटत असतानाच अचानक चित्रपटातील ‘चोली के पीछे क्या है’ या गाण्याविरोधात दिल्लीमधील वकील आर.पी. चुग यांनी थेट न्यायालयात धाव घेतली. याचिका दाखल करताना चुग यांनी त्यामध्ये लिहिले की, हे गाणं अत्यंत अश्लील आणि महिलाविरोधी आहे. देशभरातील लोक हे गाणं ऐकत आहेत. एकूणच चुकीचा संदेश जनतेपर्यंत पोहोचत आहे. तसेच चुग यांनी आपल्या याचिकेत चार मागण्या केल्या होत्या –
१. चित्रपटाचे दिग्दर्शक सुभाष घई, चित्रपटाचे निर्माते आणि सेन्सॉर बोर्डाला हे गाणे हटवण्यास सांगितले.
२. ‘टिप्स’ने ‘खलनायक’ चित्रपटाच्या गाण्याच्या कॅसेट्स बाजारातून मागे घ्याव्यात
३. जोपर्यंत चित्रपटातून गाणे काढून टाकले जात नाही तोपर्यंत चित्रपट प्रदर्शित करू नये.
४. गाण्याचे टीव्ही प्रक्षेपण बंद करण्यासाठी माहिती आणि प्रसारण मंत्रालयाला पत्र लिहिले की, हे गाणं टीव्हीवर दाखवू नये.
सुभाष घई त्यांच्या मागण्या मान्य करण्याच्या मनस्थितीत नव्हते. त्यामुळे ते ही संपूर्ण तयारीनिशी कोर्टात पोहोचले. पण घई यांना फारशी मेहनत करावी लागली नाही कारण ज्या दिवशी खटल्याची तारीख होती, त्या दिवशी चुग न्यायालयात न पोचल्यामुळे खटला फेटाळण्यात आला. सुभाष घई यांची कायदेशीर पेचातून सुटका झाली. पण या प्रकरणाची बातमी लोकांपर्यंत पोहोचली होती. त्यानंतर अनेकजण या गाण्याविरोधात पुढे आले. (Controversial Song)
तत्कालीन ‘सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशन’चे (CBFC) अध्यक्ष शक्ती सामंत यांना 200 हून अधिक पत्रे मिळाली होती. भाजप महिला विंगच्या अध्यक्षांनी चुग यांच्या याचिकेचा संदर्भ देत लिहिले की, हे गाणे अश्लील आहे. यामुळे विनयभंगाच्या घटना वाढल्या आहेत. फरीदाबादचे रहिवासी विनीत कुमार यांनीही आपल्या तक्रारीत असेच काहीसे लिहिले होते. गाण्याच्या विरोधात लिहिलेल्या सर्व पत्रांमध्ये ते हटवण्याची मागणी करण्यात आली होती. एकीकडे अशी परिस्थिती होती, तर दुसरीकडे काहीजण गाण्याच्या बाजूनेही बोलत होते. हे गाणं ‘चोली के पीची’ हे राजस्थानी लोकगीतेवर आधारित असल्याचा दाखल देण्यात आला होता.
जेव्हा चित्रपट पूर्ण होऊन सेन्सॉर बोर्डाकडे गेला तेव्हा बोर्डाने त्यामध्ये एकूण सात ‘कट’ सुचवले. सात कटपैकी तीन कट ‘चोली के पीछे’ या गाण्यात होते. या गाण्यातली ही मुख्य ओळ काढून टाकायला सांगण्यात आलं होतं. हे बदल केल्यावरच चित्रपटाला U/A प्रमाणपत्र दिले जाईल, असे सांगण्यात आले. घई यांनी बहुतांश ‘कट’ मान्य केले, मात्र चोली के पीछे गाण्याबाबतचे कट मात्र त्यांना मान्य नव्हते. (Controversial Song)
यासंदर्भात त्यांनी सेन्सॉर बोर्डाशी चर्चा केली आणि अखेर घई आपला मुद्दा पटवून देण्यात यशस्वी झाले. त्यानुसार गाण्याची ओळ तशीच ठेवण्यात आली, पण गाण्याच्या डान्स स्टेपच्या ‘कट’ बाबत मात्र सेन्सॉर बोर्ड ठाम राहिलं आणि घईंना ती स्टेप बदलावी लागली.
सर्व संकटांमधून मुक्त होऊन ‘खलनायक’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. पण लोकांचा गाण्याला असलेला विरोध कायम होता. अखेर समाजातील काही मान्यवर व्यक्तींनी, “हे गाणं चित्रपटाच्या कथानकाची गरज आहे”, असं सांगून लोकांची समजूत काढली आणि त्यानंतर हळूहळू सर्व विरोध मावळला. ‘खलनायक’ त्या वर्षीचा ब्लॉकबस्टर हिट चित्रपट ठरला.
=======
हे देखील वाचा – रोजा (Roja): या सत्यघटनेवरून मणिरत्नम यांना सुचली चित्रपटाची संकल्पना
=======
या चित्रपटाला फिल्मफेअर अवॉर्डसाठी एकूण ११ नॉमिनेशन्स मिळाली होती. यापैकी केवळ दोन पुरस्कार मिळाले. विशेष म्हणजे हे दोन्ही पुरस्कार विवादित ‘चोली के पीछे है’ या गाण्यासाठीच मिळाले होते. यापैकी एक सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका – अलका याज्ञिक आणि इला अरुण आणि दुसरं सर्वोत्कृष्ट नृत्यदिग्दर्शिका सरोज खान यांना. अशा रीतीने अनेक संकटामधून ठरलेल्या या गाण्याने फिल्मफेअर पुरस्कारावर आपली मोहोर उमटवली. (Controversial Song)
– भाग्यश्री बर्वे