दिग्दर्शक सुभाष घई आणि गीतकार आनंद बक्षी यांचे जबरदस्त ट्युनिंग!
चार दिवस सासूचे: या मालिकेचं नाव चक्क ‘लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये नोंदविण्यात आलं..
आठवणीतील मालिका लिहिताना ‘चार दिवस सासूचे’ या मालिकेला विसरून चालणारच नाही. मराठीमध्ये बहुदा सास – बहू मालिकांची सुरवात याच मालिकेपासून झाली असावी. ‘इ टीव्ही मराठी’ (आता कलर्स मराठी) या वाहिनीवर २६ नोव्हेंबर २००१ साली सुरु झालेली ही मालिका प्रदीर्घ काळ सुरु होती. अखेर ५ जानेवारी २०१३ रोजी मालिकेने सर्वांचा निरोप घेतला. मालिकेचं एकूण ३१४७ भाग प्रसारित झाले होते. (Char Divas Sasuche)
या मालिकेचं अजून एक वैशिष्टय म्हणजे, मालिकेचं नाव भारतीय टेलिव्हिजनवर ‘सर्वाधिक काळ चालणारी मालिका’ म्हणून ‘लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये नोंदविण्यात आलं. कोणी काहीही म्हणो, पण सलग ११ वर्ष रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणं ही गोष्ट साधी निश्चितच नाही. त्याकाळी स्टार प्लस वाहिनीवरील ‘क्योंकी सास भी कभी बहू थी…’ ही मालिका लोकप्रियतेच्या शिखरावर होती. परंतु त्यापेक्षाही जास्त लोकप्रियता ‘चार दिवस सासूचे’ या मालिकेला लाभली होती.
‘चार दिवस सासूचे’ या मालिकेची कथा म्हणजे ‘कौटुंबिक मेलोड्रामा’ होता. हिंदी मालिकांसारखे भव्य दिव्य सेट्स, साड्या नेसून वावरणाऱ्या बायका, ‘लेडी व्हिलन’ हे सगळे प्रकार यामध्ये होते. देशमुख कुटुंबात सून बनून आलेली अनुराधा सुरुवातीला तिच्या सासूला पसंत नसते. पण नंतर तीच तिची सर्वात लाडकी सून बनते. तिच्या या प्रवासात तिची मोठी जाऊ सुप्रिया, तिच्या पतीवर – रविवार एकतर्फी प्रेम करणारी आणि देशमुख घराण्याची सून व्हायचं स्वप्न बघणारी निशा असे अनेक अडथळे येतात. पण अनुराधा आपल्या सोशिक आणि प्रेमळ स्वभावाने सगळ्यांची मनं जिंकून घेते. अर्थात ही मुख्य कथा पुढे मारुतीच्या शेपटासारखी वाढत गेली आणि जोडीला तेवढीच उपकथानकंही ओघाने आलीच. (Char Divas Sasuche)
अकरा वर्ष! या मोठ्या कालावधीत मालिकेमध्ये एवढी उपकथानकं दाखवण्यात आली की, त्यावरील प्रत्येक कथानकावर स्वतंत्र मालिका तयार होऊ शकेल. या प्रवासात मालिकेमध्ये कित्येक पात्र आली आणि गेली. निशा, मृदुला या महत्त्वाच्या भूमिका करणाऱ्या कलाकारांनी मालिका सोडली आणि त्यांच्या जागी नवे चेहरे आले. इतकंच काय नायकाची भूमिका करणाऱ्या पंकज विष्णूनेही नंतर ही मालिका सोडली आणि त्याच्या जागी राजेश शृंगारपुरे रवीच्या भूमिकेत प्रेक्षकांसमोर आला. प्रेक्षकांनी हा मोठा बदलही स्वीकारला आणि मुख्य म्हणजे यामुळे मालिकेच्या लोकप्रियतेमध्ये तसूभरही फरक पडला नाही.
या मालिकेमध्ये कविता लाड ही अभिनेत्री अनुराधाच्या मुख्य भूमिकेत होती. आपल्या सहज सुंदर अभिनयाने तिने ही भूमिका यशस्वीपणे निभावली. या मालिकेत काम करण्यापूर्वी तिने ‘एका लग्नाची गोष्ट’ व अन्य काही नाटकं व मालिकांमध्येही काम केलं होतं. पण तिला खरी ओळख मिळवून दिली ती अनुराधाच्या भूमिकेने. या भूमिकेमुळे ती घराघरांत पोचली. मालिकेमध्ये ‘आशालता’ म्हणजेच अनुराधाची सासू (रोहिणी हट्टंगडी) ही भूमिकाही अनुराधाइतकीच महत्त्वाची होती. (Char Divas Sasuche)
या मालिकेत खलनायिकेची व्यक्तिरेखा साकारणारी सुनीला करंबेळकर (सुप्रिया) हिने एका मुलाखतीमध्ये सांगितलं होतं की, एकदा एक व्यक्ती तिला येऊन म्हणाली, “आय हेट यु.” सुनीलाला काहीच कळेना. एक अनोळखी व्यक्ती मला असं का म्हणतेय? म्हणून तिने याबद्दल त्या व्यक्तीला याबद्दल विचारलं असता, ती व्यक्ती म्हणाली, “आय हेट यु सुप्रिया… कारण तू अनुराधाला खूप त्रास देतेस.” हे वाक्य ऐकल्यावर सगळा प्रकार सुनीलच्या लक्षात आला. एकप्रकारे ही तिच्या अभिनयासाठी आणि अनुराधाच्या लोकप्रियतेसाठी मिळालेली पोचपावती होती.
मालिकेला शहरी भागांतील प्रेक्षकवर्गाइतकाच किंबहुना जास्त प्रेक्षकवर्ग ग्रामीण भागात लाभला. गावांमध्ये तर कित्येक बायका निशा (श्वेता शिंदे) आणि सुप्रियाला शिव्या देत असत आणि प्रत्येक बाई आपली होणारी सून अनुराधासारखी असावी, असं म्हणत असे. मालिकेसंदर्भातील असे अनेक किस्से त्यावेळच्या माध्यमांमध्ये प्रकाशीत झाले होते. (Char Divas Sasuche)
एकूण ११ वर्षांत अनेक कलाकार बदलले, काही नवीन आले, काही सोडून गेले; मालिकेने लीपही घेतला. त्यामुळे मालिकेमध्ये मराठी मनोरंजन क्षेत्रातील अनेक कलाकारांनी काम केलं आहे. पंकज विष्णू, आनंद काळे, प्राजक्ता कुलकर्णी, विलास उजवणे, जयंत घाटे, सागर तळाशीकर, पल्लवी सुभाष, भार्गवी चिरमुले, राजेश शृंगारपुरे, प्रसाद ओक, विकास पाटील, अभिजित केळकर, मानसी नाईक, सारिका निलाटकर, दीप्ती देवी, स्मिता ओक, तृप्ती भोईर, प्रिया मराठे, कश्मिरा कुलकर्णी, आनंद अभ्यंकर अशा कितीतरी कलाकारांनी यामध्ये काम केलं होतं.
=====
हे देखील वाचा – माझिया प्रियाला प्रीत कळेना: बालाजी टेलिफिल्म्सची पहिली मराठी मालिका
====
या मालिकेला IMDB वर ६.१ रेटिंग देण्यात आलं आहे. ही मालिका voot या कलर्स मराठीच्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे. (Char Divas Sasuche)