दिग्दर्शक सुभाष घई आणि गीतकार आनंद बक्षी यांचे जबरदस्त ट्युनिंग!
अंग्रेज नाही, भारतात जन्मला होता ‘हा’ अभिनेता; इंग्रजीसह हिंदी, उर्दू भाषेवरही होतं प्रभुत्व
आमिर खानच्या लगान चित्रपटामध्ये एलिझाबेथची भूमिका करणारी ब्रिटीश अभिनेत्री ‘रचेल शेली’ आणि कॅप्टन रसेलची भूमिका करणारे ‘पॉल ब्लॅकथॉर्न’ हे दोन्हीही हॉलिवूडचे कलाकार होते. तसं बघायला गेलं तर, बॉलिवूडच्या चित्रपटांमध्ये परदेशातील कलाकारांनी भूमिका केल्या आहेत. परंतु बॉलिवूडमधल्या अनेक चित्रपटांमध्ये झळकलेला एक अभिनेता असा आहे जो सर्वाना ब्रिटिश अभिनेता वाटतो. परंतु प्रत्यक्षात मात्र तो जन्माने भारतीय आहे. या अभिनेत्याचं नाव होतं ‘टॉम अल्टर’ (Tom Alter).
सत्तरच्या दशकापासून चित्रपटसृष्टीमध्ये कार्यरत असणाऱ्या टॉम अल्टर या अभिनेत्याने कित्येक हिंदी, इंग्लिश चित्रपटांसह प्रादेशिक भाषेतील चित्रपटांमध्येही काम केलं आहे. अनेकजण त्यांना ब्रिटिश अभिनेता समजत असत. त्यांची बॉलिवूडमधली कारकीर्द सत्तरच्या दशकात सुरु झाली.
टॉम अल्टर (Tom Alter) यांनी चरस, हम किसी से कम नही, देस परदेस, जुनून, क्रांती, कुदरत, गांधी, विधाता, नास्तिक, राम ‘तेरी गंगा मैली, कर्मा त्रिदेव, परिंदा, वीर झारा, अशा कितीतरी हिंदी चित्रपटांसोबत मल्याळी, बंगाली, इंग्लिश, कन्नड, गुजराती भाषेतील चित्रपटांमध्येही त्यांनी काम केलं आहे. १९७७ साली आलेल्या चानी या मराठी चित्रपटातही ते महत्त्वाच्या भूमिकेत होते. तसंच भारत एक खोज, जुनून, आहट, कॅप्टन व्योम, शक्तिमान, इ अनेक मालिकांमध्येही त्यांनी विविधरंगी भूमिका साकारल्या आहेत. टॉम अल्टर यांनी नाटकांमध्येही काम केलं आहे.
पूर्वायुष्य
२२ जून १९५० रोजी एका अमेरिकन ख्रिश्चन मिशनरी कुटुंबात जन्मलेले टॉम अल्टर (Tom Alter) भारतीय वंशाचे नव्हते, पण त्यांचा जन्म मात्र भारतात झाला आहे. नोव्हेंबर १९१६ मध्ये त्यांचे आजी-आजोबा अमेरिकेतील ओहायो राज्यातून भारतात आले. त्यानंतर ते लाहोर, रावळपिंडी, पेशावर, सियालकोट परिसरात काम करू लागले. पुढे सियालकोटमध्ये टॉमच्या वडिलांचा जन्म झाला. कालांतराने टॉमचे वडील कुटुंबासह भारतात आले. अलाहाबाद, सहारनपूर, जबलपूर, असा प्रवास करत राजपूर (डेहराडून आणि मसुरीच्या मधलं शहर) येथे स्थायिक झाले. १९५४ ते १९६८ या काळात टॉम राजपूरमध्येच राहिले. त्यांचं शालेय शिक्षण मसुरीच्या वुडस्टॉक स्कूलमध्ये झालं आहे.
राजपूर हे अत्यंत शांत गाव. आजही राजपूरमध्ये अनेक आश्रम आणि मंदिरं आहेत. अशा शांत ठिकाणी बालपणाचा संपूर्ण काळ व्यतीत झाल्यामुळे टॉम तसे ते शहरी संस्कृतीपासून लांबच होते. त्यात संपूर्ण कुटुंब मिशनरी असल्यामुळे कुटुंबात नेहमी अमेरिकन आणि भारतीय संस्कृती, भारत -पाकिस्तान फाळणी अशा अनेक विषयांवर चर्चा व्हायच्या. परंतु टॉम यांनी त्यामध्ये कधी विशेष रस घेतला नाही. त्यांना आवड होती ती मनोरंजनाच्या दुनियेची. त्यावेळी घरात टीव्ही नव्हता. थिएटर तर डेहराडूनमध्ये,घरापासून तसं लांबच. तरीही ते महिन्यातून एकदा चित्रपट पाहायला जायचे.
एक ना धड भाराभर चिंध्या
टॉम (Tom Alter) कॉलेजसाठी अमेरिकेच्या येल विद्यापीठात गेले. परंतु तिथला अभ्यास न झेपल्यामुळे वर्षभरातच भारतात परत आले. त्यांनतर सेंट थॉमस स्कूल, जगाधरी, हरियाणा येथे वयाच्या १९ व्या वर्षी ते शिक्षक म्हणून रुजू झाले. काही दिवसांनी त्यांनी ती नोकरीही सोडली आणि वुडस्टॉक शाळेत रुजू झाले. या शाळेत त्यांचे काका प्राचार्य होते. तिथे काही दिवस काम करून ते पुन्हा अमेरिकेला गेले आणि तिथल्या एका हॉस्पिटलमध्ये नोकरी करू लागले. सुमारे अडीच वर्षांनंतर काकांच्या सांगण्यावरून ते भारतात परत आले. त्यांची कारकीर्द कुठेच स्थिरावत नव्हती. ‘एक ना धड भाराभर चिंध्या’ अशी त्यांची अवस्था झाली होती.
आराधना चित्रपटाने दिली आयुष्याला दिशा
१९७० साली आलेला राजेश खन्ना यांचा ‘आराधना’ चित्रपट त्यांनी पाहिला आणि त्यांच्या डोक्यात अभिनेता बनण्याचा विचार घोळू लागला. अखेर तब्बल दोन वर्षांनी हा विचार पक्का करून त्यांनी पुण्यातील फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (FTII) मध्ये त्यांनी ॲडमिशन घेतली १९७२ ते १९७४ पर्यंत ते पुण्यात होते. या काळात रोशन तनेजा हे त्यांचे गुरू होते.
एफटीआयआय , सहकारी आणि क्रिकेट
एफटीआयआय मध्ये नसीरुद्दीन शाह आणि ओम पुरी त्यांचे ज्युनिअर तर, शबाना आझमी सिनिअर होत्या. त्यांना क्रिकेटचीही आवड होती. दोन वर्षे एफटीआयआय मध्ये क्रिकेटचे कर्णधार होते. नसरुद्दीन शहा देखील त्याच्यासोबत भरपूर क्रिकेट खेळायचे. या काळात टॉम आणि नासिर यांची खूप छान मैत्री झाली होती.
==========
हे देखील वाचा – बॉलिवूडमधले बहुचर्चित चित्रपट बॉक्स ऑफिसवर अयशस्वी, तर काही चित्रपटांना अनपेक्षित यश
==========
लेखनातही मारली बाजी
अल्टर (Tom Alter) यांनी ‘द लॉन्गेस्ट रेस’, ‘रिटर्न ॲट रियाल्टो आणि ‘द बेस्ट इन द वर्ल्ड’ ही पुस्तके लिहिली आहेत. इंग्रजी प्रमाणेच त्यांनी उर्दू भाषेतही लेखन केलं आहे. क्रिकेटमध्ये विशेष स्वारस्य असल्यामुळे त्यांनी क्रीडा पत्रकार म्हणूनही काम केलं होतं. स्पोर्ट्सवीक, आउटलुक, क्रिकेट टॉक, संडे ऑब्झर्व्हर, फर्स्टपोस्ट, सिटिझन आणि डेबोनेअर अशा अनेक ठिकाणी क्रिकेटबद्दल विस्तृतपणे लेखन केलं आहे. इंग्रजीसह त्यांचे हिंदी व उर्दू भाषेवरही प्रभुत्व होते. इतकंच नाही तर त्यांनी उर्दू भाषेत लेखनही केलं आहे. १९९६ मध्ये, इएसपीएन चॅनेलवर, हिंदीमध्ये क्रिकेट कॉमेंट्रीही केली होती. अखेर २९ सप्टेंबर २०१७ रोजी मुंबई येथे त्यांच्या राहत्या घरी त्वचेच्या कर्करोगामुळे त्यांचा मृत्यू झाला.