खळखळून हसायला लावणाऱ्या या कॉमेडी वेबसिरीज आवर्जून बघा…
सध्याच्या ताणतणावाच्या आयुष्यात चार घटका करमणूक हवी असते. अनेकदा टीव्ही मालिकांच्या त्याच त्याच कहाण्या बघून कंटाळा येतो. चित्रपट बघायचा तर बहुतांश चित्रपट बघून झालेले असतात किंवा तीन तास डोक्याला ‘शॉट’ न देणारा चित्रपट शोधणं जरा कठीणच काम. त्यात तीन तासांचा वेळ आपल्याजवळ असेलच असं नाही. पण ओटीटी प्लॅटफॉर्मने मात्र करमणुकीचं भांडारच समोर उघडून ठेवलं आहे. त्यामुळे संध्याकाळी ७ ते १० घरातल्या टीव्हीचा रिमोट तुमच्या हातात येत नसेल, तरीही हरकत नाही. तुम्ही तुमच्या मर्जीचे कार्यक्रम या ओटीटी प्लॅटफॉर्म्सवर बघू शकता. आजच्या लेखात तुमचा ‘स्ट्रेस’ कमी करून तुम्हाला खळखळून हसायला लावणाऱ्या वेबसिरीजची माहिती दिली आहे. तेव्हा आता रिमोट हातात मिळत नसला तरी नो टेन्शन… (Best comedy web series)
पिचर्स (Pitchers)
पिचर्स ही आत्तापर्यंतची सर्वोत्तम भारतीय विनोदी मालिका आहे, असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. यामध्ये मंडल, नवीन बन्सल आणि जीतू या नोकरी सोडून स्टार्टअप सुरु करायचा विचार करणाऱ्या तीन मित्रांची कहाणी दाखवण्यात आली आहे. जेव्हा ते स्टार्टअप चालवण्याचा प्रयत्न करतात तेव्हा अनेक मजेदार गोष्टी घडतात.
अमित गोलानी दिग्दर्शित या सिरीजमध्ये नवीन कस्तुरिया, अरुणाभ कुमार, जितेंद्र कुमार, मानवी गाग्रू, गोपाल दत्त, अभय महाजन हे कलाकार प्रमुख भूमिकेत आहेत. सिरीजचा आत्तापर्यंत एकच सिझन प्रदर्शित झाला असून या सीझनमध्ये एकूण ५ भाग आहेत. ही वेब सिरीज TVFPlay वर अगदी मोफत पाहू शकता. IMDB वर या वेबसीरिजला ९.१ रेटिंग देण्यात आलं आहे
ह्यूमरसली युवर्स (Humorously Yours)
आपल्याला वाटतं विनोदी कलाकारांचं आयुष्य अगदी आनंदी असेल. त्यांच्या अवतीभोवतीचे लोक सतत हसत असतील. पण विनोदी कलाकार किंवा कॉमेडियन देखील सामान्य माणूस असतो. त्यांच्याही आयुष्यात चढ – उतार असतातच. आयुष्यात अनेकदा त्यांना कठीण परिस्थितीचा सामना करावा लागतो. या वेबसिरीजमधून विपुल गोयल यांनी काही लोकप्रिय विनोदी कलाकारांची जीवनशैली उलगडून दाखवली आहे. ही सिरीज खळाळून हसवते, पण त्याच वेळी विचार करायलाही भाग पाडते.
या सिरीजमध्ये विपुल गोयल, अभिषेक बॅनर्जी, आसिफ खान, रसिका दुगल, पियुष शर्मा या कलाकारांच्या भूमिका आहेत. दीपक कुमार मिश्रा आणि अमित गोलानी दिग्दर्शित ही वेब सिरीज TVFPlay वर अगदी मोफत पाहू शकता. IMDB वर या वेबसीरिजला ८.६ रेटिंग देण्यात आलं आहे. (Best comedy web series)
ट्रिपलिंग (TVF Tripling)
ट्रिपलिंगची कथा चितवन शर्मा, चंदन शर्मा आणि चंचल शर्मा या तीन भावंडांची कहाणी आहे. ही तिन्ही भावंडं अनेक वर्षांपासून वेगळे राहत असतातत. परंतु, एक अनियोजित रोड ट्रिप त्यांना जवळ आणते. या ट्रिप दरम्यानची धमाल खळखळून हसवते. ही एक अप्रतिम कॉमेडी वेबसिरीज आहे.
समीर सक्सेना आणि राजेश कृष्णन दिग्दर्शित या सिरीजचे २ सिझन प्रदर्शित झाले असून, दोन्ही सिझन मिळून सीरिजचे एकूण १० भाग आहेत. या सिरीजमध्ये सुमीत व्यास, अमोल पराशर, मानवी गाग्रू, कुमुद मिश्रा, कुणाल रॉय कपूर, निधी बिश्त प्रमुख भूमिकेत आहेत. ही सिरीज तुम्ही TVFPlay या ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहू शकता. IMDB वर या वेबसीरिजला ८.५ रेटिंग देण्यात आलं आहे. (Best comedy web series)
मेट्रो पार्क (Metro Park)
अमेरिकेत स्थायिक झालेल्या पटेल नावाच्या गुजराती कुटुंबाची कथा यामध्ये दाखवण्यात आली आहे. या सिरीजच्या संकल्पनेबद्दल एक वाक्यात सांगायचं तर, “तुम्ही माणसाला गुजरातमधून बाहेर काढू शकता, पण गुजरातला माणसामधून बाहेर काढू शकत नाही.” पटेल कुटुंब परदेशात स्थायिक झाले असले तरी त्यांची जुनी जीवनशैली अजिबात विसरले नाहीयेत. ही एक कौटुंबिक – विनोदी वेबसिरीज आहे. तुम्ही कितीही उदास असलात तरी ही सिरीज बघताना तुम्ही खळखळून हसाल यात शंकाच नाही.
=============
हे ही वाचा: आवर्जून पाहायलाच हवेत असे टॉप ५ मराठी सस्पेन्स थ्रिलर चित्रपट
बॉलिवूडमध्ये चमकलेल्या ‘या’ मराठी अभिनेत्री सध्या कुठे गायब आहेत?
सिरीजचे एकूण २ सिझन प्रदर्शित झाले असून, दोन्ही सिझन मिळून २१ भाग आहेत. यापैकी ५ विशेष भाग आहेत. अबी वर्गीस आणि अजयन वेणुगोपालन दिग्दर्शित या सिरीजमध्ये वेगा तमोटिया, रणवीर शौरी, ओमी वैद्य, पूरबी जोशी आणि आशमी जोशी प्रमुख भूमिकेत आहेत. IMDB वर या सीरिजला ८.४ रेटिंग देण्यात आलं आहे. ही सिरीज तुम्ही अमेझॉन प्राईम, एअरटेल एक्सस्ट्रीम आणि जीओ सिनेमावर बघू शकता.