कळत नकळत: रहस्याची छोटीशी किनार असणारी आठवणीतली प्रेमकहाणी
मराठी मालिकांमध्ये त्याकाळी कौटुंबिक मालिका आणि काही प्रमाणात विनोदी कथानक असणाऱ्या मालिका विशेष लोकप्रिय होत्या. या कथानकांमध्ये प्रेमकथा तोंडी लावण्यापुरताच असायच्या. पण याच काळात एका प्रेमकथेनं रसिकांच्या मनावर तब्बल दोन वर्ष अधिराज्य गाजवलं होतं. २००७ साली झी मराठी वाहिनीवर रहस्याची छोटीशी किनार असणारी एका वेगळ्या वळणावरची प्रेमकथा प्रेक्षकांसमोर आली. या मालिकेमध्ये लव्ह ट्रँगल नाही, तर लव्ह स्क्वेअर दाखवण्यात आला होता. ही मालिका होती ‘कळत नकळत’(Kalat Nakalat).
नागपूरमध्ये राहणारी मधुरा एक हुशार, सुंदर आणि सुसंकृत मुलगी. लहानपणापासूनच मधुरानं अभिनेत्री व्हायचं स्वप्न बघितलेलं असतं. पण तिच्या कडक शिस्तीच्या वडिलांना हे मान्य नसतं. मधुरा शिक्षण पूर्ण करून आपल्या मित्राच्या – गौरवच्या ऑफिसमध्ये नोकरी करत असते. स्वावलंबी असूनही तिच्या मनात सतत वडिलांबद्दल आदरयुक्त भीती असते. सरळमार्गी मधुराचं भूषणवर प्रेम असतं. पण भूषण तिच्या योग्यतेचा नसतो त्यामुळे तिच्या वडिलांनी तिचं लग्न विशाल पांडेशी ठरवलेलं असतं.
गौरवही मधुराला भूषण चांगला मुलगा नसल्याचं परोपरीने पटवून द्यायचा प्रयत्न करत असतो. पण भूषणवर मनापासून प्रेम करणाऱ्या मधुराला ते पटत नाही. तिला फक्त भूषणशीच लग्न करायचं असतं. अखेर मधुरा भूषणसोबत पळून जायचं ठरवते. त्यासाठी ती घरातून बाहेर पडते, पण भूषण येतच नाही. कारण त्याला मधुरामध्ये नाही, तर तिच्या कुटुंबाच्या पैशांमध्ये रस असतो. भूषण न आल्यामुळे मधुरा घरी परतते. पण हा सर्व प्रकार तिच्या वडिलांना कळतो व ते तिला घरातून बाहेर काढतात. एकाकी, हतबल झालेल्या मधुराला गौरव आधार देतो आणि तिला मुंबईला घेऊन जातो. (Memories of Marathi serial Kalat Nakalat)
गौरव उद्योगपती अण्णासाहेब अभ्यंकरांचा नातू असतो. त्याला लग्न करायचं नसतं, पण त्याचे आजोबा लग्नासाठी त्याच्या मागे लागलेले असतात. म्हणून तो मधुराला त्याची पत्नी असल्याचं नाटक करायला सांगतो. पती पत्नीचं नाटक करता करता दोघं खरोखरच एकमेकांच्या प्रेमात पडतात. पण गौरवच्या सावत्र आईला सर्व संपत्ती तिच्या मुलाच्या नावावर व्हावी असं वाटत असल्यामुळे ती गौरव विरुद्ध षडयंत्र रचते आणि हनिमूनला गेलेल्या गौरव – मधुराचा संसार बहरायच्या आधीच मधुरा विधवा होते.
गौरवच्या मृत्यूनंतर त्याचे आजोबा मधुराला आधार देतात. हळूहळू मधुरा सावरते आणि आजोबांच्या सल्ल्याने व्यवसायात लक्ष घालू लागते. पण तिचा प्रवास सोपा नसतो. भूषण तिच्या नणंदेचा नवरा बनून तिच्यासमोर येतो. याच दरम्यान हुबेहूब गौरव सारखाच दिसणारा मुलगा तिच्या आयुष्यात येतो. आता तो खरंच गौरव आहे की अजून कोणी याचा शोध मधुरा घेऊ लागते. पण तिच्या पदरी निराशाच येते कारण तो गौरव नसून रोहित असतो.
गौरव आणि रोहित यांचा फक्त चेहराच सारखा असतो पण स्वभाव भिन्न असतात. मधुरासमोर रोहित स्वतःला अगदी ‘जेंटलमन’ असल्याचं भासवत असतो. पण प्रत्यक्षात तो अत्यंत स्वार्थी आणि आपमतलबी असतो. स्वतःच्या फायद्यासाठी तो कोणाचाही वापर करायला मागे पुढे पाहत नाही. पण मधुरा हळूहळू रोहितमध्ये गुंतत जाते आणि त्याच्याशी लग्न करते. या दरम्यान रोहितच्या स्वार्थीपणामुळे ती अनेकदा अडचणीत येते, पण तरीही रोहितचं खरं रूप तिच्यासमोर येत नाही. अखेर मधुराचं खरं प्रेम जिंकतं आणि हळूहळू रोहित सुधारतो. शेवट गोड होतो.
==============
हे ही वाचा: चंद्रमुखी चित्रपटानंतर तमाशापटांचा ‘तो काळ’ पुन्हा येणार का?
हा अभिनेता करीत असे स्वतःच्याच चित्रपटांची तिकीट विक्री!
===============
मालिकेमध्ये मधुराची बहीण, सावत्र सासू, नंणद ऋतू, रोहितची मैत्रीण अशी अनेक उपकथानकंही होती. मालिकेचं शीर्षकगीत कमालीचं लोकप्रिय झालं होतं, खरंतर आजही लोकप्रिय आहे. हळुवार प्रेमाची आस, त्याची चाहूल असे सर्व भाव या गीतामध्ये होते. मालिकेमध्ये ऋजुता देशमुख (मधुरा), अनिकेत विश्वासराव (गौरव/ रोहित), सुबोध भावे (भूषण), सुनील बर्वे (विशाल पांडे), सुकन्या कुलकर्णी, हर्षदा खानविलकर, प्रिया मराठे, माधव अभ्यंकर, इ कलाकार महत्त्वपूर्ण भूमिकेत होते. (Memories of Marathi serial Kalat Nakalat)
मालिकेची सर्वात मोठी जमेची बाजू म्हणजे मालिकेचं सशक्त कथानक. साधारणतः मोठ्या पडद्यावर दिसणारी हळवी प्रेमकहाणी छोट्या पडद्यावर अनुभवता आल्याने प्राईम टाइम न मिळूनही मालिका प्रचंड लोकप्रिय झाली होती. झी मराठी अवॉर्ड्समध्ये सलग तीन वर्ष मधुरा आणि गौरव या जोडीला सर्वोत्कृष्ट जोडी, तर मालिकेच्या शीर्षकगीताला सर्वोत्कृष्ट शीर्षकगीत आणि गीतकार हे पुरस्कार मालिकेच्या नावावर जमा झाले होते. ही मालिका बघायची असल्यास ती झी 5 तसंच युट्यूबवरही उपलब्ध आहे.