दिग्दर्शक सुभाष घई आणि गीतकार आनंद बक्षी यांचे जबरदस्त ट्युनिंग!
अनुबंध: ‘सरोगेट मदर’ या संकल्पनेवर आधारित हृदयस्पर्शी मालिका
सरोगेट मदर! आई होण्याचं भाग्य ज्या महिलांना मिळत नाही अशा महिलांसाठी मेडिकल सायन्सने एक खूप मोठं वरदान दिलं आहे; ते म्हणजे, सरोगसी. अर्थात सायन्सने कितीही प्रगती केली तरी निसर्गापुढे कायमच त्याला हार मानवी लागली आहे. आई होणं ही केवळ शारीरिक प्रक्रिया नाही, तर ती एक नैसर्गिक भावना आहे. त्यामुळे कोणतीही उपचार पद्धती, कोणताही करार या भावनेचा बाजार मांडू शकत नाही. अशाच ‘सरोगेट मदर’ या संकल्पनेवर आधारित मालिका झी मराठीवर २००९ साली प्रक्षेपित करण्यात आली होती. ही मालिका होती अनुबंध (Anubandh)!
कौटुंबिक आणि प्रेमकहाण्यांवर आधारित मालिकांच्या जमान्यात ‘सरोगसी’ सारख्या नाजूक विषयावर मालिका आणि ती देखील प्राईम टाईमला प्रक्षेपित करणं हे मोठं धाडस होतं. पण प्रेक्षकांनी या वेगळ्या वाटेवरच्या मालिकेचंही अगदी मनापासून स्वागत केलं.
एक श्रीमंत, सुसंस्कृत जोडपं शुभंकर आणि नमिता प्रधान, तर एकमेकांवर प्रेम करणारे समीर आणि अश्विनी सर्वसामान्य मध्यमवर्गीय कुटुंबातील. या चौघांचा एकमेकांशी खरंतर काहीच संबंध नसतो. पण नियती या चौघांमध्ये एक वेगळंच नातं निर्माण करते. या नात्याने हे चौघं इच्छा नसतानाही एकमेकांशी जोडले जातात आणि त्यांच्यामध्ये तयार होता एक अनुबंध!
शुभंकर आणि नमिता प्रधान या जोडप्याच्या लग्नाला बरीच वर्ष होऊन गेलेली असतात. नमिता मातृसुखासाठी तळमळत असते. अशावेळी डॉक्टर त्यांच्यासमोर एक पर्याय ठेवतात तो म्हणजे ‘सरोगसीचा’. ‘सरोगेट मदर’ पाहिजे म्हणून शुभंकर पेपरमध्ये जाहिरात देतो. इतकंच नाही तर यासाठी २५ लाख रुपये द्यायची तयारीही दाखवतो. (Memories of Anubandh Marathi serial)
समीर आणि अश्विनीचं लग्न ठरलेलं असतं. समीरला उच्च शिक्षणासाठी अमेरिकेला जायचं असतं आणि त्यासाठी त्याला १० लाख रुपयांची गरज असते. त्यामुळे पैशाची जमवाजमव करून लवकरात लवकर अमेरिकेला जाऊन शिक्षण पूर्ण करून भारतात परत यायचं आणि अश्विनीशी लग्न करायचं असं त्याचं साधं सरळ स्वप्न असतं. केतकी उर्फ किटी आणि रोहन हे अजून एक जोडपं. किटी आणि रोहनचं एकमेकांवर प्रेम असतं आणि ती दोघं लिव्ह इन मध्ये राहत असतात. पण किटीला उच्चभ्रू जीवनशैलीचं आकर्षण असतं.
शुभंकरने दिलेली सरोगसीची जाहिरात किटी बघते आणि शुभंकर -नमिताच्या बाळाची ‘सरोगेट मदर’ व्हायचं ठरवते. तिचा हा निर्णय जेव्हा रोहनला कळतो तेव्हा त्यांच्यामध्ये खूप मोठं भांडण होतं. अश्विनी तिला समजवायचा प्रयत्न करते, पण ती कोणाचंच ऐकत नाही. या प्रकारामुळे समीरच्या मनात किटीबद्दल प्रचंड चीड निर्माण होते.
पुढे समीरला कर्ज मिळतं आणि तो अमेरिकेला निघून जातो. किटीची सरोगसी फेल जाते आणि नियतीचं चक्र असं काही फिरतं की, अश्विनीला नाईलाजाने शुभंकर -नमिताच्या बाळाची ‘सरोगेट मदर’ व्हावं लागतं. सरोगसीचा प्रक्रिया पूर्ण होते आणि अश्विनी गरोदर राहते. शुभंकर -नमिताच्या आनंदाला पारावर राहत नाही. नमिता अश्विनीला फुलासारखी जपत असते. पण अगदी सत्ययुगापासून प्रत्येक युगात ‘मंथरा’ कोणत्या ना कोणत्या रूपात वावरत असतेच. तसंच इथेही होतं. आणि यामुळे नमिताच्या मनात असुरक्षिततेची भावना निर्माण होते. (Memories of Anubandh Marathi serial)
===============
हे ही वाचा: या लोकप्रिय मराठी मालिकांचं कथानक नाही ‘ओरिजिनल’; आहेत अन्य भाषांतील मालिकांचे रिमेक
‘या’ म्युझिक अल्बम्सच्या ‘१२ लाख’ कॅसेट्सची झाली होती विक्रमी विक्री!
===============
अश्विनीला फुलासारखं जपणारी नमिता तिच्यावर संशय घेऊ लागते. हळूहळू नमिताचं वागणं बदलत जातं. तिचा शुभंकरबाबत असणारा पझेसिव्हनेस वाढतच जातो आणि अशातच जवळपास अशक्य वाटणारी एक घटना घडते ते म्हणजे नमिता गरोदर राहते. याचदरम्यान समीर अचानक भारतात परत येतो आणि अश्विनीला गरोदर पाहून त्याला धक्का बसतो. पुढे मेलोड्रामा, भाव भावनांचे चढ उतार, अशा अनेक गोष्टी घडत मालिकेचा शेवट गोड होतो. मालिकेमध्ये शुभंकरची बहीण व तिचं कुटुंब, अश्विनीच्या भावाचं कुटुंब अशी काही उपकथानकंही दाखवण्यात आली होती.
मालिकेमध्ये तुषार दळवी (शुभंकर), भार्गवी चिरमुले (नमिता), सई ताम्हणकर (अश्विनी), आशुतोष कुलकर्णी, स्मिता तांबे (किटी) मुख्य भूमिकेत असून मनोज कोल्हटकर, सीमा देशमुख, राहुल मेहंदळे, शुभांगी लाटकर, मिताली मयेकर आदी कलाकार महत्त्वपूर्ण भूमिकेत आहेत. (Memories of Anubandh Marathi serial)
मालिकेची संकल्पना वेगळी होती शिवाय ती वर्षभरातच संपवल्यामुळे मालिका विशेष लक्षात राहिली. ही मालिका बघायची असल्यास ती झी 5 या ओटीटी प्लाक्तफॉर्मवर उपलब्ध आहे.